News Flash

ही तर भंपक समाजाची मानसिकता!

‘लोकरंग’मधील (१० ऑगस्ट) अतुल देऊळगावकर यांचा ‘हम आपके है कौन?ची देन’ हा अप्रतिम लेख वाचला.

| August 31, 2014 01:00 am

‘लोकरंग’मधील (१० ऑगस्ट) अतुल देऊळगावकर यांचा ‘हम आपके है कौन?ची देन’ हा अप्रतिम लेख वाचला. आजच्या सामाजिक परिस्थितीचं योग्य वर्णन यात लेखकाने केलेलं असलं तरी ही परिस्थिती म्हणजे पूर्णत: ‘हआहैकौ’चीच देन आहे याविषयी साशंकता वाटते. चित्रपटादी कला जशा सामाजिक स्थितीवर प्रभाव पाडतात, तसेच तत्कालीन सामाजिक स्थितीचे प्रतिबिंबही त्या कलांमध्ये वेळोवेळी पडतच असते. १९९० नंतर जागतिकीकरणाच्या वाऱ्यामुळे जो मध्यम व उच्च मध्यमवर्ग उदयास आला, त्या वर्गाची बेगडी, भंपक मानसिकताच या परिस्थितीला कारण आहे. एकीकडे जागतिकीकरणामुळे आणि खिशात खुळखुळणाऱ्या पैशांमुळे साद घालणारा चंगळवाद आणि दुसरीकडे सामाजिक व कौटुंबिक जबाबदारीच्या नैतिकतेचे दडपण या विचित्र कोंडीत हा वर्ग चाचपडत होता. त्यामुळे एकीकडे संपत्तीसंचय करताना भ्रष्ट मार्गावर विविध तडजोडी करता करता दुसरीकडे स्वातंत्र्यदिनी, प्रजासत्ताकदिनी याला देशप्रेमाचे नैमित्तिक भरते येत होते, तर एकीकडे बायको-मुलांसह चंगळवाद जोपासत असताना दुसरीकडे राखीपौर्णिमेला बहीणप्रेमाचे, तर मातृदिनी मातृप्रेमाचे भंपक भरतेही येत होते. आजकाल फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप यासारख्या सोशल मीडियावर शेअर होत असलेल्या राष्ट्रप्रेमाच्या आणि नातेसंबंधांच्या गळेकाढू मेसेजेसमध्ये या बेगडी प्रेमाचे आणि भंपकपणाचे प्रच्छन्न प्रदर्शन दिसतेच आहे. कर  चुकवणारे व्यावसायिक, कामचुकार नोकरदार, भ्रष्ट राजकारणी, रोजच्या जीवनात सर्रास नियमबाह्य़ वर्तन करणारे असे सारेच राष्ट्रभक्तीचा डोस पाजणारे, झेंडय़ाचा सन्मान राखण्याचे आवाहन करणारे मेसेजेस बिनदिक्कत शेअर करताना दिसतात. वडिलोपार्जित संपत्तीसाठी भावाबहिणींची फसवणूक करणारे/ करू पाहणारे, आई-वडिलांना केवळ अडचण समजणारेच नातेसंबंधांतील ओलाव्याची महती गाणारे मेसेजेस हिरीरीने शेअर करतात. या तत्सम मेसेजेसमधला एक-शतांश मथितार्थ जरी शेअर करणाऱ्यांपैकी एक-शतांश लोकांनी अंगीकारला, तरी सामाजिक स्थितीमध्ये झपाटय़ाने सकारात्मक बदल दिसायला लागतील.

आठवणी ताज्या करणारा लेख
मृदुला दाढे जोशी यांनी लिहिलेल्या जयदेव यांच्या गाण्यांवर आधारित पहिल्या लेखापासून ‘रहे ना रहे हम’ हे माझे आवडते सदर आहे. त्यांनी आधीच्या लेखांमध्ये उल्लेख केलेली जवळपास सर्वच गाणी आमच्या साठीला पोहोचलेल्या पिढीला माहीत आहेत. तरीही त्या ज्या प्रकारे रसग्रहण करतात ते मार्मिक असते. संगीत आणि शायरीची जाण असल्याशिवाय हे शक्य नाही. मदनमोहन यांच्याविषयी त्यांनी लिहिलेले लेख वाचताना एक लक्षात आले, ते म्हणजे- इतर संगीतकारांच्या रचना मला शब्दांसकट पाठ होत्या; पण मदनमोहन यांच्या गाण्यांविषयी मात्र फक्त चाली आणि धृपद एवढेच माहीत होते. कारण शब्द अर्थपूर्ण आणि गंभीर असत. सहज-सोपे क्वचितच! त्यामुळेच मदनमोहन यांच्यावरील लेख फार भावला. ‘माई री..’ अनेक वर्षांपूर्वी ऐकले होते. मृदुला दाढे जोशी यांचा हा लेख वाचून ते आज पुन्हा एकदा दहा वेळा तरी हे गाणे ऐकले.
– प्रदीप भावे, ठाणे (प.)

यथार्थ वर्णन
‘रिमझिम गिरे सावन..’ हा ‘लोकरंग’मधील (३ ऑगस्ट) लेख आवडला. ‘ओ सजना, आहा रिमझिम के ये, हरियाला सावन, इक अगन बुझी, रात भी हे कुछ भीगी, प्यार हुआ, मोरे अंग लग जा, अजहू न आए बालमा, उमड घुमड, मेघा छाये आधी रात, अब के सजन, ठंडी हवा.. काली घटा..’ या मला आवडणाऱ्या काही हिंदी चित्रपटगीतांत पावसाचं आणि पावसाळी वातावरणाचं यथार्थ वर्णन आलंय असं वाटतं. जर व्यक्ती संवेदनशील असेल आणि निसर्गप्रिय असेल, प्रेमाचं मूल्य ज्यांना ठाऊक असेल, त्यांनाच अशा प्रकारे व्यक्त होणं शक्य होतं. लेखिकेने आयुष्याच्या अशा विविध पैलूंवरील गाण्यांसंदर्भात असंच लिहीत राहावं.
– अ‍ॅड. प्रशांत पंचाक्षरी

अप्रतिम लेख
‘रिमझिम गिरे सावन’ हा सुंदर लेख लिहिल्याबद्दल (‘संगीतबद्ध’ केल्याबद्दल असं म्हणणं रास्त ठरेल!) आभार. मृदुला दाढे जोशी यांच्या सदरातील सर्वच लेख वाचनीय असतात. पावसाळी गाण्यांवर बेतलेला हा लेखही अप्रतिम होता.
– के. आर. वैशंपायन, नागपूर

संवेदनशील लेखन
काही हिंदी गाणी, त्यांचे शब्द, संगीत आठवलं की अनेकदा गळा दाटून येतो. काही गाण्यांबाबत तर आपण खूपच संवेदनशील असतो. आणि मृदुला दाढे जोशी ज्या पद्धतीने हिंदी चित्रपटांतील गाण्यांवर लिहितात, ते वाचून अधिकच हळवं व्हायला होतं.
– विजय प्रधान

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2014 1:00 am

Web Title: loksatta lokrang response 2
Next Stories
1 आसबेकृत तर्काची ऐशीतैशी!
2 जत्रेतील आरसे
3 विचार करायला लावणारा लेख
Just Now!
X