रेखा देशपांडे – deshrekha@yahoo.com

बासूदा.. बासू चटर्जी. मध्यमवर्गीय जग व त्यांच्या जाणिवा आपल्या सिनेमातून चितारणारे संवेदनशील दिग्दर्शक. चित्रपटीय झगमगाटी दुनियेतही आपला ठसा उमटवणारे.. बासूदा.

चित्रपटसृष्टी आणि तिच्या चाहत्यांचं जग म्हणजे एक रणांगण झालं होतं तेव्हा. एकीकडे लोकप्रिय शैलीच्या साचेबद्ध चित्रपटांच्या चिरंतन नशेत जगणारे चाहते आणि दुसरीकडे नव्यानं जन्माला आलेल्या समांतर सिनेमाच्या अर्थपूर्णतेचा, वास्तवदर्शीतेचा अभिमान बाळगणारे पुरस्कर्ते. दोघांतल्या वादांच्या रणदुंदुंभींनी आसमंत दणाणून गेला होता. अशात कुठुनसे बासरीचे हलकेसे हळुवार सूर मधेच ऐकू येऊ लागले होते..

१९७०-८० ची दशकं. दोन्हीकडच्या चाहत्यांना शांत करणारे मध्यममार्गी चित्रपट येऊ लागले होते. आणि या दोन्ही प्रतिपक्षांना एकत्र आणण्याची किमया साधली होती त्यांना. या मध्यममार्गीयांमधले म्होरके होते ते म्हणजे एक मुखर्जी आणि दोन बासू. हृषिदा, बासूदा आणि बासूदा हे मध्यममार्गी सिनेमाचा मार्ग चोखाळणारे अग्रणी दिग्दर्शक. सामान्य माणसाच्या जगण्यातलं नाटय़ ओळखून ते आपापल्या शैलीत रंगवलं या तिघांनी. हृषिदा त्या सामान्य जगण्यातून उदात्ताकडे घेऊन जायचे प्रेक्षकाला. बासू भट्टाचार्य सामान्य स्त्री-पुरुषांतल्या, विशेषत: पती-पत्नी नात्यातल्या सामान्य गुंतागुंतीतले विलोभनीय मानसशास्त्रीय पैलू शोधत राहत. बासू चटर्जी याच शहरी मध्यमवर्गीय माणसांच्या जगण्यातलं साधं सरळपण हलक्याफुलक्या मिश्किल शैलीत मांडत. त्यातल्या सूक्ष्म नाटय़ाकडे प्रेक्षकांचं लक्ष वेधत. समांतर सिनेमातलं वास्तव या मध्यमवर्गीय प्रेक्षकाच्या अंगावर यायचं. अरे बाप रे, असं व्हायचं. तर बासूदांनी दाखवलेलं वास्तव त्यांच्या खूप परिचयाचं आणि त्यामुळे जिव्हाळ्याचं, काहीसं आश्वासकही वाटत असे.

‘थोडा है थोडे की जरूरत है, जिंदगी फिर भी यहाँ खूबसूरत है..’ असं एक गाणं ‘खट्टा मीठा’मध्ये होतं. हे गाणं म्हणजे बासू चटर्जींच्या सिनेमातल्या माणसांच्या जगण्याचं तत्त्वज्ञानच होय. हा महानगरीय मध्यमवर्ग तसा अल्पसंतुष्ट होता. आपल्या मर्यादा आणि क्षमता, किंबहुना क्षमतांच्या मर्यादा ओळखून होता. श्रीमंती आपल्यासाठी नाही हे त्यानं मान्य केलं होतं आणि गरिबीविषयी उगीच फारशी कणव बाळगून चळवळीत वगैरे पडण्याचा उत्साह त्याच्या ठायी नव्हता. असं जग होतं त्याचं. आणि बासू चटर्जींनी नेमकं तेच आपल्या सिनेमाचं जग ठरवून टाकलं.

या सिनेमाला चकचकीत, ग्लॅमरस, श्रीमंती चित्रचौकटींची गरजच नसे. मोठय़ा बजेटची हाव नसे. ही पात्रं- नव्हे, ही माणसं आपल्या-तुपल्यासारखेच कपडे घालत, आपल्या-तुपल्यासारख्याच नोकऱ्या करत किंवा आपल्या-तुपल्यासारखी बेकार असत. आणि नोकरी असली तर प्रमोशन मिळेल की नाही, या विवंचनेत असत. बेस्टच्या बसमधून आणि लोकल ट्रेनमधून फिरत. आपल्या-तुपल्यासारखंच एखादं साधंसं माणूस त्यांना साध्याशा प्रसंगात भेटे आणि नाटय़ रंगत जाई. आता हे वर्णन एखाद्या साच्याचं वाटलं तरी ते तसं नसे. साचा एवढाच, की आपल्या-तुपल्यासारखं मध्यमवर्गीय महानगरीय जगणं! पण याच परिसरात माणसांच्या वागण्याच्या कितीतरी तऱ्हा असतात. म्हणूनच प्रत्येक माणूस वेगळा दिसतो. तसाच बासूदांचा प्रत्येक चित्रपट वेगळा असायचा.

प्रत्यक्षात गप्पा मारताना बासू भट्टाचार्य म्हणजे वात्रटपणाचा अर्क, तर बासू चटर्जी गंभीर मुद्रेनं हळूच काहीतरी मिश्किल बोलून किंचितसं हसणारे. स्वत:शीच हसल्यासारखे. एखादीच रेष ओढून कार्टून सिद्ध केल्यासारखे. पण चित्रपटात या दोन दिग्दर्शकांच्या भूमिका जणू काहीशा रिव्हर्स व्हायच्या. बासू चटर्जींच्या मिश्किलपणाचं रहस्य होतं त्यांच्या कार्टूनिस्ट असण्यात. आर. के. उर्फ रूसी करंजियांच्या ‘ब्लिट्झ’मध्ये ते कार्टूनिस्ट म्हणून काम करत. मुंबईत ते आले होते ते आग्य्राहून. वडील रेल्वेत नोकरीला होते. अजमेर, माऊंट अबू, मथुरा, आग्रा अशा त्यांच्या बदल्या होत. लहानपणापासून सिनेमा बघण्याचा शौक असला तरी बासू मुंबईत आले ते तसे सिनेमा करायच्या महत्त्वाकांक्षेने नव्हे. निम्न-मध्यमवर्गीय मुलासारखेच ते आले ते नोकरी करण्यासाठी. एका मिलिटरी शाळेत ग्रंथपालाची नोकरी मिळाली होती. काही दिवसांनी ही नोकरी सोडून ते कार्टून काढून ‘ब्लिट्झ’ला देऊ लागले. राजकीय व्यंगचित्रं! (मजा म्हणजे पुढे चित्रपट करायला लागल्यावर त्यांनी त्यातून राजकारणावर कधी टिप्पणी केली नाही.) ७० च्या दशकात फिल्म सोसायटी चळवळ ऐन भरात होती. मुंबईतली ‘फिल्म फोरम’ ही सोसायटी चित्रपट व्यावसायिकांची सोसायटी म्हणून ओळखली जायची. (होय, त्यावेळचे काही चित्रपट व्यावसायिक ‘फिल्म सोसायटी’ हा संस्कार मानणारे होते. हे संस्कार मानणाऱ्यांत मराठी चित्रपटवाले कुठेही नव्हते!) अरुण कौल आणि बासू चटर्जी हे ही फिल्म सोसायटी चालवायचे. फिल्म सोसायटीतून जगातल्या विविध देशांचे चित्रपट पाहायला मिळू लागले आणि सिनेमाचे विश्व आणि त्याच्या शक्यता किती अफाट आहेत याची जाणीव त्यांना होऊ लागली.

बासू चटर्जींच्या मनात चित्रपट दिग्दर्शनाचे विचार घोळू लागले. अजमेरपासूनचा आपला सहाध्यायी मित्र शैलेंद्र चित्रपट निर्मिती करतोय हे कळताच त्यांनी त्याच्याजवळ आपली इच्छा व्यक्त केली आणि शैलेंद्रनं त्यांना आपल्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाशी बोलायला सांगितलं. बासूदा बासू भट्टाचार्याशी बोलले. बिमल रॉय यांचे सहाय्यक म्हणून काम केल्यानंतर बासू भट्टाचार्य हा आपला पहिलाच चित्रपट दिग्दर्शित करणार होते. १९६६ मध्ये  बासू चटर्जी त्यांचे सहाय्यक बनले. चित्रपट होता- ‘तीसरी कसम’! १९६८ मध्ये त्यांनी गोविंद सरैयांच्या ‘सरस्वतीचंद्र’साठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. (हे दोन्ही चित्रपट प्रसिद्ध साहित्यकृतींवर आधारित होते. ‘तीसरी कसम’ फणीश्वरनाथ रेणूंच्या ‘तीसरी कसम ऊर्फ मारे गए गुलफाम’वर आणि ‘सरस्वतीचंद्र’ गोवर्धनराम त्रिपाठी यांच्या याच नावाच्या प्रसिद्ध गुजराती कादंबरीवर.) आणि मग त्यांनी स्वतंत्रपणे दिग्दर्शनाला सुरुवात केली ती राजेंद्र यादव यांच्या प्रसिद्ध साहित्यकृतीवरील ‘सारा आकाश’ या चित्रपटाद्वारे. या चित्रपटात कुणी स्टार नव्हते. राकेश पांडे आणि मधुछंदा. कथेतली दोन्ही मुख्य पात्रं अगदी नवीकोरी. कॉलेजात शिकत असलेला, करीअरची स्वप्नं पाहणारा, कोवळा, निम्न-मध्यमवर्गीय तरुण समर. घरच्यांच्या दबावापायी त्याला लग्नाच्या बेडीत अडकावं लागतं. कुचंबणा होते ती कोवळ्या नव्या नवरीची. यात ना स्टारपणाचं ग्लॅमर होतं, ना गोष्टीत सिनेमाई लटकेझटके. बासूदांच्या या पटकथेला फिल्मफेयर पुरस्कारही मिळाला आणि उत्कृष्टतेची पावतीही! मग ‘पिया का घर’, ‘रजनीगंधा’, ‘छोटी-सी बात’, ‘चितचोर’, ‘स्वामी’, ‘खट्टा मीठा’..

राजश्री प्रॉडक्शन्ससाठी केलेल्या ‘पिया का घर’मध्ये गावातल्या ऐसपैस वाडय़ातून, मोकळ्या परिसरातून लग्न होऊन मुंबई महानगरीच्या चाळीतल्या दीडखणी सासरी आलेल्या नववधूची (जया बच्चन) घुसमट होते. तीत मुंबईतल्या असंख्य चाळवासी सासुरवाशिणींनी आपली प्रतिबिंबं पाहिली असतील. मग त्या नववधूची समस्या सोडवताना बासूदा दीडखणी सासरच्या आणि कुटुंबाचाच भाग अशा चाळकऱ्यांच्या ‘घर छोटा, मगर दिल बडा’ अशा रूपाचं दर्शन घडवत महानगरीतल्या जनतेला सलाम ठोकतात. तिकडे ‘हमारी बहू अलका’मध्ये सुनेवर अती माया करणाऱ्या सासऱ्यापायी (उत्पल दत्त) नवदम्पतीची (बिंदिया गोस्वामी- राकेश रोशन) होणारी मिश्किल गोची ते मग विनोदाची आतषबाजी करत सोडवतात.

‘रजनीगंधा’ आणि ‘छोटी-सी बात’ हे त्यांचे सिग्नेचर चित्रपटच म्हटले पाहिजेत. मन्नू भंडारींची लघुकथा आहे- ‘यही सच है’! तिला चित्रपटाच्या पडद्यावर एक हळुवार, काव्यात्म नाव मिळालं.. ‘रजनीगंधा’! गोष्ट होती सामान्य, सुशिक्षित, पदवीधर मुलीच्या आकांक्षांची.. तिच्या द्विधेची. अशाच कुणाही मुलीच्या बाबतीत घडेल असा सगळा घटनाक्रम. (अर्थात हे दशक होतं ७० चं. मनातलं मनातच न ठेवण्याचं, कुढत न बसणाऱ्यांचं आणि ब्रेकअप्चे सोहळे करून मोकळे होणाऱ्यांचं गद्य जग नव्हतं ते!) कॉलेजच्या कोवळ्या दिवसांतला जिवलग मित्र नवीन (दिनेश ठाकूर) दीपाला (विद्या सिन्हा)  नोकरीच्या मुलाखतीसाठी ती मुंबईत आली असताना भेटतो. दीपाच्या मनात एकेकाळच्या कोवळ्या, पण पुढे आकारच घेऊ न शकलेल्या किंवा व्यक्तच न झालेल्या भावनांची दाटी होते. त्याचवेळी एक द्विधा मन:स्थितीही निर्माण होते. कारण दरम्यानच्या काळात दिल्लीत एम. ए.ची परीक्षा देत असताना या गंभीर, अभ्यासू मुलीला भेटलेला असतो एक तसा अभ्यासात सामान्य, पण आपल्या मस्त आनंदात जगणारा तरुण संजय (अमोल पालेकर). त्यानं चिकाटीनं दीपाला आपल्या प्रेमात पाडलंय. तिच्याबरोबर संसार करायचा हे त्यानं गृहीतच धरलंय. आता इथे दीपाच्या मनात सतत तुलना : काय खरं म्हणायचं? यातलं काय आपलं? कधीच व्यक्त न होणारा गूढ नवीन? की मनात येईल ते धाडकन् बोलून टाकणारा आणि त्यामुळे ज्याच्याविषयी खात्री वाटावी असा संजय?  बासूदा दीपाला या द्विधा मन:स्थितीतून बाहेर काढतात ते मिस्किल टच् देतच. ‘रजनीगंधा’ला त्या वर्षी लोकप्रिय शैलीतील उत्कृष्ट चित्रपटाचं फिल्मफेयर अ‍ॅवार्ड आणि क्रिटिक्स अ‍ॅवार्डही मिळालं, ही गोष्टच खूप बोलकी आहे.

‘रजनीगंधा’तल्या दीपासारखीच, चारचौघींइतकी देखणी, प्रिंटेड सिंथेटिक साडीचा पदर खांद्यावरून लपेटून घेत चालणारी नोकरदार प्रभा ‘छोटी-सी बात’मध्ये होती. पण मोकळी, सहज. तर अरुण होता बुजरा, तिच्यावर प्रेम करणारा आणि तिचा पाठलाग करणारा. पण तिनं मागे वळून बघताच भंबेरी उडणारा. तिला कसं पटवावं हे न कळणारा, बावळा तरुण. दिसायला ‘रजनीगंधा’सारखीच जोडी; पण स्वभाववैशिष्टय़ं अगदी वेगळी. आणि दोन्ही ठिकाणी पटणारी अशीच. हा फरक जाणवून देणं वरकरणी सहज सोपं वाटावं; पण विचार केला की ते किती कठीण होतं हे लक्षात येतं. अशा कठीण गोष्टी सोप्या वाटाव्यात हे बासू चटर्जींचं वैशिष्टय़. रोजच्या साध्या घटनांमध्ये कुठेही आघात न करता नाटय़ निर्माण करणं.. बासूदांच्या चित्रपटाचं व्यक्तिमत्व तयार झालं होतं.

‘चितचोर’मधल्या मुंबईकर विनोदला (अमोल पालेकर) गाव आवडतं ते तिथल्या गीतामध्ये (झरीना वहाब) गुंतू लागल्यामुळे. हा विनोदही साधा ओव्हरसीयर. इंजिनीयर असलेल्या आणि त्याचा बॉस असलेल्या सुनीलबरोबर त्याची काय बरोबरी होणार? बिचारा निराश होऊन मुंबईला यायला निघतो. पण गीताला आवडलाय, भावलाय तो विनोदच. भावलाय म्हणजे भावलायच. ओव्हरसीयर की इंजिनीयर याच्याशी तिला काही देणंघेणं नाही. तिच्या हट्टापुढे, किंबहुना निर्धारापुढे उच्चभ्रू सुनील (विजयेंद्र घाटगे) हार मानतो आणि मुंबईला निघालेल्या विनोदचा कान पिळतो की, ‘तिचा निश्चय पक्का आहे, तूच हार मानून निघालास.’

हा मध्यममार्गी आणि मध्यमवर्गीय सिनेमा शोलेबिलेसारखी तुफान गर्दी खेचणारा कधीच नव्हता आणि याची जाणीव बासूदांना होती. तशी त्यांना अपेक्षाही नव्हती. कारण त्यांचा विचार स्पष्ट होता. चित्रपटाचं यश पैशांत त्यांनी कधी मोजलं नाही. चित्रपटाच्या प्रकृतीनुसार त्याला लहान-मोठा प्रेक्षक प्रतिसाद मिळणार हे स्पष्ट होतं. छोटय़ा बजेटमधला त्यांचा हा सिनेमादेखील पैसा मिळवत होताच. पण चांगला चित्रपट हेच त्याचं खरं यश होतं त्यांच्या लेखी. ‘रजनीगंधा’, ‘छोटी-सी बात’च्या यशानंतर निर्मात्यांकडून बडय़ा बजेटच्या चित्रपटाचं दिग्दर्शन करा म्हणून त्यांना ऑफर्स आल्या, पण बासूदा ठाम होते. ते स्वत: मध्यमवर्गीय. त्यांचं कायम हेच म्हणणं राहिलं की, ‘मला जे जीवन माहीत आहे, जे वास्तव मी अनुभवलंय तेच मी दाखवणार.’ त्यामुळेच त्यांचा सिनेमा हा कायम खरा वाटत राहिला. त्यांनाही आणि प्रेक्षकांनाही. ते ‘मेक बिलीव्ह’ जग नव्हतंच. वेगळ्या संदर्भात सत्यजित राय आणि अदूर गोपालकृष्णन्ही हेच तर म्हणत आले. सत्यजित राय यांनी हिंदी चित्रपट करायचं अनेक र्वष- ‘शतरंज के खिलाडम्ी’ करेपर्यंत- नाकारलं. कारण जी भाषा, ज्या भाषेची संस्कृती आपल्या परिचयाची नाही, त्या भाषेचा चित्रपट करणं त्यांना पसंत नव्हतं. अदूर यांनीही मल्याळम्ची कास सोडली नाही. आपल्या मातीतला सिनेमा केला की तो आपसूकच वैश्विक होतो, हे त्यांचं म्हणणं- जे राय आणि अदूर या दोघांच्या बाबतीत सिद्धच झालेलं आहे. बासूदांचा मध्यमवर्गीय सिनेमा यामुळेच ‘खरा’ ठरला. ही ‘छोटी-सी बात’ खरं तर खूपच ‘बडी’ असते. ‘खट्टा मीठा’ आणि ‘शौकीन’ हे त्यांच्या विनोदाचे क्लायमॅक्स म्हटले पाहिजेत. ‘खट्टा मीठा’मधला वयस्कर पारशी विधुर होमी मिस्त्री (अशोककुमार) आणि वयस्कर पारशी विधवा नरगिस सेठना (पर्ल पदमसी) आणि त्यांची वेगवेगळ्या वयातली मुलं. या आईबापांनी उतारवयात पुनर्विवाह केला असता मुलांच्या दोन फौजांमधलं महाभारत आणि नंतरचा हृद्य समेट हा सगळा कथाभागच विनोदानं ठासून भरलेला आणि तरी भावुक करणाराही होता. ‘शौकीन’मध्ये तीन हिरवट म्हातारे एका तरुणीवर मरताहेत. रोमॅंटिक स्वप्नं पाहताहेत, एकमेकांशी स्पर्धा करताहेत आणि रुळावर येत अखेर त्या तरुणीचं तिच्या प्रियकराशी मीलन घडवून आणताहेत. अशोककुमार, उत्पल दत्त आणि ए. के. हनगल हे ते तीन शौकीन म्हातारे. हे दोन्ही चित्रपट म्हणजे कलावंतनिवडीची उत्कृष्ट उदाहरणं होत.

पुढच्या काळात त्यांनी देव आनंद (मनपसंद), हेमामालिनी (रत्नदीप), हेमा-धर्मेंद्र (दिल्लगी), जितेंद्र- नीतू सिंह (प्रियतमा), अमिताभ (मंजिम्ल), अनिल कपूर-अमृता सिंह ( चमेली की शादी) अशा ग्लॅमरस स्टार्सना घेऊन आपल्या शैलीचे चित्रपटही केले, तेव्हा या स्टार्सना बासू चटर्जी शैलीत त्यांनी वावरायला लावलं. एरवी डिस्को डान्सर म्हणून ओळखला जाणारा मिथुन बासूदांच्या चित्रपटात साधासुधा मध्यमवर्गीय तरुणच झाला.

परंतु एक ‘रुका हुआ फैसला’ हा ‘ट्वेल्व्ह अँग्री मेन’ या नाटकावर आधारित त्यांनी केलेला चित्रपट अगदी वेगळ्या शैलीचा प्रयोग होता आणि तो बासूदांच्या दिग्दर्शकीय कारकीर्दीतला एक वेगळा उठून दिसणारा तुरा होय. तो त्यांच्या प्रेक्षकांना वेगळा धक्काही वाटला असेल. पण तो बासूदांच्या दिग्दर्शकीय शक्यतांचा एक दाखला होता.

पुढच्या काळात दूरदर्शनसाठी ‘रजनी’, ‘ब्योमकेश बख्शी’, ‘काकाजी कहिन’ या मालिका करण्यातही आपल्याला मजा आली असं ते म्हणायचे. ‘रजनी’ ही मध्यमवर्गीय गृहिणीच; पण समाजातल्या दैनंदिन भ्रष्टाचारांविरुद्ध धाडसानं उभी राहणारी त्यांची वेगळी नायिका होती. शरदिंदु बॅनर्जींचा बंगाली वाचकांना प्रिय असलेला डिटेक्टिव्ह ‘ब्योमकेश बख्शी’ दूरदर्शनच्या देशभरातल्या प्रेक्षकांच्या ओळखीचा झाला तो बासूदांच्या मालिकेमुळे. हा ब्योमकेश बख्शी नुसता डिटेक्टिव्ह नाही, तर सत्याचा आग्रह धरणारा आणि सत्य शोधून काढणारा आहे. त्यामुळे ही मालिका डिटेक्टिव्ह कथेपलीकडे पोहोचते. मनोहर श्याम जोशींच्या ‘नेताजी कहिन’ या राजकीय प्रहसनाचं दूरदर्शन मालिकेतलं सादरीकरण होतं ‘काकाजी कहिन.’ कालचा एपिसोड आज न आठवण्याच्या आजच्या काळातही दूरदर्शनवर काही दशकांपूर्वी गाजलेल्या या मालिका आठवाव्यात आणि त्या प्रेक्षकाची कळी खुलावी, यातच यांचं सारं यश आलं.

अलीकडेच २०१५ मध्ये शरत कटारियानं आयुष्मान खुराना आणि भूमी पेडणेकरला घेऊन ‘दम लगा के हैशा’ हा चित्रपट केला होता. रा. स्व. संघाच्या शाखेत जाणाऱ्या मध्यमवर्गीय प्रेमप्रकाश तिवारीनं राष्ट्रकार्याला वाहून घेण्यासाठी ब्रह्मचर्याची शपथ घेतलीय. पण वडिलांपुढे त्याचं काही चालत नाही आणि त्यांनी ठरवलेल्या लठ्ठ मुलीशी त्याला लग्न करावं लागतं. ‘सारा आकाश’मधल्या समरसारखीच त्याची अवस्था होते. तो तिला नांदवून घ्यायलाच तयार नाहीए. या सिच्युएशनमधून जो काही विनोदाचा धमाका होतो तो आठवतो आणि वाटतं, बासूदांच्या सिनेमानं आपलं बीज या जमिनीत सोडलंय की! ते कधी ना कधी रुजून येतंच. कारण माणूस आहे तोवर त्याचं मन आहे, आणि मन आहे तोवर त्याच्या भावना आहेत. जगण्याच्या शैली बदलल्या तरी जगण्याचा गाभा तोच राहतो. बात छोटी- सी है, लेकिन बहुत बडम्ी.