सुभाष अवचट – Subhash.awchat@gmail.com

केव्हा काय घडेल याचा पत्ता नाही. निळूभाऊ लिमये हे समाजवादी परिवारातले. हसरे महापौर आणि क्रान्तिकारक! त्यांची माझी घरगुती ओळख होती. पूनम हॉटेल आम्हा मुलांना मोकळे होते. एकदा त्यांनी मला बोलावले आणि म्हणाले, ‘‘अरे! तू तुझ्या मित्रांना घेऊन खंडाळ्याला जा. आपल्या मयूर हॉटेलमध्ये राहा. चित्रं काढा. तुला तेथे मजा येईल.’’ झाले तसेच. पूनम हॉटेलमधून टेम्पोने खंडाळ्याला सामान जाणार होते. आम्ही टेम्पोत बसलो आणि निघालो. आता हा छोटा प्रवास मला कुठे पोहचवणार होता!

Robin Hood thief from Bihar
फक्त स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने करायचा घरफोडी; बिहारच्या ‘रॉबिन हूड’ला केरळमध्ये केलेली चोरी पडली महागात
Somalias Pirates Stock Market in Harardhere
वित्तरंजन : भांडवली बाजारच; पण कुणाचा?
chandrapur s 19 Month Old Survi Salve Enters India Book of Records
दीड वर्षाची सुरवी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या वैशिष्ट्य…
Shikhar Dhawan and Shubman Gill
 IPL 2024, GT vs PBKS: पंजाबच्या फलंदाजांचा कस! आज गुजरात टायटन्सचे आव्हान; गिल, धवनकडे लक्ष

कौलारू मयूर हॉटेल हे एका टेकडीवर होते. (आता ते ‘डय़ूक्स र्रिटीट’!) राजमाची पॉइंटच्या वाटेवर आहे ते. आम्ही तेथे पोहचलो तेव्हा ते ढगांत झोपले होते. अंगणात मोठय़ा झाडांतून पाण्याचे थेंब टपकत होते. व्हरांडय़ाच्या कोपऱ्यात ओली कुत्री उबेला पायाची मुटकुळी करून झोपली होती. सर्वत्र दमट शांतता होती. अचानक पावसाची सर यायची.. ढगांत झाडांच्या सावल्या हलायच्या.. त्यातून तिरके वारे निसटायचे.. लगेच सारे पूर्ववत व्हायचे. तेथला जुना स्वेटर घातलेला मॅनेजर आला. तो नशेतच होता. आम्हाला त्यांनी खोल्या उघडून दिल्या. उतारावरून टेम्पो पुण्याकडे निघून गेल्याचा आवाज आला. आणि सारे ठप्प झाले. आता काय करायचे? धुरकट किचनमध्ये जाऊन आम्ही चहा प्यायलो. तिथे डोक्यावर मफलर बांधलेल्या एकमेव म्हाताऱ्या बाई होत्या. त्या म्हणाल्या, ‘‘भूक लागल्यावर जेवायला या!’’

चित्रं काढणं शक्य नव्हतं. आम्ही एकमेकांकडे पाहिलं. मोडक्या छत्र्या घेऊन फिरायला बाहेर पडलो. थोडी उघाडी झाली होती.

मयूर हॉटेलच्या तीव्र उतारावरून आम्ही हमरस्त्यावर आलो. हाच मुंबई-पुण्याचा जुना महामार्ग होता. अनोळखी गावात चालायला मजा येते. समोर एक पायवाट डोंगरावर चढत गेली होती. आम्ही ती पकडली. टेकाडावर काही जुने बंगले दिसत होते. अचानक वारा यायचा आणि त्या छत्र्या उडायच्या. माझी छत्री उडत गेली. एका गेटपाशी जाऊन धडकली. मी तिला पकडली खरी; पण मी समोर पाहिले.. नाजूक विणलेल्या टोपडय़ातून हसऱ्या बाळाचा चेहरा दिसावा तसा ढगातून एक छोटे स्कॉटिश चॅपेल माझ्याकडे पाहत होते. अर्थात आम्ही थबकलो. मी म्हणालो, ‘‘चला, उद्या पहिले स्केच या चॅपेलचेच करायचे.’’ त्या पायवाटेच्या दुरून, खोलवरून आगगाडीची शिट्टी ऐकू आली. कोठेतरी रेल्वे स्टेशन असावे असा अदमास आला. त्या रस्त्यावर दोन्ही बाजूला श्रीमंतांचे, बंद फाटकांचे तुरळक बंगले होते. उजव्या बाजूला गच्च झाडी होती. खंडाळा हे टेकडय़ांचे, दऱ्यांचे उतरते गाव आहे. त्याखाली बोगदे आहेत. ब्रिटिशांनी बांधलेले टुमदार रेल्वे स्टेशन आहे याचा उलगडा तेव्हा झाला नव्हता. कोणतेही असे ठिकाण पाहिले की बालिश कल्पनांचा हव्यास सुरू होतो. तो म्हणजे- ‘साला, आपले एक घर येथे हवे!’

पण भविष्यात मी याच पायवाटेवर घर बांधणार आहे याची सुतराम कल्पना मला तेव्हा नव्हती.

नंतर कॉलेजच्या पावसाळी ट्रिप्समध्ये आम्ही तिथे यायचो. अमृतांजन पॉइंटला जायचो. हा रस्ता मयूर हॉटेलवरूनच खाली उतरत असे. खाली मोठा बोगदा पार करावा लागे. या बोगद्यात त्या अ‍ॅडोलसंट वयात गमतशीर प्रेमप्रकरणं होत असत. त्याबद्दल ‘बोगदा’ हा स्वतंत्र लेख लिहावा लागेल. एका ट्रिपमध्ये मी पाहिलं, मयूर हॉटेल पाडण्याचं काम सुरू झालं होतं. त्याच्या समोरच्या पायवाटेचा रस्ता तयार झाला होता. मी चटकन वळून त्या चॅपेलपाशी जाऊन फोटो घेत असे. रस्त्यावरच एक कॉन्व्हेंट आहे. गर्द वनात लपलेलं. पावसात फिरणं, गाणी म्हणणं, प्रेमाची हुरहुर.. ते दिवस संपले. अमृतांजन पॉइंटही आता भुईसपाट झाला. आणि कॉलेजच्या धुमाकूळ घातलेल्या दिवसांच्या खंडाळ्याच्या आठवणीही पुसट झाल्या खऱ्या. पण पावसाच्या, त्या पायवाटेवरच्या चॅपेलच्या आठवणी मात्र ताज्या राहिल्या.

केव्हा काय घडेल याचा भरवसा नाही.. आता आर्ट वर्कशॉपसाठी मी पॅरिसमध्ये होतो. आम्ही चित्रविचित्र असे पंधरा-वीस आर्टिस्ट तेथे होतो. काम संपले की समोरच्या रेस्टोमध्ये आम्ही वाईन- सँडविच आणि गप्पा मारत, टिंगलटवाळी करत सायंकाळी बसत असू. एकदा असेच बसलो असताना एक गुजराती जोडपं आत आलं. भारतीय जोडपी परदेशात वेगळीच दिसतात. विशेषत: बायका. त्या जीन्स-पॅन्ट घालतात, वर रंगीत टॉप घालतात. कॅन्व्हास शूज असतात. मंगळसूत्र वगैरे शर्टात दडलेलं असतं. आमचं ‘हाय.. हॅलो’ झालं.

आम्ही सारे चित्रकार आहोत कळल्यावर तो आपल्या हाताने हवेत चित्र काढल्याचा अभिनय करीत म्हणाला, ‘‘आप कलाकार है। खंडाळा, महाबळेश्वर में जाकर स्टुडिओ बनाना चाहिए! हमें तो कला समझती नहीं।’’ असं म्हणून तो आपल्यावरच हसला. इथे परत खंडाळा आला. मी म्हणालो, ‘‘खंडाळा में जगह कहाँ मिलती है?’’ बायकोकडे पाहत तो म्हणाला, ‘‘मेरे पास है. चाहिए क्या?’’

मी म्हटले, ‘‘भाव सांगा!’’ त्याचे म्हणणे असे- ‘‘तू जागा पाहिली नाही, आपण जागेवर भेटू!’’

मी म्हणालो, ‘‘नाही. आत्ताच सौदा करू.’’

त्याला कुठे माहीत होतं, त्याच छोटय़ा चॅपेलपाशी मी मित्राला सांगितलं होतं.. ‘साला, इथे घर पाहिजे होतं!’ शेवटी तिथेच सौदा झाला. नंतर लोणावळ्यात रजिस्ट्रेशन झालं. आणि नंतर मी माझ्या मित्राबरोबर प्रथमच प्लॉट पाह्य़ला गेलो. चॅपेलपासून चढ चढला की उजव्या बाजूला एक छोटा रस्ता लागतो, तो याच प्लॉटवर संपतो. मी पाहिले- प्लॉटचा पहिला भाग उंचावर होता. नंतर त्याचा अर्धा भाग खूप खाली रस्त्यापाशी उतरत होता. सपाट प्लॉट नसल्याने तो कोणी विकत घेत नसावा. त्यापलीकडे कॉन्व्हेंटचे जुनेपुराणे जंगल होते. कॅन्टिलिव्हर! मी मित्राला सांगितले. तसे मित्र टाळी देत म्हणाला, ‘‘चला, प्लॉटच्या दोषावर लस मिळाली! आता सेलिब्रेशन.’’ आम्ही लोणावळ्यात बीयर घेऊन परतेपर्यंत संध्याकाळ होऊन गेली होती. प्लॉटवर पोहचलो तेव्हा समोरचे दृश्य पाहून स्तब्धच झालो. समोरचं जंगल लाखो काजव्यांनी लगडलेलं होतं. त्या प्लॉटवर काजव्यांची घरंगळणारी चादर होती.

‘‘अरे, हे तर काजव्यांचं घर!’’ ती संध्याकाळ मी विसरणार नाही. मी घर बांधेन अथवा नाही, पण मी त्या सौद्यात फसलो नव्हतो.

बराच काळ लोटला. माझ्या चित्रांच्या प्रदर्शनांत, प्रवासात घर हा विषय बाजूला पडला. माझ्या कामासाठी मुंबईतलं घर छोटं पडायला लागलं. माझी मोठय़ा साइजमधील पेंटिंग्ज, लिफ्टमधून जाण्यात फार अडचणी येऊ लागल्या. मुंबईत मी कामासाठी आलो होतो, पण मुंबईत राहावं की नाही, हा गोंधळ होता. मुंबई कशीही असली तरी येथे मोटिव्हेशन मिळते. तुम्हाला ती आळशी बनवत नाही. माझ्या आठवणीतले जुने पुणे कधीच संपले होते. मध्ये राहिला तो खंडाळा. तेथे स्टुडिओ बांधण्याची कल्पना जशी पक्की झाली तसा मी भेटलो ते चंद्रशेखर कानेटकर या आर्किटेक्ट मित्राला. त्याचे आमचे लाडके नाव ‘अप्पा’! हा भारतातला जाणता आर्किटेक्ट आहे. जाणता म्हणण्याचा अर्थ हा, की प्रत्येक व्यक्तीचे राहणीमान, विचार लक्षात घेऊन तो त्याच्या घराची रचना करतो. उगीचच भपका आणत नाही. त्यामुळे त्या घरातील लोक आनंदाने नांदतात. माझे अनेक आर्किटेक्ट मित्र आहेत. पण मला घराचे हॉटेल करायचे नव्हते. अप्पा लोकेशनवर आला. हात उंच करून म्हणाला, ‘‘त्यावरती तुला स्टुडिओ पाहिजे का?’’ मी म्हणालो, ‘‘तू देशील तेथे!’’ यानंतर घर पूर्ण होईपर्यंत मी कोणतीही चर्चा केली नाही. अप्पावर माझा पूर्ण विश्वास होता, की तो मला या घरात अशा स्पेसेस देणार की मी कोठेही बसलो, उठलो, चाललो तरी ते पेंटिंगचाच भाग असेल. झाले तसेच. अप्पाने मला एक सुरेख घर दिले आहे. त्यात हवा, सूर्यप्रकाश, ढग, पाऊस मनमोकळे वावरू शकतात. थँक्स अप्पा!

घर बांधताना अडचणी येतातच. त्या काही रोमँटिक नसतात. नगरसेवक, महानगरपालिका, इलेक्ट्रीसिटीवाले अशी कुरणे असतातच. त्यापेक्षा मटेरियल, कामगार, चोऱ्या आणि शेवटी अत्यंत क्रूर म्हणजे पैसा.. जो माझा वारंवार संपत असे. मग एखादे पेंटिंग विकले की माझा इंजिनीयर देवीदासला फोन करे- ‘‘अरे, आता कौले आणा!’’ दुसऱ्या पेटिंगनंतर- ‘‘अरे! आता बाथरूम करा!’’ असे दोन-तीन वर्षे चालले. साऱ्यांच्या सहकार्याने ‘हिल टॉप’ या डायमंड र्मचट्सच्या श्रीमंत कॉलनीत एका चित्रकाराचे घर झाले खरे. त्यांच्या श्रीमंत झगमगाटातल्या घरांत माझे घर म्हणजे बाळाला नजर लागू नये म्हणून लावलेल्या इवल्याशा तिटेसारखे आहे.

पण एक लक्षात ठेवायला हवे, की असे घर म्हणजे सुंदर प्रेयसीसारखे हाय मेन्टेनन्स असते. त्यात इकडे आड, तिकडे विहीर अवस्था असते.

माझ्या प्रदर्शनासाठी मी अनेक कॅन्व्हासेस आणि रंगांचा टेम्पो घेऊन खंडाळ्याला आलो. मला तिथे महिनाभर काम करायचे होते. कामाला सुरुवात केली तसा पाऊस सुरू झाला. मजाच मजा. मी दररोज दहा तास काम करीत असे. पण पाऊस वाढत गेला. वादळ आले. माझ्या बागेतली झाडे, कुंडय़ा अक्षरश: कोलमडल्या. डेकवर हातात व्हिस्कीचा ग्लास धरत पाऊस एन्जॉय करण्यातली रोमँटिक सिच्युएशन आता हळूहळू विरघळत गेली. कोठेतरी मुख्य ट्रान्सफॉर्मर कोसळला आणि खंडाळा, लोणावळा अंधारात बुडालं. जनरेटर्स सुरू झाले. खंडित झालेला वीजप्रवाह पाऊस आणि ढगांमुळे सुरू करता येत नव्हता. शेवटी गावातले डिझेल संपले आणि आठएक दिवस मी मेणबत्त्यांमध्ये एकटय़ाने दिवसरात्र स्टुडिओत काढले. प्रचंड डिप्रेशन. दिवसाही घरभर अंधार! पावसाचे रौद्ररूप किती भयानक असते हे मी प्रथमच पाहिले. पावसाच्या कविता, चित्रे, रोमान्स याच्या लाल चिखलासारखी माझी अवस्था झाली. शेवटी मी वेडा होईन असे वाटायला लागले आणि मी गाडी काढून पुण्याकडे निघालो. वडगावच्या येथे रेघ मारून थांबवावा असा ओला रस्ता, त्यापलीकडे छान मनमोकळे ऊन पडले होते. त्या स्वच्छ प्रकाशात मी उभा राहून न्हाऊन घेतले. खंडाळ्याच्या दिशेने पाहिले- ढगांचे डोंगर उभे होते. माणसाला सर्व हवे असते. थोडा पाऊस, कोवळा प्रकाश.. सर्व बेताचे! त्यात रोमान्सही आला.

आता बदललेल्या ऋतूंशी मी ‘समझोता’ केला आहे. गेल्या अनेक वर्षांत मी तिथे स्वेटर घातलेला नाही. मी बागेत झाडे लावण्याचा प्रयत्नही सोडला. मी लावलेली मोठी झाडं,  पन्नासएक झाडं उन्मळून पडतानाचं दु:ख मला परत घ्यायचं नाही. आसपासच्या जंगलात उगवतात तशा उगवलेल्या झाडांवर मी तृप्त आहे. पूर्वी माझा मित्र जगजीत सिंगचं घर जवळच होतं. फिरायला जाताना तो आठवतो. त्याच्या गझला मनात रेंगाळतात. घरात माझ्या मित्रांनी मला भेट दिलेली गावठी दोन कुत्री आहेत. बेवारशी पिल्ले होती ती. एकाचं नाव- फज. दुसरीचं- चिक्की! मस्त राहतात. माझ्या नातवांबरोबर फिरायला जातात. फजला माकडे आवडतात. जवळच जावेद अख्तरांचे घर आहे. त्यांच्या कंपाऊंडमधल्या झाडांवर ही माकडे नेहमी बसतात. फज त्या झाडांखाली मान वर करून भुंकत असतो. किती वेळा त्याला सांगून झाले, ‘अरे फज, तुझी भाषा त्यांना कळत नाही. त्यांना फक्त शायरी कळते!’

आमच्या चिक्कीला शेजारच्या घरातल्या कोंबडय़ा आवडतात. त्यांना पकडण्यात ती दिवसभर पळत असते. माझे दोन्ही नातू पिवळ्या टेकडय़ांवर फिरायला जातात. मित्र आलेच कधी, तर फरीयाजपाशी बुवाची मिसळीचा कार्यक्रम होतोच. माझे मित्र कवलजीत सिंग, सुनील शेट्टी जवळपास आहेत. भेटीगाठीत संध्याकाळ विरते. सारं कालचक्र सुरळीत चाललंय. माझी माझ्या संग्रहातील अनेक पेंटिंग्ज, स्केचेस, डायऱ्या, पुतळे माझ्या मुलाने जपून ठेवले आहेत. म्हणजे या पावसापासून त्यांना बुरशी लागू नये म्हणून तो काळजी घेतोय खरा.

आता पाऊस, ढग, वीज यांपासून मी अलिप्त झालोय. सकाळ-संध्याकाळी माझ्या जवळच्या खंडाळा स्टेशनवर फेरफटका मारतो. लहान मुलांच्या गोष्टीतल्यासारखं हे छोटं स्टेशन आहे. ब्रिटिशकालीन. तिथे घंटा आहे. झेंडा दाखवणारा एक स्टेशन मास्तर आहे की नाही, मला ठाऊक नाही. इथे गर्दी नाही. फेरीवाले नाहीत. फारशा गाडय़ाही थांबत नाहीत. मी जातो तेव्हा एकटाच असतो. एखादी गाडी धाडधाड करत त्या स्टेशनातून शहराकडे जाते. पलीकडच्या बोगद्यात अदृश्य होईपर्यंत मी ती पाहत राहतो. माणसं किती ये-जा करतात.

हे सारं काजव्यांसारखं आहे. त्यांच्या वेळेनुसार ते येतात. माझ्या घराभोवती प्रकाशमान होत फिरतात. नाहीसे होतात. माझ्या केअर टेकरच्या फोनची वाट मी पाहत असतो. त्याला मी सांगून ठेवलं आहे, ‘काजवे आले की मला फोन कर!’

काही दिवसांपूर्वी मी भोर या गावी गेलो होतो. सुंदर गाव आहे हे. विस्तीर्ण बॅकवॉटरला सोबत घेऊन हे गाव वावरते आहे. सूर्यास्ताला आम्ही पाण्यापाशी उभे होतो. पिवळंधम्म गवत, त्यात रुतलेले काळे दगड, पाण्यात पडलेली पिवळं- ऑरेंजचं प्रतिबिंब मला माझ्या भाचीला म्हणावंसं वाटलं, ‘‘अगं, इथे सुंदर घर बांधायला हवं!’’

तो विचार मी तिथेच थांबवला आणि स्वत:चीच समजूत काढून म्हटलं, ‘‘व्वा! चला आता इथे फोटो काढू आणि भोर गावची लँडस्केप करू!’’ ती मी केलीसुद्धा. पण अशा सुंदर ठिकाणी दबा धरून बसलेल्या आतल्या मनाला सैल सोडायलाच हवं.