30 September 2020

News Flash

अनर्थ

प्रत्येक सजीव हा आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी स्वत:मध्ये  बदल करत हळूहळू उत्क्रांत होत जातो

प्रत्येक सजीव हा आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी स्वत:मध्ये  बदल करत हळूहळू उत्क्रांत होत जातो, हे डार्वनिने त्याच्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतातून सांगितले. आज आपल्याला दिसणारे प्राणी, पक्षी, झाडे आणि न दिसणारे अनेक सूक्ष्म जंतू असेच उत्क्रांत होत आजपर्यंत टिकून राहिले आहेत. या सर्वामध्ये माणूस हाच सर्वात उत्क्रांत आणि म्हणूनच खूप हुशार प्राणी आहे असे आपण म्हणू शकतो का? तंत्रज्ञानाच्या जोरावर आज आपण आकाशात उडू शकतो, पाण्यात फिरू शकतो, अति-उष्ण आणि अति-थंड प्रदेशातही वास्तव्य करू शकतो. परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी लागणारे बदल जैविक उत्क्रांतीमध्ये खूप हळू होतात; ज्याला हजारो-लाखो वर्षेही लागू शकतात. पण आज आपण तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रतिकूल परिस्थितीतही सहजपणे राहू शकतो. एवढंच कशाला, परिस्थितीशी जुळवून घेण्याची नमती भूमिका सोडून माणसाची मजल परिस्थिती स्वत:च्या गरजेनुसार बदलण्यापर्यंत गेली आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. जोपर्यंत हा तंत्रज्ञानाचा वारू आपल्याला पाहिजे त्या दिशेला वेगाने घेऊन जात आहे असे वाटते, तोपर्यंत आपण स्वत:ला नक्कीच हुशार म्हणून घेऊ या. पण या वेगावर, त्याच्या दिशेवर आणि मुख्य म्हणजे गंतव्यस्थानावर खरंच आपलं नियंत्रण आहे का? असा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे होऊ घातलेल्या अनर्थाची पूर्वसूचना देणारा सध्याचा कळीचा मुद्दा- जागतिक तापमानवाढ (Global Warming)!

जागतिक तापमानवाढ म्हणजे जगाच्या सरासरी तापमानात होत असेलेली वाढ. १८८० पासून जागतिक तापमानात ०.८ अंश सेल्सिअस इतकी वाढ झाली आहे. पण आपण रोज यापेक्षाही जास्त तापमानातील बदल अनुभवतो. नाही का? सकाळ-दुपार किंवा उन्हाळा आणि हिवाळा यांतील तापमानाचा फरक हा नक्कीच ०.८  सेल्सिअसपेक्षा जास्त असतो. मग यात काय विशेष? एक म्हणजे हे जागतिक सरासरी तापमान आहे. स्थानिक तापमान जरी यापेक्षा जास्त प्रमाणात कमी-जास्त होत असले तरी जागतिक सरासरी तापमानात खूप कमी बदल होतात. याचे कारण हे तापमान पृथ्वीला सूर्याकडून मिळालेल्या ऊर्जेवर अवलंबून असते. ज्यात फार काही मोठे बदल झालेले नाहीत. आजचे जागतिक सरासरी तापमान हे लाखो वर्षांपूर्वी आलेल्या हिमयुगातल्या सरासरी तापमानापेक्षा फक्त ४ ते ७ अंशानेच जास्त आहे हे लक्षात ठेवले की तापमान ०.८ सेल्सिअसने वाढणे आणि तेदेखील एवढय़ा कमी काळात ही काळजीचीच गोष्ट आहे, हे पटेल. पण हे तापमान नेमके कशामुळे वाढते आहे? याचे उत्तर आहे- हरितगृह वायू (Greenhouse Gases). सूर्याकडून येणारी बरीचशी उष्णता पृथ्वी शोषून घेते, तर काही परावíतत होऊन पुन्हा अवकाशात परत जाऊ पाहते. परंतु पृथ्वीभोवती असलेल्या वातावरणातल्या हरितगृह वायूंमुळे ही उष्णता पृथ्वीच्याच वातावरणात अडकून पडते. कार्बन-डाय-ऑक्साइड, क्लोरोफ्लुरोकार्बन, पाण्याची वाफ, मिथेन आणि नायट्रस ऑक्साइड असे काही वायू परावíतत झालेल्या उष्णतेला अडवून ठेवतात. यांनाच ‘हरितगृह वायू’ म्हणतात. यामुळेच पृथ्वीवरचे तापमान नियंत्रित राहते. जर हे वायू पृथ्वीच्या वातावरणात नसते तर इतर काही ग्रहांप्रमाणे पृथ्वी एक थंड गोळा बनून राहिली असती. पण या वायूंमुळेच पृथ्वीवर आवश्यक ती उष्णता टिकून राहिली आहे. अर्थात जेव्हा गोष्टी प्रमाणात असतात तेव्हा चांगल्याच असतात.

औद्योगिक क्रांतीनंतर ऊर्जेची आवश्यकता खूप वाढली. कोळसा आणि खनिज तेलांचा वापर खूप जास्त प्रमाणात होऊ लागला. याचाच परिणाम म्हणजे हे हरितगृह वायू तयार होण्याचे प्रमाण वाढले. त्याचबरोबर वाढत्या लोकसंख्येमुळे आणि इतर व्यापारी फायद्यांसाठी प्रचंड प्रमाणात जंगलतोड झाली. झाडे कमी झाली की वातावरणातील कार्बन-डाय-ऑक्साइडचे प्रमाण वाढणारच. आणि त्याचबरोबर पृथ्वीचे तापमानही. हेच सध्या होत आहे.

जागतिक तापमानवाढीचा परिणाम पूर्ण पृथ्वीवर आणि तिच्यातील जीवसृष्टीवर होतो आहे. वाढलेल्या उष्णतेमुळे ध्रुवीय प्रदेशातील हिमनद्यांचे वितळणे सुरू झाले आहे. हेच पाणी समुद्रात जात असल्याने समुद्राची पातळी वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. हे असेच चालू राहिले तर येणाऱ्या काही वर्षांत समुद्रकिनाऱ्यावर असलेली अनेक शहरे पाण्याखाली जातील आणि जगाचा नकाशा नव्याने बनवावा लागेल. तापमानवाढीचा सगळ्यात मोठा परिणाम हा हवामानावर होत आहे. दुष्काळ, पूर, वादळं अधिक प्रमाणात आणि अधिक तीव्र स्वरूपात आपल्याला दिसत आहेत. काही प्रदेशांत अति-उष्ण उन्हाळा, तर काही ठिकाणी अति-थंड हिवाळा अशी हवामानची तीव्रता वाढण्यामागचे कारण तापमानवाढ हेच आहे. तापमानवाढीमुळे होणाऱ्या या हवामानातील बदलाला ‘Climate Change’ असे म्हटले जाते.

आंतरराष्ट्रीय पातळीवर जागतिक तापमानवाढीला आळा घालण्याचे प्रयत्न १९९७ सालच्या क्योटो प्रोटोकॉल कराराद्वारे करण्यात आले; ज्यात तापमानवाढीच्या समस्येचा स्वीकार आणि त्यावर उपाय म्हणून करारातील देशांनी आपापल्या देशात हरितवायू उत्सर्जनाचे प्रमाण कमी करायचे असे ठरले. तसेच २०१५ चा पॅरिस करार हा असाच जागतिक तापमानवाढीवर सगळ्या देशांनी एकत्रितपणे येऊन उपाययोजना करण्याच्या प्रयत्नांचाच एक भाग आहे.

जागतिक तापमानवाढीचं आणि हवामान- बदलाचं संकट हे मानवनिर्मित आहे. सुरुवातीला कदाचित नकळत, पण नंतर माहिती असूनही किंवा असलेल्या माहितीकडे दुर्लक्ष करून आपणच हे संकट केवळ आपल्यावरच नाही, तर पृथ्वी आणि तिच्यावरच्या सर्वच सजीवांवर ओढवून घेतलेले आहे. आज तरी आपल्याला आपले अस्तित्व टिकवण्यासाठी पृथ्वीशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. निसर्गाचा फक्त वापर करून घेण्यापेक्षा निसर्गाशी जुळवून घेण्याचे आणि त्याचे संवर्धन करण्याचे धोरण स्वीकारणे यातच आपले शहाणपण आहे. कोठेतरी वाचलेलं हे वाक्य शेवटी आपल्यासमोर असलेल्या पर्यायाची तीव्रतेने जाणीव करून देतं- ‘Save Earth, नहीं तो Un-Earth हो जायेगा!’

parag2211@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2019 12:03 am

Web Title: global warming mpg 94
Next Stories
1 इंटरनेटच्या चष्म्यातून निवडणूक!
2 गूगल ट्रेण्ड्स सर्वेक्षणाचा नवा स्रोत
3 नदीसंघर्षांचे आखाडे
Just Now!
X