|| संजय किलरेस्कर

‘किलरेस्कर उद्योगसमूहा’चे संस्थापक लक्ष्मणराव किलरेस्कर यांची २० जून रोजी १५० वी जयंती आहे. त्यानिमित्ताने यंत्रांच्या विश्वात रमलेल्या या सच्च्या यांत्रिकाच्या कार्यकर्तृत्वाचे स्मरण..

‘कारखाने ही केवळ चार नित्योपयोगी वस्तू बनवणारी केंदं्र नाहीत, तर ते नव्या विचारांची, कल्पनांची आणि नव्या सामाजिक प्रवाहांची निर्मितीकेंद्रं बनायला हवेत.’ हा विचार आजपासून १०० वर्षांपूर्वीच्या काळात मनात ठेवून एका कर्मयोगी तंत्रज्ञानं यंत्रनिर्मितीच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि त्यानंतर त्यांचा वारसा चालवणाऱ्या त्यांच्या पुढच्या पिढय़ांनी सर्वागांनी उद्योग जोपासला, वाढवला. ‘किलरेस्कर उद्योगसमूह’ आज भारतातच नाही, तर संपूर्ण जगभरात ज्यामुळे नावाजला जातो, ती गुणवत्ता, तो दर्जा, ती सचोटी यांची नीव या उद्योगसमूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किलरेस्कर यांनी रचली. २० जून १८६९ हा त्यांचा जन्मदिवस! या निमित्तानं यंत्रांच्या विश्वात रमलेल्या या सच्च्या यांत्रिकाच्या व्यक्तिमत्त्वाच्या काही पलूंना उजाळा देण्याचा हा प्रयत्न!

लक्ष्मणरावांचं सारं कार्यकर्तृत्व हा एका लहान लेखाचा विषय होऊ शकत नाही, याची पूर्ण कल्पना आहे. आज शंभरी ओलांडलेल्या या उद्योगसमूहाचं स्वप्न त्यांनी पाहिलं.. तेही स्वातंत्र्यपूर्व काळात! काळाची पावलं ओळखणारा हा द्रष्टा होता. भारतीय शेतकऱ्यांच्या अस्सल गरजा त्यांनी ओळखल्या. शेतीमध्ये तांत्रिकदृष्टय़ा प्रागतिक दृष्टिकोन कसा आणता येईल, याचा अचूक विचार करून त्यांनी यंत्रं बनवली. पण त्या जोडीला त्यांनी सतत एक सामाजिक विचारही मनात ठेवला. त्यांची उद्यमशील वृती आणि प्रयोगशीलता केवळ त्यांच्या नवनव्या उपकरणांपर्यंतच मर्यादित नव्हती, तर अंधश्रद्धा, जातिभेद, अस्पृश्यता यांनी ग्रासलेल्या तेव्हाच्या समाजाला प्रागतिक विचारांच्या मार्गावर आणण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांतही ती दिसून येते.

कर्नाटकातल्या गुर्लहोसूरचं किलरेस्कर कुटुंब हे मुळातच प्रागतिक आणि काळाची पावलं ओळखून स्वत:ला त्याच्याशी सुसंगत ठेवणारं. शिक्षणाचं महत्त्व जाणणारं. मात्र, लक्ष्मणरावांनी मुंबईला आपल्या आवडत्या यंत्रकलेचं शिक्षण घेण्यासाठी जायचा निर्णय वयाच्या १५ व्या वर्षी वडिलांना सांगितला, तेव्हा त्यांना विरोध झाला नसला तरी या निर्णयाचं अगदी आनंदानं स्वागतही झालं नव्हतं. खर्चासाठी दोन रुपये पाठवता येतील, असं वडिलांनी सांगितलं आणि ते मुंबईत येऊन दाखल झाले. तेव्हा नुकत्याच सुरू झालेल्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये त्यांनी प्रवेश घेतला. लहानपणापासून चित्रकलेची आवड त्यांना होतीच. मात्र त्यांच्या डोळ्यांना रंगांची अचूक छाननी करता येत नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी चित्रकलेचं शिक्षण थांबवलं. पण या दरम्यान एक गोष्ट घडली होती; ती म्हणजे त्यांचा कल यंत्रांकडे अधिक आहे यावर शिक्कामोर्तब झालं होतं. वास्तविक यंत्रउद्योगात काही करता येईल असं शिक्षण घ्यावं, हे त्यांच्या मनात सुरुवातीपासून होतंच.

जे. जे.मधलं शिक्षण थांबलं, पण एका नवीन प्रतिष्ठित संस्थेचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले झाले. ती संस्था म्हणजे- ‘व्ही.जे.टी.आय.’! तंत्रशिक्षण देणाऱ्या या संस्थेत मेकॅनिकल ड्रॉइंग शिकवणाऱ्या शिक्षकाचं पद भरायचं आहे, असं लक्ष्मणरावांना कळलं. त्यासाठी ते प्रिन्सिपॉलना भेटले. अननुभवी वाटणाऱ्या लक्ष्मणरावांना ती नोकरी कशी द्यायची, अशी शंका त्यांच्या मनात आली. पण प्रिन्सिपॉलसाहेबांनी परीक्षा म्हणून त्यांना सांगितलेलं ड्रॉइंग अचूकपणे लक्ष्मणरावांनी सादर केलं आणि त्यांच्या मनातली शंका दूर झाली. प्रतिष्ठित संस्थेतली नोकरी, मिळणारं ३५ रुपये हे वेतन या दोन गोष्टी त्या काळचा विचार करता आयुष्य चाकोरीत जगायला अगदी पुरेशा होत्या. पण इथंच माणसाचा खरा कस लागतो.

ज्या व्यक्तीला आपला उत्कर्ष साधायची सच्ची तळमळ असते, ती व्यक्ती आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संधीचा जास्तीत जास्त उपयोग तर करून घेत असतेच; शिवाय सतत ‘आउट ऑफ द बॉक्स’ विचार करत असते. संधी कोणत्या दिशेनं आणि कशा रूपात येईल, हे माहीत नसतं. त्यामुळे सतत सजग राहून स्वत:ला अधिकाधिक ‘अपडेट’ ठेवणं हेच हातात असतं. महाराष्ट्रातल्या एका प्रथितयश उद्योगसमूहाचे संस्थापक म्हणून लक्ष्मणराव विख्यात झाले, त्या सगळ्या प्रवासात त्यांच्या आयुष्यातल्या अशा अनेक सार्थकी लागलेल्या संधी महत्त्वाच्या ठरल्या. त्यांनी व्ही.जे.टी.आय.मधल्या नोकरीमुळे कधीही चाकोरीबद्ध आयुष्य स्वीकारलं नाही. या संस्थेला जोडूनच एक वर्कशॉप होतं. अनेक यंत्रं तिथं होती. या खात्याच्या प्रमुखाशी मत्री करून लक्ष्मणरावांनी नवीन गोष्टी शिकायला सुरुवात केली. वंगणामुळे काळे होणारे हात, खराब होणारे कपडे अशा कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता त्यांनी यंत्रांच्या जगात पाऊल ठेवलं. आवड आणि कष्ट या दोन गोष्टी जुळून आल्या, की काय साध्य होत नाही! ओळखी वाढू लागल्या, नवीन कामांच्या संधी चालून येऊ लागल्या. यंत्रांची ड्रॉइंग्ज करून देता देता, चक्क एक छापखाना उभा करून देण्याचं कामही त्यांनी स्वीकारलं. नवीन यंत्रसामुग्रीच्या साहाय्यानं छपाई केली तर ती अधिक दर्जेदार होईल, हे लक्ष्मणरावांनी सिद्ध करून दाखवलं. जबाबदारी मोठी होती; पण तोवर त्यांनी स्वत:चं ज्ञान किती वाढवलं होतं, याचं हे बोलकं उदाहरण आहे.

‘किलरेस्कर ब्रदर्स’ हे नाव सुरुवातीला प्रसिद्ध झालं ते सायकलींचे विक्रेते म्हणून! सायकलीसुद्धा परदेशातून आणाव्या लागत, असा तो काळ! त्यांनी परदेशी निर्यातदार कारखान्यांशी थेट पत्रव्यवहार सुरू केला. या सायकली जोडून येत नसत. मग त्या इथं मागवून त्यांचे सुट्टे भाग जोडायचे, त्यांची दुरुस्ती सांभाळायची, प्रसंगी लोकांना ती चालवायला शिकवायची.. हे सारे उद्योग त्यांनी आपले भाऊ आणि इतर मदतनीस मित्रांच्या साहाय्यानं केले.

या कल्पक वृत्तीमुळे लक्ष्मणरावांचा जनसंग्रह प्रचंड वाढत होता. सामान्य नागरिकापासून संस्थानिकांपर्यंत त्यांचा वावर होता. औंधच्या संस्थानिकांनी त्यांना एक वेगळीच संधी दिली. औंध येथे ते बांधत असलेल्या यमाईदेवीच्या मंदिराच्या कळसाला चांदीचा मुलामा देण्याचं काम लक्ष्मणरावांनी स्वीकारलं. इलेक्ट्रो-प्लेटिंग या प्रकाराची माहिती त्यांनी करून घेतली होतीच. त्यामुळे त्यांनी हे काम यशस्वीपणे करून दिलंच; शिवाय मंदिरासमोर ७५ फूट लांब आणि ५० फूट रुंद असा भलामोठा मंडपही बांधून दिला. या कामाच्या निमित्तानं त्यांची आणि औंधच्या संस्थानिकांमधली मत्री दृढ झाली.

यानंतर ‘किलरेस्कर ब्रदर्स’चं नाव झळकलं ते लोखंडी नांगराच्या निर्मितीमुळे! इथल्या शेतकऱ्याच्या सोयीसाठी लोखंडी फाळ असणारा नांगर तयार झाला. तो शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय करण्यासाठीही सुरुवातीला कष्ट घ्यावे लागले. पण त्यानिमित्तानं शेतकऱ्यांच्या गरजा समजल्या. मग पंप्स, कडबाकापणी यंत्र, हँडपंप्स, तवे, सेन्ट्रीफ्युगल पंप्स, डिझेल इंजिन्स, कॉम्प्रेसर्स, लेथ मशिन्स.. हा प्रवास महाराष्ट्रानं पाहिलाच आहे. मानवी कष्टांना तंत्रज्ञानाची कौशल्यपूर्ण आणि सुबक जोड दिली की काम अधिक सुकर होतं, हे हा उद्योगसमूह गेली अनेक दशकं सिद्ध करत आहे. या उद्योगास सतत एक मानवी स्पर्श आहे आणि तो जाणीवपूर्वक सांभाळलाही आहे.

लक्ष्मणराव द्रष्टे होते. त्यामुळे त्यांनी जाती, धर्म, वर्ग असले भेद कधी मानले नाहीत. कोणत्याही अंधश्रद्धेला स्वत:ही थारा दिला नाही आणि आपल्या उद्योगातही कुणालाही देऊ दिला नाही. त्यांचा स्वदेशीचा आग्रह, स्वातंत्र्य चळवळीतला सहभाग, त्यांनी स्वीकारलेला खादीचा पोशाख, किलरेस्करवाडीमध्ये चालणारे चरखे हा त्यांच्यातल्या उद्यमशील यांत्रिकाचा सामाजिक चेहरा होता. ‘बिझनेस अ‍ॅण्ड पॉलिटिक्स डू नॉट मिक्स!’ या म्हणीला त्यांनी अगदी उत्तम पद्धतीनं उत्तर दिलं.

किलरेस्करवाडी वसवणं हे त्यांचं स्वप्न होतं. परदेशातली औद्योगिक गावं किंवा वसाहत ही संकल्पना त्यांना फार आवडली होती. त्यातूनच किलरेस्करवाडी उभी राहिली. या गावाची प्रगती आणि आधुनिक विचारांचा पाया नेहमी भक्कम राहील, याची त्यांनी काळजी घेतली. मग गावात त्याकाळी अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या कुणाच्या घरी लग्न लावायला भटजीनं नकार दिल्यावर आपल्याच एका माणसाकडून ते लग्न लावून घेतलं. धर्म आणि जाती यांमुळे दरी निर्माण होऊ नये हाच त्यांचा प्रयत्न असे. त्यातून त्यांच्यावर टीकाही झाली. मुहूर्त बघणं वगैरे गोष्टीही त्यांनी हद्दपार केल्या. किलरेस्करवाडीत सुरक्षारक्षक म्हणून त्यांनी चक्क औंधच्या तुरुंगातल्या दरोडेखोराची सुधारण्याच्या बोलीवर नेमणूक केली. त्याच्या मुलांचं शिक्षण सुरू केलं. नवीन विचारांची सुरुवात स्वत:पासून करायची, हा त्यांनी घालून दिलेला शिरस्ता सारा उद्योगसमूह आजही जपतोय.

आज ‘किलरेस्कर ब्रदर्स लिमिटेड’बरोबर केओईएल, केईसी, केपीसी, केएफआयएल अशा अनेक कंपन्या दर्जेदार निर्मितीसाठी प्रसिद्ध आहेत. किलरेस्कर कुटुंबाची पाचवी पिढी त्याच व्रतस्थ भूमिकेनं काम करीत आहे आणि वारसा जोपासत आहे. देश-विदेशांत अनेक ठिकाणी हा उद्योगसमूह कार्यरत आहे.

लक्ष्मणरावांचं वर्णन – ‘एका हाताने यंत्रावर काम करता करता दुसऱ्या हाताने भाकरी खाणारा उद्योगमहर्षी!’ असं केलं जातं. म्हणूनच त्यांना ‘कर्मयोगी तंत्रज्ञ’ म्हणावंसं वाटतं. भारतात यंत्रांची क्रांती आणणाऱ्या डोळस उद्योगपतींत त्यांचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं. त्यांच्या कार्याची दखल अनेक स्तरांवर घेतली गेली. पण त्यातलं मानाचं पान म्हणजे २ ऑगस्ट १९५३ रोजी सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या हस्ते त्यांना समारंभपूर्वक ‘मराठा चेम्बर्स’चं सन्माननीय सदस्यत्व देण्यात आलं. त्यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाची ही कृतज्ञतापूर्ण आठवण!

lokrang@expressindia.com