News Flash

अतूट मित्र (कै.) बंडोपंत गोखले

‘पत्रकार दि. वि. गोखले व्यक्तित्त्व आणि कर्तृत्व’ हा गौरवग्रंथ गोखले यांच्या स्मृतिदिनी (२० ऑक्टोबर) नवचैतन्य प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे.

| October 13, 2013 01:01 am

‘पत्रकार दि. वि. गोखले व्यक्तित्त्व आणि कर्तृत्व’ हा गौरवग्रंथ गोखले यांच्या स्मृतिदिनी (२० ऑक्टोबर) नवचैतन्य प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. नीला उपाध्ये यांनी संपादित केलेल्या या ग्रंथातील हा एक लेख.. दिविंच्या व्यक्तिमत्त्वाचे काही पैलू उलगडणारा..
धावत्या जीवनात अनेक गोष्टी सतत घडत असतात. पण काही वेळा अशी अकल्पित गोष्ट घडते की, ती जीवनाचा धागा बनून जाते. हीच गोष्ट बंडोपंत नि माझ्या संबंधात घडली. त्यांची माझी भेट अकल्पित झाली. पुण्याच्या स. प. कॉलेजच्या समोर ‘ग्रीन’ नावाचे हॉटेल होते. त्याच्यापासून चार हातांवर न्यू लकी रेस्टॉरन्ट होते. वीर सावरकरांनी निर्माण केलेल्या िहदुत्वाच्या प्रचंड लाटेत शेकडो तरुण ओढले गेले होते. इराणी हॉटेलात चहा पिण्यास जायचे नाही, हा विचार त्या काळात बळावत होता, तेव्हा आम्ही दोन-तीन मित्र ग्रीन हॉटेलमध्ये चहा पिऊन फूटपाथवर उभे होतो. आता निरोप घेण्याच्या तयारीत असतानाच दोन व्यक्ती समोर आल्या.
मला पाहताच एक परिचित म्हणाले, ‘‘पिलू (माझे प्रारंभीचे नाव) थांब! ओळख करून देतो. हा बंडू गोखले, आचार्य अत्रे यांच्या सावरकर-विरोधी प्रचाराला कसा बांध घालायचा, याबद्दलच्या आपल्यातील चच्रेची त्याला माहिती देत होतो.’’
‘‘आपण एक बैठक घेऊ आणि चर्चा करू.’’ मी सुचवले. पुढे दोन बठकी झाल्या आणि आठ-दहा दिवसांनी स. प. कॉलेजात अत्रे यांची सभा उधळण्याचा कार्यक्रम झाला. ‘माफी मागा’ हे अत्रे यांना सांगण्याचे काम मला देण्यात आले होते. सभेच्या घटनेची चटकदारपणे माहिती तोंडातोंडी गावभर झाली होती. पण आम्हा दोघांची नावे कुठेही छापली गेली नव्हती; आणि ती छापली जाऊ नयेत याची व्यवस्था (कै.) गणपतराव नलावडे करीत होते. पण शेवटी नावे छापली गेलीच. (कै.) बाळाराव सावरकरांच्या वीर सावरकर चरित्र खंडाच्या पहिल्या भागात अत्रे प्रकरणाची माहिती देताना मी आणि बंडोपंत यांची नावे छापण्यात आली. या गोष्टीचा उल्लेख यासाठी केला की, बंडोपंत आणि मी यांची जी मत्री तेव्हा झाली, ती ते दिवंगत झाले तेव्हाच संपली. अशा मत्र्या थोडय़ा असतात. नोकरी, इतर कामधंदा संपला की फोनदेखील बंद होणाऱ्या मत्र्याच अधिक!
त्यानंतर पुण्यात बऱ्याच सभा, चर्चा, सभा मोडण्याचे प्रसंग घडले. माझ्या स्मरणातील सभा ही रॉय पक्षाने गोखले हॉलमध्ये घेतलेली होती. सभेचा विषय होता-‘स्वयंनिर्णयाचा राज्याचा अधिकार?’ सभा मोडली याला कारण या विषयावर विरोधी भाषण करण्याला संचालकांचा विरोध. मला वाटते, सभेत बंडोपंत नव्हते, मीच अग्रक्रमावर होतो. पण सभा संपल्यावर गोखले नि मी, गोखले हॉलच्या बाहेर बोलत काही काळ उभे असल्याचे अस्पष्ट चित्र मनात दिसते..
कायद्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर मी बडोद्याला परत गेलो आणि गोखले यांचा संबंध सुटला. माझ्या जीवनाने निरनिराळे ओघ घेतले. शेवटी मी ‘द बॉम्बे क्रॉनिकल’ या संस्थेत उपसंपादक म्हणून दाखल झालो. त्यावेळी बंडोपंत ‘नवशक्ति’त काम करीत होते. अचानक आमची गाठ हुतात्मा चौकात पडली. चहा पिताना मधल्या काळातील गोष्टींचा उल्लेख झाला.
पुढे मी बेस्ट उपक्रमात जनता संपर्क अधिकारी म्हणून कामाला लागलो आणि बंडोपंत नवीन निघालेल्या ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये लागले. माझ्या कामाच्या निमित्ताने मला वृत्तपत्रांत फेऱ्या माराव्या लागत. साहजिकच बंडोपंतांकडे माझी थोडय़ा समयासाठी बठक होई. युद्ध, युद्धाचा इतिहास, सेनापतींची चरित्रे हे प्रामुख्याने चच्रेचे विषय असत. मग या धावत्या भेटीच्या काळात ्रसंपादक गोविंद तळवलकरही सामील होत. त्यांच्यामुळे भारतीय राजकारण हाही विषय असे.
पुढे आम्हा दोघांची भेट ‘िहदुस्थान समाचार’च्या कार्यालयात होऊ लागली. तेथे विद्याधर गोखले अधूनमधून येत. प्रत्येक शनिवारी ऑफिस संपले की घोगा स्ट्रीटवरच्या ‘समाचार’च्या कार्यालयात आम्ही जमत असू. त्यानंतर भेटीचे स्थान बदलले. मी एशियाटिक संस्थेचा सभासद होतो. पुढे गोखले, तळवलकर वगरेही सभासद झाले, तेव्हा शनिवारी हमखास तेथे बठक होऊ लागली. अर्थात् हवी असणारी नवी नि जुनी पुस्तके घेतल्यावर मग बठक व्हायची. गोखले-तळवलकर येतात, हे समजल्यावर इतरही आपली हजेरी तेथे थोडय़ा वेळासाठी लावत. एखादा चांगला इंग्रजी चित्रपट लागला तर तो प्रथम पाहण्यास जात असू. आम्ही तिघे असे वरचेवर बरोबर असल्याने काही लोकांनी आम्हाला चेष्टेने ‘थ्री मस्केटिअर्स’ असे नाव दिले होते.
१९६२च्या चिनी आक्रमणाने आम्ही दोघे अधिक जवळ आलो. कारण युद्ध हा आमचा हौसेचा विषय नि आम्ही दोघांनी त्यावर अधिक लिखाण केले. आमच्या दोघांचा निष्ठेचा विषय ‘वीर सावरकर’ होता. त्या संबंधीच्या दोन आठवणी. सावरकरांच्या अंत्ययात्रेत आम्ही दोघे सावरकर सदनापासून ते बॉम्बे सेंट्रल स्टेशनपर्यंत बरोबर आलो. येथे मी बंडोपंताना म्हणालो, ‘‘मी अधिक श्रम करू शकणार नाही.’’ बंडोपंत मात्र शेवटपर्यंत गेले. ‘विवेक’ची सावरकर पुरवणी काढण्याची कल्पना आमची! त्यात बाळशात्री हरदास, विद्याधर गोखले, बंडोपंत, मी, आणखी दोघेजण यांचे लेख होते.
१९६५ साली िहदुस्थान नि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले. तेव्हापर्यंत माझ्याकडे युद्धासंबंधीची बरीच पुस्तके जमली होती. माझ्या वाचनातून माझ्या मनात एक विचार दृढ होत होता. त्याचा प्रारंभ १९४०-४१ साली झाला होता. माझे मामा (कै.) गो. म. जोशी हे सनातनी पक्षाचे अग्रेसर नेते. ते अत्यंत विद्वान नि फर्डे वक्ते होते. ते सावरकरांची माझ्यासमोर चेष्टा करीत. सावरकरांनी एकदा त्यांच्या टीकेला उत्तर देताना (कै.) मामांचा उल्लेख ‘‘कोणी गोम्या सोम्या उठतो नि स्वत:ला समाजसंशोधक म्हणतो’’ असा केला होता. एक दिवशी त्यांच्याशी बोलत असताना मी मामांना विचारले, ‘‘िहदू संस्कृती इतकी श्रेष्ठ तर िहदूंचा रणांगणावर सतत पराभव कां झाला?’’ ते म्हणाले, ‘‘असे फालतू प्रश्न विचारू नकोस.’’ माझ्या ध्यानात आले की, या पंडिताकडे या प्रश्नाचे उत्तर नाही; कारण त्यांना युद्धासंबंधी काहीही ज्ञान नाही! मी डोळ्याने पाहत होतो की, जर्मनांकडील नवीन शस्त्रे नि अभिनव युद्धतंत्र यांच्या हल्ल्याखाली फेंच नि ब्रिटिश सन्ये उधळली गेली होती! धडा उघड होता.
१९६५या युद्धानंतर ‘नवशक्ति’च्या रविवारच्या अंकात ‘युद्धतंत्राची उपेक्षा’ ही लेखमाला लिहिली. पुढे बंडोपंत भेटले. ते मला म्हणाले, ‘‘लेखमालेचा ग्रंथ करा.’’ ते काम पुरे होण्यास पाच वष्रे लागली. पुस्तकाला प्रस्तावना कोणाची? बंडोपंत नि गोिवदराव तळवलकर यांनी (कै.)नानासाहेब गोरे यांचे नाव निश्चित केले. त्यांना विनंती करायला बंडोपंत, गोिवदराव नि मी असे गेलो. ते दोघे पुढे, मी पाठीमागे! (कै.) गोरे यांच्याशी प्रामुख्याने ते दोघेच बोलले. (कै.) गोरे यांनी प्रस्तावना लिहिण्याचे कबूल केले. बंडोपंतांनी ती मिळवली. एका आठवडय़ात माझा ‘भारतातील युद्धशात्राची उपेक्षा’ हा ग्रंथ महाराष्ट्रात ख्यातनाम झाला. इतका की, पं.महादेवशास्त्री जोशींच्या संस्कृती कोशात त्यातील सिद्धान्ताला स्थान मिळाले. महाराष्ट्र शासनाने त्याला पारितोषिक दिले.
असे माझे मित्र (कै.) बंडोपंत स्वत: उत्साही होते आणि दुसऱ्यातही उत्साह निर्माण करण्यात अग्रभागी होते. जितके लिहावे तितके थोडे!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2013 1:01 am

Web Title: article from the book patrakar d v gokhale vyaktimatva and kartutva
Next Stories
1 लेखकाने निर्भीडपणे लिहिलं पाहिजे…
2 भारतीय सत्त्वाचा शोध घेणारी चित्रकार
3 माझा ग्रंथसंग्रह नाही
Just Now!
X