News Flash

कविता-सखी : हे मनोगताचे गीत

या लेखनाचं प्रमुख सूत्र कविता हेच असेल. पण रूढ सांकेतिक अर्थानं ते केवळ कवितेपुरतं नसेल. कवितेच्या बहुरूपी विश्वाच्या, एकूण जगण्याच्या आणि त्यामुळे अर्थात स्वत:च्याही

| January 6, 2013 03:46 am

या लेखनाचं प्रमुख सूत्र  कविता हेच असेल. पण रूढ सांकेतिक अर्थानं ते केवळ कवितेपुरतं नसेल. कवितेच्या बहुरूपी विश्वाच्या, एकूण जगण्याच्या आणि त्यामुळे अर्थात स्वत:च्याही थोडंसं आत उतरण्याचा प्रयत्नही असेल. आयुष्यभर कवितेची सोबत करणाऱ्या मनस्वी कवीचं हे सदर..
तसा तो मूळचा नाटक-गाण्यातला.. एका अनिवार्य क्षणी कविता लिहू लागला आणि मग लिहीतच राहिला.. आज त्याला प्रामुख्याने कवी म्हणून ओळखतात. (या त्याच्या ओळखीला कवी-गीतकार किंवा गीतकार-कवी असेही दोन पर्याय आहेत. यातील कुठल्या पर्यायाला अग्रक्रम द्यायचा हे ज्याच्या-त्याच्या अंतस्थ हेतूवर अवलंबून असतं. स्वत: कवीला मात्र दोन्ही पर्याय सारखेच सार्थ आणि स्वागतार्ह वाटतात.).
पण हा सारा प्रवास फार अभावित आणि सहजगत्या घडला.. कविता हा त्याच्या लेखी महत्त्वाकांक्षेचा विषय कधीच नव्हता आणि आजही नाही. रूढ अर्थाने नवोदित असतानाही, कविता प्रकाशनार्थ पाठवून कौल लावण्याचा खटाटोप त्यानं कधी केला नाही. साहित्यिक मेळावे आणि कविसंमेलन यामधूनही तो अभावानंच दिसत राहिला. प्रसिद्धिपराङ्मुख म्हणून नव्हे, पण तशी कधी ओढच वाटली नाही. स्वत:च्या मनाशी संवाद करावा तशा कविता लिहाव्या व चार समानधर्मीयांना ऐकवाव्या.. बस्स, इतकंच. स्वत:च्या कवितांची नीटशी वही देखील कितीतरी काळ त्यानं केली नव्हती. कविता सुचली की एकदाच हाताशी असलेल्या कागदावर लिहायची..वडिलांकडून पाठांतराचा वारसा घेतलेल्या मेंदूनं ती कविता नोंदून घेतली की, तो कागद हवेवर सोडून द्यायचा हा आजवरचा शिरस्ता.
पण हळूहळू त्या वर्तुळाचा परीघ आपसूक वाढत गेला. त्याच्या कविताच जणू आपली वाट आपणच काढत चालत राहिल्या. जिथं कवी स्वत: व्यक्तिश: पोचला नाही अशा कुठल्या कुठल्या ठिकाणी, पृथ्वीच्या पाठीवर सर्वत्र त्याच्या कविता अलगद पोचल्या. केवळ भौगोलिक अर्थानं नव्हे.. तर असंख्य हृदयांत त्या कवितांना आणि पर्यायानं स्वत: कवीलाही कायमचा हक्काचा निवारा मिळाला. चित्रपट, रंगभूमी, आकाशवाणी, दूरदर्शन, खाजगी ध्वनिमुद्रिका आणि प्रकाशनं अशा किती माध्यमांचं अंगण त्याच्या कवितांना खुलं झालं.. मागं वळून पाहण्याची त्याला फारशी आवड नाही, पण क्वचित घडलेला प्रवास क्षणमात्र डोळ्यात उतरतो, तेव्हा तो मनोमन सुखावतो आणि स्वत:शीच गुणगुणतो,   
       केव्हातरी पेरलेल्या
       गोष्टी उगवू लागल्या
साक्षेपी आणि सजग वाचकांना हे केव्हाच कळलं असेल, की निखालस आजचे वाटणारे हे कवीच्या मनोगताचे शब्द तब्बल ३० वर्षांपूर्वीचे आहेत. ‘पक्ष्यांचे ठसे’ या त्याच्या पहिल्या काव्यसंग्रहात अगदी शेवटी ‘उत्तररंग’ या शीर्षकाखाली, त्याचं जे दीड पानी मनोगत छापलं होतं, त्यातला हा छोटासा उतारा आहे. मात्र तो इथं देताना, कधी कंसात तर कधी थेटपणे त्याच्या त्या मूळच्या अभिव्यक्तीला आजच्या त्याच्या मानसिकतेची फोडणी द्यायला तो विसरलेला नाही. १९६९-७०च्या मध्याला त्याच्यातला कवी त्याच्याही नकळत प्रकट होऊ लागला.. निदान त्याच्या स्वत:च्या दृष्टीतून अनमोल असलेल्या या अभूतपूर्व घटनेला यंदा ४० र्वष होत आहेत. ‘पक्ष्यांचे ठसे’, ‘स्वतंत्रते भगवती’, ‘गाण्यांची वही’, ‘शब्दधून’, ‘लय’ आणि ‘आत्मरंग’ हे सहा संग्रह चार दशकांच्या या एवढय़ा कालावधीत त्याच्या नावावर जमा झाले आहेत. ‘निरंकुशाची रोजनिशी’, ‘गाणारी वाट’, ‘अनुबंध’ ही त्याची  पुस्तकं ललित गद्यस्वरूप असूनही, त्यांची जातकुळी कवितेचीच असल्याचं त्याचं त्यालाही स्पष्ट जाणवतं.. हे सगळं असं असणं हे एका अर्थी अपरिहार्यच.. कारण, स्वत:च्या अस्तित्वाची एक बाळ-जाण येण्याआधीच केव्हातरी, त्याची नाळ कवितेशी जुळली होती. कर्णाची कवचकुंडलं जशी अंगभूत अंकुरलेली होती तसंच याचं हे कविपणही त्याच्या समग्र अस्तित्वात अंतर्भूत झालेलं असणार..  
 तरीही स्वत:ला कवी म्हणून स्वीकारायला त्यानं बराच अवधी घेतला..  एकाअर्थी तेही बरंच झालं. कारण त्यानंतर जेव्हा केव्हा आपलं कवी असणं सर्वार्थानं त्यानं स्वीकारलं तेव्हा ती जाणीव त्याच्या समग्र अस्तित्वात आणि अवघ्या जगण्यात इतकी खोलवर मुरून गेली की, तिची जाणीवही त्याच्या लेखी वेगळी राहिली नाही. मात्र त्याचं हे निरपवाद स्वयंभू कविपण हे केवळ शब्दातून व्यक्त होणारं, निव्वळ शब्दांतूनच सिद्ध होणारं आणि शब्दांच्या अभावी पोरकं होणारं असेल असं त्यानं कधीही मानलं नाही. शब्द हे कवितेचं निर्वविाद अविभाज्य अंग असेल, नव्हे आहेच. पण त्यामागचं कविपण हे निरंजन, देहातीतच असायला हवं, ही खूण-गाठ त्याच्यामध्ये नेमकी कधी आणि कशी पेरली गेली, हे त्याचं त्यालाही सांगता येणार नाही. पण तरीही त्या जाणिवेचे पडसाद आयुष्याच्या वळणा-वळणावर आपल्या वागण्या-बोलण्यातून वेळोवेळी प्रकट झालेले त्याला जाणवतात.. आठवतातही..       
काळ १९७५-७६ चा.. त्याच्या कवी असण्याचा गवगवा नुकताच सुरू झाला होता. त्यातून ओघाने येणारे सोपस्कारही नुकतेच सुरू होत होते. सलामीलाच पुणे आकाशवाणीवरील ‘िबब-प्रतििबब’ मालिकेत त्याची एक मुलाखत झाली. मुलाखतकार होती, पदवीधर आणि कवयित्री होण्याच्या मार्गावर असलेली अरुणा ढेरे. मुलाखत कसली, मनमुराद गप्पाच होत्या त्या. कवितेचं मुख्य सूत्र पकडून तिच्या अवतीभवतीच्या दहा दिशांची साद घालणारी आवाहनं आणि स्वप्नं तो सांगू पाहत होता. न राहवून तिनं विचारलं, ‘हे इतकं सगळं तू करायचं म्हणतोस, पण त्यामध्ये तुझी कविता, तुझ्यातला कवी कोमेजणार नाही का?’ सहजगत्या त्याचं उत्तर गेलं .. तो कवी, त्याची कविता हे सगळं इतकं तकलुपी, लेचंपेचं असलं तर ते कोमेजल्याचं दु:ख कशाला? पण तसं नसेल, तर मी जे करेन त्याला कवितेचा स्पर्श असेल.  
आणि तसंच झालं.. काळाच्या ओघात अनेक माध्यमं, क्षेत्रं सामोरी येत राहिली .. त्यानुरूप अनेक भूमिका आल्या.. त्यांचे  वेगळे धर्म आले. पण कवीचा मूळ िपडधर्म कधीही हरवला नाही.. त्यामुळे या स्वैर भटकंतीत तो कवी-गीतकार झाला, कवी संगीतकार, कवी-गायक झाला. कवी-सादरकर्ता झाला आणि कवी-दिग्दर्शकही.. फार कशाला, त्याचं जे चित्र-विचित्र, भलं-बुरं माणूसपण आहे, त्यालाही जबाबदार हे कविपणच, अगदी अलीकडे तर, आधीच्या वाटचालीत ध्यानीमनी नसलेली एक रंग-चित्र-धून त्याच्या समग्र अस्तित्वाला झपाटून राहिली आहे.. लगेच स्वत:ला चित्रकार वगरे म्हणवून घेण्याइतका तो निबर किंवा चित्रकार श्याम जोशींच्या शब्दात सांगायचं तर.. निसंडु (म्हणजे निर्लज्ज संतोषी डुक्कर) नाही.  पण या नव्या मोहिमेतही त्याची ही कविपणाची मूळ प्रचिती नकळत व्यक्त झालीच.   
पहिलंवहिलं रंग-चित्र-प्रदर्शन चक्क चित्रकलेच्या एका माहेरघरी, करवीर क्षेत्री ठरलं. मात्र कुठल्याच चित्रावर त्याची सही नव्हती.. खरं तर त्यानंही काही बिघडणार नव्हतं. पण चित्रकार मित्रांनी सगळ्या फ्रेम्स सोडवून हुकूम केला- चित्रांवर सही कर.. त्या प्रेमळ सक्तीला नकार देण्याचा उद्धटपणा करवेना. पण म्हणून नेहमीची, सुधीर मोघे ही लफ्फेदार सही करायलाही हात धजेना.. विचार केला, प्रथमच आपण भाषेचं कुंपण नसलेल्या शब्दांपलीकडच्या माध्यमात प्रवेश करतो आहोत, तर प्रातिनिधिक भाषेत, म्हणजे इंग्रजीत सही करावी.. तिथंही संपूर्ण ओळख देणारं नाव नको वाटत होतं. अचानकपणे अगदी प्रथमच आपली इंग्रजीतली ती पहिलीवहिली सही लपेटून मोकळा झालो.. पोएट-सुधीर.  
आजवर कधीही आपलं कवी-पण लौकिक अर्थानं मिरवावं असं वाटलं नाही. आणि इथे एका नव्याच नि:शब्द..नीरव माध्यमावर मात्र आपलं कविपण नकळत गोंदवलं गेलं होतं . हे काय घडलं असावं ?
१९७५ मधली ती मुलाखत, २००८ मध्ये ही रंगधून  आणि त्या दोन्हीच्या मध्यभागी १९८१ मध्ये ‘पक्ष्यांचे ठसे’मधील कवीच्या मनोगतात व्यक्त झालेलं त्याचं हे अनोखं भान..
जेव्हा तो कविता लिहीत नव्हता
तेव्हांही तो कवी होता  
आणि ज्या वेळी तो कविता लिहिणं थांबवेल
त्यानंतरही, तो कवीच असेल.  
 तात्पर्य, इथून पुढे जे लेखन उलगडत जाईल त्याचं प्रमुख सूत्र नक्कीच, कविता हेच असेल.. पण रूढ सांकेतिक अर्थानं ते केवळ कवितेपुरतं नसेल.. अनेक तपशील येतील, पण ते केवळ तपशील नसतील.. स्वत:च्या कवितांच्या, कवितेच्या बहुरूपी विश्वाच्या, एकूण जगण्याच्या आणि त्यामुळे अर्थात स्वत:च्याही थोडंसं आत उतरण्याचा प्रयत्नही करावासा वाटतो आहे. त्यामुळे अभिव्यक्तीही कदाचित चित्र-विचित्र रूपं घेण्याचा प्रयत्न करेल.. पण एक ग्वाही नक्की, जे व्यक्त होईल ते आरपार मन:पूर्वक आणि स्वत:शी  प्रामाणिक असेल. कारण या मूलभूत बठकीवरच आजवरची वाटचाल झाली आहे आणि पुढचीही होईल, असा खोल विश्वास आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2013 3:46 am

Web Title: article on poem
Just Now!
X