‘लोकरंग’मधील (३० जून) ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रताप आसबे यांनी घेतलेली मुलाखत ‘काँग्रेसफुटीच्या पन्नाशीपश्चात’ वाचली. प्रताप आसबे हे काँग्रेस आणि खासकरून पवारांचे चाहते आहेत. त्यामुळे पवार यांची उजवी बाजू त्यांनी मांडावी हे योग्यच आहे. मुलाखतीत प्रथमच त्यांनी पवारसाहेब यांनी बीजेपीबद्दल काय म्हटले हे सांगितले आहे. ते पवारसाहेब यांचे विधान अत्यंत जातीयवादी आहे. ते वाक्य असे- ‘जातिवाचक मी बोलत नाही, परंतु समाजातील एका विशिष्ट जातीच्या घटकांचा यास मोठा पाठिंबा राहिला आहे. त्यांच्यात एक अशी अस्वस्थता आहे की, या जातीचे म्हणून आपल्याला सर्वसामान्य लोक स्वीकारत नाहीत. म्हणून मग आपल्याला हिंदुत्वाच्या आधारावर संघटन उभे केले पाहिजे, अशी त्यांची मानसिकता आहे.’ पवारांचे हे वाक्य अत्यंत घातकी आणि जातीयवादी आहे. म्हणूनच ते चव्हाणसाहेबांच्या पासंगाला पुरू शकत नाहीत. ‘सर्वसामान्य’ याचा अर्थ ‘मराठा समाज’ का हो पवारसाहेब? याच मनोवृत्तीमुळे अनेक कर्तबगार ‘त्या’ जातीतील लोकांना केंद्रीय सरकारात काम करावे लागले. मुंबईचा सी-लिंक पवारसाहेबांनी बांधला नाही, पण नाव देताना त्यांना आठवले मुंबईत जन्मलेले राजीव गांधी. त्यांना दिसले नाहीत टिळक, आगरकर, गोखले, रानडे आणि सावरकर. आणि सोनिया गांधींच्या जवळच्यांनी तत्परतने कार्यवाही केली. साहेब, आपल्याला खूप मिळाले. आपण मोठे झालात. एकविसाव्या शतकात आपल्याकडून या वयातही हा जातीयवाद नको. भाजपला आणि मोदी यांना मानणारे फक्त ‘त्या’ जातीचेच नाहीत, ‘सर्वसामान्य’ही आहेत, हे आपल्याला निवडणुकांतून लक्षात येत असेलच. महाराष्ट्राच्या येत्या निवडणुकीत त्याच्यावर शिक्कामोर्तब होईलच.

– सुभाष चिटणीस, मुंबई</strong>

 

मन अस्वस्थ करणारे अनुभव

‘लोकरंग’मध्ये (१६ जून) ‘सत्य-असत्याच्या मागावर’ हा मेधा पाटकर यांचा लेख वाचला. या लेखमालेतून जे काही वाचण्यास मिळते, ते मन सुन्न करणारे असते. मोठमोठी भाषणे करणारे नेते, प्रत्येक गोष्टीत नियमावर बोट ठेवणारे प्रशासन, सरकारी असंवेदनशीलता याबाबतचे अनुभव मनाला अस्वस्थ करतात. या सर्व गोष्टींवर योग्य मार्गाने उत्तरे शोधून आंदोलने करणे, दावे-प्रतिदावे, अहवाल, शासकीय आकडेवारी अशा बऱ्याच गोष्टी सर्वसामान्यांना कळणे अशक्यच! त्यामागील सत्य काय असते हे ‘सत्य- असत्याच्या मागावर’सारख्या लेखातून समजते. अन्यथा या गोष्टी कुठेतरी कागदपत्रांच्या फायलींतच अडकतात; सामान्यांना त्याची माहिती मिळत नाही.

– प्र. मु. काळे, नाशिक