प्रमोद पाटील

‘‘हिंदू’नंतरची दहा वर्षे’ याबद्दल ‘लोकरंग’तर्फे लेख पाठवण्याचे आवाहन आम्ही केले होते. त्यास उत्तम प्रतिसाद लाभला. तथापि, विषयाच्या अनुषंगाने लिहिण्यापेक्षा या कादंबरीची चिकित्सा करण्यावरच अनेकांचा भर जाणवला. काहींनी बदलत्या काळानुरूप ‘हिंदू’च्या पुढच्या भागांत काय अपेक्षित आहे याचा पाढा वाचला. आजूबाजूचे झपाटय़ाने बदलणारे वास्तव ‘हिंदू’च्या पुढील भागांत कसे उतरेल याचे ठोकताळे काहींनी मांडलेले दिसले. तथापि काहीही असले तरी ‘हिंदू’कडून मराठी वाचकांना बऱ्याच आशा-अपेक्षा आहेत, हे वास्तव आहेच. त्यापैकी प्रातिनिधिक लेख..

‘‘हिंदू’नंतरची दहा वर्षे’ हा विषय तसा फसवा आहे. एखाद्या साहित्यरचनेमुळे ताबडतोब प्रचंड विचारमंथन होऊन फार मोठे मतपरिवर्तन होते किंवा सामाजिक सुधारणांचे पर्व सुरू होते, हे गृहितक अतिशयोक्त वाटते. ‘हिंदू’ दहा वर्षांपूर्वी वाचली तेव्हाच या कादंबरीची रचना सदोष आहे असे माझे मत झाले. यात कथानकाची बाजू खूपच कमकुवत आहे. खंडेराव देशमुख या मुख्य पात्राच्या जाणिवा, स्मृती आणि विचारांचा प्रवाह मागेपुढे, उलटसुलट आणि वेडावाकडा वाहत राहतो. काही ठिकाणी तो अनेक ऐतिहासिक विषयांवर भाष्य करतो, हेच या कादंबरीचे सूत्र आहे. पण त्यास फार मोठय़ा ऐतिहासिक संशोधनाचा आधार आहे असे अजिबात जाणवत नाही. उलट, कादंबरीत बौद्ध व जैन धर्माबाबत वादग्रस्त विधाने केली आहेत. ती अशी : ‘हिंदू धर्म खेडोपाडी रुजला. बौद्ध धर्म शहरी होता, शहरीच राहिला. त्यामुळे संपला.’ (पृ. १५८) ‘जैन व बौद्ध धर्मचौर्य करणारे पंथ आहेत. भांडवलशहा आहेत. अनेक मोठमोठे निरिच्छ श्रमणक तत्त्वज्ञ मोहेंजोदारो काळापासून आर्यावर्तात लोकजागृती करत होते. त्यांचे विचार महावीराने व गौतम बुद्धाने शिकून घेतले आणि त्यांना डच्चू दिला. साधी कृतज्ञताही दाखवली नाही. ’ (पृ. ३५५) तसेच भारतावर आर्याच्या टोळ्यांच्या आक्रमणाचे अवास्तव वर्णन कादंबरीत केले आहे, तेही वादग्रस्त आहे. ‘जगण्याची समृद्ध अडगळ’ या  मथळ्यात हिंदू समाजातील दोष स्वीकारता येत नाहीत, पण  हिंदू म्हणून जगण्याचे वास्तवही नाकारता येत नाही, हे द्वंद्व आहे. समृद्ध आहे म्हणून त्याज्य  नाही, पण अडगळ आहे म्हणजे उपयुक्तही नाही असाही विषाद यात जाणवतो. हिंदू समाजातील अनेक दोष व वाईट प्रथांवर कादंबरीत भाष्य येते, पण त्याचा प्रभाव पडत नाही. पण या दोषांचे जे मूळ- म्हणजे अतिरेकी इतिहासप्रेम हा तर या कादंबरीचा स्थायीभाव आहे. या अतिरेकी इतिहासप्रेमाचे रूपांतर मग स्थितीवादी, निष्क्रिय आत्ममग्नतेत होते. या कादंबरीचा नायक भूतकाळात एवढा गुंतला आहे की त्याला भविष्याचा वेधच घेता येत नाही, हे या कादंबरीचे मोठे वैगुण्य आहे.

या कादंबरीनंतरच्या दशकात अनेक राजकीय बदल व सत्तांतर झाले. त्यांचा व या कादंबरीचा अर्थातच काही संबंध नाही. कारण राजकीय हिंदुत्व हा या कादंबरीचा विषय नसून हिंदू समाज हा आहे. हिंदूंचा इतिहास, या समाजाचे गुण-दोष यांची चर्चा करण्याची ही जागा नाही. गेल्या काही दशकांत हिंदूंचे जागतिकीकरण झाले आहे. जगातील सर्व महत्त्वाच्या देशांत हिंदू पोहोचले आहेत. हा आशादायक बदल आहे.  तरीही अतिरेकी इतिहासप्रेम व आत्ममग्नता या हिंदूंमधील सर्वात मोठय़ा दोषांचे निर्मूलन झाले आहे असे वाटत नाही. सुमारे एक अब्ज लोकसंख्या असलेल्या हिंदू समाजाचे जागतिक महत्त्व आहेच. पण २१ व्या शतकातील आव्हानांना तोंड द्यायचे व स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर हिंदू समाजाला बदलावेच लागेल. सद्य:कालीन हिंदू समाजास खंडेराव देशमुखची आत्ममग्नता परवडणारी नाही, ही समज जरी ‘हिंदू’च्या निमित्ताने आली तरी खूप झाले