02 June 2020

News Flash

बहरहाल : म्हातारी मेली

लहानपणी बरं का, गुळगुळीत काळ्या रस्त्याच्या दुतर्फा वयस्क हिरवी झाडे ऐनेदार कमान करून उभी असत

(संग्रहित छायाचित्र)

गिरीश पांडुरंग कुलकर्णी 

आमच्या शहरानंही परवा महानगर बनण्याच्या शर्यतीत जोरकस मुसंडी मारत मान टाकून दाखविली. अनेक माणसा-जनावरांचे बळी घेत आपले विक्राळ स्वरूप दाखवीत या गावानं सगळे मथळे काबीज केले. देशातील इतर महानगरांप्रमाणेच पुण्यानंही नुसत्या पावसाला साथीला घेऊन एकूण मानवी महत्त्वाकांक्षेवर वरवंटा फिरवला. असं करण्यानं आता या शहराची गणना महानगरात होईल. महानगरांच्या व्याख्येत बसण्याची पुण्याची असोशी गेल्या वीस वर्षांपासून चतु:सीमांतून ओसंडत होतीच. बंगळुरूनं आम्हाला मागे टाकून एकाच शहरातल्या दोन ठिकाणांमधील अंतर तासांवरून दिवसांवर नेऊन ठेवत स्थळ-काळाच्या कल्पनांची पुनर्माडणी करून दाखवली. आम्ही चरफडलो. आमच्या आयटीपार्काभोवती भरणारे वाहनांचे कुंभमेळे गाव-जत्रेगत क्षुद्र ठरवीत बंगळुरूकरांनी माणसांची आणि वाहनांची अजस्त्र संमेलने दिसामाजी घडवीत अचानक मुंबई- दिल्लीसारख्या बिनीच्या शिलेदारांची जोड धरली. प्रगतीच्या शाळेत रोज सांगाती येणारा मित्र असा हात सोडून पुढे पळाला असता आम्ही आलेले अनावर रडे दाबले. रडून होणार नव्हतेच काही. मराठी कर्तृत्वाला आव्हान दिल्यागत झाले होते. आम्ही सतत ‘शिवाजी.. शिवाजी’ जप करीत असल्याने अनायसे त्या कर्तृत्वाची आठवण आम्हाला झाली. इतिहास अंगावर मिरवणारे आमचे शहर वर्तमानातल्या समस्यांवर उपाय शोधण्याकरिता सत्वर कामास लागले. शिवरायांनी या पुनवडीत सोन्याच्या नांगराने नांगरून नवजीवन फुलविले, तसे चहुदिशांच्या झाडा-टेकडय़ांवर, गावा-शिवारातून आम्ही जेसीबी फिरविले. अठरापगड जाती-जमातींचा मावळा या पुण्यात एकत्र आणला. पुढारी, नोकरशहा, नागरिक, स्थलांतरित, विद्यार्थी, बदलीवर आलेले सगळे एक झाले आणि त्यांनी पुण्याला पुढे पाडण्याचा चंग बांधला. नऊवारी नेसून विश्वविद्यालयात जाऊन ज्ञान मिळवून पोक्त झालेल्या आजीगत भासणाऱ्या या शहराचा, आधुनिक मेकओवर आम्ही करायला घेतला. जेसीबीने भकास, सपाट केलेल्या रानांमधून आम्ही इमारतींच्या टोळ्या उभ्या केल्या. पाडलेल्या झाडांची कलेवरं सारून ‘रोड वाईडिंग’ का काय ते केलं. पिसाटागत पूल बांधले. असे पूल की ज्यांना जगात तोड नाही. काटकोनातले पूल असणारे शहर अशी नवी ओळख त्यानिमित्तानं आम्ही मिळवली. येणाऱ्या हर पाहुण्याला पेशव्यांनी ब्राह्मण जमा करून रमणा द्यावा.. तद्वत नाले बुजवून जागा दिली. ज्या दिलेरीनं आम्ही सिमेंट ओतत उभी खोकडी मांडली, तशाच कलंदरीनं त्या खोकडय़ांभोवती गिचमिड झोपडय़ांची रांगोळी काढली. नवतरुणीला पुरळ उठू लागल्यागत या नक्षीनं जून म्हातारीचा कायापालट होऊ लागला. गावाभोवती चहू दिशांनी मग वाहनांचे कारखाने लावून आम्ही गर्दी गोळा करू लागलो. वेशीवरल्या इवल्या गावातली शेती फस्त करीत आम्ही इन्स्टिटय़ूटं काढली. ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ असं आबदार बिरुद मिरवणारी ही नगरी चवचाल नटवीगत गल्लीबोळात शिकवण्यांची मोहोळं लेवून बाजारात बसली. इथले पुढारी सिकंदर, कारभारी बिलंदर आणि जनता कलंदर! पूर्वजांगत कर्तृत्वाला अटकेपार नेण्याची त्यांची चटक. त्यांनी मग कल्पना लढवल्या आणि गुळगुळीत रस्त्याची तरफ लावून मुंबईची बकाल डोंगरावर अलगद उचलून आणली. ‘आमच्या शहरात खेळायला या, पोटाला घालायला या, खाऊन खाऊन माजायला या’.. अशा हाळ्या घालीत आमचे पुढारी जग जागवून आले. नव्या काळाची, नव्या नखऱ्याची आयटीची तीट लावून त्यांनी ब्यूटी वाढवली. इथं ज्ञानपिपासेनं येणाऱ्या पांथस्थाला अभ्यासाचा वानवळा देऊन धाडणारी ती आजी पार विस्मरणात गेली. घरच्यापेक्षा दारचे वाढले आणि घराघरांत नवे संडास पाडले. खानावळी, टपऱ्या टाकत भुकेले जमा केले. त्यांना पानं घालून इमल्यावर इमले रचले. आयटीनं आणलेली ऐट मिरवीत आम्ही महानगरांच्या ब्युटी पॅजंटच्या तयारीला लागलो. अन् अचानक परवा पाऊस पडला. घरच्या कर्त्यां पुरुषाने लोकलज्जेस्तव वर्षांनुवर्ष दाबून ठेवलेलं रडं भरून वाहिलं. त्याला बांध घालता येईना. माझ्या गावाचं अन् मनाचं मातेरं करीत पाणी अस्ताव्यस्त धावलं, विकल करून पार मागे लहानपणी ऐकलेल्या पानशेतच्या पुराच्या कहाणीपाशी घेऊन गेलं.

लहानपणी बरं का, गुळगुळीत काळ्या रस्त्याच्या दुतर्फा वयस्क हिरवी झाडे ऐनेदार कमान करून उभी असत. त्या हिरव्या पसाऱ्याशी लगट करत आभाळीचं ऊन आमच्या जोडबसच्या पायाशी शुभ्र चकाकते आरसे सांडी. त्या पायघडय़ांवरून हलके रोंरावत ती  पीएमटीची जोडबस धावे. एकामागे एक दोन बस जोडून बांधलेली छोटी रेल्वेच जणू. मी अनेकदा मागच्या डब्यात बसे, कारण इंजिनाविना या डब्याचा प्रवास आईचं बोट धरून चाललेल्या लेकरासम ओढाळ होई. कुठलीशी खिडकी गाठून झाडांचे घेर पाहत मी झोपी जात असे. मग दिवस असून स्वप्ने पडत आणि नव्या झुळुकीने पायतळीचे आरसे बदलताना जाग आणली तर स्वप्नांची मनोराज्ये होत. पुण्याला तेव्हा गाव म्हणत असत. ऐन गावात असलेल्या कसब्यातलं आमचं एक खोलीचं घर पडलं आणि आम्हाला कुसाबाहेरच्या धनकवडीला बिऱ्हाड हलवावं लागलं. धनकवडी हे डोंगर उतारावरचं एक खेडं. डोंगराच्या पायथ्यानं वळणं घेत रस्ता साताऱ्याला जाई. याच सातारच्या रस्त्यानं धावणारी माझी ही जोडबस स्वारगेटहून निघून डोंगर पायथ्याच्या कलानगरला मला उतरवून कष्टाने चढ चढत कात्रजला जाई. उतरून अंमळ पश्चिमेला असलेली टेकडी चढून मी घर गाठीत असे. टेकडीच्या माथ्यावर आमची सोसायटी होती. पायवाट निर्मनुष्य असल्याने माथ्यावर पोहोचून घर दिसताच हायसे वाटे. माथ्यावरच्या मातीने आणि रंगीत गारगोटय़ांनी भरलेल्या माळावर चालताना मनीची मनोराज्ये पसरत जात. त्या दिवसाचे रंगीत क्षितिज स्वत:त साठविलेली एखादी चमकदार गारगोटी मी आठवणीसारखी दप्तरात टाकून घरी नेत असे. शाळा संपून कॉलेजला जाईपर्यंत या गारगोटय़ा संपून जातील अशी भीती वाटे. त्या भीतीनं मग मनोराज्यातले इमले ढासळत अन् क्षितिज काळवंडू लागे. सुसाट धावत धापा टाकीत मी घर गाठीत असे. बसमध्ये पाहिलेली स्वप्ने खरी करण्याच्या नादात माळावरचे ते तिन्हीसांजेचे भयस्वप्न तेवढे प्रत्यक्षात साकार झाले. शिकण्यासाठी यायचे जे पुणे नावाचे गाव होते, त्याचा सावकाश झालेला मृत्यू हाच माझ्या मोठं होण्याचाही इतिहास आहे याची परवा जाणीव झाली. हे गाव परवा अखेर देवाघरी गेले. गावाचा मृत्यू पाहण्याचे दु:ख अभावानेच कोणाला प्राप्त होत असावे. आजमितीला या देशातल्या अनेक गावातल्या हयात पिढय़ांनी मात्र हा ठेवा स्वकर्तृत्वाने मिळविला आहे. माणसांच्या वंशात आडनिडी पिढी करंटी निघते म्हणतात ते खरंच म्हणायचं. मी तरी नक्कीच करंटा निघालो आहे. या गावातल्या हरेक ऐवजाबद्दलची निर्व्याज ओढ सहजी टाकून मी येणाऱ्या नव्या नवलाईने हरखून, भारावून पुढे जात राहिलो. जोडबसला नाव देऊन तिच्याशी दोस्ती करणारा मी मोठं झाल्यावर विनापाश व्यवहारी बनलो. मला त्या गारगोटीची, माळाची, ऐनेदार कमानीची कशाकशाची आठवण राहिली नाही. आता गाव मेल्यावर मी आठवतो आहे त्याच्या गावपणाच्या आठवणी. झालं ते स्वीकारण्याचा  कालसुसंगत निबरपणा खरं तर माझी ओळखच बनला आहे. तरीही हे सारे मला का आठवते आहे? माझ्या आठवणींपाशी सुरू होणाऱ्या नव्या धावत्या काळाने मला अनेकानेक आनंद दिले आहेत, स्वप्नेही दाखविली आहेत. मग उगाच कढ काढीत मी हे ढोंग का रचतो आहे? कालौघात ज्याप्रमाणे घरची म्हातारी मला आठवेनाशी झाली, तशी गावची म्हातारीही विस्मरणात गेली. माझ्या जगण्याचा पस आकसून पोटच्या खळगीएवढाच उरला. चहूदिशांतून उठणारे प्रगतीचे हाकारे वसती गावे उठवून अनेकांची शिकार साधू लागले. मीही मिसळलाच माझा आवाज त्या गदारोळात. म्हातारी खस्ता खात असताना मला यशाचा धुंद कैफ चढला होता. ना जाणिवेनं, ना कुठल्या उत्सुकतेनं मी माझ्या गावाची विचारपूस केली, ना माझा वकूब गावाकरता कामी लावला. गाव मृत्युपंथाला लावून मी प्रगतीची वहिवाट पाडली. आता दिवस घालत बसलोय आम्ही. सगळ्यांचेच. गेल्या सोयऱ्यांचे आणि मेल्या गावाचे. अशा वेळीच तर आठवणी निघतात- लढायांच्या, रोगराईंच्या, महापुरांच्या!

आमच्या लहानपणापासूनची या गावची नांदती आठवण म्हणजे पानशेतचा पूर. इथले बापजादे रंगवून त्याची कहाणी सांगत. होत्याचं नव्हतं झालेलं पाहिलेली ती माणसं. टिकून राहिलेली ती माणसं. त्यांनीच कष्टानं उभं केलं त्यांचं वाहून गेलेलं गाव. त्या प्रसंगातली ओल त्यांच्या आतडय़ात झिरपली असेल का? पण काळानं अशी बांधिलकी जपणारी माणसं ओढून नेली. किंबहुना, या माणसांसवे माणसातली ओलही हिरावून नेली. आज मला कुठे काय लगाव उरलाय या गावाबद्दल? माणसाच्या जगण्यात गाव उरलंय कुठं? सगळी गावं सारखीच. तिथे पसा मिळतो अन् अर्थ हरवतो. निबरपणाच्या नवउपलब्धीतून आम्ही मुर्दाडागत टिच्चून राहतो अशा निर्जीव गावात. क्षितिजापर्यंत जिथे केवळ सिमेंट उगवतं तिथे अन्यथा टिकायचं तरी कसं? माझ्या जगण्याला अर्थाची आवश्यकता नाही. एका विशाल अविरत फिरणाऱ्या चक्रावर साचलेला एक क्षुद्र धूलिकण याउपर त्या जगण्याला किंमत नाही. त्यामुळेच कदाचित ही शहरं हवं तेव्हा माणसं मारतात. त्यांचं हे नवं रूप- स्वरूप मला प्रगतीच्या हाका घालीत त्यांच्या पापपुण्यात वाटेकरी करीत आलं आहे. आता मी सुटू शकणार नाही. माझ्या जुन्या गावाचा मी सहज आपखुशीने हात सोडला तेव्हा ते माझ्यावर रागावलं नाही की रुसलं नाही. त्याच्या पाठीवरची समजुतीची मोळी अनेक पिढय़ांना आभाळ मोकळं करून देत आली होती. माझं नवं शहर मात्र मला गाडून त्यावर उभं राहिलं चमचमत. विध्वंसाच्या विदारक कहाण्या पाहून ऐकून मी मोडून पडतो आहे. कुणाला दोषी धरू? स्वत:नंतर नाव सुचत नाही. माझ्या रंगहीन बकाल जगण्याला विटून म्हातारी मेली आणि आता सोकावलेल्या काळापुढे मी क्लांत, शरण आहे. काही न सुचण्याची विषण्णता देणारा मृत्यू आमच्या गावात मुक्कामी आला अन् त्याने स्वरंजनार्थ रचलेले सोहळे आम्ही मूकपणाने अनुभवले. मला थोडं रडू द्या. थोडी ओल हवी आहे. पुरात वाहून न गेलेलं माझं आयुष्य चिखलाने माखलं आहे. त्याला न्हावू माखू घालून ताजेतवाने करणारी जुन्या पुराची वृद्ध आठवण मी जागवतो आहे. त्या आठवणीतली माणसं पुन्हा उठून उभी राहिली होती. मलाही उभं राहावंच लागेल. माणसाला आपल्या वस्तीचं अप्रूप, काळजी, आपुलकी आणि असं इतरही बरंच सकारात्मक वाटण्याचे दिवस निश्चित सरले. ही एक ठोक समजूत गाठी बांधून या काळाने आणलेला कोरडेपणा चढवून मला कामाला लागण्याची घाई करावी लागेल.

म्हातारीच्या दिवसांचे सोपस्कार झाले की प्रगतीपथावर चालू लागेन मी..

girishkulkarni1@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 6, 2019 12:08 am

Web Title: baharhal article girish pandurang kulkarni abn 97
Next Stories
1 भ्रष्ट व्यवस्थेतील शोकात्म नायक
2 नाटकवाला : जादूचा लोटा
3 संज्ञा आणि संकल्पना : दृष्टीआडची सृष्टी
Just Now!
X