गिरीश कुबेर

girish.kuber@expressindia.com

BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
What Kishori Pednekar Said About Raj Thackeray ?
किशोरी पेडणेकरांची राज ठाकरेंवर टीका; “दात पडलेला, नखं काढलेला, शक्तीहीन वाघ लोकांना..”
sangli lok sabha seat, nana patole, sanjay raut, congress, shivsena uddhav thackarey, lok sabha 2024, election 2024, maha vikas aghadi, conflict in maha vikas aghadi, maharashtra politics, maharashtra news, marathi news, sangli news, election news,
“संजय राऊत यांनी नाटके बंद करावी,” नाना पटोले यांचा सल्ला; म्हणाले, “त्यांनी छोट्या कार्यकर्त्यासारखे वागू नये…”
Sanjay Shirsat on Raj Thackeray GudhiPadva
राज ठाकरे आणि महायुतीमध्ये काय ठरलं? संजय शिरसाट म्हणाले, “यावेळी गुढीपाडवा मेळाव्यात…”

@girishkuber

हिंदुत्ववाद्यांनी नाकारलेला कार्यक्रम दिल्लीत घडवून आणणारे केजरीवाल स्वत: मात्र त्या व्यासपीठावर गेले नाहीत. पुरोगाम्यांना आपले वाटूनही दिल्लीतील त्यांची प्रतिमा ‘श्रावणबाळ’ अशीच राहिली. केजरीवाल उजवे, डावे की मध्यममार्गी, याचा अंदाज माध्यमांनाही अद्याप आलेला नाही.. हे राजकीय चातुर्य नवे आणि आजच्या काळास धार्जिणेसुद्धा..

अलीकडचा काळ हा नवउद्यमींनी- म्हणजे स्टार्टअप्स- घडवलेल्या नवनव्या उत्पादनांचा. उबर, एअर बीएनबी, पिंटरेस्ट, ड्रॉप बॉक्स.. किती सांगावीत? राजकारणाच्या क्षेत्रात अशा स्टार्टअप्ची उणीव होती. त्यातही यशस्वी म्हणता येईल असे स्टार्टअप् या क्षेत्रात नव्हते. ती पोकळी आम आदमी पक्षाने भरून काढली असे म्हणता येईल.

स्टार्टअप्सचे सर्व गुण ‘आप’ला लागू पडतात. स्टार्टअप्च्या कल्पनेत नावीन्य असते, त्याची मांडणी वेगळी असते आणि मुख्य म्हणजे कोणत्याही क्षेत्रातील स्टार्टअप् हे त्या क्षेत्रातील प्रस्थापितांना आपापल्या भूमिकांचा नव्याने विचार करायला लावते.

हे सर्व ‘आप’ने केले. मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधानकीच्या कार्यकाळात अण्णा हजारे आणि अन्य भाबडय़ांनी भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाच्या शिडीवरून मध्यमवर्गाच्या कल्पनाविश्वात प्रवेश केला. ही २०११ सालची गोष्ट. दिल्लीतील रामलीला मैदान हे अण्णांच्या उपोषण- वावडय़ांनी देशाच्या राजकारणाचे केंद्र बनलेले होते. या भ्रष्टाचार निर्मूलकांच्या रामलीला मदानावरील बाललीलांनी त्यावेळी डोके उठवले होते. त्या आंदोलनाने भ्रष्टाचार किती कमी झाला, हे आपण पाहतोच आहोत. पण काँग्रेसविरोधी राजकीय शक्तींचे छुपे समर्थन लाभलेल्या त्या आंदोलनामुळे किमान दोघांचे भले झाले. किरण बेदी आणि अरिवद केजरीवाल. हे दोघे अण्णांचे पट्टशिष्य. आपल्यापेक्षा आपले चेले किती सवाई आहेत, हे अण्णांना कळलेदेखील नाही.

‘आम आदमी पक्ष’ हा त्या रामलीला मदानावरील उपोषणक्रीडेचे फलित. सुरुवातीला त्यास देशभरातून तुफान प्रतिसाद लाभला. आपल्या देशात आपण स्वत: सोडून अन्य सर्व भ्रष्टाचारी आहेत, यावर ९९.९९ टक्के जनतेचे एकमत असते. त्यामुळे या भ्रष्टाचार निर्मूलनाच्या हाकेस सर्वच धावत ‘ओ’ देतात. पण निर्मूलन करायचे म्हणजे काय, याबाबत सगळाच अंधार. त्याचा फायदा घेत केजरीवाल यांनी आपले हे ‘आप’ नावाचे स्टार्टअप् बाजारात आणले. ही घटना २०१२ सालची. ‘आप’ची अधिकृत स्थापना त्या वर्षी झाली. देशात बदलाचे सोसाटय़ाचे वारे वाहू लागले होते आणि विद्यमान, प्रचलित राजकारण्यांपेक्षा आपल्या उद्धारासाठी नवे हरीचे लाल हवेत असे भारतीयांना वाटू लागले होते. त्या काळात अनेक राजकीय पक्ष जन्माला आले वा जन्मलेल्या राजकीय पक्षांत नवे नेतृत्व आले. उदाहरणार्थ, भाजपात नरेंद्र मोदी आले, महाराष्ट्रात त्याआधी जन्मलेला राज ठाकरे यांचा मनसे याच काळात स्थिरावला आणि ‘आप’चा प्रयोगही याच काळात सुरू झाला.

सुरुवातीला या ‘आप’ खेळात सहभागी होणाऱ्यांचा उत्साह ‘‘चला, आपण राजकारण.. राजकारण खेळू या’’ असाच बालीश होता. वागण्यात असा नवशिकेपणा आणि वर स्वत:बाबतचा नैतिक अहंकार. त्यामुळे या मंडळींना ऐकणे ही निव्वळ डोकेदुखी. आपण सोडून सर्वजण चोर असाच त्यांचा आविर्भाव होता. तेव्हा अर्थातच त्यांना टीकेचे धनी व्हावे लागले. प्रस्तुत लेखकासह अनेकांनी त्यावेळी ‘आप’ने मांडलेला उच्छाद आणि त्यांचा बालीशपणा दाखवून दिला. प्रस्थापित राजकीय पक्षांपेक्षा त्यांना वेगळे काही करून दाखवायचे होते. पण काय आणि कसे, या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे नव्हती. आणि तरीही प्रस्थापित मात्र सारे चोर असा त्यांचा दावा होता. वेगळे काही करू इच्छिणाऱ्यांस सहानुभूती वा कुतूहल या कारणांनी पाठिंबा देणारे आपल्याकडे थोडेफार आसपास असतातच. लोकसंख्याच इतकी प्रचंड आहे आपली; तेव्हा हे अशांचे असणे साहजिक. त्यांच्या पाठिंब्यावर ‘आप’ टिकून राहिला. पण यथावकाश अन्य पक्षांप्रमाणे पक्षफुटी, भ्रष्टाचाराचे आरोप, लैंगिक शोषणाच्या तक्रारी वगैरे सर्व काही त्यांच्याबाबत घडले आणि आपदेखील अन्य राजकीय पक्षांप्रमाणे ‘आपल्यातला’ झाला.

त्यानंतरचा केजरीवाल यांचा प्रवास हा त्यांचे स्वप्नाळू आणि कंठाळी कार्यकर्त्यांतून अव्वल राजकारण्यात झालेले रूपांतर दर्शवतो. प्रस्थापित राजकारणाच्या खेळाच्या नियमबदलाची भाषा करत करत केजरीवाल यांनी त्याच राजकारणाच्या नियमांत बघता बघता प्रावीण्य मिळवले आणि अभूतपूर्व म्हणता येईल अशी सलग तीन वेळा सत्तेवर येण्याची कामगिरी नोंदवली. त्याची सुरुवात झाली अण्णांचा हात सोडून देण्याने. यापुढच्या आपल्या राजकारणात अण्णा हे अडथळा ठरतील याचा अंदाज आल्यावर केजरीवाल यांनी कोणताही भावनिक घोळ घातला नाही. ‘आप’ला त्यांनी अण्णांपासून विलग केले. हे चतुर राजकारण्याचे लक्षण. फक्त अण्णांची त्यांनी ‘सल्लागार मंडळ’ अध्यक्षपदी नियुक्ती केली नाही, इतकेच काय ते. पण त्यातून आपच्या फुलपाखराचे राजकीय पक्षाच्या  सुरवंटात सुखेनव रूपांतर झाल्याचा रास्त संदेश सर्वत्र गेला. ‘आप’ हे स्टार्टअप् रुजल्याचेच हे द्योतक. या प्रक्रियेत घडत गेलेला बदल तपासणे मनोरंजक आणि उद्बोधकदेखील आहे.

पहिला बदल म्हणजे आपने अलगदपणे भ्रष्टाचार हा मुद्दा सोडला. भ्रष्टाचाराइतका लवचीकपणा अन्य कोणत्याही मुद्दय़ात नाही. थेट जनतेच्या हृदयातच जाण्याची ताकद या मुद्दय़ात आहे. तो वापरून प्रस्थापितांस खाली खेचून स्वत: प्रस्थापित होता येते, हे आसपासच्या अनेक जिवंत उदाहरणांवरून कळेल. बरे, यात करायचे असे काहीच नसते. फक्त अमुक एखादा भ्रष्ट आहे, त्याने यात भ्रष्टाचार केला, त्यात पैसे खाल्ले अशा आरोपांचा जप सातत्याने करायचा. जनता आपोआप विश्वास ठेवते. आणि ही जनताही इतकी दयाळू, की पुढे या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे वगैरे काय झाले, असे काहीही विचारत नाही. (पाहा : बोफोर्स, दूरसंचार, कोळसा इत्यादी घोटाळे (?)) तेव्हा सत्ता मिळाली की हे मुद्दे सोडून द्यायचे असतात, हे शहाणपण केजरीवाल यांना लगेचच आले. त्यामुळे ते त्यापासून पुढे गेले.

दुसरे म्हणजे केजरीवाल अजिबात माध्यमांच्या नादी लागले नाहीत. माध्यमांना साच्यातले गणपती फार आवडतात आणि ते लवकर दिसतात. त्यामुळे त्यांची मापे काढायची त्यांना सवय असते. आपली ही अशी मापे निघणार नाहीत याची पुरेपूर काळजी केजरीवाल यांनी घेतली. त्यांनी माध्यमांचा वापर केला. माध्यमांना स्वत:स वापरू दिले नाही. केजरीवाल डावे की उजवे की मिश्र हे म्हणूनच माध्यमांना अद्यापि निश्चित करता आलेले नाही. उजवीकडचे आणि डावीकडचे अशा दोन्हीकडच्यांना या अशा चर्चात रस असतो. तसे करणे माध्यमांसाठी सोपे असते. आणि ही बाब एकदा का नक्की झाली, की हा आपल्यातला की ‘त्यांच्या’तला हे सहज ठरवता येते. पुरोगामी आणि उजवे अशा दोघांनाही याचा फार सोस. यात चांगला-वाईट ठरवणे अवघड. पुरोगामी आणि प्रतिगामी दोघेही तितकेच घातक.

केजरीवाल यांनी स्वत:ला या दोघांतील एकात अडकून घेणे कसोशीने टाळले. प्रस्थापित व्यवस्थेविरोधात खणखणीत भूमिका घेणारा दाक्षिणात्य गायक टी. एम. कृष्णा याच्या कार्यक्रमास हिंदुत्ववाद्यांनी आक्षेप घेतल्या घेतल्या या कार्यक्रमाचे यजमानपद स्वीकारण्याची तयारी केजरीवाल यांनी दाखवली. कृष्णा हे सध्या नरेंद्र मोदी आणि वाढता अतिरेकी धर्मवाद यावर दणकून बोलतात. इंग्रजी प्रसार माध्यमांच्या गळ्यातील ताईतच आहेत ते. त्यामुळे केजरीवाल यांनी त्यांना सन्मानाने बोलावल्याबरोबर अशी माध्यमे, समाजमाध्यमे यांना एकदम भरतेच आले. पण केजरीवाल यांचे चातुर्य हे की, त्यांनी हा मुद्दा अजिबात मिरवला नाही. म्हणजे त्यांनी पुरोगामी व्यासपीठावर जाणे कटाक्षाने टाळले. एकदा का ते पुरोगामी म्हणवून घेणाऱ्यांच्या कळपात शिरते, तर एक वर्ग त्यांच्यापासून दुरावता. तो धोका केजरीवाल यांनी पत्करला नाही.

इतकेच नव्हे तर दिल्लीत इतके दिवस शाहीनबाग धगधगते आहे. पण केजरीवाल तिकडे एकदाही फिरकलेले नाहीत. पण याचा अर्थ ते या मुद्दय़ावर भाजपच्या बाजूचे आहेत असा अजिबात नाही. उलट, केजरीवाल निवडून यावेत यासाठी शाहीनबागेतल्या आंदोलनकारी महिला त्यांचे त्यांचे देव पाण्यात घालून बसल्या होत्या. म्हणजे त्यांना केजरीवाल हे आधारच वाटतात. पण म्हणून केजरीवाल यांनी आपल्याला शाहीनबाग आंदोलनाविषयी ममत्व आहे असे एकदाही दाखवून दिलेले नाही.

हे केजरीवाल चातुर्य इतक्यापुरतेच मर्यादित नाही. ‘जेएनयू’वरून दिल्लीत इतके काय काय घडले, पण केजरीवाल यांनी या विद्यापीठात पाऊलदेखील टाकलेले नाही. त्यामुळे या विद्यापीठातल्या कथित ‘टुकडे टुकडे’ टोळ्यांशी त्यांचा काही संपर्कच आलेला नाही. परिणामी भाजपची पंचाईत अशी की, केजरीवाल यांना देशद्रोही ठरवण्यासाठीच्या हुकमी कारणाने भाजपास हुलकावणी दिली. निवडणुकीच्या काळातही ही ‘टुकडे टुकडे’ गँग आपल्या प्रचारात दिसणार नाही, याची पुरती खबरदारी केजरीवाल यांनी घेतली. पण तरी ही ‘टुकडे टुकडे’ गँग केजरीवाल यांना आपल्यातीलच एक मानते.

यात विरोधाभास असा की, केजरीवाल यांची प्रतिमाच मुळी दिल्लीतील ‘श्रावणबाळ’ अशी आहे. कारण दिल्लीतल्या श्रद्धाळूृ ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांनी फुकट देवदर्शन यात्रा आयोजित केल्या होत्या. या यात्रेत हिंदू, जैन, शीख.. इतकेच काय, पण इस्लामधर्मीयांची धर्मस्थळेदेखील आहेत. म्हणजे हा त्यांचा सर्वधर्मसमभाव! आपल्याकडे ‘सेक्युलर’ या शब्दाच्या अर्थातच गोंधळ आहे. पण केजरीवाल यांनी तो आपल्यापुरता तरी सोडवला. त्यामुळे ते सर्वधर्मीयांचे सोहोळे तितक्याच उत्साहाने साजरे करतात. यात खचितच पुरोगामित्व नाही. पण या सव्वाशे कोटींच्या देशात खरे नास्तिक मोजायला एका-दोघांच्या हाताची बोटे पुरतील हे केजरीवाल जाणतात. त्यामुळे स्वत:ला सश्रद्ध दाखवण्याचे राजकीय महत्त्व त्यांना ठाऊक आहे. म्हणूनच देवस्थानांच्या परिक्रमा करण्यात केजरीवाल यांना काही वाटत नाही.

या मुद्दय़ावर राहुल गांधी यांची जी काही त्रेधातिरपीट उडाली आहे ती पाहता केजरीवाल यांचा शहाणपणा चतुर ठरतो. आपण कसे जानवेधारी ब्राह्मण आहोत, हे सिद्ध करण्यासाठी राहुल यांना चारधाम यात्रा करावी लागली. याउलट असे काहीही न करता केजरीवाल हिंदूंनाही आपले वाटले, वाटतात आणि अल्पसंख्याकांनाही परके वाटत नाहीत. या त्यांच्या चातुर्याचा परिणाम भाजप वैफल्यग्रस्त होण्यात झाला, हे अनेकांच्या ध्यानातही आले नसेल. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ते परवेश वर्मा अशा अनेकांना मदानात उतरवूनही हे सर्व केजरीवाल यांना अिहदू वा मुसलमान-धार्जणिे ठरवू शकले नाहीत. ही बाब लक्षात घेणे महत्त्वाचे.

हे सर्व निवडणूक-नाटय़ पाहिल्यावर पश्चिम आशियातील तेलसंघर्षांची आठवण आली. त्यातील अन्य तपशील येथे अनावश्यक ठरेल. पण तो तिढा जेव्हा सुटेना तेव्हा त्यात मध्यस्थीस उतरलेले हेन्री किसिंजर यांचे एक विधान खूप गाजले : Oil is too precious to be left to Arabs. ‘खनिज तेल हा घटक इतका महत्त्वाचा आहे की तो केवळ अरबांहाती सोडून चालणार नाही.’

यात तेलाच्या जागी ‘हिंदू धर्म’ आणि अरबांच्या जागी कोणत्याही राजकीय पक्षाला घातले की या विधानाचे भारतीयत्व पटेल. कोणा एका राजकीय पक्षाच्या दावणीला बांधला जावा वा त्या पक्षाकडे मालकी द्यावी इतका हिंदू धर्म हा लहान नाही.

अनेक प्रस्थापित उद्योगांना नवउद्यमी बरेच काही शिकवून जातात. आप या राजकीय नवउद्यमीने काँग्रेस, भाजपसह सर्व डाव्या/ उजव्या पक्षांना आपल्या यशातून घालून दिलेला हा धडा आहे. त्यातून हे राजकीय पक्ष शिकतील.. ही आशा. कारण Religion is too precious to be left to any political party.