डोंगरांनो का उभे? सांगाल का काही मला?
तीनशे वर्षांचिया जो मागला तो मामला
कुणी फिरस्ता हिंडता वनी,
वदला ऐशी आर्जववाणी।
ऐकून त्याची आर्त याचना,
आली येथल्या जडा चेतना।।
मला विचारा मीच सांगतो,
आधी या माझ्याकडे, सरसावत एकेक पुढे,
हात उभारूनि घुमू लागले, डोंगर किल्ले बुरूज कडे ।।

कवी यशवंत यांनी सहय़ाद्रीच्या अंगाखांद्यावर उभ्या असलेल्या गडकोटांबद्दल लिहून ठेवलेले हे सुंदर काव्य. गडकोटांमध्ये रमणाऱ्यांना ते अनेकदा आत्मगानच वाटते. या काव्याचे स्मरण होण्याचे कारण म्हणजे दिवाळी आलीय आणि दिवाळी म्हटले की आपल्या सर्वाना ओढ लागते ती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची! दिवाळी म्हटले की, जसे फराळ, फटाके, पणत्या, आकाशकंदील डोळय़ांपुढे येतात, तसेच अंगणातील किल्लाही आठवतो. लहानांच्या विश्वातला आणि मोठय़ांच्या आठवणीतला असा हा दिवाळीचा किल्ला!

Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
Baba Jumdev
विश्लेषण : विदर्भात एका ‘बाबां’बद्दल दुसऱ्या ‘बाबां’चे वादग्रस्त वक्तव्य… अनुयायांत संताप आणि भाजपला ताप!
Bene Israel Alibaug
विश्लेषण: अलिबागमधील ‘अली’ कोण होता? मुस्लीम की बेने इस्रायली?

महाराष्ट्र संस्कृतीत गडकोटांना प्राचीन स्थान आणि महत्त्व आहे. आमच्या पराक्रम आणि संघर्षांची ही प्रतीके आहेत. या गडकोटांच्या स्मृती जपाव्यात आणि पूर्वजांच्या पराक्रमाच्या नौबती पुन्हा घडाव्यात जणू यासाठीच या किल्ले बनवण्याच्या परंपरेचा उदय झाला असावा.

आपल्याकडे दोन प्रकारे किल्ले तयार केले जातात. पहिला प्रकार म्हणजे दगड, विटा, माती गोळा करून त्यापासून आपल्या मनातील गडाला हवा तसा आकार द्यायचा, तर दुसरा बाजारातून लाकडी किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा तयार किल्ला विकत आणायचा. ज्यांना जागेची, वेळेची आणि मुख्य म्हणजे किल्ल्यासाठी लागणाऱ्या दगड-मातीची अडचण आहे, त्यांच्यासाठी दुसरा प्रकार सोयीचा पडतो. पण ज्या उद्देशाने ही परंपरा सुरू झाली, मुलांना इतिहास-गडकोटांची जवळून ओळख व्हावी ती इच्छा, हेतू या तयार किल्ल्यात खऱ्या अर्थाने साध्य होताना दिसत नाही. पण मग यासाठी सोसायटय़ा, स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेत त्यांच्या अडचणी सोडवणे गरजेचे आहे. असो!

आपण आपल्या पारंपरिक किल्ला तयार करण्याकडे वळूयात. अनेकदा जागा, साहित्य उपलब्ध असले तरी किल्ला बनवायला घेतला, की अनेकांच्या पुढे प्रश्न तयार होतात. काहीजण निव्वळ एक मातीचा ढीग तयार करून रिकामे होतात, पण आपल्याला फक्त एक डोंगर नाही तर एक गड तयार करायचा आहे, हे लक्षात घ्यायला हवे. तरच तो किल्ला आमच्या शिवाजीराजांनाही आवडेल. यामुळे डोंगर आणि एक गड यातील फरक लक्षात घेऊनच कामाला सुरुवात करता येईल.

आपल्याकडे भुईकोट (सपाटीवरील किल्ला), जलदुर्ग (पाण्यातील किल्ला) आणि गिरिदुर्ग (डोंगरावरील किल्ला) असे किल्ल्याचे तीन प्रकार दिसतात. यामध्ये दिवाळीत अनेकजण डोंगरी किल्ले तयार करतात. खरेतर अन्य दोन्ही प्रकारही हाताळायला हरकत नाही. गिरिदुर्ग करायचा असेल तर यासाठी सुरुवातीला एक चांगला डोंगर तयार करायला हवा. या डोंगराला त्याच्या रांगा, शिरा, दऱ्या, खोल कडे, सुळके आणि डोंगराच्या शिरोभागी गडासाठी काहीसा सपाटीचा भाग असायला हवा.

हा डोंगर उभा करताना दगड-विटा-माती भरपूर उपलब्ध असेल तर प्रश्न नाही, अन्यथा एखादी जुनी बादली किंवा मोठे भांडे उपडे ठेवून त्यावरही आपला हा मुख्य डोंगर साकारता येतो. भिंतीला एखादी मोठी फरशी लावून त्या भोवतीही डोंगर तयार करता येतो. दरम्यान, यापैकीही काहीच नसेल तर एखादे लाकडी खोके किंवा टोपली उपडी ठेवून त्यावर विविध आकार-उंचवटय़ात पोते पसरवायचे. जेणेकरून त्याला डोंगराचा उंच सखलपणा येईल आणि मग त्यावर माती थापली, की झाला आपला डोंगर तयार. एकदा का आपला हा डोंगर तयार झाला की मग प्रत्यक्ष गडाचा विचार सुरू करायचा.

अनेकजण फक्त एखादा डोंगर उभा करून त्यावर शिवाजीमहाराज व त्यांच्या मावळय़ांची चित्रे मांडून रिकामे होतात. पण एक लक्षात ठेवा, शिवाजीमहाराज कुठल्याही डोंगरावर नाही तर डोंगरी किल्ल्यात राहात होते. मग त्यासाठी या डोंगराला गडाचा आकार हवा. आता यासाठी गड म्हणजे काय, त्याच्या शरीराची ओळख करून घ्यायला हवी.

गड, कोट, किल्ला, दुर्ग अशा विविध नामावलीत येणारी ही वास्तू इतिहासकाळी लढाईचे, आक्रमणाचे, संरक्षणाचे, राहण्याचे, वस्तीचे, टेहळणीचे आणि सर्वात महत्त्वाचे राज्यकारभाराचे साधन होते. या एकेका किल्ल्यातून त्या प्रदेशावर सत्ता-नियंत्रण आणि त्याचे संरक्षण केले जाई. मग अशा या वास्तूला काही विशिष्ट आकार-चेहरा हा असणारच! याचा विचार करू लागलो, की मग गडांचे अभेद्यपण, आक्रमकता, उंचीचे गारुड, दुर्गमतेचे विचार हे सारे पुढे येते. एखाद्या उंच डोंगरावर किल्ला हा त्यातूनच जन्माला येतो. त्याच्या भोवतीने आक्रमक तटबंदीची भिंत तयार होते. या तटाला लपलेले दरवाजे, गडाच्या आत पाण्याच्या टाक्या, तळी, सदर, धान्य-दारूगोळय़ाची कोठारे, कडेलोटाची जागा या सर्व जागा-वास्तू निर्माण होतात. मग दिवाळीतला किल्ला करतानाही या साऱ्या गोष्टींचा विचार करायला नको का?

अनेक गडांवर मंदिरे दिसतात, गडाच्या पोटात कोरीव लेण्याही दडलेल्या असतात, पायथ्याशी एखादे गाव नांदत असते, त्याचे शिवार शेतीने फुललेले असते.. गडाला आकार देताना यांच्याकडेही दुर्लक्ष करून चालत नाही. असा हा एकेक भाग उतरवत गेल्यास तुमचा गडही मग एखादा बुलंद किल्ल्याप्रमाणे वाटू लागेल.

गडाची ही अंगे दाखविण्यासाठी काही क्लृप्त्याही आहेत. तटबंदी करताना पूर्वीची नळीची कौले वापरावीत. अशी कौले आजही कुंभारवाडय़ावर मिळतात. श्रीखंडाचे प्लॅस्टिकचे डबे तळय़ासाठी जमिनीलगत गाडावेत, नारळाच्या करवंटय़ापासून गुहा-लेणी तयार करता येते, थर्माकोल, काडय़ापेटीपासून धान्य, दारूगोळय़ाचे कोठार, मंदिर, गडाखालची वस्ती तयार करता येते. या साऱ्यांमधून जशी इतिहासाची उजळणी होते, तसेच तुमच्यातील प्रयोगशीलतेला, कल्पकतेलाही वाव मिळतो. गडाचे हे बांधकाम पूर्ण झाले की तटबंदी हुबेहूब दिसण्यासाठी त्याला दगडाला साजेसा रंग द्यावा, डोंगरावर जंगल भासावे यासाठी हळीव, मोहरी पेरावी. असे सारे केल्यावर दिवाळीच्या पहिल्या दिवसापर्यंत मग तुमचा गड शिवाजीराजांच्या आगमनासाठी सज्ज होतो. त्यावर शिवकाळाला योग्य अशी चित्रसंगती साकारावी. एवढे केले की झाले, तुमच्या दारातही उभा राहिला शिवाजीमहाराजांचा रायगड, राजगड, पुरंदर किंवा सिंहगड!

दिवाळीतील किल्ले बनवण्याची परंपरा ही आपल्या पूर्वजांनी आपल्या गौरवशाली इतिहासाच्या जवळ जाण्यासाठी निर्माण केलेली एक संधी आहे. खरेतर कुठल्याही किल्ले उभारणीतून आधी आम्ही भूगोलाच्या जवळ जातो आणि मग इतिहासाशी गट्टी जमते. या परंपरेतूनच आमचे गडकोटांविषयी प्रेम वाढते. पुढे दुर्गभ्रमंतीची आवड जडते. चला तर मग या दिवाळीत एक खराखुरा किल्ला बनवुयात आणि नंतर सुटीत जवळच्या एका तरी गडाला भेट देऊयात!