रा. स्व.संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या १२५ व्या जयंतीवर्षांनिमित्त डॉ. श्रीरंग गोडबोले संपादित ‘युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार’ या विशेषांकाचे प्रकाशन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते पुण्यात  २६ मार्च रोजी होत आहे. संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी डॉक्टरांच्या कार्यपद्धतीची ओळख करून देणारा एक लेख १९५१ मध्ये लिहिला होता. त्या मूळ िहदी लेखाचा हा अनुवाद..
इंग्रजीमध्ये एक म्हण आहे -A hero is never a hero to his private servant. ‘दुरून डोंगर साजरे’ ही म्हणही सर्वाना ठाऊक आहे. एखादी व्यक्ती वा संस्था दुरून थोर वाटते; पण तिच्या जेवढे जवळ जावे तेवढी तिच्यातील वैगुण्ये ठाऊक होऊ लागतात. डॉ. हेडगेवार हे मात्र या नियमाला अपवाद होते. त्यांना लांबून पाहणारे लोक आश्चर्याने विचारत, की हा तुमचा अखिल भारतीय नेता आहे? डॉ. हेडगेवार यांना दुरून पाहिले असता त्यांचे अलौकिक व्यक्तिमत्त्व लक्षात येत नसे; पण त्यांच्याजवळ, त्यांच्या सहवासात राहिल्यावर मात्र त्यांचे मोठेपण लक्षात येई. खूप लोक त्यांना सर्वसाधारण माणूस समजून त्यांच्या संपर्कात येत असत आणि जाताना मात्र त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने भारावून जात असत. त्यांची िनदा करायच्या उद्देशाने जे येत असत, ते त्यांची स्तुतिस्तोत्रे गात परत जात असत, असा हा महापुरुष होता.
डॉक्टर हेडगेवार हे अत्यंत कुशल संघटक होते. त्यांच्या कार्यपद्धतीची तीन प्रमुख वैशिष्टय़े सांगता येतील. पहिले म्हणजे लोकसंग्रह. संघटना करावयाची याचाच अर्थ लोकसंग्रह करावयाचा. ही गोष्ट वरवर पाहता अत्यंत साधी व सोपी वाटते; पण ती तशी नाही. चार जणांना एकत्र करणे आणि त्यांना विशिष्ट विचारसरणीने संघटित करणे हे महाकठीण काम आहे. हल्ली तर विवाहित झाल्यावर भाऊ-भाऊ एकत्र राहत असले तर नवल वाटते! त्यांच्यात झगडे कसे होत नाहीत असा प्रश्न पडतो.
लोकसंग्रह एक शास्त्र आणि कलाही
लोकसंग्रह करणे हे एक शास्त्र आहे आणि ती एक कलाही आहे, असे डॉक्टर म्हणत असत. सर्वसाधारणपणे लोकांची अशी समजूत असते, की आपली विचारसरणी मांडली, तिचा भरपूर प्रचार केला, की आपोआप लोकसंग्रह होईल. परंतु हे एवढे सोपे काम नाही. डॉक्टर म्हणत असत, की स्वत: स्वयंसेवक हेच लोकसंग्रहाचे साधन आहे. त्यासाठी जाहीर भाषणे व प्रचाराचा उपयोग नाही. जाहीर प्रचारामुळे क्षणिक लोभ किंवा चळवळ उभी राहू शकेल. परंतु स्थायी स्वरूपाची संघटना त्याद्वारे उभी करता येणार नाही. यामुळेच लोकसंग्रह करू शकू या दृष्टीने प्रत्येक स्वयंसेवकाने आपली जडणघडण केली पाहिजे, असे डॉक्टरांचे सांगणे असे. या दृष्टीने त्यांनी स्वतचे व्यक्तिमत्त्व घडवूनही दाखवले होते. वास्तविक त्यांचा मूळचा स्वभाव अत्यंत तापट, जहाल होता. परंतु ही गोष्ट लोकसंग्रहाच्या आड येत आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी आपला तापट स्वभाव प्रयत्नपूर्वक सौम्य, शीतल बनवला. एकदा एका व्यक्तीने आमच्यादेखतच ‘संघ मुलांना चोऱ्या करायला शिकवतो’ असा आरोप केला. त्यावरही डॉक्टर रागावले नाहीत व त्यांनी शांतपणे त्याची समजूत काढली! रागावणे म्हणजे काय, हे जणू काही ते विसरूनच गेले होते! याप्रमाणे त्यांनी स्वतला लोकसंग्रहाच्या दृष्टीने घडवले. ‘मी शेवटी माणूसच आहे आणि माणूस म्हटला की तो चूक करणारच’ अशा प्रकारचे बोलणे त्यांना मान्य नसे. कधी चूक झाली, तरी नंतर ती सुधारणे, हे आपल्याच हातात आहे असे ते म्हणत. ‘मी जसा आहे तसाच राहीन, तुम्ही माझा या स्वरूपातच उपयोग करून घेतला पाहिजे’ असे म्हणणे त्यांना मान्य नव्हते. आपले दोष आपणच सुधारले पाहिजेत, असे त्यांचे मत होते.
डॉक्टरांनी आपला स्वतचा आदर्श घालून दिला आणि त्याद्वारे कित्येकांची जीवने उजळून टाकली. त्यांच्या मनात त्यांनी जबाबदारीची भावना जागवली. त्यामुळेच संघाला आज सर्वत्र यश मिळताना दिसत आहे. प्रारंभी संघशाखांमध्ये आमच्यासारखी पोरेटोरेच जात असत, ज्यांना थट्टेने शेंबडी पोरे म्हटले जायचे. त्यावेळी डॉक्टरांची टिंगल अनेक जण करत असत.  लोक म्हणत, की या पोरासोरांच्या बळावर तुम्ही अखिल भारतीय संघटना बांधणार का? आता मात्र या ‘शेंबडय़ा पोरांच्या’ बळावरच संघकार्य विविध प्रांतांमध्ये फैलावलेले दिसून येत आहे. याच कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्षेत्रांमध्ये महान आदर्श निर्माण केले आहेत. ‘संघाचे कार्यकत्रे अत्यंत श्रेष्ठ गुणवत्तेचे आहेत,’ असे संघाचे विरोधकही म्हणतात. त्यामुळेच ‘संघाचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवून काम करा,’ असा उपदेश विरोधकांचे नेतेही त्यांच्या कार्यकर्त्यांना देताना दिसतात. डॉक्टरांनी आपल्या स्वतच्या जीवनाचा आदर्श स्वयंसेवकांपुढे ठेवला आणि त्यांना उत्कृष्ट लोकसंग्राहक बनवले.
योग्य ते संस्कार आवश्यक
डॉक्टरांच्या कार्यपद्धतीचे दुसरे प्रमुख वैशिष्टय़ म्हणजे संस्कार. खूप लोकांना एकत्र केले आणि त्यांच्यापुढे भाषण दिले म्हणजे संघटना निर्माण होत नाही. लोकांना एकत्र केल्यावर त्यांच्यावर योग्य ते संस्कार करणे आवश्यक असते. असे संस्कार करता येण्यासाठी आपल्या व्यक्तिमत्त्वात तेवढे सामथ्र्य असावे लागते. संस्कार करण्यासाठीच डॉक्टरांनी शाखापद्धती सुरू केली. बऱ्याच लोकांची अशी समजूत आहे, की शाखा म्हणजे व्यायामशाळा आहे! डॉक्टरांची दृष्टी अशी नव्हती. त्यांनी शाखांवरील कार्यक्रमांची रचना संस्कार करण्याच्या दृष्टीने केली होती. शाखांवरील व संघाचे इतर कार्यक्रम बंद केले म्हणजे संघ संपुष्टात येईल असे बऱ्याच जणांना वाटते. पण संघातले कार्यक्रम हे केवळ कार्यक्रम करण्यासाठी नसतात. संघातले कार्यक्रम कोणतेही असले तरी चालतील; पण त्याद्वारे संस्कारक्षम वातावरण निर्माण झाले पाहिजे, असे डॉक्टरांचे प्रतिपादन होते. डॉक्टरांनी याच दृष्टीने अत्यंत प्रभावी आणि संस्कारक्षम वातावरण निर्माण होईल असे कार्यक्रम दिले. हे वातावरण एवढे प्रभावी होते व आहे, की त्यामुळे अनेक स्वयंसेवकांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन झाले व त्यांनी संघकार्यासाठी आपले सर्वस्व वाहिले. संघात माणूस जायला लागला, की व्यावहारिक दृष्टीने तो ‘वेडा’ होतो, असे म्हटले जाते. हे आपल्या संघातील वातावरणक्षमतेला मिळालेले प्रमाणपत्रच आहे! याच संस्कारक्षम वातावरणाने हिंदू समाजात प्रखर आत्मविश्वास जागृत केला आहे. या वातावरणाच्या आधारावरच संघाने आत्मकेंद्री, स्वार्थी जीवनाचे दुष्टचक्र भेदून टाकण्यात यश मिळवले आहे. हे वातावरण निर्माण करण्याचे श्रेय स्वयंसेवकांकडेच जाते. त्यांच्या वर्तनानेच त्यांच्या आसपास स्वार्थत्यागाचे वातावरण निर्माण होते. दिव्याने दिवा लावावा अशा प्रकारची ही उज्ज्वल परंपरा आहे आणि तिचा प्रारंभिबदू स्वत  डॉक्टरांचे त्यागमय, गुणसंपन्न जीवन हाच आहे.
स्नेहमय व मधुर संबंध
डॉक्टरांच्या कार्यपद्धतीचे तिसरे वैशिष्टय़ म्हणजे परस्परसंबंधातील निकटता अथवा स्नेहमय आत्मीयता. संघटना निर्माण होण्यासाठी संघटनेतील सदस्यांचे परस्परांमध्ये अत्यंत स्नेहमय व मधुर संबंध असले पाहिजेत असे डॉक्टर म्हणत असत. तत्पूर्वीच्या कोणत्याही संघटनेत अशा निकोप स्नेहसंबंधांची परंपरा नव्हती. हा पलू पूर्णपणे डॉक्टरांच्या प्रतिभेचे देणे आहे असे म्हणता येईल. समान विचारधारा असलेल्या कार्यकर्त्यांमध्येही अनेक वेळा तीव्र स्वरूपाची भांडणे, अगदी मारामाऱ्याही झालेल्या आपण पाहतो. केवळ समान विचार, समान ध्येय असले म्हणजे कार्यकत्रे गुण्यागोिवदाने कार्य करत राहतील असे मानता येत नाही, अनुभवही तसा नाही. त्यासाठी परस्परांमध्ये स्नेहभाव निर्माण करणे व तो वाढवणे आवश्यक आहे. डॉक्टरांनी या बाबीचे महत्त्व ओळखले होते. आज स्वयंसेवकांमध्ये जो आपसातील बंधुभाव दिसतो त्याची पायाभरणीही डॉक्टरांनीच केली.
स्वत डॉक्टर स्वयंसेवकांच्या कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये उत्साहाने व आनंदाने सहभागी होत असत. लग्नसराईच्या काळात तर त्यांना एकेका दिवशी पंधरा-वीस लग्नसमारंभांना जावे लागायचे. स्वयंसेवकांमधील व्यक्तिगत संबंध घनिष्ट आणि स्न्ोहपूर्ण असले पाहिजेत, याविषयी त्यांचा कटाक्ष होता आणि स्वत सरसंघचालक असूनही त्यांनी त्या दृष्टीने आदर्श घालून दिला होता. प्रत्येक स्वयंसेवक हा आपला मित्र असला पाहिजे आणि प्रत्येक मित्र हा स्वयंसेवक झाला पाहिजे असे ते म्हणत. अजूनही संघाचा एखादा स्वयंसेवक आजारी पडला की त्याला भेटायला इतके स्वयंसेवक जातात की घरच्या मंडळींनाही आश्चर्य वाटते!  डॉक्टरांनी घालून दिलेल्या आदर्शामुळेच आज स्वयंसेवकांमधील संबंध बंधुवत असतात.
डॉक्टरांनी संघकार्यात श्रमाच्या प्रतिष्ठेलाही महत्त्वपूर्ण स्थान दिले. संघाचे कोणतेही काम करताना स्वयंसेवकाला संकोच अथवा कमीपणा वाटत नाही, याचे कारण हेच आहे. प्रारंभीच्या काळात मोहिते    संघस्थानाची सफाई स्वत डॉक्टरांनीच केली होती.
संकल्पना बदलली
डॉक्टरांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रभावी व वैशिष्टय़पूर्ण होते. त्यांच्या उपस्थितीत बठक अत्यंत रोचक, हवीहवीशी वाटणारी असे. बठकीत हास्यविनोद होत असे, अनेक गोष्टी सांगितल्या जात आणि अशा खेळकर वातावरणातच डॉक्टर स्वयंसेवकांचे दोष हळुवारपणे दाखवून देत असत. प्रत्येक स्वयंसेवक हा निर्दोष, अधिकाधिक परिपूर्ण व्हावा व त्याद्वारे संघकार्यही निर्दोष व्हावे, असा त्यांचा प्रयत्न असे. त्यांचे संपर्काचे तंत्र अत्यंत प्रभावी होते. त्यांनी ‘स्वयंसेवक’ या शब्दाची संकल्पनाच बदलून टाकली. स्वयंसेवक म्हणजे देशभक्त, स्वयंसेवक म्हणजे सामाजिक कार्यकर्ता, स्वयंसेवक म्हणजे ध्येयवादी, समर्थ नेतृत्व असा अर्थ त्यांनी या शब्दात भरला, हे डॉक्टरांचे वैशिष्टय़ होते. त्यांचे स्मरण करताना, असे स्वयंसेवक जागोजागी निर्माण करण्याचे आपले व्रत आपण अधिक प्रखरपणे पुढे चालवले पाहिजे.(संदर्भ : ‘डाक्टरजी की कार्यपद्धति के तीन सूत्र’, साप्ताहिक ‘पांचजन्य’, १९५१. )                
अनुवाद : भालचंद्र जोशी