काश्मिरी पंडितांचे काय?

‘लोकरंग’मधील (९ फेब्रुवारी) काश्मीर संदर्भातील लेख प्रसिद्ध झाले आहेत. हे लेख म्हणजे अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर तेथे उद्भवलेल्या परिस्थितीचे उद्गार आहेत. ते दु:खद आहेत. पण त्याचं कारण केवळ ३७० रद्द केलं गेलं, हेच आहे काय?  ‘माझे भारतीयत्व..’ लेखातील तरुण धार्मिक सौहार्दाच्या गोष्टी सांगतो. पण काश्मीरमध्ये चार लाख अल्पसंख्याक हिंदूंना जर तेथील बहुसंख्याक मुस्लिम सत्ताधाऱ्यांनी विश्वास नि संरक्षण दिले असते तर त्यांना नेसत्या वस्त्रानिशी काश्मीर सोडावे लागले नसते. ज्यांनी तेथे राहण्याचा अट्टहास केला, त्यांना ठार मारण्यात आले, त्यांची घरे, संपत्ती लुटण्यात आली, त्यांच्या मुली-बायकांना पळवण्यात आले, त्यांच्यावर बलात्कार झाले. हे सारे टळले असते तर तेथे मुस्लिमांनी धार्मिक सौहार्द राखले असे म्हणता आले असते.

या निवेदनात लष्कर नि निमलष्करी जवानांनी केलेला, छळ, अत्याचार यांचा उल्लेख आहे. मोदी किंवा कोणतेही सरकार असे आदेश देत नाहीत. तसेच दुसरा मुद्दा असा की, नेहरूंनी मोठय़ा विश्वासाने शेख अब्दुल्ला यांना काश्मीरचे मुख्यमंत्री बनविले. पण त्यांनी अनेक वेळा कोलांटउडय़ा मारल्या. शेवटी नेहरूंनी त्यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवले नि त्यांच्यावर काश्मीर प्रवेशबंदी लादली. इंदिरा गांधी यांनाही असाच अनुभव आला. फारूख अब्दुल्लांच्या काळात अतिरेक्यांच्या कारवाया वाढल्या. पण त्यांनी त्यांचा बीमोड केला नाही, हीच काश्मीरच्या आजच्या परिस्थितीला कारणीभूत ठरलेली गोष्ट आहे. शिवाय तेथे अब्दुल्ला, मुफ्ती अशा घराण्यांचे वर्चस्व व मुस्लीम बहुमत असल्यामुळे आलटूनपालटून तेच गादीवर आले. उर्वरित भारतात गांधी, पवार घराण्यांचे वर्चस्व असले तरी लोकांना पर्याय असल्याने १९८४ नंतर सातत्याने नि बहुमताने काँग्रेस पक्ष कधीही सत्तेवर आला नाही. लेह-लडाखला काश्मिरातील सत्ताधाऱ्यांनी नेहमीच दुय्यम स्थान दिले. तेथील हिंदू व बौद्धांच्या प्रगतीसाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे त्यांची प्रगती झाली नाही. त्यांच्यावर अन्याय झाला.

– श्रीधर गांगल, ठाणे</p>

‘तेव्हा’चे वास्तव?

‘लोकरंग’मधील (९ फेब्रुवारी) जम्मू आणि काश्मीर/ लडाख येथील सध्याचे वास्तव दर्शविणारे लेख प्रसिद्ध करून वाचकांना फारच मोलाची माहिती दिली आहे. तेथील जनता किती भीषण परिस्थितीत जगत आहे, हेही त्यातून दिसून येते.

परंतु माझ्यासारख्या सामान्य वाचकाला एकच छोटासा प्रश्न पडतो की, ५ ऑगस्टपूर्वी तेथील परिस्थिती (जसे की सनिकांवरील, त्यांच्या कॅम्पवरील दहशतवादी हल्ले आणि भारतप्रेमी (!) नागरिकांची जवानांवरील दगडफेक) या बाबतीत माध्यमांमध्ये एवढी चर्चा का केली गेली नाही?

– मिलिंद कुंभोजकर, सांगली</p>