सुनील लिमये

apccfwlmumbai@mahaforest.gov.in

अलीकडेच एका वाघाने तब्बल १६०० कि. मी. इतका प्रदीर्घ प्रवास केल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे. वाघ स्थलांतर का करतात? त्यामागची कारणे काय? त्यांच्या स्थलांतरणामुळे वाघ आणि मनुष्य यांच्यात संघर्ष अटळ आहे का? यावर उपाय काय? या प्रश्नांचा ऊहापोह करणारे लेख..

अलीकडेच वाघाबाबत घडलेल्या एका घटनेने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. ‘टी१सी१’ हा वाघ १६०० कि. मी.चा प्रवास करून पुन्हा ज्ञानगंगा अभयारण्यात पोहोचला. चंद्रपूरहून तो आधी अमरावती व अमरावतीवरून मध्य प्रदेशातील सातपुडा येथे जवळपास ४०० कि. मी.चे अंतर कापून पोहोचला.. ही ती घटना. अशाच आणखीही काही घटना याआधीही घडलेल्या आहेत. आपला अधिवास सोडून वाघांनी केलेल्या अशा भ्रमणाबाबत सामान्य माणसाला अनेक प्रश्न पडतात. त्यांची उत्तरे मिळवण्यासाठी अशा स्थलांतरणाचा सांगोपांग विचार करणे महत्त्वाचे आहे.

‘ई१ ही वाघीण ब्रह्मपुरी सोडून बाहेर पडल्याने तिला पकडून मेळघाटमध्ये डोलार येथील जंगलात मुक्त करण्यात आले. परंतु तेथे संघर्ष होऊ  लागल्याने तिला पुन्हा पकडून गोरेवाडा येथे आणले..’, ‘ ई३ वाघ ब्रह्मपुरीच्या जंगलात दिसतो आहे..’, ‘ ई४ वाघ नुकताच गडचिरोलीमध्ये दिसला..’ अशा बातम्या ऐकताना परग्रहावरील विचित्र प्राणी तर आपल्याकडे हिंडत नाहीत ना, असा सर्वसामान्यांचा समज होतो. परंतु तसे काही नसून वन विभागाने वन व वन्यजीव संवर्धनासाठी केलेल्या प्रयत्नांची ही निष्पत्ती आहे. महाराष्ट्रात वाघांच्या संख्येत होत असलेल्या वाढीमुळे तरुण नर वाघ वा वाघीण त्यांच्या अधिवासासाठी स्थलांतरित होत आहेत. या अशा तरुण वाघांच्या स्थलांतराच्या बातम्या वर्तमानपत्रांतून येतात तेव्हा वन्यजीवप्रेमी आनंदित होतात. परंतु ही भविष्यातील मानव-वाघ यांच्यातील संघर्षांची नांदी तर नाही ना, या विचाराने सामान्यजन भयभीत होतात. सन २०१४ साली १९० इतकी असलेली महाराष्ट्रातील वाघांची संख्या आज ३१२ वर पोहोचली आहे. यात दोन वर्षांपर्यंतच्या बछडय़ांचा समावेश केलेला नाही. मोठे होणारे वाघाचे बछडे हे आपल्या निश्चित अशा अधिवासासाठी आणि सहचारिणी वा सहचर मिळवण्यासाठी नव्या जागेच्या शोधार्थ बाहेर पडतात तेव्हा स्थलांतरण व पर्यायाने अकस्मात घडणाऱ्या अपघाती मानव-वन्यजीव संघर्षांच्या काही घटना घडून येतात.

गेल्या वर्षभरात वाघांच्या स्थलांतरणाची अशी काही प्रकरणे उजेडात आली आहेत. त्यातील सर्वात मोठे म्हणजे ‘टी१सी१’चे स्थलांतर. यवतमाळ जिल्ह्य़ातील केळापूर तालुक्यातील पांढरकवडा येथील सुमारे १४८ कि. मी.च्या क्षेत्रात पसरलेल्या टिपेश्वर अभयारण्यातील टी१च्या दुसऱ्या पिल्लावळीतील तीन पिल्ले- म्हणजेच ‘टी१सी१’, ‘टी१सी२’ आणि ‘टी१सी३’ हे तीन बछडे. ते अडीच वर्षांचे असताना फेब्रुवारी २०१९ मध्ये त्यातील सी१ व सी३ या दोन तरुण वाघांना डेहराडूनच्या भारतीय वन्यजीव संस्थानाच्या मदतीने ‘रेडिओ कॉलर’ लावण्यात आली. सी२ या नर बछडय़ाला काही कारणास्तव ती लावता आली नाही. आज हा बछडा टिपेश्वर अभयारण्यातीलच माथणी नियतक्षेत्रात त्याच्या अधिवासात रमलेला आहे. तर सी३ हा नर बछडा पैनगंगा अभयारण्यात काही कालावधीपूर्वी दिसून आला. या तीन भावंडांपैकी खरी कमाल केली ती सी१ या नर बछडय़ाने- जो काही दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्य़ातील ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये त्याच्या १६०० कि. मी.पेक्षा जास्त प्रवासानंतर परत पोहोचला आहे.

महाराष्ट्राने हा जो वाघांच्या सनियंत्रणाचा प्रयोग- म्हणजे ‘रेडिओ कॉलर’ लावून त्यांच्या भ्रमंतीचा माग घ्यायला सुरुवात केली आहे, तसा प्रयोग भारतात थोडय़ाफार ठिकाणीच होत आहे. हे वाघ स्थलांतर का करीत आहेत? त्याचे सोपे उत्तर म्हणजे- आपल्या वन्यजीव संवर्धनाच्या प्रयत्नांमुळे वाघांची संख्या वाढली असून त्यातील मोठय़ा होणाऱ्या वाघांना, विशेषत: नर वाघांना त्यांच्या हक्काच्या स्वतंत्र जागा किंवा अधिवास निश्चित करण्यासाठी दूरवर भ्रमण करावे लागते.

सध्याची स्थलांतरे पाहता ज्या ठिकाणी गेल्या काही दशकांपूर्वी वाघांचे अस्तित्व होते (उत्तर मराठवाडा, गडचिरोली व खानदेश) अशा प्रदेशाकडे हे वाघ स्थलांतर करीत आहेत. या सगळ्या प्रवासात त्यांचा मनुष्याशी (हिंगोलीतील घटना व इतर काही ठिकाणचा अपवाद वगळता) कोठेही मोठा संघर्ष झालेला नाही. मानवाशी संघर्ष करण्याची वाघांची इच्छा नसते. फक्त त्यांना त्यांचा अधिवास शोधताना माणसाकडून त्रास होणार नाही, हे पाहणे गरजेचे आहे. स्थलांतराची अशी उदाहरणे आपल्याला चंद्रपूर जिल्ह्य़ात आढळून येतात. ब्रह्मपुरी जंगलातील टी४९ या वाघिणीच्या ई१, ई२, ई३, ई४ या तरुण मादी बछडय़ांना ‘रेडिओ कॉलर’ करण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे भारतीय वन्यजीव संस्थानाच्या मदतीने फेब्रुवारी २०१९ मध्ये तीन दिवसांत ई१, ई२ आणि ई४ या मादी बछडय़ांना ते साधारणत: दोन वर्ष वयाचे असताना ‘रेडिओ कॉलर’ लावण्यात आली. ई२ हा बछडा मात्र हाती लागला नाही. परंतु आज ब्रह्मपुरीमध्ये हा ई२ नर त्याच्या अधिवासाच्या शोधात आहे. ई३ ही मादीदेखील ब्रह्मपुरीमध्ये दिसत असून, ई४ या मादीने मात्र गेल्या दोन महिन्यात तिचा कोणताही ठावठिकाणा लागू दिलेला नव्हता. परंतु तिच्या अंगावरील पट्टय़ांवरून ती गडचिरोलीमध्ये दिसल्याचे काही वन्यजीवप्रेमींचे म्हणणे आहे. यातील ई१ ही मादी मात्र अधिवासाच्या शोधात ब्रह्मपुरीवरून चंद्रपूरला पोहोचल्यावर दुर्दैवाने मनुष्याशी झालेल्या तिच्या संघर्षांत दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. असा अपघाताने मानवाशी होणारा दुर्दैवी संघर्ष वाढू नये म्हणून तिला जेरबंद करून मेळघाटमधील डोलारच्या जंगलात जुलै २०१९ मध्ये सोडण्यात आले. तेथेही ती अधिवास व सहचर शोधत होती असे दिसते. परंतु ब्रह्मपुरीच्या सपाट मैदानी जंगलातून तिथे गेलेल्या या वाघिणीला कदाचित मेळघाटचा डोंगराळ प्रदेश पचनी पडला नसावा. त्यामुळे तिचा काही ठिकाणी मानवाशी संघर्ष झाला. हा संघर्ष वाढू नये म्हणून तिला पुन्हा जेरबंद करून सप्टेंबर २०१९ मध्ये गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात आणावे लागले. आज ब्रह्मपुरी परिसरातील सुमारे १२०० चौ. कि. मी. जंगलात ४५ च्या आसपास वाघ आहेत व १५ पेक्षाही जास्त बछडे आहेत. या बछडय़ांना नजीकच्या कालावधीत आपला अधिवास शोधावा लागणार आहे. त्यातून त्यांचे तिथून इतरत्र स्थलांतर होणार, हे निश्चित.

संरक्षित क्षेत्रातही अशा वाघांना ‘रेडिओ कॉलर’ लावण्याचा प्रयोग झाला आहे. मे २०१८ मध्ये ताडोबामधील ‘छोटी तारा’ या वाघिणीच्या दोन नर पिल्लांना ‘रेडिओ कॉलर’ लावण्यात आल्या होत्या. त्यातील एक नर बछडय़ाला दुर्दैवाने शेतीच्या बांधावरील कुंपणाच्या विजेच्या तारेचा स्पर्श झाल्याने तो मृत्युमुखी पडला. मात्र, ‘छोटा मटकासूर’ हा दुसरा बछडा ताडोबा जंगलातच आपल्या अधिवासाच्या शोधात आहे. ताडोबातील प्रसिद्ध ‘माया’ वाघिणीच्या दोन बछडय़ांचे क्षेत्रिय कर्मचाऱ्यांकडून ‘रेडिओ कॉलर’शिवाय सनियंत्रण करण्यात येते. दुर्दैवाने त्यातील एक मादी बछडा गव्याशी झालेल्या झुंजीत मृत्युमुखी पडला, तर नर बछडा मात्र आज ताडोबा ते पेंच हा जो वाघाचा भ्रमणमार्ग आहे, त्या मार्गावरून उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात पोहोचला आहे. ताडोबाच्या गाभा क्षेत्रातील महालगांव या जुनोनाजवळील परिसरातील ‘लारा’ नावाच्या वाघिणीच्या तीन बछडय़ांना मे २०१९ मध्ये ‘रेडिओ कॉलर’ बसविण्यात आली होती. त्यापैकी एका बछडय़ाची ‘कॉलर’ पडली असून उर्वरित दोन्ही बछडे ताडोबात त्यांचा अधिवास शोधत फिरत आहे. महाराष्ट्रात मेळघाट, पेंच, नवेगाव-नागझिरा, ताडोबा-अंधारी हे व्याघ्र प्रकल्प, उमरेड-कऱ्हांडला, टिपेश्वर, बोर ही अभयारण्ये, तर ब्रह्मपुरीचा परिसर ही वाघांचा संचार असलेली महत्त्वाची ठिकाणे आहेत. येथील वाघांची संख्या वाढत जाते तेव्हा नवीन वाघ काही काळानंतर त्यांच्या माता-पित्याच्या अधिवासात राहत नाहीत. माता-पित्याची जागा बळकावणे किंवा नवीन जागेचा शोध घेणे यापैकी एक पर्याय ते निवडतात. आज त्यांच्या स्थलांतरासाठीच्या संभाव्य जागांचा विचार करता महाराष्ट्रातील गडचिरोली येथील जंगल हे अत्यंत चांगले जंगल आहे. या जिल्ह्य़ातील सुमारे ८० टक्के भूभाग जंगलाखाली आहे. ताडोबाच्या अगदी जवळ असलेला हा भाग वाघांच्या उत्तर ते दक्षिण अशा भ्रमणमार्गातील असून येथील जंगलविस्ताराचा विचार करता सुमारे १०० वाघ या अधिवासात राहू शकतात. गडचिरोली जिल्ह्य़ातील आलापल्ली विभागातील चपराळा अभयारण्य हे सुमारे १३५ चौ. कि. मी.वर पसरले असून येथेसुद्धा ताडोबातील वाघ स्थलांतरित होण्याची शक्यता आहे. परंतु शिकारीपासून संरक्षण व मानवाशी त्यांचा होऊ  शकणारा संभाव्य संघर्ष टाळणे अत्यंत जरुरीचे आहे.  नवेगाव-नागझिरा हे सुमारे ६५४ चौ. कि. मी. क्षेत्रावर पसरलेले वाघांसाठीचे अभयारण्य असून २०१४ च्या कॅमेरा ट्रॅपमध्ये येथे सहा वाघ आढळून आले होते. त्यामुळे या जंगलात अधिवासासाठी नवीन वाघांना जास्त संधी आहे. तसेच हे क्षेत्र कान्हा व ताडोबा  क्षेत्राशी जोडल्या जाणाऱ्या भ्रमणमार्गावरील आहे.  वाघ स्थलांतरित होऊ  शकतात असे आणखी एक क्षेत्र म्हणजे सुमारे ३२५ चौ. कि. मी.वर पसरलेले यवतमाळ जिल्ह्य़ातील पैनगंगा अभयारण्य. यवतमाळमधील टिपेश्वर अभयारण्यातही वाघांची संख्या चांगलीच वाढते आहे. तेलंगणामधील कावल व्याघ्र प्रकल्प हे येथील वाघांना स्थलांतरित होण्यासाठीचे एक अत्यंत उत्तम क्षेत्र आहे. वाघांना स्थलांतरित होण्यासाठी आणखी एक चांगला प्रदेश म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्प. सुमारे १४१८ चौ. कि. मी. क्षेत्रावर पसरलेला हा व्याघ्र प्रकल्प असून दक्षिणेकडील वाघांना कर्नाटक, गोवा येथून तिलारी- राधानगरीमार्गे या क्षेत्रात स्थलांतरीत होण्यासाठी एक उत्तम मार्ग आहे.

एकदंरीतच वाघांचे स्थलांतर हे सुरळीतपणे पार पडू शकते. परंतु त्याआधी ते स्थलांतर का करतात व ते का गरजेचे आहे, हे आपण समजून घेणे गरजेचे आहे. वाघांचे हे स्थलांतर दाखवून देते की, संरक्षित क्षेत्रे वा ब्रह्मपुरीसारखे क्षेत्र-  जेथे वनक्षेत्राबरोबरच वनेतर क्षेत्रात वाघांची संख्या वाढते आहे. येथे वाघांच्या जन्माचे प्रमाण हे त्यांच्या मृत्यूच्या प्रमाणापेक्षा जास्त असते. त्यांचा एक ‘सिंक एरिया’ असतो. त्या क्षेत्रात वाघांच्या मृत्यूचे प्रमाण त्यांच्या जन्माच्या प्रमाणापेक्षा जास्त असते. ‘सोस एरिया’तून ‘सिंक एरिया’कडे वाघांचे स्थलांतर अत्यंत गरजेचे असते व त्यासाठी अशा क्षेत्रांना जोडणारे  भ्रमणमार्ग शोधणे व ते संरक्षित करणे ही आपली जबाबदारी आहे.

सी१ हा वाघाचा बछडा जेव्हा हिंगोलीत त्याच्या अधिवासाच्या शोधात फिरत होता, तेव्हा सुकडी गावातील लोकांनी अतिउत्सुकतेपोटी वाघाची छायाचित्रे काढण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे कदाचित त्यांना वाघाकडून जखमी व्हावे लागले होते. परंतु असले संघर्षांचे कटू प्रसंग टाळणे हे आपल्याच हाती आहे. त्यामुळे सी१ या नर वाघ बछडय़ाने त्याच्या प्रदीर्घ प्रवासात हे दाखवून दिले आहे की, स्वत:साठी अधिवास शोधताना वाघ शक्यतो मानवाच्या संपर्कात न येण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे त्यांच्या स्थलांतरणास मदत करताना त्यांचे भ्रमणमार्ग व अधिवास सांभाळणे हे वन्यजीव संवर्धन करणाऱ्या यंत्रणांसमोर मोठे आव्हान आहे. वन्यजीव व वाघांचे संवर्धन, वाघांचे अधिवास शोधण्यासाठी होणारे स्थलांतर व त्यांच्या भ्रमणमार्गातील अडथळे दूर करण्यासाठी वन विभाग व स्थानिक ग्रामस्थांनी करावयाचे प्रयत्न अतिशय महत्त्वाचे असतात. वाघांच्या अशा प्रकारे होणाऱ्या स्थलांतरणामुळे मानव-वन्यजीव यांच्यातील संघर्ष वाढेल, ही भीती बाळगण्याचे कारण नाही. मात्र, आपणही व्याघ्र संवर्धनाच्या दृष्टीने थोडासा समजूतदारपणा व सहनशीलता दाखविणे जरुरीचे आहे

(लेखक भारतीय वन सेवेत अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक-वन्यजीव (पश्चिम, मुंबई) म्हणून कार्यरत आहेत.)