अभिजीत ताम्हणे

व्हेनिस या शहरात दर दोन वर्षांनी जाऊन फक्त पाहायचं असं एवढं काय असतं? हे शहर सुंदर वगैरे आहेच, पण त्या सौंदर्याची सवय होते दोन-तीन भेटींमध्ये. व्हेनिसच्या पहिल्यावहिल्या भेटीत सान माकरे चौकाची भव्यता भावते. याच चौकात संत मार्कूसच्या नावानं बांधलेल्या मनोऱ्यावर जाण्यासाठी महागडं तिकीट काढावं लागतं, पण वर जाताच अख्खं व्हेनिस पायाशी लोळण घेतं आणि ‘पैसा वस्सूल’ आनंद होतो. जमिनीवर – म्हणजे व्हेनिस या बेटसमूहाला आकार देणाऱ्या दगडी फरसबंदीवर उतरल्यानंतर डोजेस राजवाडय़ासह अनेक इमारतींच्या कमानी किंवा अन्य सजावट यांकडे हळूहळू लक्ष जाऊ लागतं आणि पाश्चात्त्य आणि तुर्की, इस्लामी संस्कृतींचा मिलाफ मनाला भिडू लागतो. व्हेनिसला ‘गेटवे टु ईस्ट’ असं पश्चिमेकडले लोक का म्हणायचे हे इथल्या इमारती सांगतात.. आपल्या महाराष्ट्रातल्या औंधच्या भवानी संग्रहालयात पंडित सातवळेकरांच्या चित्रांमधलं ‘व्हेनेशियन आकाश’ पाहिलं असेल तर खुद्द व्हेनिसमध्ये हे आकाश दररोज सकाळ-संध्याकाळ रंगांचा रतीबच घालत असतं. हे सारं कोणाही अधाशी पर्यटकाला डोळ्यांत साठवता येण्याजोगं व्हेनिस! पण जरा तीन-चार दिवस इथं राहिल्यावर इथली शांतता दिसू लागते. आपल्याकडे आडगल्ल्या असतात तसे इथले आडकालवे पाहत आपण काही क्षण थबकतो. कालव्यांशेजारचे रस्ते म्हणजे ‘फोन्डामेंटा’, थोडी चौकासारखी जागा म्हणजे ‘काम्पो’, बंद दाराआडचा साताठ छोटय़ा इमारतीवजा घरं असलेला गोट म्हणजे ‘सोटोपरोगो’, पूल म्हणजे ‘पॉन्टे’, कालव्याकडे जाणारा उभा रस्ता म्हणजे ‘रामो’ हे सारं केवळ भाषेत समजून घेण्याऐवजी एकेका रस्त्याचं निराळेपण न्याहाळताना अंगवळणी पडू लागतं.. पण सहाव्या-सातव्या व्हेनिसभेटीतही हेच सारं पाहताना ‘अंगवळणी पडणं’ हेच शिरजोर ठरतं.. डोळे विशिष्ट प्रकारच्या सौंदर्याला सरावतात. आता याच व्हेनिसमधले बांगलादेशी फेरीवाले दिसू लागतात. दिसण्यात आपणही साधारण त्यांच्यासारखेच असल्यानं व्हेनिसकरांची आपल्याकडे पाहण्याची नजर निराळी आहे, हे जाणवू लागतं.. इथेही काम करत असतात ते डोळेच! पण डोळे आता फक्त सौंदर्य पिऊन घेण्याच्या नव्हे, तर खरी परिस्थिती जाणून घेण्याच्या कामास लागलेले असतात.

हा व्हेनिस या शहराचा दृश्य-अनुभव. पण तिथं एवढय़ा वेळा जाण्याचं कारण मात्र तिथली दृश्यकलेची द्वैवार्षिकी! दर दोन वर्षांनी सर्व देशांनी आपापली कला आपापल्या कलामंडपांत दाखवायची, असा ‘बिएनाले’चा प्रघात मधल्या महायुद्धकाळाचा अपवाद वगळता १८९५ सालापासूनच्या १२४ वर्षांत यंदा अठ्ठावन्नाव्यांदा व्हेनिसमध्ये पाळला गेला. अत्यंत पाश्चात्त्यकेंद्री, खरं तर वसाहतवादीच अशा या प्रघातामध्ये १९६० सालानंतर हळूहळू बदल होऊ लागले. मध्यवर्ती प्रदर्शनात इतर अनेक देशांच्या कलावंतांना स्थान मिळू लागलं. देशोदेशींचे कलामंडप शहरभर कुठेकुठे झाले. ‘राष्ट्र-देश’ नसलेल्या संस्था किंवा संघटनांचे मंडपही आले. त्यामुळे एकविसाव्या शतकाच्या उदयकाळापासून जागतिक दृश्यकला आज कोणत्या स्थितीत आहे हे पाहण्यासाठी व्हेनिसची बिएनाले जणू अनिवार्य तीर्थस्थान ठरली. ‘तीर्थी धोंडा पाणी- देव रोकडा सज्जनी’ हे नाथवचन माहीत असलेल्यांना ‘जार्दिनी द बिएनाले’ (जार्दिनी म्हणजे गार्डन- उद्यानापेक्षा उपवन म्हणावं असं- ‘बिएनालेचं राखीव उपवन’) आणि आर्सेनाले (हे एकेकाळी व्हेनिसच्या कासेलो या जलदुर्गाचं दारूगोळा कोठार होतं, तिथं आता प्रचंड कलाप्रदर्शन भरतं.) या दोन मुख्य ठिकाणी अन्य शहरभर विखुरलेल्या सहप्रदर्शनांमध्ये ‘सौजन्य : अमुकतमुक आर्ट गॅलरी’ या उल्लेखांचं धोंडा-पाणी दिसत/ डाचत राहतं; पण कलेचा अनुभव बहुतेकदा साक्षात समोर असतो!

हा ‘कलेचा अनुभव’सुद्धा व्हेनिसच्या अनुभवासारखाच एक प्रकारे. अंगवळणी पडल्यावर फार हरखून न टाकणारा. सौंदर्यप्रत्यय म्हणजे काय, हे एकदा कळू लागलं की नंतर त्या ‘प्रत्यया’च्या निरनिराळ्या विभक्तीच फक्त पाहायच्या, त्यांमधला फरक जाणून घ्यायचा, हे महत्त्वाचं आहेच. पण कलेचा प्रत्यय घेण्याची रीतच बदलणं, हाही एक मार्ग आहे आणि तो प्रशस्त करण्याचं काम १९१३ सालात ‘डाडाइस्ट’ कलाचळवळीपासून सुरू झालं ते आज जगभर पसरलेलं आहे. त्यामुळे कलेचं केवळ दृश्य-सौंदर्य न्याहाळण्याऐवजी कलेला जगाकडे पाहण्याचं माध्यम मानावं, हा तो महामार्ग आजवर चांगलाच रुंद झालेला आहे. जगाच्या आजच्या परिस्थितीचा प्रत्यय देणारी कला, ती ‘समकालीन कला’ (आधुनिक कला हे त्यापेक्षा जुन्या कलेला म्हणायचं!). अशी समकालीन कला व्हेनिसच्या बिएनालेत दिसते, भेटते, अंगावर येते, टपली मारते.

इथे ‘अंगावर येते, टपली मारते’ हे केवळ भाषिक अलंकार म्हणून लिहिलेलं नाही. नील बेलूफा यांनी जिममध्ये असतात तशा आकर्षक उपकरणांवर प्रेक्षकांना बसायला लावून त्यांच्यापुढे सीरियात किंवा कुर्दिस्तानात लढणाऱ्यांच्या ‘स्काइप’वरून (परवानगीनंतरच) घेतलेल्या मुलाखती मांडल्या, त्या अंगावरच येत होत्या [चित्र १]. या मुलाखती तिथं बसल्यानंतरच ऐकू येत. माणसाचा चेहरा, तिथं बसल्याखेरीज पूर्ण दिसतच नसे. त्याऐवजी चेहऱ्यावर काळी पट्टी दिसे. प्रत्यक्ष समोरासमोर आलं, तरच  कलाकृती दिसणार! मुलाखतीतला माणूस ‘हॅलो’ वगैरे म्हणत असताना नकळत आपणही ‘हॅलो’ म्हणावं, इतका तो आपल्याशी बोलत असल्यासारखा भासणार. पण तो वा ती पुढं जे सांगत आहेत, ते आणखी अस्वस्थ करणारं. ‘का रे जगताय असे?’ असं त्यांना विचारावं वाटत असतं तोच मुलाखत संपते. एकतर्फी.

युक्रेनच्या कलामंडपानं खरोखर टपलीच मारली. या युक्रेनी दालनात शिरल्या शिरल्या समोर दिसे एक पडदा. दृश्यकलावंतांच्या संकल्पनेतून तयार झालेली व्हिडीओकला ही आज सर्रास दृश्यकलाच मानली जाते, त्यामुळे या पडद्याचं विशेष काही वाटत नाही. पण त्या पडद्यावर फक्त एकदा अजस्र मालवाहू विमानाचा फोटो नि नंतर बराच वेळ एक हार्डडिस्क एवढंच वारंवार दाखवलं जातंय.. ‘हे क्काय’ म्हणून इकडेतिकडे पाहावं तर भिंतीवर ‘जगातील सर्वात मोठे मालवाहू विमान बनणार युक्रेनच्या कलेचे दालन- हार्डडिस्कमध्ये साठवणार युक्रेनभरच्या कलावंतांच्या कलाकृती-  जार्दिनीवर पडणार या विमानाची सावली- युक्रेनमधील सर्वच्या सर्व चित्र-शिल्पकारांना संधी देणारा अभिनव प्रयोग’ असं जाहिरातीसारखं लिहिलेलं दिसतं आणि त्याखाली लांबलचक नामावली दिसते. ती त्या समस्त युक्रेनी कलावंतांची असणार, हे आपण ओळखतो तितक्यात- ‘अधिक माहितीसाठी आमच्या स्वयंसेवकांशी जरूर संवाद साधावा’ अशी तिसरी पाटी दिसते.. पाच टेबलं आहेत या दालनात, पैकी एका टेबलावर जाऊन संवाद साधला तर तिथला तरुण गोष्टच सांगू लागतो– ‘‘काय झालं, की विमान उडणार होतं. ही जी नावं दिसताहेत त्या सर्वानी रीतसर अर्ज केले होते, आपापल्या कलाकृतींच्या डिजिटल प्रतिमा दिल्या होत्या. पण काय झालं, की जरा प्रॉब्लेम झाले. म्हणजे एका ज्येष्ठ चित्रकाराला ही कल्पना खोगीरभरतीसारखी वाटली. म्हणून काय झालं, की त्यांनी थेट आमच्या राष्ट्राध्यक्षांशीच संपर्क साधला. दुसरीकडे काय झालं, की बिएनालेचं उपवन (जार्दिनी) आणि अख्खं व्हेनिस बेट हेच संरक्षित वास्तुवारसा असल्यानं विमानाची सावलीबिवली पाडायला परवानगी मिळेना. मात्र एव्हाना सरकारी विमान कंपनीकडे या उड्डाणासाठी पैसेही भरून झाले होते. तेवढय़ात काय झालं, की ही कंपनी म्हणाली, ‘‘आमचं नेमकं हेच मोठ्ठं विमान सध्या दुरुस्तीला काढलंय. काय करणार? इंजिनाचीच की हो दुरुस्ती! मग विमान ना? उडालंच नाही. सावली ना? पडलीच नाही. अभिनव प्रयोग? झालाच नाही. पण ठीकाय, इथवर तरी आलोय की आम्ही.’’ ही भलतीच गोष्ट ऐकताना कासावीस होऊन आपण ‘हॅट्- खोटंय सगळं..’ असं म्हणणार तेवढय़ात युक्रेनच्या राजकीय, सामरिक, आर्थिक ओढाताणीच्या बातम्या गेल्या पाच वर्षांत कसकशा वाढत गेल्या आहेत हे उगाच आठवतं आणि तो बनाव, ती गोष्ट हेच युक्रेनच्या सद्य:स्थितीचं ‘चित्र’ असल्याचं लक्षात येतं! तरीही, त्या कलावंतांनी रीतसर अर्ज करून नावं दिली त्यांचं काय? टेबलावरला संवादक म्हणतो, ‘‘आमचा कॅटलॉग (प्रदर्शनपुस्तिका) पाहा ना.. सर्व चित्रकारांच्या फोन नंबरांसकट नाव-पत्त्यांची यादीसुद्धा आहे त्या कॅटलॉगमध्ये’’- आता टपली बसणार असते.. केवळ राजकीय सद्य:स्थितीची लटकंती नव्हे, चित्रकारांची तगमग पोहोचवतंय हे दालन, अशी.

तगमग पोहोचायचीच असेल, तर ती रंगचित्रांतूनसुद्धा (म्हणजे, टपली न मारतासुद्धा) पोहोचवता येते. मायकल अर्मिटाज यांनी आपल्या ‘दो बिघा जमीन’मधल्या बलराज साहनींची आठवण देणारा, रिक्षा ओढणारा माणूस कॅनव्हासऐवजी एका झाडाच्या पातळ सालावर रंगवला [चित्र ३], किंवा ‘कोंबडीचोर’ नावाचं चित्र रंगवलं ही सारी चित्रं आजही असलेल्या गरिबी आणि हताशेची प्रतीकं ठरतात. भारताचा सोहम गुप्ता हा छायाचित्रकार यंदा व्हेनिस बिएनालेच्या मध्यवर्ती प्रदर्शनात निवडला गेला आहे. कोलकात्याचा हा तरुण रस्त्यावर राहणाऱ्यांशी बोलतो, मैत्रीच करतो- किंवा त्यांना विश्वासात तरी घेतो- आणि मगच त्यांचे फोटो त्यांच्या संमतीनं टिपतो [चित्र २]. अशा ४० हून अधिक फोटोंना यंदा व्हेनिस बिएनालेमध्ये स्थान मिळालं, हे ‘इंडिया पॅव्हिलियन’ कुणा तरी खासगी संग्रहालयाच्या कृपेमुळे यंदा व्हेनिसमध्ये दिसू शकलं, याच्याइतकंच महत्त्वाचं होतं. सोहम गुप्ताचे हे फोटो, गरिबांना हताशेसह अन्य भावनाही असतात, याची नोंद घेणारे आहेत. ‘इंडिया पॅव्हिलियन’ म्हणजेच भारतीय कलामंडपामध्ये जी. आर. इरण्णा

यांनी खूप खडावा वापरून केलेलं मांडणशिल्प हे व्हेनिसच्या यंदाच्या अन्य कलाकृतींच्या संदर्भात पाहिलं, तर असं लक्षात येतं की मोठा आकार-अवकाश (लार्ज स्केल), मांडणशिल्पामधल्या घटकांमध्ये पुनरावृत्ती आणि वैचित्र्य यांचा मेळ घालणं, याला नेहमीच दाद मिळत असते आणि ही दाद आशयापर्यंत न जाता रूपांकनालाच असते.

दुसरीकडे, गांधीजींच्या विनंतीवरून नंदलाल बोस यांनी हरिपुरा काँग्रेससाठी केलेल्या चित्र-मालिकेकडे फार कुणाचं लक्षच नव्हतं, हे पाहून कसंसंच वाटलं.. ‘चित्रामागचं चरित्र समजून घ्या रे बाबांनो..’ असं तिथं त्या वेळी असलेल्या काही जणांना सांगण्याचा प्रयत्नही करून पाहिला.. पण ते किती पुरणार? ज्या प्रकारच्या दृश्यांची, चित्रांची सवय झालेली आहे, त्यापेक्षा निराळं पाहण्यासाठीच इथे आलो आहोत हे येण्याआधीच ठरलं असेल तर?

तसं न ठरवता कदाचित अन्य काही जण- या मजकुराचे वाचकसुद्धा- ही (किंवा कुठलीही) बिएनाले पाहू शकतील. व्हेनिसची बिएनाले २४ नोव्हेंबपर्यंत सुरू राहणार आहे. तिथे जर जाण्याचं नियोजन अजूनही करता येईल (युरोप-अमेरिकेत असलेल्या वाचकांना हे नियोजन अधिकच सुकर होईल), हे लक्षात घेऊन काही महत्त्वाच्या- न चुकवत येण्याजोग्या कलामंडपांचा उल्लेख इथं आवश्यक वाटतो. ग्रीसचा कलामंडप नेहमीच त्या देशाच्या राजकीय स्थितीवर तिरकस भाष्य करणारा असतो. यंदा इथे तीन कलावंत आहेत, पैकी इव्हा स्टेफनी यांनी चहाच्या अड्डय़ांवरल्या संभाषणांची व्हिडीओफीत प्रदर्शित केली आहे तर झाफोस झागोरारिस यांनी, ग्रीसमध्ये यादवी सुरू असतानाच्या १९४८ या वर्षी व्हेनिसमध्ये स्वत:चं अमेरिकी कलेचं संग्रहालय असणाऱ्या पेगी गुगेनहाइम यांनी ‘मदत म्हणून’ ग्रीसचा कलामंडप प्रायोजित केला आणि ‘काही तरी ग्रीकसुद्धा हवं’ म्हणून यादवीतल्या बंदींमार्फत ग्रीक देवालयांच्या प्रतिकृती इथं उभारल्या गेल्या, याचा इतिहास इथे तत्कालीन फोटो आणि कागदपत्रं मांडून उलगडला आहे. सौदी अरेबियाच्या कलामंडपात झहरा अल-हमदी यांनी स्थानिक महिलांकडून विविध आकारांचे चामडी शोभिवंत वाडगे करून घेतले आणि अशा पाच हजार कलावस्तूंमधून एक मांडणशिल्प साकारलं, त्यातून या कामादरम्यान झालेले आवाजही काही वेळा ऐकू येतात. चीनचा कलामंडप अजिबातच खास नाही. तिथे नेहमीप्रमाणे डोळे दिपवणाऱ्याच कलाकृती चिनी सरकारनं यंदाही मंजूर केलेल्या दिसतात. त्यापेक्षा बिएनालेच्या मुख्य, मध्यवर्ती प्रदर्शनातले सान युआन व फंग यू, यिन शिउझेन हे दृश्यकलावंत डोळय़ांद्वारे बुद्धीलाही चालना देतात (युआन-यू या जोडीनं रक्तसदृश द्रावण आवरणारा मोठ्ठा यांत्रिक हात इथं मांडला आहे, तर यिन यांनी महिलांच्या नायलॉन अंतर्वस्त्रांचा बेमालूम वापर करून मोठी शिल्पं घडवली आहेत). पुरुषी अहंकाराचं प्रतीक ठरलेली एक ‘रेसिंग मोटरबाइक’ मधोमध चिरून अलेग्झांड्रा बिर्केन यांनी मध्यवर्ती प्रदर्शनात मांडली आहे, त्यातून वैचित्र्याचा अनुभव घेऊन झाल्यानंतर त्यातली हिंसा आणि त्याहीनंतर त्या हिंसक कृतीमागची खदखद ध्यानात येते.

व्हेनिस बिएनालेच्या गेल्या २००७ पासून सात खेपा झाल्या, त्यापैकी सहा खेपा पाहिल्यावर लक्षात राहाते ती अनेक कलामंडपांतून कलेशी दिसणारी बांधिलकी. सौंदर्यप्रत्ययाच्या कल्पना बदलताना जाणवतातच, पण त्याहीपेक्षा ‘ही कलेच्या अनुभवाची परमावधी’ असं एखाद्या वेळी (उदाहरणार्थ युक्रेन कलामंडपातली ‘टपली’) समजा वाटलं तरी पुढल्या परमावधीची पुढली वेळ येणारच असते.. म्हणजे वारंवार व्हेनिस बिएनाले पाहणारे सारेच जण, नव्या परमावधीच्या प्रतीक्षेत असतात.

abhijeet.tamhane@expressindia.com