News Flash

विश्वाचे अंगण : पृथ्वीचं दुर्दर्शन की सुदर्शन?

केशवसुतांनी १८९७ साली ‘मनोरंजन’ मासिकात ‘विश्वाचा विस्तार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा’ हे स्फुट विचार मांडले.

पृथ्वी, सौरमंडल याच्याही पलीकडे जग आहे याचा शोध विसाव्या शतकाच्या आरंभी वैज्ञानिकांना लागला.

अतुल देऊळगावकर – atul.deulgaonkar@gmail.com

केशवसुतांनी १८९७ साली ‘मनोरंजन’ मासिकात ‘विश्वाचा विस्तार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा’ हे स्फुट विचार मांडले. आपल्या जाणिवेपेक्षा जगाची विराटता ही अफाट आहे, हे दर्शविण्यासाठी अनेक संतांनी ‘विश्व’ या तात्त्विक संकल्पनेचा उल्लेख केला आहे. परंतु पृथ्वी, सौरमंडल याच्याही पलीकडे जग आहे याचा शोध विसाव्या शतकाच्या आरंभी वैज्ञानिकांना लागला. त्यानंतर ब्रह्मांडामध्ये (कॉसमॉस) आपलं विश्व हे एकमेव नसून अनेक विश्वं (मल्टिव्हर्स) अस्तित्वात असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. आपल्या विश्वाची निर्मिती सुमारे १५०० कोटी वर्षांपूर्वी महास्फोटातून झाली. ४८० कोटी वर्षांपूर्वी सूर्य, तर ४५० कोटी वर्षांपूर्वी पृथ्वी जन्माला आली. सजीवांची निर्मिती ३८० कोटी वर्षांपूर्वीची आहे. आपले पूर्वज वानर चार कोटी वर्षांपूर्वी दाखल झाले. सध्याचा होमो सेपियन हा ३५ हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात आला असावा. माणूस दहा हजार वर्षांपूर्वी शेती करायला लागला. आपल्या ग्रहाच्या भवितव्याचा, येथील संपूर्ण जीवसृष्टीच्या अवस्थेचा अभ्यास अनेक शास्त्रज्ञ विविध दिशांनी करीत आहेत. ते संशोधन करत अतिशय सूक्ष्म पातळीपर्यंत जातात आणि विशाल सत्याला गवसणी घालू लागतात, तेव्हा पृथ्वीची चिंता वाटून ते कासावीस होतात.

एकेकाळचं चैतन्य संपून मरणपंथाला लागलेल्या जीर्ण, भग्न वास्तू अनुभवताना आपल्याला आतून काय होत असतं? ‘साहिब, बीबी और गुलाम’मधील आरंभीच्या व अखेरच्या दृश्यात जुनापुराणा उद्ध्वस्त महाल दिसतो. दरम्यानच्या काळातील महालाचा विनाश हा त्याचा साक्षीदार भूतनाथ याच्या नजरेतून आपण पाहतो. मृणाल सेन यांच्या ‘बैशे श्रावण’ व ‘भुवनशोम’ चित्रपटांतून भग्नावशेष सारखे डोकावत राहतात. ‘खंडहर’ तर पूर्णपणे भग्न वास्तूमध्येच आहे. या आकर्षणाविषयी विचारल्यावर मृणालदा म्हणाले होते, ‘‘मला भग्न अवशेष नेहमीच भावत आले आहेत. त्यांचा नेमका काळ कोणता मानायचा? त्याला गतवैभव समजलं जातं. मला मात्र ते समकालीन वाटतात. हळूहळू संपत जाणं, भंगत जाणं व नष्ट होणं हा सार्वत्रिक नियम आहे. तो मनुष्यदेह व निर्जीव दगड दोघांनाही सारखाच लागू आहे. आपण राहतो ते घर अचेतन आहे. घर व आपण दोघांचंही आयुष्य क्रमश: कमी होत जातं. दोघांचा एकमेकांशी संबंध येत राहतो. म्हणून भग्नावशेष दरवेळी वेगळंच काही व्यक्त करत आहेत असं आपल्याला जाणवत राहतं.’’ आपलं म्हणजे समस्त मानवप्राण्यांचं घर म्हणजे पृथ्वी हीसुद्धा अशीच खंगत चालली आहे? पृथ्वीवरील निसर्गाचा विनाश पाहताना अनेक वैज्ञानिकांची अवस्था भूतनाथसारखी होत असावी. या ऱ्हासपर्वाचे हे साक्षीदार ‘अब तुम्हारे हवाले धरती साथीयों’ असं कळवळून सांगत आहेत.

पृथ्वीतलावर सर्वात आधी सस्तन प्राणी दाखल झाला असावा आणि मग पक्षी आले असणार असा अनेकांचा समज असतो. परंतु वास्तव वेगळंच आहे. कहाण्यांमध्येसुद्धा ज्यांना अजिबात महत्त्व नाही असे मंडूक अर्थात् बेडूक हे कालक्रमात आपल्यापेक्षा व डायनोसोरपेक्षा वरिष्ठ सजीव आहेत. सुमारे ४० कोटी वर्षांपूर्वीपासून त्यांचा धीरगंभीर ध्वनी आसमंताला सरावाचा झाला आहे. (म्हणूनच ‘दादूर, मोर, पपिहा, कोयल’ यांना अभंग व बंदिशींत अढळ स्थान असावं.) अंटाक्र्टिका वगळता जगातील सर्व भागांत बेडकांच्या सुमारे ५,५०० प्रजाती नांदत होत्या. ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर’च्या संशोधनानुसार, ‘सध्या बेडकांच्या पाच प्रजाती उच्चाटनाच्या मार्गावर आहेत.’ बेडकांची त्वचा ही पार्य (पर्मिएबल) असल्यामुळे पाण्यातील विषारी द्रव्ये शोषून घेते. पाण्यातील प्रदूषण व आम्ल थेट बेडकांच्या शरीरात जाते. जगातील अनेक शास्त्रज्ञ ‘‘हवामानबदल, रासायनिक प्रदूषण, आम्लयुक्त पाऊस व राहण्यायोग्य जागेचा अभाव (लॉस ऑफ हॅबिटाट) यामुळे बेडकांची संख्या झपाटय़ाने घटत आहे. जगातील उभयचर प्राण्यांच्या निम्म्या प्रजाती धोक्यात आल्या असून, २०८० साली त्यांचे अस्तित्व नगण्य असेल,’’ असा इशारा देत आहेत. बेडूक नाहीसे होण्याचं वार्ताकन करताना पत्रकार व लेखक एलिझाबेथ कोल्बर्ट यांना ती भयसूचक घंटा वाटली. त्या कसून अभ्यासाला लागल्या व त्यातून एक ऐतिहासिक महत्त्वाचा दस्तावेज तयार झाला- ‘द सिक्स्थ एक्स्टिन्क्शन : अ‍ॅन अननॅचरल हिस्ट्री.’ २०१४ साली आलेल्या या पुस्तकासाठी कोल्बर्ट यांना पुलित्झर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. केवळ उभयचर प्राणीच नव्हे, तर अपृष्ठवंशी प्राणी, सस्तन प्राणी व जलचर यांच्या अनेक प्रजाती नाहीशा होत आहेत हे कोल्बर्ट यांच्या लक्षात आलं. त्या म्हणतात, ‘‘वाढत जाणाऱ्या कर्बउत्सर्जनापैकी किमान एक-तृतीयांश हे समुद्रात शोषलं जातं. पाण्याशी कर्बवायूंचा संयोग होऊन कर्ब-आम्ल तयार होतं आणि त्यामुळे समुद्रांचं आम्लीकरण होऊ लागलं. त्यांचं रसायनशास्त्र बिघडून गेलं. हे समुद्रांचं प्रदूषण जलचर प्राण्यांच्या मुळावर उठलं आहे. एकंदर मानवनिर्मित युगात (आंथ्रोपोसिन) जंगलतोड व  प्रदूषण या मानवी कृत्यांमुळे निसर्ग पूर्ण विनाशाकडे वाटचाल करीत आहे. जगाच्या इतिहासात आजपर्यंत जीवसृष्टीचं पाच वेळा समूळ उच्चाटन झालं आहे. ६.६ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर लघुग्रह आदळल्यामुळे ७६ टक्के प्राणी (डायनॉसोर काळ) व वनस्पती नष्ट झाल्या असाव्यात असं मानलं जातं. आता मानवी कारणांमुळे आपण सहाव्या समूळ उच्चाटनाकडे जात आहोत.’’

२०१९ च्या मे महिन्यात संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक जैवविविधतेसंबंधीचा १८०० पानी अहवाल प्रसिद्ध केला. त्यात ‘जीवसृष्टीतील दहा लक्ष प्रजाती लुप्त होण्याच्या अवस्थेत आहेत. याचे भयंकर पडसाद मानवजातीला भोगावे लागतील,’ असं म्हटलं आहे. जैवविविधता म्हटलं की आपल्याला ‘वाघ वाचवा’, ‘सिंह जपा’ या मोहिमा आठवतात. जीवसृष्टीतील प्रत्येक जीव तेवढाच महत्त्वाचा आहे, ही फक्त ‘बोलाचीच कढी’ आहे. बंगळूरूतील ‘अत्री’ (अशोक ट्रस्ट फॉर इकॉलॉजी अँड एन्व्हायर्नमेंट) ही संस्था गेल्या २० वर्षांपासून पश्चिम घाटातील जैवविविधतेचा मागोवा घेत आहे. ‘भुंग्याच्या जातीतील कीटक जंगलातील सफाई करतात. पक्षी व प्राण्यांच्या विष्ठेचे रूपांतर कसदार मातीमध्ये करतात. या कीटकांच्या प्रजाती कमालीच्या वेगाने नष्ट होत आहेत. त्यामुळे नवनवीन विषाणू व जीवाणू आपल्या भेटीस येत आहेत,’ असा त्यांचा निष्कर्ष आहे. आम्लीकरण व तापमानवाढीमुळे सागरी संपदेची किती हानी होत आहे याचा आपल्याला अंदाजच येत नाही. ‘२१०० सालापर्यंत जगभरातील प्रवाळ संपुष्टात येतील,’ असं सांगितलं जात आहे.

पर्यावरणीय कारणांमुळे अनेक संस्कृती (सिव्हिलायझेशन्स) संपून गेल्या आहेत. सिंधू संस्कृती लयाला जाण्याच्या विविध शक्यता सांगितल्या जातात. शेती उन्नत असणाऱ्या सिंधू खोऱ्यातील विपुल पाऊसमान बदलून ते अधिकाधिक कोरडं होत गेलं. हवामान- बदलामुळे मान्सून क्षीण झाला. त्याआधी सततच्या पुरांमुळे मातीला मीठफुटी झाल्याने शेती धोक्यात आली. नद्यांनी पात्रं बदलल्यामुळे जनजीवन अस्ताव्यस्त झालं. महापुरांमध्ये गावंच्या गावं पाण्याखाली गेली.

विपुल अन्नधान्यासाठी ख्यातनाम असणाऱ्या सुमेरियन सभ्यतेला पर्यावरणीय संकटातून सावरता आलं नाही. हवामानबदलानंतर सूर्य आग ओकू लागला. पाण्याचं बाष्पीभवन वाढलं. माती क्षारपड झाली. अन्न पिकवणं दुरापास्त झालं. माया संस्कृतीचा ऱ्हासही उष्णतम वातावरणामुळे झालेल्या अवर्षणातून झाला. हवामानबदलामुळे कित्येक संस्कृतींचा अस्त झाला. पाण्यामुळे संस्कृतींचा उदय झाला. पाण्यामुळेच त्या बहरल्या आणि पाण्याअभावीच त्या नष्टही झाल्या. २०५० सालापर्यंत जगाच्या लोकसंख्येत ३०० कोटींनी भर पडणार आहे. आजमितीला जगातील पाच माणसांमागे एकाला तहान भागवता येत नाही. जलतज्ज्ञांच्या मते, २०३० साली तीन माणसांमागे एकाला तहान जलताण सहन करावा लागेल.

विज्ञानलेखक व भूगोलाचे संशोधक जरेड डायमंड यांनी ‘गन्स, जर्मस् अँड स्टील : द फेट्स ऑफ ुमन सोसायटीज्’ (१९९८) या पुस्तकात १३ हजार वर्षांत मानवी संस्कृती कशी घडत गेली याचा उद्बोधक इतिहास लिहिला होता. त्यांनी ‘कोलॅप्स : हाऊ सोसायटीज चूज टू फेल ऑर सव्‍‌र्हाइव्ह’ (२००५) या पुस्तकात आपली संस्कृती (सिव्हिलायझेशन) विनाश-पर्वाकडे जात असल्याचं सांगितलं आहे. ‘जंगल विनाश, मातीचा विनाश, जलसंकट, प्राण्यांचा विनाश, अती लोकसंख्या व विषमता या कारणांमुळे पृथ्वावरील पर्यावरणीय विनाश गडद होत आहे,’ असं  त्यांनी म्हटलंय.

ब्रिटिश लेखक व पत्रकार मार्क लिनस यांचं  ‘अवर फायनल वॉर्निग : सिक्स डिग्रीज ऑफ क्लायमेट चेंज’ हे पुस्तक एप्रिल महिन्यात प्रकाशित होणार होतं. त्यात पृथ्वीचे तापमान दोन अंश ते सहा अंश सेल्सियसने वाढले तर प्रत्येक टप्पा हा भयकारी दु:स्वप्नापेक्षा कसा प्रलयकारी असेल याचं वर्णन केलं आहे. त्यात एक अंश सेल्सियसने तापमान वाढल्यावर आक्र्टिकवर  बर्फ शिल्लक राहणार नाही. दोन अंश सेल्सियसची तापमानवाढ झाल्यास चीनमध्ये महापुराचे थैमान माजेल, तर मोसमी पावसाचे आगमन अती लांबेल. तीन अंश सेल्सियसने जगाचे तापमान वाढलं तर जगातील समुद्रांची पातळी सुमारे ५० सेंमीने वाढेल. १५ लाख लोक स्थलांतरित होतील. तीन लाख कोटी रुपयांची आर्थिक हानी होईल. जगाचे तापमान चार अंश सेल्सियसने वाढल्यास ते जग कसे असेल याची आज कल्पनाच करता येणार नाही. त्या काळात शिल्लक असलेल्या मानवाला नरकयातना सहन कराव्या लागतील. आणि सहा अंश सेल्सियसने जगाचे तापमान वाढल्यास मानवजातीचं अस्तित्व शिल्लक राहणार नाही. जीवसृष्टीचाच लोप होईल असं भविष्य वर्तवलं आहे. सध्या तापमान- वाढीला फारसं गांभीर्यानं न घेणाऱ्या धोरणकर्त्यांची संख्या वाढत असल्यामुळे त्यांना लिनस सांगत आहेत, ‘मनुष्य, पशुपक्ष्यांना हे तापमान सहन करणं शक्य होणार नाही. सुपीक प्रदेशांचं रूपांतर धुळीच्या विभागात होईल. तर एकाच वेळी संपूर्ण जगातील पिकांची हानी झाल्याचं दृश्य पाहावं लागेल. अन्नधान्य मिळवणं महाकठीण होईल.’ त्यामुळे हा अखेरचाच इशारा आहे, असं लिनस बजावतात.

भविष्यात अनेक वर्षांनंतर पृथ्वीवर काय होईल? संपूर्ण जगभर केवळ उद्यानांतूनच नव्हे, तर सगळ्या मोकळ्या जागांत वनस्पतीसृष्टीचा बहर असेल. स्थानिक वनस्पतींनी परिसर फुलून जाईल. उंदीर व झुरळांचा मागमूसही राहणार नाही. हवा शुद्ध व विषमुक्त असेल. नाले, ओढे, नद्या व समुद्रातून निर्मळ पाणी असेल. थोडक्यात, करोनाच्या गृहबंदिवास काळात काही क्षण अनुभवलं त्यापेक्षा सुंदर जग सदैव असेल. कविकल्पनेतील जग वास्तवात अवतरेल. मात्र, तेव्हा या ग्रहावरून माणूसप्राणी गायब झालेला असेल. विख्यात पत्रकार व विज्ञानलेखक अ‍ॅलन वाइजमन यांनी निर्मनुष्य जग कसं असेल, हे ‘द वर्ल्ड विदाऊट अस’ (२००७) या पुस्तकात मांडलं होतं. ती काही कल्पनाशक्तीची भरारी नव्हती. २६ एप्रिल १९८६ रोजी युक्रेनजवळील प्रप्यॅत शहरातील अणुभट्टीत स्फोट झाला आणि २० ते २५ किलोमीटपर्यंत त्यातील किरणोत्सारी कण पसरले गेले. त्यानंतर प्रप्यॅत शहरापासून ३० कि. मी. परिसरातील ६८ हजार रहिवाशांचं स्थलांतर करण्यात आलं. वाइजमन यांनी त्या ओसाड जागेतील वनस्पती व प्राणीजातींचं (फ्लोरा अँड फौना) निरीक्षण केलं. विविध शास्त्रज्ञांकडून मनुष्य दाखल होण्याआधीची पृथ्वी कशी होती, हे जाणून घेतलं. या प्रदीर्घ अभ्यासांती हे पुस्तक प्रकट झालं होतं. (१८९० साली केशवसुतांनी ‘आरंभी, म्हणजे मनुष्य नव्हता तेव्हा, क्षितीपासुनी होता स्वर्ग न फार दूर’ असंच सांगून ठेवलं होतं.)

वाइजमन लिहितात, ‘दर चार दिवसांनी या जगात दहा लाख लोकांची, तर वर्षांला ८.४ कोटी लोकांची भर पडत आहे. वरचेवर वाढत जाणारा हा भार आपल्या निवासाला पेलवेनासा झाला आहे. लोकसंख्यावाढीचा मुद्दा निघाला की आशियाई व आफ्रिकी देशांना तुच्छतापूर्वक बोल लावले जातात. परंतु लोकसंख्येपेक्षा अति- उपभोग (कंझम्प्शन) ही खरी समस्या असून त्याबाबतीत अमेरिका हीच शिरोमणी आहे.’ त्यामुळे ‘द पॉप्युलेशन बॉम्ब’ पुस्तकाचे लेखक पॉल एलरिच म्हणतात, ‘अजून तरी कोणालाही उपभोगनिरोधक साधनाचा शोध लावता आलेला नाही.’ वाइजमन यांच्या मते, ‘वाढता उपभोग आणि त्यात हवामानबदलांचे व आपल्या डोळ्यांना न दिसणाऱ्या विषाणूंचे तडाखे यातून मानवजात संपुष्टात येईल. अन्न अजिबात न मिळाल्यानं झुरळ व उंदीर नाहीसे होतील. मात्र, पृथ्वीवर टोलेजंग इमारती, प्लास्टिक, अ‍ॅल्युमिनियम, किरणोत्सारी कचरा या मानवी खुणा शिल्लक राहतील. थोडक्यात, निसर्गाची पुन:स्थापना नक्कीच होईल; फक्त त्यात माणूस नसेल.’ भविष्यातील हवामान संकटांची मांडणी करणाऱ्या हवामानवेधी (क्लायमेट फिक्शन) कादंबऱ्या व चित्रपटांतून ‘सर्व विनाश’, ‘कयामत’ वा ‘डूम्स डे’कडे आपली वाटचाल सुरू आहे असं दाखवण्यात येत आहे. पृथ्वीवरील ऐतिहासिक संकटांची चाहूल लागल्यामुळे कोल्बर्ट, डायमंड, लिनस व वाइजमन यांच्याखेरीज अनेक वैज्ञानिक, लेखक व कलावंत अस्वस्थ होत आहेत. या सर्व भविष्यवेध घेणाऱ्यांना पृथ्वीची दुर्दशा थांबवावी असं वाटत आहे. परंतु त्यासाठी आजवरच्या अनुभवांतून शहाणपण घेत स्वत: व सभोवताल दोघांनाही तत्काळ बदलावं लागेल. हाच करोनाचाही सांगावा आहे.

त्यासाठीचं पहिलं पाऊल कर्बउत्सर्जन झपाटय़ानं कमी करणं हेच असणार आहे. त्यादृष्टीने युरोपातील सर्व देशांची ‘जगातील पहिला कर्बरहित खंड’ होण्याच्या संकल्पपूर्तीकडील वाटचाल आश्वासक आहे. सरत्या वर्षांत करोनाच्या काळात तेलाचे भाव दणकून पडले. तेलखाणींचं आर्थिक गणित बिघडलं. तेव्हा स्वच्छ ऊर्जेचं स्वस्त तंत्रज्ञान आणण्याच्या युरोप-अमेरिकेतील प्रयत्नांना आणखी वेग आला. परंतु तेव्हा डोनाल्ड ट्रम्प हे हवामानबदल नाकारणाऱ्या व निसर्गविनाशास मोकाट वाट देणाऱ्या राष्ट्रप्रमुखांच्या गटाचे म्होरके होते. अमेरिका ही महासत्ता असल्यामुळे त्यांची भूमिका महत्त्वाची असते. औद्योगिक क्रांतीपासून आजपर्यंत झालेल्या कर्बउत्सर्जनातील सर्वाधिक वाटा अमेरिकेचाच आहे. सध्या दर साल दरडोई १५.५ टन कर्बउत्सर्जन करणारी अमेरिकन व्यक्तीच जगात आघाडीवर आहे. (तुलनेसाठी चीन- ७.३ टन, भारत- १.९ टन, नेपाळ- ०.२९ टन) या कारणांमुळेही अमेरिकेची वाट व चाल महत्त्वपूर्ण ठरते. २०२० च्या नोव्हेंबर महिन्यातील अमेरिकी निवडणुकीत हवमानबदल रोखण्यास अग्रक्रम देणारे ज्यो बायडेन निवडून आले आणि त्यांच्या पहिल्याच भाषणात त्यांनी ‘२०३५ पर्यंत १०० टक्के कर्बरहित स्वच्छ वीज उत्पादन करण्यासाठी दोन लाख कोटी डॉलरचा निधी देण्याचा निर्धार’ व्यक्त केला आहे, ही जगासाठी आशादायी घटना आहे.

जगाने हरित तंत्रज्ञानाकडे वाटचाल केल्यास येत्या दहा वर्षांत २६ लाख कोटी डॉलर बाजारपेठेत गुंतवले जातील. (निदान अर्थकारणासाठी तरी दिशा बदलावीच लागेल.) यातून नवीन रोजगार, नव्या कल्पना, नव्या संधी व नवसर्जन होऊ शकेल. करोनाकाळ आटोपण्याचा कालावधी अजून दृष्टिपथात येत नाहीए. निसर्गाचा विध्वंस वाढतच असल्याने इतर अनेक विषाणूंच्या जागतिक हल्लय़ाची टांगती तलवार आहे. गृहबंदीकाळात जागतिक कर्बउत्सर्जन केवळ चार ते सात टक्कय़ांनी कमी होताच शुद्ध हवा, पाणी व नयनमनोहर निसर्गाची झलक पाहण्याचा लाभ झाला. कर्बउत्सर्जन ५० टक्कय़ांनी कमी होऊ शकलं तर.. आणि ते २०५० पर्यंत शून्य झालं तर.. नक्कीच कलाकलाने निसर्ग प्रसन्न होत जाईल. हा विचार आता सर्वत्र पसरत असल्याने निसर्गरक्षणासाठी जनमताचा रेटा वाढतो आहे. त्यातही भागधारक व कर्मचाऱ्यांच्या क्षोभामुळे बडय़ा कंपन्यांना कर्बउत्सर्जनापासून मागे हटावं लागतं आहे. या सर्व घटनांमुळे येणाऱ्या दशकात पृथ्वीचं सुदर्शन घडवणं अनिवार्य झालं आहे. या स्तंभात आजवर उल्लेख केलेल्या विद्वानांचा ‘याचसाठी अट्टहास’ आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2020 1:01 am

Web Title: beautiful earth solar planet vishvache angan dd70
Next Stories
1 ‘मुक्त विद्यापीठा’चं नसणं..
2 या मातीतील सूर : लोकप्रिय!
3 ‘वाडा चिरेबंदी’चे भाषांतर माधुरी पुरंदरे यांचे!
Just Now!
X