|| डॉ. आशुतोष जावडेकर

ऑफिसचं कॉन्फरन्सचं काम झाल्यावर गोव्यात एक दिवस अजून मला थांबायचंच होतं. एकटय़ाने. सगळ्या धामधुमीत मला एवढं पक्कं कळलं होतं, की एक दिवस स्वत:साठी दिला नाही तर अवघड आहे यार सगळं! आता सकाळी भाडय़ाने वॅग्नर गाडी घेऊन फोंडय़ाच्या दिशेला निघालो आहे. सध्या इतकं हरवल्यासारखं वाटतं कधी कधी. म्हणजे वरून काहीच अडचणी नाही आहेत. पोराच्या तिमाही परीक्षेचा अभ्यास घेतला आहे आणि त्याला बरे गुणही मिळाले आहेत. बायकोसोबत मधे दोन दिवस भटकंती करून आलो आहे आणि ती खूश आहे. ऑफिसमध्ये बढती मिळालीय. कामं वाढली आहेत, पण एकूण फार ताण नाही. किंवा आहे त्या ताणाची नीट सवय झाली आहे. शाळेच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर नांदेडच्या गप्पा नेहमीसारख्या चालू आहेत. गोदावरीचं पाणी आता जरा कमी झालंय.. ऑफिसच्या मित्र-ग्रुपवर आचरट विनोदांचा रतीब नित्याने होतो आहे.

अरिन-माही मात्र भेटत नाहीत यार! अरिनच्या प्रोजेक्ट्ची डेडलाइन आलीय म्हणे. आणि माही..? मीच अंतर राखायला लागलोय का? माहीचं मन धीरज नावाच्या मुलात गुंतत चाललं आहे, अशी पक्की बातमी जेव्हा अरिनने दिली तेव्हा मी नुसता हसलो. आम्ही दोघांनी धीरजला उगाच पन्नास शिव्या घातल्या. पण अरिनला मी माझ्या मनातलं- आतलं सांगितलं नाही, शेअर केलं नाही. लहान आहे तो अजून. नात्यामधलं दुहेरीपण त्याला नाही अजून कळणार. त्याला नाही मी हे सांगू शकत, की माही मला मनापासून आवडते यार.  म्हणजे मत्रीण म्हणूनही, सुंदर स्त्री म्हणूनही, बुद्धिमान जाणती बाई म्हणूनही. रंगपंचमीच्या दिवशी ओलेती झालेली माही अजूनही मधेच दिसत राहते स्वप्नात.

आणि मला पुढे कुठे जायचं नाहीच आहे. ती नसíगक ओढ मला स्वप्नांपुरतीच ठेवायची आहे. अरिनच्या भाषेत सांगायचं तर- आय डोन्ट वॉन्ट टू मेस अप. मी जबाबदार आहे. मी प्रगल्भ आहे. पण धीरजमध्ये माही गुंतत चालली आहे कळल्यावर माझ्यातला पौगंडावस्थेमध्येच राहिलेला कुठलासा अंश उसळी मारून मनात वर येतो. वाटतं, त्या धीरजला दमात घ्यावा. बकोट पकडावी शर्टाची. शिवी हासडावी आणि सांगावं, ‘‘माही माझी आहे.’’

अर्थात् माहीला या सगळ्याचा अंदाज आहेच. ती जास्त हुशार आहे. ती जास्त पटकन् मला आरपार ओळखते. मला त्याचीच भीती वाटते मग.. ती काही बोलली नाही मला आणि चुकूनही, एकदाही तिने कधी मला या खेळात- हा खेळ असेल तर- खेळवलेलं नाही. नाही तर सगळ्या मुली अशा नसतात. सगळी पोरंही माझ्यासारखी नसतात. लोड येतो यार.. आपण आणि आपल्या आसपासचे सगळेच प्रगल्भ असल्याचा लोड येतो. नात्यात पुढे काय होणार आहे हे आधीच समजतं.

मी नाही भेटणार काही दिवस माहीला- असं माझं मीच ठरवलंय. माझ्या मनातला तो नुकताच मिसरूड फुटलेला, खांदे नुकतेच भरू लागलेला मुलगा शांत झाला की भेटेन तिला. ती राहीलच माझी मत्रीण. कायम! पण आत्ता नाही. आत्ता हे अंतर हवंच. पण मग मी ज्या हजार गोष्टी रोज शेअर करतो तिच्याशी- ते करता येत नाही आणि मला उदास वाटतं..

आलं फोंडा. मस्त नाश्ता करून घ्यावा आधी. इथला बन आणि अळसांदे उसळ खायला हवी. मागच्या वेळेस खाल्लेली ती चव अजून रेंगाळते आहे. पण इथे पाìकग दिसत नाहीये. आणि गाडी लांब लावून हॉटेलपर्यंत चालायचा कंटाळा आलाय मला.

मला ना बेसिकली कंटाळा आला आहे. येस. हाच प्रश्न आहे बहुधा. सतत नात्यात लीड घ्यायचा कंटाळा.. गरज नाहीये यार मला.. साला अरिन! त्याला दोनदा रात्री म्हटलं की, चल कॉफीला.. तर भाव खाल्ला त्याने. मीही मग त्याला सांगितलं आहे, की तुझा प्रोजेक्ट संपला की तूच सांग मला कधी आणि कुठे भेटायचं. आणि या सगळ्यामुळे विशी-तिशी-चाळिशी ग्रुपदेखील शांत आहे सध्या. मीच दोन जोक्स टाकले, पण त्यावरही पटकन् कुणी काही बोललं नाही. एवढं सालं कोण बिझी असतं? आणि मग मी काय गोटय़ा खेळत बसलोय का? मीही नाही काही बोलणार ग्रुपवर. माहीने मग एक डाएटचा तक्ता टाकलेला. त्यावर मला काहीतरी खरडायची पन्नास वेळा उबळ आलेली. पण नाही म्हणजे नाहीच लिहिलं.

जाऊ दे. आता चालत जाऊन आधी खाऊन घ्यावं. भूक लागली आहे चक्क! काल ताजे मासे होते हॉटेलमध्ये ते खावेसे वाटले नाहीत. कंटाळा आला. मी म्हटलं ना, बेसिकली मला कंटाळा आलाय सगळ्याच गोष्टींचा. काम, घर, नातेसंबंध, मत्री, प्रेम.. मी म्हातारा नाही झालेलो. पण या सगळ्याच गोष्टींच्या मर्यादा चाळीस वर्षांचं झालं की दिसू लागतात की काय? आणि मग एकदम वाटतं की, कशालाच अर्थ नसतो यार. जाऊ दे, समोर आलेला बन खावा.. केळीचा वास, उसळ गरम गरम.. अहाहा! अन्न हे पूर्णब्रह्म. काय सुंदर चव आहे! निदान हे तरी शेअर करायला हवं.. कुणाला तरी. फोटो काढून रेळेकाकांना पाठवावं.

इथे हॉटेलात लहान मुलं आहेत. नोकरदार आहेत. म्हातारे आहेत. निवांत असतात ना हे गोव्याचे लोक? आणि सौंदर्यही जपणारे. बाहेर रस्त्यावर फुलं विकणारा माणूसही चाफ्याची किती सुंदर कमान विकतो आहे.

चला, आपण मात्र पळायला हवं पुढे.. गर्दी होण्याच्या आत शांतादुग्रेच्या देवळात जावं. आत्ता सकाळचे जेमतेम आठ वाजत आहेत. नाश्ता झाला आहे. कंटाळा गेलेला नाही. पण अजून वाढलेलाही नाही निदान!

किती निवांत रस्ता आहे हा.. गूगल मॅप्स आता चुकवू नको दे. ही गूगलबाई भारतीय उच्चारात का बोलत नाही? तिलाही बेसिकली आळस आलाय का? तितक्यात रेळेकाकांचा मेसेज परत आला आहे. नुसता स्माइली..

तिकडे अमेरिकेत रात्र असणार. काका का जागत बसतात? त्यांची मुलं त्यांना वापरूनच घेतात का? नातवंडं सांभाळण्यासाठी! पण तसं भारतीय पद्धतीने मनातही कधी बोलायचं नसतं. ‘सगळं करूनसवरून वरून मात्र ब्रह्मचारी असण्याचं सोंग घेणारी आहे आपली समाज-संस्कृती..’ असं एकदा माही म्हणालेली. हे दुटप्पीपण सगळ्याच परिघात आलं मग ओघाने. आणि माझ्या आसपासचे अनेक सहज सरावले आहेत यालाही. मी चाळीस वर्षांचा आता झालो तरी नाही सरावलेलो! आणि त्याचा मला आनंद आहे. पण त्या निखळपणाची किंमतही द्यावी लागते ना मग.. जाऊ दे..

काय सुंदर, हिरवागार रस्ता आहे. आणि ही वळणे.. अरिनच्या भाषेत सनी लिओनीसारखी  वळणे.. यापुढची स्माइली मी शेअर नाही करणार कुणासोबत.. ती माझी मीच ठेवतो आहे मनात.. कारण शेअर केलं की नसíगकरीत्या अपेक्षा येतात. आणि अपेक्षा सहसा पुऱ्या होत नाहीत. मग तसं  झालं की.. हा कंटाळा येतो!

पण माझा कंटाळा आत्ता गाडी चालवताना दूर होतो आहे.. आणि बायको म्हणते तसं पोटात चांगलं गेलं की मी तसाही उत्साही बनत जातो. इथेही पुढे एक स्माइली आहे. तीही माझी मनातल्या मनातच ठेवणार आहे पण मी.

असं एकदम डोळ्यांत पाणी का आलंय? कोणाला मिस करतो आहे मी? काय मिस करतो आहे? माझ्या आसपासच्या चाळिशीच्या पुरुषांना असं होतं का? का सगळे नुसते ऑफिसमधल्या विशीच्या असिस्टंटवर टप्पे टाकण्यात व्यग्र आहेत?.. इथेही स्माइली आहे. आणि आता मला डोळे ओले असतानाही एकीकडे हसायला येतंय..

आलं मंदिर.. मी फार देवपूजा करणाऱ्यातला नाही, पण काही ठिकाणी शांत, छान वाटतं. एकदा अजमेर शरीफच्या दग्र्यामध्ये आसपास एवढी प्रचंड गर्दी, कलकल असतानाही जिवाला शांतता मिळाली होती. माझा खादीम जेव्हा मला सुफी वचने ऐकवत होता तेव्हा मी त्या क्षणी गोदावरीमध्ये उडी मारणारा शाळेतला मुलगा झालो होतो. तो मुलगा निवळशंख  होता. आता काय झालंय त्याचं? इथे एक उदास चेहरा आहे स्माइलीऐवजी.. आणि तोही मी शेअर करणार नाही आहे कुणाशी..

शांतादुग्रेचं मंदिर पोर्तुगीज आणि भारतीय असं दोन्ही डिझाइन घेऊन बांधल्यासारखं वाटतं. ही दीपमाळ किती वर वर जाते आहे. हा तलाव किती सुबक आहे. देवळात गर्दी नाही हे बरंय. लवकर सकाळी आल्याचा फायदा.. हा सोवळ्यात असलेला खास सारस्वत पुरुष.. हे दोन गुरुजी.. ही आत समजुतीने सगळ्यांना अभय देणारी देवी.. शांतादुर्गा.. मी खूप शांत नकळत होत चाललोय देवी. मला तुझ्यातलं दुग्रेचं तेज दे.. आता गणपतीत सगळीकडे जोरदार आरत्या होतील.. दुग्रे दुर्घट भारी..

एक अनाथपण असतंच मनात.. ते मिटावं म्हणून माणूस गुंततो.. माही, अरिन, रेळेकाका, बायको, मुलगा, बाकी सोबती या सगळ्यांच्यात.. आम्हा सर्व अनाथांसाठी करुणा विस्तार देवी! मी हात जोडून शांत बसून आहे. म्हटलं तर सोबत कुणी नाहीये.. आणि म्हटलं तर सगळे आहेत.. प्रदक्षिणा घेऊन झाल्यावर पुन्हा नमस्कार करून मी बाहेर पडतो आहे आणि मन पुन्हा उत्साही होतं आहे..

मी बाहेर पडतो देवळाच्या.. भरून आलेल्या, ढग कवेत घेऊन खाली खाली झुकलेल्या आकाशाकडे मी बघतो आणि मला कळतंय- की ही एक फेज आहे फक्त.. सरेल हीही.. सरकेन  मी.. सरकवेन..

मागे देवीची आरती सुरू झाली आहे. घंटा आणि झांजांचा आवाज घुमू लागला आहे. मी दीपमाळेपाशी थांबून आहे.. आणि एकदम नांदेडची आजी ज्ञानेश्वरीतली ओवी म्हणायची ती आठवते आहे. स्वशिखरांचा भारू.. नेणे जैसा मेरू.. साक्षात मेरूपर्वताला स्वत:च्याच प्रगल्भ शिखरांचा होणारा भार, जाच माऊलीच टिपू शकतात. एकदम अरिन आठवतोय. तो नेहमी म्हणतो, ‘‘कम ऑन तेजस.. फाइट, फाइट!’’

आणि माहीचा मागे मेसेज येऊन पडलाय.. ‘‘तेजस, चिडला आहेस का माझ्यावर? नको रे चिडू..’’

नुसतं झगडून चालणार नाहीच. नुसतं जुळवून घेऊनही नाहीच. आपली व्यवहाराची, मत्रीची, प्रेमाची आणि अन्य नात्यांचीही शिखर-ओझी आनंदाने पेलायला हवीत. नाही रडून, रुसून चालणार.. मागून कुणीतरी देवीच्या आरतीचा प्रसाद देत आहे. आणि मी आता भरल्या आभाळाखाली नि:शंक उभा आहे..

ashudentist@gmail.com