गिरीश पांडुरंग कुलकर्णी 

ती घरी आली की ईप्सित दूरध्वनी लागावा तशी आनंदी लगबग होते. ‘आपण फिरविलेला नंबर अस्तित्वात नाही’ छापाची मरगळ ल्यायलेली दुपार उतरत्या उन्हाची तिरीप आल्यागत मनात उबारा पसरवते. मग ती घरभर फिरते अन् तिच्या आगेमागे अन् भवतीनं घराला फिरवते. यावेळी ती बोलत नाही वा इतरांच्या बोलण्याकडे लक्षही देत नाही. या गृहफेरीसाठी आवश्यक शांतता तिला देण्याचं कसब एव्हाना सगळ्यांनी मेहनतीनं कमावलंय. तिच्या सवडीनं ती त्यावेळी आवडलेल्या वस्तूसह तिच्या सोयीच्या जागी बसते. जर ती वस्तू म्हणजे मोबाइल असेल तर शांतताप्रहर अंमळ लांबतो. अन् अवचित एके क्षणी मग ती बोलते.

Swiggy delivery boy was caught on cctv camera stealing shoes kept outside flat in Gurugram video goes viral
VIDEO : डिलीव्हरी बॉयने चोरले घराबाहेरील शूज, घटना सीसीटिव्ही कॅमेरात कैद, पाहा व्हिडीओ
Job Opportunity Recruitment at AI Airport Services Limited
नोकरीची संधी: एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये पदभरती
Airtel Xtreme
लाईट्स, कॅमेरा, XStream : तुमचं वन स्टॉप एन्टरटेन्मेंट हब
spmcil recruitment 2024 jobs in security printing and minting corporation of India ltd
नोकरीची तयारी : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमधील संधी

‘‘माज्या बड्डेला येणारेस का?’’

‘‘तुझा बड्डे? कधी आहे? आम्हाला तर काही माहीतच नाही बुवा.’’

‘‘अरेऽऽऽऽ!’’ कपाळावर हात मारत ती.

‘‘अगं, खरंच माहिती नाहीये मला.’’

‘‘मागच्या वर्षी आलेलास ना? तेव्हाच अस्तो माझा बड्डे.’’

‘‘अच्छा.. अच्छा. मागच्या वर्षीच्या वेळेसच आहे होय!’’

‘‘बड्डे तसाच अस्तो. एकाच दिवशी. ३१ तारखेला.’’

‘व्यर्थ घालवलीस इतकी वर्षे!’ असा भाव चेहऱ्यावर दाखवत चिंगी मला दापते. आणि असलाच मूड तर येऊ घातलेल्या बड्डेच्या आपल्या ‘प्लॅन’विषयी सांगते. रीटर्न गिफ्ट काय देणारये, फ्रॉक कुठला घालणारये आणि टीचर काय म्हणाल्या.. सगळ्ळं! अगदी बजवार. पण अनेकदा अनुल्लेखानं मारते.

इनमिन साडेचार-पाच वर्षे झाली असतील अवतार घेऊन- आणि तोरा तो केवढा? असा विचार मनात येत असतानाच झर्रकन् उभी राहून गोल फिरत नाचायला लागते. मागून कुणीतरी ‘‘नाच करून दाखव ना..’’ म्हटलेलं असतं. मग ‘आँख मारे ओ लडकी आँख मारे’ अशा छापाच्या कुठल्याशा हुच्च गाण्याचे बोल गुणगुणत स्वरचित नृत्यात चिंगी रममाण होते.

या निरागसत्वानं मी अवाक् होतो. चांगलं-वाईट, योग्य-अयोग्य इत्यादी भेदाभेदांना चिंगीपाशी थारा नाही. शहाणपणाच्या कोणत्याही चौकटी तिच्या अभिव्यक्तीला पडलेल्या नाहीत. किती देखणा काळ आहे हा तिच्यासाठी! पण हर बड्डेला ती हे स्वातंत्र्य गमावत जाणार आहे. हे चांगलं नाही, ते करू नकोस वगरेंच्या नेटवर्कचं जाळं आहेच भवताली. सध्या गंमत असणारी शाळा पुढे कंटाळा बनून जाणार आहे. आणि आई-वडिलांपासून ते माझ्यासारख्या तिऱ्हाईतांपर्यंतच्या अपेक्षा तिला ओझं ठरणार आहेत. माझ्या बनचुकेपणाचा अदमास मला चिंगीकडे बघून लावता येतो. ठरावीक छापाच्या माझ्या हसण्याचे बोल चिंगीसारखे अनेकरंगी उरले नाहीत. माझ्या हसण्यातही न सांगता माझा कमावलेला अहंकार डोकावतो. प्रयत्न करूनही थांबवता येत नाही त्याला. अर्थात मधेच कधीमधी चिंगी ‘‘एव्वढे पेपर वाचतोस तरी तुला साधं टेंपल रन माहीत नाही?’’ असं काहीतरी विचारून त्या अहंकाराच्या ठिकऱ्या उडवते. पण ती जाताच मी करतोच गोळा परत तुकडा न् तुकडा. जमणारच नाही त्याविना. म्हणजे तशी समजूतच करून दिलीये माझी. इतरांनी. मी. खरं तर अनेकदा अडचण होते, पण टाकू म्हणता टाकता येत नाही. अगदी साध्या मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टीत ‘अपमान’ दिसतो आणि मोठं होणं मूर्खपणाचं वाटायला लागतं.

बहरहाल, चिंगी मधे मधे येत राहते. पण पडणारे प्रश्न मोकळेपणाने प्रकट विचारण्याचं बळ मात्र माझ्याकडे नसतं. आपलं अज्ञान प्रकट होईल हे भय तर असतंच; पण प्रश्न विचारण्यातून होणाऱ्या परिणामांच्या भयाची छाया जास्त गडद असते. मग मी कल्पना करतो- माझ्या चिंगी असण्याची. असणारच की मीही चिंगी कधीतरी. मग चारीठाव शिक्षण, मध्यमवर्गीय कुटुंब, चार भिंतींचं घर, मित्र, क्रीडांगण, प्रयोगशाळा, पुस्तकं, सण, फटाके सगळं मिळूनही ‘चिंगी ते मी’ या प्रवासात भय कुठून आलं? अन् साकळत असं दाट कसं झालं? तर ते तुकडय़ा तुकडय़ानं साऱ्यांनी दिलं : घरच्यांनी दिलं, दारच्यांनी दिलं, शाळेनं दिलं, गावानं दिलं, जातीनं दिलं, वर्णानं दिलं, भाषेनं अन् रूपानंही दिलं. मीही जणू कमाई असल्यागत ते साठवत गेलो.

माझ्या काळात, माझ्या देशात ‘मध्यमवर्गीय’ असणाऱ्या प्रत्येकानं हेच केलं होतं. बरं, अहंकार जिंकून निर्भय जगणाऱ्या अनेकांची जुनी घरं नीलफलक लावून आम्हीच सजवत होतो गावात. फार मोठय़ाथोरांनी स्थापिलेल्या शाळेत जातो म्हणून अभिमान वाटायचा. पण तुम्हीही असे थोर होऊ शकता, त्याकरिता हे हे गुण जोपासा, असं चुकून कोण्या शिक्षकानं सांगितलं असेलच तर ते मात्र लक्षात न राहावं अशाच पद्धतीनं. घरी अन् गावात फक्त मार्काचं स्तोम. आमच्या शाळेतल्या कुठल्याच विद्यार्थ्यांचं कर्तृत्व त्या थोर संस्थापकांच्या जवळपासही जाणारं ठरलं नाही. नाही म्हणायला आम्ही सगळे प्रस्थापित अन् सुखवस्तू मात्र झालो आहोत. आमची अभिव्यक्तीही साचेबद्ध आहे. सामान्यत: आम्ही सगळे एकाच छापाचे व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्ड पाठवतो. काही राजकीय प्रचार करतो. शक्यतो कळपात राहतो. आमचं भय आम्हाला एकत्र आणतं. अन् मग आमच्या शाळेचं ‘एकी हेच बळ’ हे ब्रीद अनुसरल्यागत होतं निदान.

बहरहाल, एके दिवशी अचानक चिंगी येते. तिच्या आत्यानं नवं घर भाडय़ानं घेतलेलं असतं. चिंगी आई-बाबासह येते. घरभर फिरते. अन् अचानक म्हणते, ‘‘काय बाबा? आत्तूचं तिसरं घर झालं. आपलं अजून एकचे. काय चाललंय काय?’’ भण्ण शांतता पसरते. बाबा हवालदिल. आत्तु उगाच अपराधी. आई त्रासलेली. चिंगी निवांत!

मी मात्र खडबडून जागा होतो. अनेक प्रश्नांनी भोवंडून जातो. चिंगीवर होणाऱ्या साचेबद्ध कल्पनांच्या प्रभावाची मला चिंता वाटते. अर्थात तिचं निरागसत्व मात्र अबाधित असतं. बाबाचा ‘उपमर्द’ करतोय वगरे कल्पना तिच्या खिजगणतीत नसतात. बाबा यानंतरही पावभाजी खायला नेईल याविषयी ती नि:शंक असते. आणि त्यामुळेच परिणामांच्या नाहक चिंतेनं ती प्रश्न थांबवत नाही. मला सुचतं मग काही. माझ्या मोठेपणाच्या चौकटीतून बाहेर पडायचा मार्ग सापडतो. मी नवा चित्रपट लिहितो. माझ्यातल्या साकळलेल्या भयाला ‘धप्पा’ देण्याचा प्रयत्न करतो. अनेक लहान चिंगुटल्यांना नायकत्व देतो आणि माझ्या साचल्या समजुतींतून मोकळं व्हायचा प्रयत्न करतो. आवर्जून चिंगीला ‘धप्पा’ दाखवायला घेऊन जातो. ती पाहते. घरी आल्यावर मी विचारतो, ‘‘काय चिंगे? आवडला का ‘धप्पा’?’’

‘‘हो.’’

‘‘काय आवडलं नेमकं?’’

‘‘सगळ्ळं आवडलं रे बाबा.’’ ती त्रासून म्हणते.

चिंगी खरंच बोलत असते. पण आत्ता तिला ते बोलणं नको असतं. तिनं चित्रपट आवडला म्हणताना मला हायसं वाटतं.

लहानांना धाकदपटशा दाखवण्याचा आमचा सर्रास परिपाठ आहे. पुण्यात घडलेल्या अशाच एका घटनेचा संदर्भ घेत मी ‘धप्पा’ची कथा लिहिली. अन् या धाकदपटशाविरोधात लहानग्यांनी बंड केलं तर काय, असा एक कल्पनाविस्तार. वयानं मोठं झाल्यानं मला जे करता येत नाही ते कल्पनेत लहान होऊन मी केलं. कल्पनेत तरी मला थोडंफार चिंगी होता येतंय याचं खरंच अप्रूप वाटलं.

गुंगवून टाकणाऱ्या खेळण्याला कंटाळा आल्यावर मोडून टाकणारी बालसुलभ वृत्ती मला भावते. मला माझ्यात रमवणारी हरएक गोष्ट अशी सहज मोडून टाकता यायला हवी, चिंगीसारखी नित्यनूतन ओळख मिळवता यावी, या विचारांनी मला उत्साह येतो. इतक्यात, ‘‘तू तिला चिंगी म्हणत जाऊ नकोस बरं. तिच्या आई-वडिलांना नसेल आवडत. किती छान नाव आहे तिचं.. कौशिकी!’’

मला तंबी मिळते. मी चपापतो. अंगठय़ाएवढय़ा त्या बाहुलीला पाहून उत्स्फूर्त ‘चिंगी’ म्हणावंसं वाटल्यानं मी ते नाव तिला दिलं होतं. निरागसपणे. कुणाला काय वाटेल, याचा काहीही विचार न करता. पण मोठय़ांना असं निरागस वागून चालत नाही ना या रहाटीत. किमान तशी सार्वत्रिक समजूत तरी करून घेतलीये आम्ही.

मला याविरुद्ध तर बंड करायचंय. चिंगीला ‘कौशिकी’ म्हणायचा पोलिटिकल करेक्टनेस मला नकोय. त्यातून येणारं कौतुक वा यशही नकोय. मला परिणामांच्या भयानं माझ्या ऊर्मीला मुरड घालायची नाहीये. कॉर्पोरेट स्टुडिओला आवडेल अशी कथा मला लिहायची नाहीये. सरकारला रुचेल म्हणून असत्य बोलायचं नाहीये. आणि चालणार नाही म्हणून लहान मुलांसाठी चित्रपट काढण्याचा प्रयत्न सोडायचा नाहीये. मोठं झाल्यावरही न ऐकलेल्या धाटणीनं ‘लहानपण देऽऽगा देवा’ म्हणणाऱ्या कुमारांची निरागसता हा एक जुनाच मोह आहे.

बहरहाल, तूर्त चिंगी घरी यावी याकरिताच्या विचारात राहतो. या विचारांची आगगाडी मला नेहमीच चिंगीपाशी नेते.

girishkulkarni1@gmail.com