नारायणभाई देसाई गेली अनेक वर्षे चक्षुर्वैसत्यम अशी गांधींची जीवनगाथा ‘गांधीकथा’च्या माध्यमातून उलगडून दाखवतात. २ ऑक्टोबर ही गांधी जयंती. त्यानिमित्ताने या कार्यक्रमाविषयीचा हा विशेष लेख.

कथा-कीर्तन हा आपल्या लोकजीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. तो नवनवीन रूपे घेत असला तरी प्रामुख्याने गोष्ट आणि गाणी या माध्यमांतून वीरपुरुषांची आणि दैवी समजल्या जाणाऱ्या अवतारांची कहाणी आपण ऐकत असतो. शिवरायांचे किंवा बाबासाहेब आंबेडकर यांचे पोवाडे गायले जातात आणि आवडीने ऐकले जातात.

lokrang article, Maharshi Vitthal Ramji Shinde, maharshi shinde centenary golden jubilee year, prarthana samaj, centenary golden jubilee year, bramho samaj, depressed classes mission society, Asprushata Niwaran Parishad, Bhartiya Asprushyatecha Prashna, work for depressed class, maharshi vitthal ramji shinde, 23 april 2024, reformer,
निमित्त : समर्पित समाजसुधारक
Rashmi Thackeray in Thane for Chaitra Navratri festival
ठाण्यात चैत्र नवरात्रौत्सवासाठी रश्मी ठाकरे उपस्थिती… ठाकरे गटाचे शक्तीप्रदर्शन
sanjay ruat and shrikant shinde
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये गैरव्यवहार? संजय राऊतांची थेट मोदींकडे तक्रार; म्हणाले, “बिदागीच्या रकमा…”
thane lok sabha seat, BJP s Sanjeev Naik, Launches Campaign in Thane, Emphasizes Charitable Birthday Celebration, sanjeev naik in thane lok sabha, mahayuti, shinde shivsena,
वाढदिवसाच्या निमित्ताने संजीव नाईक यांची मतपेरणी

रामकथा तर देशभर उत्साहाने सांगितली जाते. वाल्मीकीच्या प्रतिभेतून निर्माण झालेल्या रामायणाला अनेक भाषांतील कवींनी वेगळे साज चढवले. एकनाथ-रामदास मराठीत किंवा दक्षिणेत केबनसारख्या अनेक कवींनी वेगवेगळी रूपे दिली. तुलसी रामायण तर उत्तरेत प्रत्येकाच्या ओठावर आहे. कृष्णाच्या कथा शास्त्रीय संगीताच्या बंदिशींतून, कथ्थक ओडिसीसारख्या नृत्यप्रकारांतून, लावणी-तमाशा, प्रवचन-कीर्तन अशा अनेक रूपांतून आपल्यासमोर येतात.

व्यास-वाल्मीकींनी निर्माण केलेल्या बहुरूपी पात्रांचे अनेक आविष्कार आपल्याला चटका लावतात. इतिहासाचे कितीतरी दाखले आपण निर्माण केले त्यात वास्तवापेक्षा कल्पितांचा भाग अधिक आहे. मोहनदास करमचंद गांधी हे प्रत्यक्ष आपल्यासमोर जिवंत व्यक्ती होते. माझ्या पिढीने बालपणात का होईना, त्यांचा अनुभव घेतला आहे. त्यांच्याबरोबर राहिलेल्या अनेकांनी या माणसाबद्दल लिहिले आहे. दक्षिण आफ्रिकेत त्यांच्यासोबत हेन्री पोलाक आणि त्यांची बायको मिली राहत असत. दोघांनीही गांधींबद्दल लिहिलं आहे. त्यात मिलीने तर ‘गांधी-दी मॅन’ असे पुस्तकच लिहिले. प्रभुदास गांधी यांनीही प्रत्यक्ष पाहिलेल्या गोष्टी लिहिल्या आहेत.

भारतात अनेकांनी आपले अनुभव लिहिले तरी मुद्दाम उल्लेख करावासा वाटतो विल्यम शरर यांनी लिहिलेल्या छोटेखानी पुस्तकाचा. शरर एक तरुण पत्रकार म्हणून भारतात होते. त्यांची गांधींशी विशेष दोस्ती होती. त्यांनी पुस्तक लिहिले ते मात्र ५० वर्षांनंतर. ते गांधींसोबत गोलमेज परिषदेच्या वेळी लंडनला गेले. त्यानंतर त्यांची जर्मनीत बदली झाली. हिटलरच्या दिवसांबद्दल त्यांनी ‘राईज अ‍ॅण्ड फॉल ऑफ दी थर्ड राईश’ हे अद्वितीय पुस्तक लिहिले. ते वाचताना प्रत्येक पानावर आपण थबकतो. खरोखर इतका क्रूर, खुनशी माणूस विसाव्या शतकात एखाद्या राष्ट्राला आपल्याबरोबर विनाशाच्या मार्गाने नेऊ शकतो? त्याच लेखकाने गांधींबद्दल एक गोड पुस्तक लिहिले.

अल्बर्ट आईनस्टाईन या द्रष्टय़ा शास्त्रज्ञाने गांधीजींबद्दल म्हटले, की असा हाडामांसाचा माणूस या पृथ्वीतलावर खरोखर होऊन गेला, यावर पुढील पिढय़ांचा विश्वास बसणार नाही. आईनस्टाईनने हे लिहिले तेव्हा गांधी जिवंत होते- ही मरणोत्तर श्रद्धांजली नव्हती. फ्रेंच लेखक रोमाँ रोलाँ यांनी तर १९२४ सालीच गांधी ५५ वर्षांचे असताना त्यांच्या आध्यात्मिक व्यक्तित्वाबद्दल लिहिले. मार्टिन ल्यूथर किंग, नेल्सन मंडेला, लेख वालेसा या आणि कितीतरी नेत्यांनी गांधींची शिकवण आत्मसात करून आपापल्या देशांत शांततामय परिवर्तन घडवून आणले.

तरीसुद्धा आपण स्वातंत्र्य लढय़ासंबंधी वाचताना गांधींच्या कार्याबद्दल वाचतो तेवढेच. त्यातून या कार्याबद्दल सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते, हिंदुत्ववादी, मार्क्‍सवादी, आंबेडकरवादी हे आपापल्या राजकीय विचारसरणीनुसार वेगवेगळे रंग देत असतात. भारतीय जनजीवनावर गांधींचा पगडा इतका मोठा आहे, की विसाव्या शतकात जे काही झाले, त्याचे श्रेय किंवा अपश्रेय गांधींना देण्याची आपली सवय झाली आहे. या गदारोळात आपल्याला खरे गांधी सापडतच नाहीत.

गांधी हा खराखुरा माणूस कसा होता, त्याने परिवर्तन घडवून आणलेले फक्त भारतातील राजसत्तेचे होते की आणखी काही हे आपल्याला समजून घेतले पाहिजे. ते सत्याचे प्रयोग करून फक्त स्वत:चा शोध घेत नव्हते, तर कुटुंबव्यवस्था, समाज, आर्थिक रचना, शिक्षण, आरोग्य अशा जीवनाच्या सर्व अंगांत परिवर्तन घडवून आणत होते आणि हे सारे माणसाचा मूळ धर्म प्रेमावर आधारित आहे हे लक्षात घेऊन.

या किमयेबद्दल ऐकलं पाहिजे ते गांधीजींच्या अंगाखांद्यावर प्रत्यक्ष खेळलेल्या नारायणभाईंकडून. नारायण हा गांधीजींच्या दीर्घकाळ समीप असलेल्या महादेवभाईंचा मुलगा. बा आणि बापू महादेवभाईंना आपला खरा वारस मानत. त्यांच्या अकाली मृत्यूच्या वेळी नारायण नुकताच तारुण्यात प्रवेश करत होता. ते त्याला बावला म्हणत. नारायणला त्यांच्या वात्सल्याचा प्रत्यक्ष अनुभव आला. आपल्या वडिलांचे चरित्र लिहिण्याची नारायणभाईंना इच्छा झाली. त्यांना वाटले की महादेवभाई सतत २५ वर्षे रोजनिशी लिहीत. त्यात सर्व तपशील मिळतील. प्रत्यक्षात त्या रोजनिशीत फक्त गांधीजींबद्दल लिहिले होते. ज्या दिवशी त्यांची भेट नाही त्या दिवसाचे पान कोरे. महादेवमध्ये जर फक्त मोहन तर महादेवचा शोध मोहनच्या म्हणजे गांधीजींच्या लिखाणात सापडेल हे लक्षात येऊन त्यांनी आपले चरित्र लेखन केले.

गांधींबद्दल शेकडो पुस्तके असली तरी त्यांची बृहद् चरित्रे प्रामुख्याने परदेशी अभ्यासकांनी लिहिली आहेत. डी. जी. तेंडुलकर यांनी आठ खंडांत आणि गांधींचे दुसरे सचिव प्यारेलाल आणि त्यांची बहीण सुशील नायर यांनी दहा खंडांत महाचरित्र लिहिले ते इंग्रजी भाषेत. भारतीय भाषांत पहिले प्रदीर्घ चरित्र नारायणभाई देसाई यांनी लिहिले. त्याचे नाव ‘माझं जीवन माझा संदेश.’ अलीकडेच सकाळ ट्रस्टच्या वतीने शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी संपादित केलेल्या पुस्तकात अनिल काकोडकरांसारखे शास्त्रज्ञ, राहुल बजाज, अनू आगासारखे उद्योजक, गावस्कर-तेंडुलकर यांसारखे खेळाडू या सर्वानी त्यांना सापडलेल्या गांधींबद्दल लिहिले आहे.

गांधींबद्दल चक्षुर्वैसत्यम् अशी जीवनगाथा नारायणभाईच्या तोंडून ऐकणे हा एक अनुभव आहे. ‘गांधीकथा’ गुजरातीत आणि हिंदीत नारायणभाईंनी अनेक ठिकाणी सांगितली आहे. नारायणभाई स्वत: गात नाहीत, पण त्यांनी या निवेदनासाठी लिहिलेली गाणी त्यांचा संगीतवृंद गात असतो. नारायणभाईंची ऐंशी कधीच उलटली असली तरी ते अजून प्रत्येक गांधीकथांच्या सत्रासाठी वेगळी तयारी करतात. आता आपल्यासमोरील अनेक ज्वलंत प्रश्नांना सामोर ठेवून त्यांनी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात मुंबईत हिंदी गांधीकथेची तयारी केली आहे. आज चंगळवाद, सामाजिक असमतोल, भ्रष्टाचार असे कितीतरी मुद्दे भेडसावतात. त्यांना उत्तर गांधीविचारातून सापडेल अशी अनेकांना अंधूक कल्पना असते. परंतु प्रत्यक्ष वाट दिसत नाही. ‘गांधीकथे’च्या श्रवणाने अनेक वाटा दिसू लागतील असा विश्वास वाटतो.

(‘गांधीकथा’ (हिंदी) हा कार्यक्रम महात्मा गांधी सेवा मंदिर, वांद्रे  येथे २ ते ६ ऑक्टो. दरम्यान रोज संध्या. ५ ते ९ सर्वासाठी खुला आहे.)