News Flash

दादोजी, शिवाजी महाराज आणि सत्य

‘सध्याचे युग हे इतिहासाचे सर्वाधिक भान असलेले युग आहे. आधुनिक मानवाला कधी नव्हती इतकी स्वत:ची आणि म्हणून इतिहासाची जाणीव असते..

| August 31, 2014 01:04 am

‘सध्याचे युग हे इतिहासाचे सर्वाधिक भान असलेले युग आहे. आधुनिक मानवाला कधी नव्हती इतकी स्वत:ची आणि म्हणून इतिहासाची जाणीव असते.. भूत, वर्तमान आणि भविष्य हे जिला शेवटचे टोक नाही अशा इतिहासाच्या साखळीतले दुवे आहेत.’ हे अवतरण प्रसिद्ध इतिहासकार ई. ए. कार यांच्या ‘इतिहास म्हणजे काय’ या पुस्तकातील १५९ पानावरील आहे. भांडारकर संस्थेवरील हल्ल्यानंतरच्या गेल्या १० वर्षांचा विचार केला तर महाराष्ट्रातल्या इतिहासाच्या प्राध्यापकांचं, अभ्यासकांचं आणि काही स्वयंघोषित संशोधकांचं इतिहासाविषयीचं भान आणि इतिहासातील योग्य दुवे जोडण्याचे प्रयत्न हे हेतुपुरस्सररीत्या आणि संशयास्पद असल्याचं उघड उघड दिसतं. ब्राह्मण-ब्राह्मणेतर संघर्ष महाराष्ट्राला नवा नाही, पण भांडारकर संस्थेवरील हल्ल्यानंतर त्याला जे विघातक स्वरूप आलं आहे, त्यातून इतिहासाची मोडतोड करण्याची, तो सोयीस्कररीत्या लिहिण्याची आणि इतिहासाच्या नावाखाली दमदाटी करण्याची अहमहमिकाच सुरू असल्याचं दिसेल. छत्रपती शिवाजी महाराज तर यातील सर्वाधिक स्फोटक आणि वादग्रस्त विषय झाला आहे.
जेम्स लेन नामक एका पाश्चात्त्य लेखकानं ‘शिवाजी : अ हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ या पुस्तकात दादोजी कोंडदेव यांच्याविषयी केलेलं एक विधान या सर्वाला कारणीभूत ठरलं. आणि दादोजी यांना शिवाजी महाराजांच्या इतिहासातून हद्दपार करण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू झाले. इयत्ता चौथीचे क्रमिक पुस्तक बदलणं, लाल महालातील दादोजी यांचा पुतळा हटवणं आणि या सर्वाच्या आधी भांडारकरवरील हल्ला अशी ही मालिका पद्धतशीरपणे घडवली गेली. मराठा संघटना इतक्या आक्रमक झाल्या की, परिणामी शिवाजी महाराजांविषयी काही काळ बोलणंच बंद झालं. इतिहासाविषयी लेखन करणाऱ्यांमध्ये ब्राह्मण-ब्राह्मणेतर असे सरळ सरळ दोन तट पडले. आणि या दोन्ही तटांनी विविध ठिकाणी लेख लिहून एकमेकांना खोडून काढायला सुरुवात केली. या पुस्तकात ब्राह्मणेतरांनी दादोजी यांच्याबद्दल केलेल्या दाव्यांचं खंडण-मंडण करण्याचा प्रयत्न आहे. ब्राह्मणेतर लेखकांच्या लेखनात जसा आवेश, केवळ दोषारोप आणि आक्रमकता दिसते, तशीच या पुस्तकातही काही प्रमाणात आहे. पण ती ब्राह्मणेतर लेखकांइतकी अनाठायी नाही.
दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराज यांचं सुरुवातीचं शिक्षण झालं, त्यांची नेमणूक खुद्द शहाजीराजांनीच केली होती, या दोन विधानांत या पुस्तकातलं सार संपतं. बाकी ब्राह्मणेतर लेखकांच्या लेखांना प्रत्युत्तर, त्यांचे दावे खोडून काढणं आणि त्यांच्या विधानातील विसंगती उघड करणं, असा भाग आहे. सरळ आणि स्पष्टच सांगायचं तर ब्राह्मणेतर लेखकांनी दादोजींविषयी केलेल्या लेखनाला खोडून काढण्याचा हा प्रयत्न आहे. आणि तो एका मर्यादित अर्थानं स्तुत्य आहे. कारण दादोजी यांचं शिवाजी महाराजांच्या जडणघडणीतलं स्थान नाकारण्यात काहीच अर्थ नाही. ज्यांना सत्य बोलण्याचं भय वाटतं, ते लोक असत्य विधानं करतात तेव्हा खरं तर इतिहासाचं काहीच नुकसान होत नाही. समाजाची काही काळ दिशाभूल होते. पण शेवटी जॉर्ज ऑर्वेल म्हणतो त्याचं प्रत्यंतर येतंच. तो म्हणतो – ‘तुम्ही सर्व काळ सर्व लोकांना मूर्ख बनवू शकत नाही.’ या पुस्तकाच्या वाचनातून लक्षात घेण्याची गोष्ट आहे ती एवढीच.
ज्यांना केवळ पुराव्यांची मोडतोड करायची आहे, सत्य दडवून ठेवायचं आहे आणि निव्वळ दमदाटी करायची आहे, त्यांची दखल न घेण्यातच सुज्ञता आहे. आणि ती महाराष्ट्रातील सुज्ञ जाणकारांनी गेल्या १० वर्षांत चांगल्या प्रकारे या प्रसंगाच्या संदर्भात दाखवली आहे. कारण ब्राह्मण-ब्राह्मणेतर इतिहासविषयक लेखन करणाऱ्यांची शाब्दिक लढाई सत्यापेक्षा सत्याचा अपलाप करणारी आहे. आणि म्हणून त्याज्य आहे. असो. या पुस्तकातून लेखकाची तळमळ दृगोचर होते. आणि ती इष्टच आहे.
‘हिंदूवी स्वराज्याचे कारभारी दादोजी कोंडदेव : खंडण आणि मंडण’ – श्यामसुंदर सुळे, अखिल भारतीय मराठा विकास परिषद, तळेगाव, जि. पुणे, पृष्ठ- २४८,  मूल्य- ८० रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2014 1:04 am

Web Title: dadoji konddev king shivaji and truth
Next Stories
1 बोलावे ते तुम्हीच!
2 गंभीर विश्लेषणाचा अभाव
3 सामाजिक प्रश्नांचा ढोबळ लेखाजोखा
Just Now!
X