डॉ.अब्दुल कलाम यांची इस्रोमध्ये प्रथम निवड करणाऱ्या त्यांच्या रत्नपारखी वरिष्ठांनी कथन केलेली त्यांची कहाणी..
‘इस्रो’मध्ये मी विक्रम साराभाई यांच्याबरोबर काम करत असतानाची ही गोष्ट आहे. इस्रोत एक अभियंता भरती करायचा होता. त्याचे नावही निश्चित झाले होते. त्यावेळचे प्रकल्प संचालक एच. जी. एस. मूर्ती यांनी थुंबामधील केंद्रासाठी ईश्वर दास यांच्या नावाची शिफारस केली होती. दुसऱ्याही एका व्यक्तीची मुलाखत झाली होती, परंतु त्यांची निवड झाली नव्हती. यादरम्यान ‘नासा’च्या एका कार्यक्रमाकरता मी साराभाईंसोबत अमेरिकेत गेलेलो असताना इस्रोतील नियुक्त्यांबाबत आम्ही चर्चा करीत होतो. त्यावेळी अभियंत्याचे एक पद रिक्त असताना आणखीही एका व्यक्तीचा विचार करावा, असे साराभाई यांनी मला सांगितले. ती जबाबदारी त्यांनी माझ्यावरच टाकली. मी बायोडेटा पाहिला. त्यात उणीव अशी काहीच नव्हती. ओझरती नजर फिरवताच मी साराभाईंना म्हटले, ‘हा मुलगा चांगले काम करील याविषयी मला जराही शंका नाही.’ या मुलाने पुढे इस्रोत इतके चांगले काम केले, की मला रत्नपारखी असल्याचा आनंद झाला. तो मुलगा होता- एपीजे अब्दुल कलाम. कलाम इस्रोमध्ये दाखल झाले. त्यानंतर भारतीय वैज्ञानिकांचे एकपथक नासाच्या वॉलॉप बेटावरील उड्डाण केंद्रास भेट देण्यासाठी गेले होते. तेव्हा वॉशिंग्टनहून वॉलॉपला जाताना माझी कलाम यांच्याशी पहिली भेट झाली. नंतर आमच्यातला स्नेह वाढत गेला. कलाम इस्रोत येण्याआधी डॉ. वसंतराव गोवारीकरांनी अग्निबाणांच्या इंधनावर बरेच काम केले होते. पण अग्निबाण तयार करून प्रत्यक्ष उपग्रह सोडण्याचा टप्पा तेव्हा आपण गाठला नव्हता.
तो खरंच एक मंतरलेला काळ होता. इस्रोत तेव्हा सतीश धवन, मी, गोवारीकर, कलाम असे सर्वजण आत्मीयतेने काम करत होतो. मी व साराभाई अनेकदा अहमदाबादहून त्रिवेंद्रमला जात असू तेव्हा कलाम तिथे काम करत होते. त्यांनी तिथे अनेक नवी कामे केलेली असत. त्यांचा कामाचा झपाटा अफाट होता. प्रवासात साराभाई गमतीने मला म्हणत, ‘आता तिकडे गेल्यावर फटाके फुटणार.’ म्हणजे आणखी वेगळे प्रयोग पाहायला मिळणार. त्यावेळी आम्ही त्यांना गमतीने ‘बिझीबी’ म्हणत असू. कलाम यांच्याकडे तेव्हा एसएलव्ही- सॅटेलाईट लाँच व्हेईकल (उपग्रह प्रक्षेपक) तयार करण्याची कामगिरी सोपवली गेली होती. जपानच्या सहकार्याने उभारला गेलेला तो प्रकल्प होता. पण कलामांनी नंतर त्याला स्वदेशी रूप दिले. त्यांनी एसएलव्हीचा नोज कोन कार्बनी धाग्यांचा बनवला. तो हलका व स्वस्त होता. त्यांनी त्या काळात आधुनिक  व स्वदेशी अँटेना बनवले होते. त्यांचे प्रयत्न तेव्हापासून स्वदेशी तंत्रज्ञानाकडे झुकणारे होते. १९७९ मध्ये एसएलव्हीचे पहिले उड्डाण झाले. अग्निबाण झेपावला, पण दुर्दैवाने तो लक्ष्य न गाठताच कोसळला. प्रकल्पाचे प्रमुख असलेल्या कलाम यांना वाईट वाटले हे आम्हाला दिसतच होते. पण त्यांनी तो अग्निबाण का कोसळला, याची कारणे शोधली. परंतु अग्निबाण पडला तेव्हा इस्रोचे प्रमुख सतीश धवन यांनी कलाम यांना सांगितले की, ‘तुम्ही पत्रकारांना सामोरे जाऊ नका. मी काय ते बघतो.’ त्यानंतर पुन्हा कलाम उमेदीने कामाला लागले आणि १८ जुलै १९८० रोजी त्यांनी एसएलव्हीच्या साहाय्याने रोहिणी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. त्यावेळी पंतप्रधान इंदिरा गांधी जातीने उपस्थित होत्या. या यशानंतर इस्रोचे संचालक सतीश धवन यांनी ‘कलाम, आता तुम्ही पुढे व्हा अन् पत्रकारांना सामोरे जा,’ असे सांगितले होते. अशी इस्रोची संस्कृती होती. आजही आहे. कलाम यांच्या जडणघडणीत इस्रो, साराभाई, धवन यांचा मोठा वाटा आहे. झपाटलेपणाने काम करण्याची शिकवण त्यांना तिथे मिळाली. एसएलव्हीचे यश आणि कलामांचे नाव तोपर्यंत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कानावर गेले होते. त्यांनी लगेच एक आदेशाद्वारे ‘कलाम आम्हाला संरक्षण संशोधन व विकास संस्थेत (डीआरडीओ) हवे आहेत,’ असे सांगितले. खरे तर कलामांची आम्हालाही गरज होती. पण आम्ही त्यांना इस्रोतून डीआरडीओत जाऊ दिले. दहाएक वर्षे त्यांनी इस्रोत काम केले. देशासाठी समर्पण वृत्तीने काम करणाऱ्या कलाम यांनी इस्रोची कार्यसंस्कृती सर्वस्वानं अंगीकारली होती. इस्रोमध्ये वरिष्ठांची चूक कनिष्टही दाखवू शकत असे. यश मिळाले तरी हलकासा जल्लोष. यशाचेही परीक्षण आणि अपयशाचे तर त्याहून कठोर परीक्षण- ही इस्रोची संस्कृती आहे. म्हणूनच आज आपण अग्नी, पृथ्वी यांसारखी क्षेपणास्त्रे तयार करू शकलो आहोत. एकदा असाच एका कार्यक्रमाला गेलो असताना कलाम भेटले. त्यांनी एका तरुणाशी माझी गाठ घालून दिली. ‘हा फार हुशार मुलगा आहे. पुढे नक्कीच चांगली कामगिरी करेल,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पुढे हा तरुण डीआरडीओचा संचालक झाला. कलाम माणसे पारखण्यात पारंगत होते. त्यांची राहणी साधी होती. लहान मुलांसारखे ते निरागस होते. त्यांना संगीताची आवड होती. ते वीणा वाजवीत असत.
गुणग्राहकता हा त्यांचा विशेष गुण. कुणी काही नवे केले की लगेच ते त्याचं कौतुक करायचे. राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांनी मला सहकुटुंब दिल्लीला बोलावले होते. तेव्हा त्यांनी पॅरिसमध्ये काम करणाऱ्या माझ्या मुलाकडून तो मलेरियावर करत असलेल्या संशोधनाची साद्यंत माहिती विचारून घेतली. राष्ट्रपती भवनात ते माझ्या नातीसोबत लहान होऊन खेळले. माझ्याशी त्यांचा कायम स्नेह होता. त्यांच्या बोलण्यात जी असोशी जाणवे, त्याने आपण भारावून जात असू. ते लोकांचे राष्ट्रपती ठरले. अगदी खेडय़ापाडय़ातील लोकांनाही त्यांची महती कळली होती. भारत-अमेरिका यांच्यात तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी अणुकरार केला तेव्हा अनेक राजकीय नेत्यांना या कराराला पाठिंबा द्यायचा की नाही, हे ठरवता येत नव्हते. समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव यांनी कलाम यांची भेट घेतली व त्यांना अणुकरार ही नेमकी काय भानगड आहे, ते विचारले. कलामांनी त्यांना सगळी माहिती दिली व या करारास पाठिंबा द्या, असे सांगितले. त्यावर मुलायमसिंगांनी एकही प्रतिप्रश्न न करता त्यांच्यावर विश्वास ठेवून अणुकरारास पाठिंबा दिला.
आज आपल्याला ‘मेक इन इंडिया’चे महत्त्व पटले असले तरी त्यांना ते कधीच पटले होते. विज्ञान संशोधनात देशाच्या स्वयंपूर्णतेसाठी नवप्रवर्तनावर त्यांनी भर दिला. जयपूर फूटने अनेकांचे आयुष्य बदलून टाकले. जयपूर फूटच्या आधी परदेशातून कृत्रिम पाय मागवले जात. पण मॅगसेसे पुरस्कारविजेते सामाजिक कार्यकर्ते पी. के. सेठी यांनी स्वदेशी बनावटीचा जयपूर फूट बनवला. परदेशी मापाच्या पायात भारतीय पाय बसवणे चुकीचे होते. त्यामुळे त्रास होत असे. ते वजनाने जड होते. कलाम यांनी उपग्रह वा अवकाशयानात वापरल्या जाणाऱ्या धातूसंमिश्रांपासून हे पाय बनवायला सांगितले आणि ते हलके झाले. असंख्य गरजूंना त्यांचा उपयोग झाला. अशाच तऱ्हेने त्यांनी कुबडय़ाही हलक्या केल्या. रोजच्या व्यवहारात अवकाश तंत्रज्ञानाचे पूरक उपयोग करण्याची अमेरिकी परंपरा कलामांनी भारतात सुरू केली. त्यांनी हृदयासाठी लागणारे स्टेंटही कमी खर्चात तयार होतील असे बनवले. याकामी त्यांनी डीआरडीओतील त्यांच्या ज्ञानाची व प्रयोगांची शिदोरी पणाला लावली. ‘विद्यार्थ्यांना प्रश्न विचारू द्या, त्यांना शिक्षणाची हवी ती शाखा निवडू द्या,’ असे कलाम सांगत असत. कारण आपल्याला ज्याची आवड आहे, ज्या कामाने समाधान मिळते, त्यातच माणसाची प्रगती होते. कलाम यांचे शिक्षण ‘एमआयटी’मध्ये- ‘मद्रास इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ या संस्थेत झाले होते. काहीजणांना चुकून ते अमेरिकेतील एमआयटीत शिकले होते असे वाटते. पण ते खरे नाही. त्यांचे सगळे शिक्षण भारतातच झाले. त्यांना परदेशात अनेक मानाची पदे मिळाली असती; पण ते गेले नाहीत. यामागे त्यांचा स्वदेशीचा जाज्ज्वल्य अभिमान होता. कलामांनी भारताला काय दिले, असे मला विचाराल तर त्यांनी भारतीयांची पराभूत मानसिकता काही प्रमाणात कमी केली असे मी म्हणेन. त्यांनी नव्या प्रयोगांना प्रोत्साहन दिले. भारताला महाशक्ती बनवण्याचे स्वप्न पाहिले. त्यासाठी त्यांनी युवकांचे प्रेरणास्थान म्हणून काम केले. त्यांच्यात एक प्रचंड ऊर्जा सळसळत असे.
प्रगतीशील भारत घडविण्याची त्यांना आस होती. विज्ञान क्षेत्रात असूनही वलयांकित होण्याचे भाग्य त्यांना लाभले. देवदुर्लभ असे लोकांचे प्रेम मिळाले. त्यांची इस्रोत जी निवड झाली त्याचे त्यांनी चीज केले. कलामांच्या निधनाने एक सच्चा मित्र, तत्त्वज्ञ, मार्गदर्शक आपल्याला अध्र्या वाटेवर सोडून अनंताच्या प्रवासाला निघून गेला आहे.
(माजी संचालक, स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर, इस्रो, अहमदाबाद)
शब्दांकन- राजेंद्र येवलेकर