ग्रेटाची हाक कोण लक्षात घेतो?

‘निर्घृण कत्तल रातोरात!’ हा माधव गाडगीळ यांचा लेख (लोकरंग – २० ऑक्टोबर) पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व पटवून देणारा होता. मुंबईची शान असलेल्या आरे कॉलनीत मेट्रो कारशेडसाठी झालेल्या निर्घृण वृक्षतोडीचा प्रश्न अनेक अंगांनी गाजला तरी त्याबाबत अद्यापही उदासीनता आहे. काही बिघडलेच नाही अशा थाटात सरकारनं त्रयस्थाच्या भूमिकेतून याकडे पाहिले. माणसाने आपल्या अस्वस्थ प्रकृतीला स्वस्थ बनविण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात जाण्याऐवजी विकासाच्या नावाखाली निसर्गाला दूर लोटण्याचा हा प्रकार म्हणजे विकार आहे. निसर्ग जितका कोमल तितकाच प्रसंगी क्रूरही असतो, हे आतापर्यंत अनेक वेळा सिद्ध झाले आहे. तरीही आम्ही या परोपकारी निसर्गावर हुकमत गाजविण्याची एकही संधी सोडत नाही. निसर्ग संवर्धन व संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे पण सरकारी खुर्चीत बसल्यावर दुर्दैवाने याचा विसर पडतो. ‘निसर्ग म्हणजे आमच्यासारख्या लहान मुलांचा श्वास आहे, तो बंद करू नका’ असे काकुळतीला येऊन मोठय़ांना विनवणी करणाऱ्या स्वीडनच्या सोळा वर्षीय ग्रेटाची हाक आता सर्वाच्या कानी येणे काळाची गरज आहे; अन्यथा कळीचे फूल बनविणारा निसर्ग मानवी जीवनासाठी काटा ठरेल.

– सूर्यकांत भोसले, मुलुंड (पूर्व)

  आरे आणि मेट्रोबाबतचे दावे व वस्तुस्थिती

‘निर्घृण कत्तल रातोरात!’ हा माधव गाडगीळ यांचा लेख वाचला. हिंदू संस्कृतीचे गोडवे गाणाऱ्या व आपणच तेवढे हिंदू संस्कृतीचे रक्षणकत्रे असल्याचा आव आणणाऱ्या सरकारनं कुठलाही मागचा पुढचा विचार न करता, हिंदू संस्कृतीत रात्रीच्या वेळी झाडे तोडत नाहीत हा साधा नियम न पाळता आरेतील झाडांची निर्घृणरीत्या कत्तल केली. न्यायालय, प्रशासन व सरकार एकमेकांचे हात हातात धरून लगोलग निर्णयाची अंमलबजावणी करतात की काय असेच या प्रकरणात वाटले. एवढी तत्परता रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात दाखवली असती तर खड्डय़ांमुळे नाहक गेलेले जीव तरी वाचले असते. मराठवाडय़ात कृत्रिम पावसाचा प्रयोग करू इच्छिणारे व महाराष्ट्रात

३२ कोटी वृक्ष लागवडीचा निर्धार करणाऱ्या (प्रत्यक्षातील खरी आकडेवारी अजूनही जाहीर न करणाऱ्या) सरकारनं आरेतलं आंदोलन चिरडून टाकलं.

मेट्रोमुळे होणारं पर्यावरणीय नुकसान, बंगळुरुतील मेट्रोचा पर्यावरणावर झालेला परिणाम, मेट्रोचा खरा उपयोग किती व कोणाला होतो, हे प्रश्न तर आहेतच, तसंच ‘मेट्रो बांधताना निसर्गाची थोडी हानी झाली तरी बिघडत नाही, या दाव्याला कोणताही शास्त्रीय पुरावा उपलब्ध नाही. हा दावा म्हणजे जनतेची धादांत फसवणूक आहे.’ हे लेखकाने केलेलं विधान सर्वाच्याच डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे.

– मिलिंद यशवंत नेरलेकर, डोंबिवली (पूर्व)