|| वि. वि. करमरकर

येत्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे वैशिष्टय़ म्हणजे पूर्वीसारखा आता फलंदाजीतील धावांचा वेग संथ राहिलेला नाही. आयपीएलसारख्या स्पर्धामुळे पन्नास षटकांच्या स्पर्धेतही साडेतीनशे-चारशे धावांचे आव्हान लीलया पेलले जाऊ लागले आहे. एका अर्थी विश्वचषकाच्या पोटात ‘ट्वेन्टी-२०’ स्पर्धाच रंगणार आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीला, तसेच इंग्लंड-वेल्स मंडळाला साजरा करायचाय १२ व्या विश्वचषकाच्या नावानं एकच जल्लोष! तो येऊन ठेपलाय अकरा दिवसांवर. पण त्याआधी इंग्लंड देतंय साऱ्या क्रिकेटजगतास उलटसुलट संकेत!

ही स्पर्धा पन्नास षटकांची. पण संकेत येत आहेत- या स्पर्धेला ‘ट्वेन्टी-२०’ ऊर्फ २० षटकांच्या नाटय़ाकरिता शोभेसा साज चढवायचे! ५० षटकांचं क्रिकेट हा कसोटी अन् ‘ट्वेन्टी-२०’ क्रिकेट यांना सांधणारा दुवा. तो कालबा होतोय, या आशंकेनं इंग्लंड पछाडलेलं. मग ५० षटकांच्या क्रिकेटकडे वळायचं की ‘ट्वेन्टी-२०’कडे? या प्रश्नाचं उत्तर शोधताना विश्वचषकाला ‘ट्वेन्टी-२०’ची मोठी आवृत्ती तर बनवली जाणार नाही ना? म्हणजे अंतरंग ‘ट्वेन्टी-२०’चे, पण मुखवटा ५० षटकांच्या क्रिकेटचा असणार काय? ५० षटकांच्या क्रिकेटची आकर्षकता वाढवण्यासाठी पाटा खेळपट्टय़ांचा जाणूनबुजून आसरा घेतला जात आहे का? फलंदाजीच्या नंदनवनात चौकार-षटकारांची बरसात होणार. केवळ याच भूमिकेतून ठणठणीत खेळपट्टय़ांचा नजराणा तमाम फलंदाजांच्या स्वागतासाठी सादर केला जाणार आहे का?

सचिन तेंडुलकरपासून न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिलपर्यंत एकसुरात भाकित करत आहेत : विश्वचषक रंगेल तो फलंदाजीस (फटकेबाजीस) पोषक खेळपट्टय़ांवर!

लंडनमधील विम्बल्डन स्पर्धा आजही होते ग्रास कोर्टवरच. पण गेल्या दशकभरात या ग्रास कोर्टची गती मंदावत गेलीय. हा बदल विशेष जाणवतो, तो या दोन आठवडी स्पर्धेच्या उत्तरार्धात. ‘सव्‍‌र्ह अ‍ॅण्ड व्हॉली’- म्हणजे वेगवान सव्‍‌र्हिस सोडून नेटकडे धाव घेण्याचं तंत्र आता चालेनासं झालेलं आहे. चकमकी (रॅलीज्) झटपट संपत नाहीयेत. हा बदल कितपत हेतुपुरस्पर असावा? तसंच क्रिकेट खेळपट्टय़ांचं हे नवं रूप कितपत जाणूनबुजून बनवलेलं असावं?

यंदाच्या विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर उलटसुलट संकेत येत आहेत ते यजमान इंग्लंडच्या प्रभुत्वाविषयी, अभेद्यतेविषयी. आंग्ल भूमीत आज वाहत आहे उमेदीचे, स्वप्न बघण्याचे वारे. खरं तर क्रिकेटपेक्षाही इंग्लंडला वेड फुटबॉलचं. आणि सुमारे ४५ युरोपीय देशांच्या क्षेत्रात इंग्लिश क्लबनी इतिहास घडवलाय.. तोही यंदाच. चॅम्पियन्स लीग अन् युरोप लीग या दोन्हीही फुटबॉल स्पर्धात अंतिम फेरीत एकसाथ थडकले आहेत ते चारच्या चार इंग्लिश क्लब. चॅम्पियन्स लीगमध्ये लिव्हरपूल (ऊर्फ रेड्स) व टॉटनहॅन हॉटस्पर्स (ऊर्फ स्पर्स), युरोप लीगमध्ये आर्सेनल (ऊर्फ गनर्स) व चेल्सी (ऊर्फ ब्लूज्)! आजवर कोणत्याही युरोपीय देशातील क्लबना न जमलेली ही भरारी! ही भरारी ब्रिटिश जनमानसाला त्या ओघात स्वप्न दाखवतेय- दहा निवडक देशांतील क्रिकेट विश्वचषक विजयाचे!

केव्हिन पीटरसनपासून अँड्रय़ू फ्लिंटॉफपर्यंत इंग्लंडचे माजी कप्तान इंग्लिश विजयाची भाकिते करत आहेत. पीटरसन म्हणतो की, ‘२००३ आणि २००७ मध्ये विश्वचषक खिशात घालणाऱ्या रिकी पॉन्टिंगच्या कांगारू संघाचा दर्जा आजच्या इंग्लिश संघानं कमावलाय. तेव्हा कांगारूंकडे होती हेडन, गिलख्रिस्ट आणि पॉन्टिंग ही त्रिमूर्ती. त्यापैकी एकाच्या तडाख्यातून बचावलात, तर दुसरा तुम्हाला बदडायचा, नाहीतर तिसरा! आता इंग्लंडकडे आहे तशीच स्फोटक त्रिमूर्ती : जेसन रॉय, जॉनी बेयरस्टो अन् जोस बटलर!’

फ्लिंटॉफ ही नामावली वाढवतो : रॉय, बेयरस्टो, बटलर, तसेच जो रूट, मॉर्गन, स्टोक्स अन् मोईन अली. इतर कोणत्या संघाकडे क्रमांक एक ते सातसाठी असे हिरे आहेत, हा त्याचा सवाल!

पहिल्या पाच विश्वचषकांत तीनदा अंतिम फेरी गाठणाऱ्या इंग्लंडला त्यानंतर वारंवार मानहानीकारक धक्के सोसावे लागले. त्यातून हा संघ गेल्या चार वर्षांत डोकं वर काढतोय. आणि फायदा उठवतोय.. कळत-नकळत पाटा खेळपट्टय़ांचा! १९७१ ते २०१५ या ४५ वर्षांत फलंदाजांसह गोलंदाजांना न्याय देणाऱ्या इंग्लिश खेळपट्टय़ांवर तीनशेची मजल देशी-विदेशी २१ संघांनी मारली. पण त्यानंतरच्या सुमारे चार वर्षांत त्रिशतकी झेप केवळ सात विदेशी संघांनाच मारता आली. अन् त्याच्या तिपटीनं- बावीसदा- यजमान इंग्लंडनं मारली! हीच झेप इंग्लंडला स्वप्न दाखवतेय विश्वचषक विजयाचे!

ब्रिटिश मोहिमेला आगेकूच करण्यासाठी रस्ता मोकळा असल्याचा ‘ग्रीन सिग्नल’ दाखवला जातोय; त्याच वेळी मोहीम थांबवायचा ‘रेड सिग्नल’ही दिसतोय. एकाच वेळी उलटसुलट संकेत! कारण त्रिशतकी भरारी इंग्लंड मारतंय खरं; पण प्रतिपक्षालाही त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यास हात देत आहेत या खेळपट्टय़ा. क्रमवारीत अव्वल स्थान मिरवणाऱ्या इंग्लिश गोलंदाजीची धुलाई करत आहे सहाव्या स्थानावरचं पाकिस्तान. प्रथम इंग्लंडच्या ३७३ धावा, तर विरुद्ध ३६१ धावा पाकिस्तानच्या. त्यानंतरही प्रथम फलंदाजीत पाकिस्तान ३५८ धावांची मजल गाठतो!

पाकिस्तानी कामगिरीत काहीही नवल वाटलं नाही ते सौरव गांगुलीला. इंग्लंडमध्ये पाकिस्तानचा खेळ नेहमीच बहरतो. इंग्लंडमध्ये पाक फलंदाज चमकतात. नवनवे जलद गोलंदाज प्रतिपक्षाला नाचवतात. भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरी गाठतीलच. त्यांच्यासह पाकिस्तानही तो टप्पा गाठू शकेल, असा दावा गांगुली करतो.

सर्वसामान्यत: मानलं जातंय की, जागतिक क्रमवारीत पहिले-दुसरे असलेले इंग्लंड आणि भारत दहा देशांतील प्राथमिक साखळीतून उपांत्य फेरी गाठतील. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांनी चेंडू कुरतडून वर्षांची बंदी ओढवून घेतली होती. मुख्यत: त्यामुळेच ऑस्ट्रेलिया आज क्रमवारीत पहिल्या तीनमध्ये नाही. मात्र, आता या दुकलीच्या पुनरागमनानंतर तेही उपांत्य फेरी गाठणारच. चौथ्या स्थानासाठी दावेदार दिसतात- विंडीज, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान!

भारताकडून विजयाची अपेक्षा धरावी का? जरूर धरावी. कारण विराट सेनेच्या वाटचालीत भरपूर सातत्य आहे. जसप्रीत बुमराह भारताचं प्रमुख अस्त्र असेल. मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंडय़ा (आणि विजय शंकर?) हे त्याचे साथीदार असतील. मनगटी हिसका देणारा लेगी यजुवेंद्र चहल अन् ‘चायनामन’ कुलदीप यादव ही भेदक फिरकी जोडी. त्यांच्यासह टप्प्यावर मारा करत राहणारा डावखुरा रवींद्र जडेजा अन् काहीसा राऊंड आर्म मारा करणारा पुणेकर केदार जाधव. हा समतोल मारा हे भारताचं बलस्थान. संघात इशांत शर्माचा समावेश झाला असता तर दुधात साखर पडली असती.

रोहित शर्मा आणि डावखुरा शिखर धवन या सलामीच्या जोडीकडून भारताच्या विशेष अपेक्षा आहेत. हे दोघे आणि विराट कोहली यशस्वी झाले तरच भारतीय मोहीम फलदायी होईल. त्यातही कोहलीला पुन्हा एकदा फलंदाजीची धुरा वाहावी लागेल. त्याच्या व्यक्तिमत्त्वाचं मोठं वैशिष्टय़ म्हणजे तो आहे विजयासाठी विलक्षण आतुर. गावस्कर, कपिल, वेंगसरकर, अझरुद्दीन, तेंडुलकर, गांगुली, द्रविड, कुंबळे, धोनी, सेहवाग या सर्वापेक्षा विजयासाठी वखवखलेलं व्यक्तिमत्त्व आहे विराटचं! ऋषभ पंतसारख्या डावखुऱ्या फलंदाजाचा आग्रह न धरणं हे मात्र त्याच्या विजिगीषू वृत्तीशी विसंगत.

यंदाच्या विश्वचषकात वादातीत ‘फेवरिट’ कोणीही नाही. जागतिक क्रमवारी जरा बाजूला ठेवू या. पण पहिले सहा आणि विंडीज असे दहापैकी सात संघ बरेचसे तुल्यबळ आहेत. पहिल्या तीन स्पर्धात विंडीज अन् २००३-२००७ मध्ये ऑस्ट्रेलिया महाबलवान होते. आता किमान सात संघ थोडेफार खाली-वर आहेत. अशा परिस्थितीत एक फरक निर्णायक ठरू शकतो. तो म्हणजे विजयाचा ध्यास अन् विजिगीषू वृत्ती! हे गुण साऱ्याच कर्णधारांत आणि संघांत असणारच. विराटचं वेगळेपण जाणवतं ते इथं. भले त्याला सल्लामसलतीसाठी सचिन, सौरव, द्रविड, सेहवाग, कुंबळे, झहीर, हरभजन नसोत; गांगुली-धोनी यांना लाभलेली कवचकुंडलं नसोत; तरीही तो रवी शास्त्री, धोनी आणि रोहित शर्मा यांच्याशी मसलत करील आणि सोबत त्याची विजिगीषू वृत्ती निर्णायक ठरू शकेल.

आयपीएल फॉर्म काय दर्शवतो?

इंग्लंडमध्ये ‘विश्व’चषक (खरं म्हणजे राष्ट्रकुल चषक!) सुरू होतोय ३० मे रोजी. भारताचा पहिला सामना पाच जूनला. दीड महिना रंगलेली आयपीएल स्पर्धा संपली १२ मे’ला. विश्वचषक तीन आठवडय़ांवर आलेला असताना आयपीएलमधील विश्वचषकवीरांचा फॉर्म काय दर्शवतो?

आधीच स्पष्ट करू इच्छितो की, आयपीएलचा कारभार वीस-वीस षटकांच्या डावांचा. त्यातील कामगिरीची तुलना पन्नास-पन्नास षटकांच्या क्रिकेटशी करणं कितपत योग्य? ही तुलना एका मर्यादेपुरतीच. आणि तिची उपयुक्तताही त्या मर्यादेतील चौकटीपुरतीच!

आयपीएलची आणखी एक मर्यादा लक्षात घेतली पाहिजे. कोणत्याही ठेकेदाराच्या संघात- मग त्या नीता अंबानी असोत वा शाहरुख खान- पाच अव्वल गोलंदाज असतातच वा खेळवले जातातच असे नाही. विशेषत: चौथा-पाचवा गोलंदाज हा कच्चा दुवा असतो. फटकेबाजीसाठी त्यांना प्राधान्यानं लक्ष्य केलं जातं. पण इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि पाकिस्तान आदी राष्ट्रीय संघांशी सामना करताना पाच- निदान चार अव्वल गोलंदाजांना सामोरं जावं लागतं. अशा राष्ट्रीय संघातले पाचवे-सहावे गोलंदाजही चांगले- निदान बऱ्यापैकी असतात. तिथं फलंदाजीचा कस सतत व अखंड लागत असतो.

भारताचा संघनायक विराट कोहली आणि मुंबई इंडियन्स संघाचा चतुर कर्णधार आणि भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा या दोघांच्याही पदरी आयपीएल मोसम अपेक्षित यश जमा करू शकला नाही. चौदा डावांत विराटच्या धावा ४६४, तर रोहितच्या १५ डावांत ४०५. धावगती शंभर चेंडूंमागे (स्ट्राइक रेट) विराट १४१, तर रोहित १२८. दोघांचीही अर्धशतकांची जोडी. खेरीज विराटचे एकदा ५८ चेंडूंत शतक. तेवढेच त्याच्या लौकिकास साजेसे. चेन्नईच्या फिरणाऱ्या खेळपट्टीवर इम्रान ताहीर आणि मिच सॅन्टवर यांच्या स्पिनविरुद्ध त्याचं कुशल अर्धशतक.

मुंबई इंडियन्सविरोधात ६४ चेंडूंत नाबाद शतक साजरे करणाऱ्या राहुलची कमाई १४ डावांत सहा अर्धशतकांसह ५९३ धावांची. पण धावगती १३५ ही अपेक्षापूर्ती न करणारी. वयाच्या चाळिशीकडे झुकलेल्या महेंद्रसिंग धोनीनं आपल्या फिटनेसचं प्रसन्न दर्शन पुनश्च घडवलं. पण दोन सामन्यांत विश्रांती घेण्याची शारीरिक तडजोडही आपणहून केली! बारा डावांत तीन अर्धशतकांसह त्याच्या धावा ४१६. पण धावगती १३५ ही एकेकाळच्या धोनीला खिजवणारी. रॉयल चॅलेंजर्सकडे डेल स्टेन, उमेश यादव, मार्कस् स्टॉईनीस, उगवता नवदीप सैनी आणि यजुवेंद्र चहल असे पाच उत्तम गोलंदाज. चेन्नईची हालत त्यांनी ४ बाद २८ केलेली. त्यानंतर धोनीच्या ४८ चेंडूंत षटकामागे साडेदहा या धावगतीने नाबाद ८४. धोनीच्या या अवताराची भारताला इंग्लंडमध्ये गरज!

शिखर धवन ठरला सातत्याचा आदर्श. अवघ्या सहा डावांत ५२१ धावा. धावगती १३६. पाटा खेळपट्टय़ांवर पुन्हा एकदा जलद गोलंदाजांचा कर्दनकाळ. विश्वचषकासाठी निवडलेल्या लॉकी फग्र्युसन, आंद्रे रसेल, कारलोस ब्रेथवेट आणि स्पिनर कुलदीप यांना ६३ चेंडूंत ९७ धावांसाठी बदडले. सातत्यपूर्ण धवनच्या दुसऱ्या टोकाला दिनेश कार्तिक. धावगती- १४६. समाधानकारक. पण तेरा डावांत फक्त अडीचशे धावा. शिवाय कोलकाता नाइट रायडर्समधील सहकाऱ्यांकडून नेतृत्वावर उघड टीका!

हार्दिकचा धूमधडाका

विजय शंकरची विश्वचषकासाठी निवड वादग्रस्त. आता आयपीएलमध्ये १४ डावांत २४४ धावा अन् धावगती सव्वाशेची हा त्याचा खेळ निराशाजनकच. केदार जाधवही या स्पर्धेत चमक दाखवू शकला नाही. १२ डावांत केवळ १६२ धावा. त्यापेक्षाही अपेक्षाभंग करणारी ९५ ची धावगती. याउलट काही आठवडय़ांच्या विश्रांतीनंतर हार्दिक पंडय़ाचा धूमधडाका. त्याने चारशे धावा फटकवल्या त्या १९१ या थरारक धावगतीने. पण गोलंदाजीत सुधारणेला वाव.

सरतेशेवटी एक इशारा.. आयपीएलमध्ये रोहित शर्मा (मुंबई) अन् धोनी (चेन्नई) यांनी आपापल्या संघांना चारदा अन् तीनदा अजिंक्य केलंय. पण ही करामत कोहलीला एकदाही जमलेली नाही. गौतम गंभीरने आपल्या दिल्लीतील सहकाऱ्यामधील या उणिवेकडे लक्ष वेधलं होतं. त्याला जबाब दिलाय सौरव गांगुलीनं : जागतिक पातळीवर कर्णधार कोहली यशवंत आहे.. जयवंत आहे! गंभीरला नव्हे, पण सुज्ञांस अधिक सांगणे न लगे!

झटपट क्रिकेट- ताजे रँकिंग इंग्लंड अव्वल, भारत दुसरा

पन्नास षटकांच्या झटपट क्रिकेटमध्ये (वन डे इंटरनॅशनल) इंग्लंडनं १२३ गुणांसह अव्वल स्थान कायम राखलंय. त्यांचा पाठलाग करण्यात भारत केवळ दोन गुणांच्या फरकाने दुसऱ्या स्थानावर आहे.

झटपट क्रिकेटच्या ताज्या- म्हणजे १० मे’च्या रँकिंग तक्त्यानुसार, पहिल्या १० देशांत चक्क पाच आशियाई राष्ट्रे आहेत. भारतखंडातील भारत, श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तान या चार देशांसह आता अफगाणिस्ताननेही मजल मारावी, हे विशेष. पण भारताखेरीज चारही आशियाई यादवीग्रस्त देशांचं रेटिंग दोन आकडी- म्हणजे १०० च्या खालचं आहे.

कसोटी क्रमवारीत दहाव्या पायरीवर असणाऱ्या झिम्बाब्वेला अफगाणिस्तानने पन्नास षटकं (वन डे इंटरनॅशनल) आणि वीस षटकं (टी-२०) श्रेणीमध्ये पदच्युत केलंय. पन्नास षटकांत दहाव्या, तर वीस षटकांत अफगाणिस्तानने सातव्या पायरीपर्यंत प्रगती केलीय.

माजी विश्वचषक (खरं म्हणजे राष्ट्रकुल चषक) विजेत्यांची आजची स्थिती काय दर्शवते? गेली स्पर्धा रुबाबात जिंकणारे कांगारू स्टीव स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्याविना खेळताना पाचव्या पायरीवर फेकले गेले आहेत. १९९२ चा जेता पाकिस्तान अन् ९६ मधील अजिंक्य श्रीलंका आता घसरले आहेत सहाव्या आणि नवव्या स्थानावर!

विश्वचषकाच्या मोसमात सर्वाधिक ४७ झटपट सामने खेळून पूर्वतयारीत काही कमी पडू दिलं नाही ते भारतानेच. पण हेही तितकंच खरं, की भारताशी खेळणं आर्थिकदृष्टय़ा लाभदायक असल्याने सारेच देश भारताशी चार हात करण्यास उत्सुकच नव्हे, तर अधीर असतात.