News Flash

‘मौज’ला आकार देणारे संपादक

 ‘समतानंद- अनंत हरी गद्रे’ या भानू काळे लिखित पुस्तकातील गद्रे यांचा संपादक म्हणून चतुरस्रपणा दर्शविणारे ‘संपादक गद्रे’ हे प्रकरण..

(संग्रहित छायाचित्र)

 ‘समतानंद- अनंत हरी गद्रे’ या भानू काळे लिखित पुस्तकातील गद्रे यांचा संपादक म्हणून चतुरस्रपणा दर्शविणारे ‘संपादक गद्रे’ हे प्रकरण..

साधारण टिळक वारले त्याच सुमारास, म्हणजे १९२०च्या मागेपुढे केव्हा तरी अनंतराव गद्रे यांनी पुणे सोडून मुंबई इथे आपले वास्तव्य हलवले. ‘संदेश’ची आर्थिक स्थिती कधीच चांगली नव्हती. ते सलग खूप वर्षे कधीच चालले नाही. स्थापनेपासून ते १९ जुलै १९१८ पर्यंत अशी साडेतीन वर्षे ते सलग चालले, पण मग सरकारने खटला भरल्याने बंद पडले. ‘आम्हावर इंग्लंडचे युनियन जॅक फडको किंवा जर्मनीचा गरुडध्वज फडको, आम्हांस सारखेच’ अशा आशयाचे वाक्य अच्युतराव कोल्हटकरांच्या संपादकीयात आले होते व त्याला सरकारने आक्षेप घेतला होता. त्याच वर्षी काही दिवसांनी पुन्हा ‘संदेश’ सुरू झाले आणि १९२१ मध्ये ते पुन्हा पुढच्या दोन वर्षांसाठी बंद पडले. सरकारी रोषामुळे असे एकूण पाच-सहा वेळा त्यांना ‘संदेश’मधेच बंद करावे लागले होते. वाढत्या प्रापंचिक जबाबदारीमुळे अशा अनिश्चित नोकरीत दीर्घकाळ राहणे अनंतरावांना शक्य नव्हते.

टिळकांचे राजकारण आणि त्याचा प्रसार हेच त्यांचे पुण्यातील वास्तव्यात जणू जीवितकार्य होते आणि त्यामुळे टिळकांच्या निधनानंतर पुण्यात राहण्यात त्यांना स्वारस्य वाटले नसावे. फंड-गुंड प्रकरणातून स्वत:ला अत्यंत पूज्य असलेल्या लोकमान्यांशी आणि एकूणच केसरी परिवाराशी निर्माण झालेले वितुष्ट हेही अनंतरावांनी पुणे सोडण्यामागचे एक कारण असायची शक्यता नाकारता येत नाही. टिळकांचे निधन झाल्यावर एकूणच राजकारणापासून त्यांचे मन दूर गेले. पुढील आयुष्यात त्यांनी राजकीय लेखन असे जवळपास काहीच केले नाही, यावरूनही तसे वाटते. पुढे त्यांनी हिंदु महासभेचे काम केले, परंतु तिथेही त्यांचा प्रत्यक्ष सहभाग हा राजकारणात नसून, सामाजिक स्वरूपाच्या कामांमध्येच होता असे दिसते.

मुंबईला आल्यावर अगदी सुरुवातीला त्यांनी गिरगावातल्या बदामवाडीत (आता विठ्ठलभाई पटेल नावाने ओळखल्या जाणाऱ्या रस्त्यावर) अहिल्या बिल्डिंगमध्ये भाडय़ाची जागा घेतली होती. एके काळी त्याच बिल्डिंगीत बालगंधर्वदेखील राहायचे. त्यानंतर गिरगावातच राजा राममोहन रोडवरील कॉन्ट्रॅक्टर बिल्डिंगमध्ये अनंतराव राहत होते. त्यानंतर काही वर्षांनी ते गिरगावातच सेंट्रल सिनेमामागच्या गोरेगावकर चाळींत, सहाव्या क्रमांकाच्या चाळीत राहायला आले. तिथले त्यांचे वास्तव्य कायमस्वरूपी ठरले.

सहा गोरेगावकर चाळींत मिळून त्या काळी ३८० बिऱ्हाडे होती आणि त्यातली बहुसंख्य महाराष्ट्रीय ब्राह्मणांची होती. तेव्हा मुंबईतील बहुतेकांची घरे ही भाडय़ाची असत. मालकीची घरे (ओनरशिप घरे) ही कल्पना बऱ्याच नंतरची. गोरेगावकर चाळी म्हणजे त्या वेळच्या गिरगावातील पांढरपेशा मराठी माणसांचा बालेकिल्लाच होता. तिथला गणेशोत्सव अगदी लोकमान्यांनी ही प्रथा सुरू केली त्या वेळेपासूनचा! चाळीत इतरही अनेक उपक्रम उत्साहाने राबवले जायचे. अशा वातावरणात राहणाऱ्यांच्या मनावर सांस्कृतिक संस्कार आपोआपच व्हायचे.

पत्रकार म्हणून कुठे नोकरी करण्यापेक्षा स्वत:चेच साप्ताहिक चालवायचे त्यांनी पक्के केले. पुण्यात असताना अनंतरावांना प्रकाशन व्यवसायाची तोंडओळख झालीच होती. १९ मार्च १९२२ रोजी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर त्यांनी मौज साप्ताहिकाचा पहिला अंक प्रसिद्ध केला.

साप्ताहिक सुरू करण्यापूर्वी त्याचे नाव निश्चित करून घेणे, कलेक्टरपुढे आवश्यक ते शपथपत्र (declaration) करणे, अंक टपाल करण्यासाठी पोस्ट खात्याची परवानगी घेणे, विक्रेत्यांशी बोलून घेणे, संभाव्य जाहिरातदारांना भेटणे आणि मुख्य म्हणजे, अंकाचे एकूण स्वरूप नक्की करून वेगवेगळ्या लेखकांशी संधान बांधणे.. अशी अनेक संबंधित कामे करण्यात त्यांचे काही महिने गेले. आदल्या चार-पाच वर्षांत त्यांच्याकडे स्वत:चे असे काही पैसे साठले असणे अशक्यच होते, त्यामुळे भांडवलाचा प्रश्नही गंभीरच होता. पण त्यांचा प्रकाशनातील आणि एकूणच जीवनातील उत्साह एवढा प्रचंड होता, की कुठल्याही अडचणीचा त्यांनी कधीच बाऊ केला नाही.

त्या काळातील एकूण सामाजिक पार्श्वभूमी समजून घेणेही इथे उपयुक्त ठरेल. पहिल्या महायुद्धानंतरच्या त्या काळात भारतात नव्या विचारांचे वारे वाहू लागले होते. पाश्चात्त्य शिक्षण, विचारधारा, चित्रपट, कला आणि साहित्याच्या संपर्कातून बौद्धिकदृष्टय़ा अधिक उन्नत असलेला, अधिक उच्च अभिरुची असलेला समाज निदान शहरी भागात तरी उदयाला येत होता. शॉ आणि इब्सेन, मॉम आणि हेमिंग्वे आता त्याच्या परिचयाचे झाले होते. व्यापार, उद्योगधंदे, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांतून प्राप्त होत असलेल्या सुविधा, समृद्धी आणि आधुनिक राहणी यांचाही परिणाम या समाजावर होत होता. दैनिकांच्या क्षेत्रात हा बदल अच्युतराव कोल्हटकरांनी अचूक टिपला होता. साप्ताहिकांच्या क्षेत्रात असेच काहीतरी करायचे अनंतरावांच्या मनात असावे.

अनंत बाळकृष्ण घगवे शास्त्री यांच्या ‘सरस्वती मुद्रणालया’त मौजचा पहिला अंक छापला गेला होता. संपादक व प्रकाशक म्हणून अनंत हरी गद्रे असेच नाव होते. त्या पहिल्याच अंकात मौज सुरू करण्यामागचा आपला उद्देश अनंतरावांनी स्पष्ट केला होता. नेहमीचे राजकारणाचे धीरगंभीर विषय बाजूला ठेवून लोकांची करमणूक करावी, याच उद्देशाने ‘मौज’ सुरू केली.

‘मौज’ या नावातच त्यांना अपेक्षित असलेले साप्ताहिकाचे वेगळेपण दिसते. मौजमध्ये सामाजिक घडामोडी, कथा-कादंबऱ्या यांवर भर असे. छोटय़ा-मोठय़ा नाटक कंपन्यांच्या दौऱ्यांचे विस्तृत वृत्तही असे. ‘रंगभूमीचा रागरंग’ हे मौजचे सदर फक्त रंगभूमीवरील घडामोडींना वाहिलेले होते. ‘नाटक मंडळ्यांचे गॅझेट’ असा मौजचा प्रथमपासूनच लौकिक होता. पुढे बोलपट सुरू झाल्यावर त्यांचाही परामर्श मौजेत येत असे. विनोदी लेख व व्यंगचित्रे यांनाही मौजेने स्थान द्यायला सुरुवात केली. अर्थात तेव्हाची व्यंगचित्रे बरीचशी बटबटीत असत. मोजक्या व नाजूक रेखांचा वापर करून व्यंग अधोरेखित करण्याची कला त्यांच्यात फारशी दिसत नसे. ‘न्यूज ऑफ द वर्ल्ड’ या सदरात जगभरातील वैशिष्टय़पूर्ण घडामोडी येत. युरोपिअन स्त्री-पुरुषांच्या वैवाहिक जीवनाविषयी, त्यांच्यातील वाढत्या घटस्फोटांविषयी त्यात सनसनाटी माहिती असे. अनंतरावांची संपादकीयंही लोकप्रिय होती. ‘चहा, चिवडा, चिरूट’ हे समकालीन घडामोडींवर खुसखुशीत भाष्य करणारे सदर विशेष लोकप्रिय होते. वि. वा. हडप यांची ‘बहकलेली तरुणी’ ही कादंबरी मौजेतून क्रमश: प्रकाशित झाली. त्या वेळच्या ‘सोवळ्या’ वाचकांना अश्लील वाटणारी ती कादंबरी तरुणांप्रमाणेच वयोवृद्धही (चोरून) वाचत अशी नोंद मोहन नगरकर यांनी ‘नवशक्ती’मधील एका लेखात केली आहे. हडपांच्या ‘इष्काचा प्याला’सारख्या इतरही अनेक कादंबऱ्या मौजमधून क्रमश: प्रसिद्ध झाल्या व वाचकप्रिय ठरल्या. ‘विलायती सुधारणांचा ओंफस’ या त्यांच्या सदरावरही वाचकांच्या उडय़ा पडायच्या. ‘बालगंधर्व, नानासाहेब चापेकर, रघुवीर सावकार, इत्यादी त्या वेळच्या स्वरूपसुंदर स्त्री-पार्टी नटांच्या स्त्री वेषातील आकर्षक फोटोंवर आताच्या सिनेनटीच्या फोटोवर पडतात, तशाच रसिकांच्या उडय़ा पडत,’ असेही नगरकरांनी लिहिले आहे.

क्रिकेटमधले चौरंगी सामने त्यावेळी मुंबईच्या युरोपियन जिमखान्यावर खेळले जात. हिंदू, पारशी, युरोपियन आणि मुसलमान संघ त्यात भाग घेत. हा रणजी ट्रॉफीच्या बराच आधीचा काळ. हे सामने प्रचंड लोकप्रिय होते. आजच्या आय.पी.एल. सामन्यांप्रमाणे त्याचे सविस्तर वृत्त अनंतराव आवर्जून छापत असत.

मौजेत ‘दिनचर्या’ नावाचे एक सदर असायचे. त्यात एखाद्या लोकप्रिय कलाकाराचा दिवस सकाळपासून रात्रीपर्यंत कसा काय जातो, याचे सचित्र वर्णन असायचे. वाचकांना तर ते सदर अतिशय आवडायचेच, पण त्या नटालाही त्यातून मिळणाऱ्या प्रसिद्धीचा लाभ व्हायचा. अशा प्रकारचे लेखन (सेलिब्रेटी जर्नलिझम) पुढे सर्रास होऊ लागले. अलीकडच्या काळात उमाकांत ठोंबरे किंवा ह. मो. मराठे यांनी असे भरपूर लेखन केले. ‘असा दिवस उजाडतो, असा दिवस मावळतो’ यांसारख्या प्रदीर्घ लेखमाला वाचकांना आठवत असतील. पण त्या काळी अशा लेखनात खूप नावीन्य होते व म्हणून प्रचंड वाचकप्रियताही होती. प्रकाशातील माणसांविषयी वाचकाला एक स्वाभाविक कुतूहल असते आणि ते शमवण्याचे टीव्ही किंवा मोबाईल किंवा इंटरनेट यांसारखे अन्य कुठले मार्ग त्या काळी वाचकांपुढे नव्हते. यामुळे प्रथमपासूनच मौजला लोकप्रियता मिळाली.

पहिल्या वर्षांपासूनच मौजने खास अंकांची रेलचेल उडवून दिली होती- दिवाळी अंक, वासंतिक अंक, काँग्रेस अंक. एखाद्या साप्ताहिकाने असे खास अंक काढण्याचा हा पहिलाच प्रकार. असे खास अंक काढण्याची प्रथा नंतर पुष्कळ वाढीस लागली, पण त्याची सुरुवात मौजेने केली. असा पहिला खास अंक १९२३ साली ‘वसंत अंक’ म्हणून निघाला. त्या वेळी अच्युतराव कोल्हटकरांनी पुन्हा एकदा नव्याने सुरू केलेल्या त्यांच्या ‘संदेश’मध्ये अतिशय खोचक असा विस्तृत अभिप्राय लिहिला होता. १९ मे १९२३च्या त्या संदेशमध्ये त्यांनी लिहिले होते- ‘हा मौजेचा अंकच घ्या. त्यात श्री. मगनलालजींच्या निरनिराळ्या शाया, नाटक कंपन्यांच्या निरनिराळ्या काया किंवा मुद्रणकलेच्या निरनिराळ्या छाया आहेत. पण बिचाऱ्या माणसा, तू त्यात कोठे आहेस? एक लेख किंवा एक विवेचन किंवा एक ओळ त्यात अशी सापडणार नाही, की जी वाचकांच्या प्रगल्भतेकरिता लिहिलेली आहे.. इथे पाहावे तो ‘सुट्टी’, तिथे पाहावे तो ‘मदन बुट्टी’, इथे पाहावे तो ‘जर्दा, तिथे पाहावे तो नटांचा ‘खुर्दा’, इथे पाहावे तो जांभळी शाई, तिथे पाहावे तो शांताबाई! पण दुर्दैवी मनुष्या, तू यात कोठे आहेस? वाचकांची सेवा करायची म्हणजे, त्यांना प्रथम सुबक, सुबोध, सुविचारपूर्ण, सुमार्गदर्शक आणि सुरस असे लेख दिले पाहिजेत आणि त्यांची ज्ञानक्षुधा प्रथम भरपूर शांत केली पाहिजे. इतर गोष्टी म्हणजे शाया, फोटो, चित्रे, अभिप्राय ही ज्ञानभोजनाची रुची वाढविणारी गौण साहित्ये आहेत, ती मुख्य भोजन नव्हेत. साहित्याचा अंक काढून त्यात नुसत्या या गोष्टी द्यायच्या, म्हणजे पाहुण्यांना जेवायला बोलावून त्यांच्यापुढे फक्त उदबत्त्या आणि पानसुपारीचे तबक ठेवण्यासारखेच आहे. त्यात वाचकांची सेवा होत नाही, त्यांची वंचना मात्र होते.’’

आपल्या गुरूनेच लिहिलेला हा कठोर आणि परखड अभिप्राय वाचून अनंतराव नक्कीच दु:खी झाले असणार. सुदैवाने यापासून अनंतरावांनी योग्य तो बोध घेतला आणि पुढे अंकात मनोरंजन आणि प्रबोधन या दोन्हींचा समावेश करण्याचा प्रयत्न केला. मौजेत आपल्याला मदत करायला म्हणून अनंतरावांनी त्याच वर्षी विख्यात कवी व लेखक सदाशिव अनंत शुक्ल यांना कामात सामील करून घेतले- कर्मचारी म्हणून नव्हे, तर एक सहकारी म्हणून. त्यामुळेही अंकात फरक पडला.

पुढच्या वर्षीच्या जानेवारीत त्यांनी जेव्हा काँग्रेस अंक काढला, तेव्हा त्यात काँग्रेसविषयीच्या माहितीपूर्ण लेखांना बरीच जागा दिली होती. यापुढे खास अंकांसाठी नामवंत लेखकांचे साहित्य मिळवायचा ते विशेष प्रयत्न करू लागले. खास अंकात ‘काँग्रेस अल्बम’, ‘रघुवीर अल्बम’, ‘बालगंधर्व अल्बम’ अशा शीर्षकांखाली उत्कृष्ट छायाचित्र-मालिकाही दिल्या जात. १९२७ सालच्या खास अंकात वामन गोपाळ (वीर वामनराव) जोशी, न. चिं. केळकर, दा. वि. गोखले, मामा वरेरकर, गोपाळ अनंत ओगले, द. ग. सारोळकर इत्यादींचे लेख होते. स्वत: कोल्हटकरांनी ओवीबद्ध ‘मौज-बोध’ त्या अंकात लिहिला होता.

मालवणचे वसंत लाडोबा म्हापणकर यांचे साप्ताहिक, मासिक व वार्षिक भविष्यलेखन सर्वप्रथम मौजेतच प्रसिद्ध होऊ लागले. साहित्यातील उतारे, संतवचने, लक्षणीय उद्धृते यांचा ते भविष्यलेखनात भरपूर वापर करत. त्यामुळे त्यांना मोठा वाचकवर्ग होता. आपण भविष्यलेखनात निव्वळ दैववादाचा पुरस्कार कधीच करत नाही, असा त्यांचा दावा असे. पुढे १९३७ साली ‘धनुर्धारी’ साप्ताहिक सुरू झाले व त्यातले म्हापणकरांचे भविष्यलेखन अंकाचे प्रमुख आकर्षण बनले, पण त्याची सुरुवात अनंतरावांनी आपल्या मौजेत केली होती.

लिखित मजकुराप्रमाणे अंकाचे दृश्यरूपही आकर्षक हवे यावर अनंतराव लक्ष देत. प्रत्येक अंकात छायाचित्रे भरपूर असत. त्याशिवाय रेक्स फोटो स्टुडिओचे काकासाहेब राजाध्यक्ष आणि थॉमस स्टुडिओ यांची रंगीबेरंगी चित्रे (पेंटिंग्ज) हीदेखील अंकात येत. त्या वेळच्या प्रसिद्ध सिनेमा नटय़ांची भरपूर छायाचित्रे मौजेत असत. अंकाचे तेही एक मोठे आकर्षण होते. १९२४ सालच्या दिवाळी अंकातील संपादकीयात ‘आम्ही मौज आर्ट स्टुडिओ उघडणार असून, हा स्टुडिओ नमुनेदार होईल अशी खटपट करणार आहोत,’ असे निवेदन आहे. पुढे मौजेचा स्वत:चा ‘मौज प्रिन्टिंग प्रेस’ सुरू झाला.

मौजेच्या लोकप्रियतेविषयी जानेवारी १९२४ मध्ये निघालेल्या खास काँग्रेस अंकात अनंतराव अभिमानाने लिहितात, ‘‘जवळजवळ दोन वर्षे होत आली. मौजेचा संसार दिवसेंदिवस वाढतच आहे. मौजेच्या गेल्या दिवाळी अंकाने तर कमाल करून सोडली व मौजेचा प्रसार रावापासून रंकापर्यंत कमालीचा वाढला. आज मौजेचा दर आठवडय़ाला कमीत कमी खप (सर्टफिाईड सेल) सात हजार प्रती इतका असून, स्पेशल अंक त्याहीपेक्षा जास्त झपाटय़ाने वाढत आहे.’’ केसरीचा अपवाद सोडला तर अन्य सर्व मराठी वृत्तपत्रांत मौजेचाच खप सर्वाधिक आहे असेही संपादकांनी या लेखात आवर्जून जाहीर केले आहे. हळूहळू तो खप वाढत वाढत पंधरा हजार प्रतींवर गेला.

जास्त खपामुळे आलेली मौजेची समृद्धी फार वर्षे टिकली नाही. जाहिरातींची वानवा होतीच आणि एकूण हिशेबीपणा कमीच होता. पहिली चार-पाच वर्षे कशीबशी रेटली गेली, पण १९२५ सालानंतर तोटा बराच वाढत गेला आणि शेवटी खप चांगला असूनही मौज साप्ताहिक आणि छापखाना हे दोन्ही विकावे लागले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2020 4:15 am

Web Title: article on samantanand anant hari gadre book review abn 97
Next Stories
1 तत्त्वनिष्ठ जीवनाचा कलात्मक आविष्कार
2 सांगतो ऐका : सत्यजित रे : एक दुर्मीळ संयोग
3 अफसाना लिख रही हूँ.. : एक शहाणी रात्र
Just Now!
X