‘महेश एलकुंचवार’ या भारदस्त नावाभोवतीचं गूढ, आदराचं वलय यापासून ‘महेशदा’ या संबोधनापर्यंत येऊन पोहोचलेला माझा प्रवास तब्बल ३३ वर्षांचा आहे. पूर्वी अजिबात परिचय नसलेल्या त्यांच्याशी आता मात्र माझे ऋणानुबंध निर्माण झाले आहेत.  सुरुवातीला एखाद्या लाँगशॉटमध्ये अंधूक, धूसर दिसणारे महेशदा आता मला ‘टाइट क्लोज अप’मध्ये दिसतात. त्यांची लिहिण्याची, बोलण्याची, वागण्याची एक स्वतंत्र ‘एलकुंचवारी’ शैली आहे, त्यांचा निराळा थाट आहे.. असं हे व्यक्तिमत्त्व मला कसं भेटत-कळत गेलं, त्याचा हा फ्लॅशबॅक-
सन १९८१ : राज्यनाटय़ स्पध्रेतल्या विजेत्या रंगकर्मीसाठी पुण्यात एका महिन्याचं निवासी नाटय़शिबिर भरत नाटय़ मंदिरात झालं. त्यात मी शिबिरार्थी होतो. पूर्वतयारी म्हणून मी काही महत्त्वाच्या नाटककारांची नाटकं वाचून गेलो. शिबिरामध्ये महेशदांच्या नाटकांवर चर्चा करताना ‘तुमच्यापकी कुणी त्यांचं नाटक वाचलंय?’ असा प्रश्न विचारल्यावर मी मोठय़ा अभिमानानं त्या वेळी हात वर केला होता, कारण मी ‘होळी’, ‘सुलतान’, ‘वासनाकांड’, ‘रक्तपुष्प’ वाचलेलं होतं. ही पुस्तकं मला अजित दळवींनी दिली होती.
सन १९८४ : औरंगाबादमध्ये आमची ‘जिगीषा’ नाटय़संस्था एका झपाटलेल्या अवस्थेत नाटय़क्षेत्रात काम करीत होती. नवनवी नाटकं करण्याची आमची ऊर्मी होती. स्पध्रेशिवाय दरवर्षी एक नाटय़महोत्सव आम्ही करीत असू, संस्थेतल्या नटांना प्रशिक्षण मिळेल, सगळ्यांच्याच कक्षा रुंदावतील हा हेतू. मी धाडस करून एलकुंचवारांना पत्रं लिहिलं. संस्थेची ओळख दिली आणि आपलं ‘गाबरे’ नाटक करण्याची कृपया परवानगी द्यावी अशी विनंती केली.
कठोर शब्दात महेशदांचं नकाराचं उत्तर आलं- ‘मी माझं ते नाटक नाकारतो आणि आता कुणालाही त्याचा प्रयोग करण्याची परवानगी देऊ इच्छित नाही!’ अशा स्वच्छ, स्पष्ट शब्दांत नकार होता. त्यातला ठामपणा त्यांच्या रेखीव, मोठय़ा सुबक अक्षरातही दिसत होता. आम्ही नाराज झालो, थोडे रागावलोही- ‘याला काय अर्थ आहे? नाटक म्हणूनच हे लिहिलं, त्याचे प्रयोग झाले आणि आता नवी पिढी ते करू पाहतेय आणि हे नकार देताहेत?’ करूया परवानगीशिवाय प्रयोग! अशाही चर्चा झाल्या. त्यात तरुण रंगकर्मीच्या आवेशाचा भाग जास्त होता. अर्थात लेखकाच्या परवानगीशिवाय प्रयोग करण्याचा गुन्हा आम्ही केला नाहीच.
सन १९८५ : औरंगाबाद हे राज्य नाटय़स्पध्रेचं एक जिवंत केंद्र होतं. त्या काळात पाहिलेले अनेक प्रायोगिक नाटकांचे उत्कट प्रयोग कायमचे स्मरणात आहेत. भुसावळच्या राजू तळेगावकरनं सादर केलेलं एलकुंचवारांचं ‘रुद्रवर्षां’ ठळक आठवतंय. ‘यातनाघर’चा एक प्रयोगही अंधूकसा आठवतोय. (बहुधा जयश्री गोडसे आणि ज्ञानदा कुलकर्णी या अभिनेत्री असाव्यात.)
सन १९८५-८६ : अखेर या ‘गूढ’ व्यक्तिमत्त्वाला प्रत्यक्ष भेटण्याचा योग पुण्यात आला. ‘थिएटर अ‍ॅकॅडमी’च्या नाटककार कार्यशाळेत मी पत्रकार आणि रंगकर्मी या दुहेरी नात्यानं उपस्थित होतो. या निमित्तानं पूर्वसंध्येला महेशदांचं एक व्याख्यान टिळक स्मारक मंदिरात होतं. त्या दिवशी अत्यंत खणखणीत, टोकदार शब्दात ‘फोकाची फोडणी’ देणाऱ्या आणि ‘वास्तववादा’ला नाकं मुरडणाऱ्या काही नाटकवाल्यांवर महेशदा तुटून पडले होते.
याच कार्यशाळेत मी महेशदांशी प्रत्यक्ष बोललो. सावळं, उंच, तीक्ष्ण, तरतरीत व्यक्तिमत्त्व! काळा पोलोनेक टीशर्ट आणि जीन्स अशी वेशभूषा.. अक्षरश: ‘हिरो’च दिसत होते ते! खूप मनमोकळं बोलले. मी ‘गाबरे’चा संदर्भही दिला तेव्हा ते अत्यंत मायेनं म्हणाले, ‘‘अरे, खरंच मी ते नाटक लिहिताना ‘आता टाकतोच महाराष्ट्रावर बॉम्ब’ अशा आविर्भावात लिहिलं होतं! पण बदलत्या जाणिवांबरोबर आज ते मला वाचवत नाही म्हणून मी त्याची परवानगी देत नाही.’’ (अर्थात पुढे ही भूमिका बदलून त्यांनी ‘गाबरे’ करण्याची परवानगी का दिली, हेही एक कोडंच आहे!)
सन १९८६-८७ : ‘कलावैभव’ निर्मित, विजया मेहता दिग्दíशत ‘वाडा चिरेबंदी’चा प्रयोग मुंबईत पाहिला आणि माझ्या नाटय़जाणिवेलाच एक निराळी अनुभूती मिळाली. इतर प्रेक्षकांसाठी तो केवळ एक अप्रतिम नाटय़प्रयोग असेल, माझ्यासाठी मात्र तो पूर्वस्मृतींचा एकेक दरवाजा उघडत आत-आत जाण्याचा अनुभव होता. त्यातले अनेक उत्कट क्षण मी आजवर फक्त माझेच समजत होतो. त्यामुळं ‘फिक्शन’ आणि ‘रिअ‍ॅलिटी’चं ते बेमालूम मिश्रण मला थेट भिडलं आणि त्याक्षणी माझं महेशदांशी एक आतलं, आतडय़ाचं नातं निर्माण झालं. नाटकातली कंपोझिशन्स, हालचाली, तो पडका वाडा, ती ओसरी, ते नातेसंबंध, ती संदिग्धता, तो अंधार मला हादरवून टाकत होता. विदर्भातल्या एका नाटककारानं मला मराठवाडय़ातला अनेक घरांमधल्या अवकाशात चक्क फिरवून आणलं त्या दिवशी. मी माझ्या जन्मगावी ‘हमदापूर’ला, आजोळी ‘धामणगाव’ला, माझ्या मावशीच्या गावी ‘कोठय़ाळ्या’ला, कुठल्याशा लग्नाला गेलेल्या ‘पोखरी’ला अशा अनेक गावी प्रवास करून आलो, त्या दोन तासांत. मी त्या दिवशी नाटय़गृहात नव्हतोच, स्वत: त्या रंगमंचावरच्या वाडय़ात या खोलीतून त्या खोलीत फिरत, वावरत होतो. ते ‘नाटक’ माझ्या मनाच्या ‘वाडय़ात’ कायमचं वसलं.
सन १९८९-९० : मुंबईला आल्यावर मी संगीत नाटक अकादमीच्या तरुण दिग्दर्शक प्रकल्पात, ‘इप्टा’ नाटय़संस्थेतर्फे प्रशांत दळवी लिखित ‘दगड का माती?’चा प्रयोग दिग्दíशत केला. जयपूरला झालेल्या महोत्सवात महेशदा निरीक्षक होते. प्रयोग त्यांना मनापासून आवडला आणि त्यांनी हे नाटक दिल्लीपर्यंत पोहोचवलं. ‘चारचौघी’ नंतरही त्यांच्याशी खूप चांगला संवाद झाला. दरम्यान मुंबईला दुबेजींचं ‘प्रतिबिंब’, प्रतिमा कुलकर्णीचं ‘आत्मकथा’ही पाहिलं. विशेषत: ‘आत्मकथा’मधलं ‘शेवटी यश यश म्हणजे काय? समकालीनांनी दिवे ओवाळणं!’ हा मार्मिक संवाद आजही आठवतोय. त्यानंतर ते भेटतच राहिले.. कधी डॉक्टर लागूंच्या घरी, विजय तेंडुलकरांच्या घरी, सतीश आळेकर, शांता गोखले, पुष्पा भावेंबरोबर अनेक वेळा..
सन १९९२-९३ : आणि मग अचानक एके दिवशी दीपा श्रीराम यांचा फोन आला. ‘आज दुपारी घरी ये बांद्रय़ाला. महेश आज नाटक वाचणार आहे!’ माझ्यासाठी तर ती एक पर्वणीच होती. गेलो नाटक ऐकायला.
नाटय़क्षेत्रातली मोजकीच मंडळी होती. ‘महेशदां’नी नाटक वाचलं- ‘मग्न तळ्याकाठी’! ‘वाडा चिरेबंदी’चा दुसरा भाग. तीच पात्रं पण १० वर्षांनंतरची. बदललेलं धरणगाव, बदललेला वाडा.. पालटलेलं गाव.. उलटसुलट झालेलं, ‘मूल्य’ बिघडलेलं पर्यावरण.. घाण झालेलं तळं आणि अधिक गुंतागुंतीचे झालेले नातेसंबंध असा आवाका असलेलं नाटक – ‘मग्न तळ्याकाठी!’
‘वाडा चिरेबंदी’ तर मी कितीदा वाचलं होतं, त्याला अंतच नाही आणि आता त्याच्या पुढचा भाग! मी डोळे मोठे करून आणि कानात प्राण आणून नाटक ऐकत होतो. महेशदांच्या आवाजानं पात्रं जिवंत झाली आणि चक्क मला ते नाटक प्रत्यक्ष घडताना ‘दिसायलाच’ लागलं. काही तरी ‘जादू’ केल्यासारखा मी झपाटून गेलो होतो. नाटक वाचून संपलं. सगळ्यांनाच ते आवडलं. काही भागांचं पुनल्रेखन करणार असं महेशदांनी स्वत:च सांगून टाकल्यामुळं तसे काही प्रश्न उपस्थित झालेच नाहीत. फक्त त्यांचं एक वाक्य माझ्या आजही लक्षात आहे-     
‘माझी एकच अट असणार आहे. जो कुणी हे नाटक दिग्दíशत करेल त्यानं भाग एक आणि भाग दोन सलग सादर केले पाहिजेत!’ मला नाटक प्रचंड आवडलं होतं. पण एक मन असंही सांगत होतं की आपसूकच त्या नाटकावर विजयाबाईंचा हक्क असणार! ‘पण काय अफलातून अनुभव मिळेल जर आपल्याला हे नाटक बसवायला मिळालं तर?’ हा विचार कितीही दाबून टाकला तरी सारखा वर येत होताच. त्या दिवशी मी इच्छाही व्यक्त करण्याचा प्रश्नच नव्हता किंवा ‘बाई कधी करणार हे नाटक?’ असं विचारून शक्यता खोदण्याचं धाडसही तेव्हा माझ्याजवळ नव्हतं. घरी गेलो, पण काहीच सुचत नव्हतं. दुसऱ्या दिवशी दीपाताईंना फोन केला- ‘मला १५ मिनिटं भेटायचंच महेशदांना.’
त्या म्हणाल्या, ‘ये नं, महेश आहे आमच्याकडेच.’ मी पोहोचलो. महेशदा आणि मी डॉक्टरांच्या स्टडीमध्ये जाऊन बसलो. मी म्हणालो- ‘मला खूप आवडेल हे नाटक करायला.’ ते म्हणाले, ‘का करावंसं वाटतंय तुला हे नाटक?’ ‘वाडा’ या नाटकाशी असलेलं माझं वेगळं नातं मी त्यांना सांगितलं. त्यांनी सलग दोन भाग करण्याचा पुनरुच्चार केला. त्यालाही मी होकार दिला. (कशाच्या जोरावर दिला, माहीत नाही.) हे दोन भाग सादर करणं हे माझं ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असेल असं मी आत्मविश्वासानं म्हणालो.
पण नाटक कोणत्या संस्थेबरोबर करणार? त्या सहा तासांच्या नाटकाचा मेळ कसा बसवणार? कोण नट माझ्याबरोबर काम करणार? या प्रश्नांना त्या दिवशी माझ्याही जवळ काहीच उत्तर नव्हतं. फक्त ‘मनापासूनची इच्छा’ एवढं एकच सूत्र मला ठाऊक होतं. महेशदांनी मला होकार दिला, पण याविषयी वेळोवेळी संपर्क आणि संवाद ठेवण्याची अट घालून. मी कामाला लागलो. पण हळूहळू लक्षात यायला लागलं हे अवघड काम आहे. मोठं प्रोजेक्ट आहे. वेळ, पसा, इन्फ्रास्ट्रक्चर, व्यवस्थापन, तंत्रज्ञांची फौज, उत्तम नटांचं असणं, सगळंच गुंतागुंतीचं आहे. या संदर्भात मला सतीश आळेकर, शांता गोखले या दोघांनी खूप मदत केली. एक नाटककार दुसऱ्या नाटककाराचं नाटक होण्यासाठी प्रयत्न करतोय हे चित्र माझ्यासाठी खूप प्रेरणादायी होतं. पण मध्येच खूप निराश वाटायचं, होणार नाही हे आपल्या हातून असं वाटून खचून जायला व्हायचं.. एके दिवशी तेंडुलकरांच्या घरी महेशदा आणि मी त्यांच्याशी बोलत होतो. माझ्या एका नाटकावर चर्चा सुरू होती. अचानक ‘वाडा’चा विषय निघाला. तेंडुलकर अगदी सहज म्हणाले, ‘तुला एवढं मनापासून वाटतंय तर ‘आविष्कार’तर्फे कर तू. मी बोलतो सुलभा आणि अरुणशी.’ माझा विश्वासच बसत नव्हता. ज्यासाठी मी एवढा धडपडत होतो, तळमळत होतो ते अवघड प्रोजेक्ट तेंडुलकरांनी इतकं सोपं करून टाकलं. दरम्यान मी काही नटांशी बोलणं सुरू केलं होतं. पण आता माझ्याकडे ठोस सांगण्यासारखं होतं, की ‘मी ‘आविष्कार’ तर्फे करतोय हे नाटक.’ अतिशय ताकदीची नटमंडळी माझ्यावर विश्वास ठेवून या नाटकात आनंदानं सामील झाली, तेही विनामानधन! आज २०१४ मध्ये हे जवळपास अशक्य वाटेल किंवा ‘दंतकथा’ तरी.. पण असं झालं खरं! सुलभा देशपांडे, दीपा श्रीराम, प्रशांत सुभेदार, दिलीप कुलकर्णी, वंदना गुप्ते, मीनल परांजपे, नंदू माधव, आसावरी घोटीकर, पद्माकर ओझे, शरयू भोपटकर, अतिषा नाईक, हेमंत प्रभू, संज्योत वैद्य, सचिन खेडेकर, किशोर कदम, सुषमा बक्षी, प्रतिमा जोशी असा नटसंच होता. काही स्टार, कुणी हौशी, काही व्यावसायिक रंगभूमीवर बिझी असलेले.. पण पहिल्या सलग वाचनानंतर सगळ्यांचाच जीव बसला या नाटकावर आणि मग सगळ्यांनी तब्बल ९० दिवस तालमीसाठी विनातक्रार वेळ दिला.
माझा प्रतिभासंपन्न नेपथ्यकार मित्र प्रदीप मुळ्ये यानं अत्यंत कल्पक नेपथ्य केलं तर संगीताला तयार झाला आज आपल्यात नसलेला प्रयोगशील संगीतकार आनंद मोडक! या सगळ्यांची मोट बांधायला सज्ज झाले सूत्रधार अरुण काकडे.
सन १९९४-९५ : मी अतिशय मन लावून ‘वाडा चिरेबंदी’ आणि ‘मग्न तळ्याकाठी’ अशा दोन भागांवर काम करत होतो. नेटकं वेळापत्रक तयार करत असतानाच महेशदांनी आणखी एक बॉम्ब टाकला- ‘मी तिसरा भाग लिहितोय- युगान्त!’.. सगळेच चक्रावलो आम्ही.. विशेषत: मी.. कारण हे वेगळं, नवं आव्हान होतं आमच्या सगळ्यांसमोर.. भारतीय रंगभूमीवरची पहिली अनोखी सलग आठ तासांची ‘नाटय़त्रयी’ आकार घेऊ पाहात होती. ‘युगान्त’ वाचलं आणि जाणवलं, हा नाटककार काही वेगळं मांडू इच्छितोय. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळाला एकाच वेळी कवेत घेतोय. मला ही ‘नाटय़त्रयी’ अतिशय महत्त्वाची वाटली. ज्यात साहित्याची खोली आहे, कवितेची तरलता आहे आणि नाटकाचा अवकाश आहे. ही ‘नाटय़त्रयी’ म्हणजे ‘सोस’ नाही तर ते अभिव्यक्तीचं अपरिहार्य ‘नाटय़रूप’ वाटलं आणि मी तिन्ही भागांचं आव्हान स्वीकारायचं ठरवलं!
फीं’्र२े-र४११ीं’्र२ेचं हे मिश्रण या नाटय़त्रयीतून प्रेक्षकांवर लादलं जात नाही तर त्यांच्या साक्षीनं हा सलग नाटय़ानुभव आकार घेत जातो. त्यात मुळांकडचा प्रवास आहे, नवता आणि परंपरेचं मिश्रण आहे, पात्रांचं नसíगक प्रोग्रेशन आहे, भारतीय तत्त्वज्ञानाचा परामर्ष आहे. ४० वर्षांत बदललेल्या महाराष्ट्राचा हा जणू सांस्कृतिक, सामाजिक आलेख आहे.
सुरुवातीला ‘कोण पाहायला येईल एवढं मोठं नाटक?’ अशा निर्माण झालेल्या प्रश्नापासून, महाराष्ट्रातल्या रंगभूमीवरचा एक महत्त्वाचा प्रयोग म्हणून नोंद होईपर्यंतचा हा एक अतिशय अनुभवसंपन्न असा आम्हा सगळ्यांचा नाटय़प्रवास होता! या नाटकाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, दिल्ली असे सर्वत्र तुडुंब प्रतिसादात ३५ प्रयोग झाले. (खरं तर तीन भाग धरून १०५ प्रयोग) ही ‘नाटय़त्रयी’ एकापेक्षा अधिक वेळा पाहिलेले प्रेक्षक आजही त्याची आठवण काढतात. त्यात नाटक आवडणारे आहेत, अभ्यासू रंगकर्मी आहेत, टीकाकार आहेत. हा अवघड प्रकल्प पेलण्याचं खूप मोठं श्रेय ‘आविष्कार’ला, यात सहभागी असलेल्या प्रत्येकाला जातं. ‘आविष्कार’ला झालेला प्रचंड आíथक बोजा उतरवायला विशेष मदत करणाऱ्या नाना पाटेकरांचंही ऋण व्यक्त करायलाच हवं.
सलग आठ तासांच्या या नाटकाच्या उभारणीत दिग्दर्शन विभागात माझ्याबरोबर होते विजय कुलकर्णी, विश्वास सोहोनी, प्रतिमा जोशी. तर निर्मिती प्रक्रियेत श्रीपाद पद्माकर, राजू गाडेकर, सीताराम कुंभारमामा यांचंही पाठबळ मोलाचं. काकडे काकांसाठी तर ही एक लढाईच होती. आज अभिमानानं म्हणता येईल की ही लढाई आम्ही सगळ्यांनी मिळून जिंकली! एकूणच १९९४-९५ हे वर्ष आणि ‘नाटय़त्रयी’चा अनुभव ही माझ्या आयुष्यातली एक महत्त्वाची ठेव आहे.
सन २०१० : ‘आविष्कार’नं महेश एलकुंचवार ‘नाटय़महोत्सव’ करायचं ठरवलं तेव्हा मला, सचिन खेडेकरला, किशोर कदमला असं मनापासून वाटलं की, या महोत्सवात ‘वाडा’च्या निमित्तानं विशेष नातं निर्माण झालेल्यांसाठी आपण काहीतरी करावं. या दरम्यान एक मोठा बदल झाला होता. महेशदा आता ललित लेखनाकडे वळले होते, त्यात रमले आणि त्याचंच फलित म्हणजे अप्रतिम असं ‘मौनराग’. हे पुस्तक वाचून झाल्यावर वाचकाला एक मोठं दडपण येतं ते लेखकाच्या विद्वत्तेचं.. त्यांनी केलेल्या सखोल चिंतनाचं.. आणि तरीही ते प्रचंड ओघवतं आहे.. शब्द, प्रतिमा, आठवणी, विचार, चिंतन, अन्वयार्थ अशा घटकांनी युक्त असं ते आत्मपरलेखन तुम्हाला प्रगल्भ करून सोडतं. साहित्य, संगीत, शिल्प, इतिहास, तत्त्वज्ञान असा त्याचा व्यापक आवाका आहे. एखाद्या मानववंशशास्त्रज्ञानं अनुभवांची मांडणी करावी असं त्याचं संदर्भासहित स्पष्टीकरण आहे.
‘मौनराग’लाच नाटय़रूप दिलं तर, असं माझ्या मनात आलं आणि साहित्य ते नाटक असा नवा प्रवास सुरू झाला. सचिन खेडेकर, किशोर कदम, राहुल रानडे, रवि-रसिक या सगळ्यांच्या मदतीनं मी अभिवाचन आणि सादरीकरण असा अनोखा प्रयोग उभा करू शकलो. सचिन खेडेकर अतिशय निष्ठेनं ‘मौनराग’साठी आपला व्यस्त वेळ देतो आणि अर्थातच अरुण काकडे काका त्याचा पाठपुरावा आजही न कंटाळता करतात. दोन-तीन प्रयोगांनंतरच किशोर कदम जरा जास्त व्यस्त होत गेला आणि मग मी अभिवाचन करू लागलो. तीन-चार वर्षांत जवळपास ४०-४२ प्रयोगांपर्यंत येऊन आम्ही पोहोचलोय. ‘जातस्यहि ध्रुवो मृत्यू:’ या लेखाचं मी अभिवाचन करतो आणि ‘गहकूटं विसङ्गितम्’ हा लेख सचिन सादर करतो- एकटा सलग ४५ मिनिटं.
प्रयोगागणिक आम्ही ‘मौनराग’मध्ये अधिक गुंतत चाललोय, नवनवे अर्थ सापडतायत. दर्दी, अभ्यासू रसिकांची मिळणारी दाद तर खूप समाधान देऊन जाते. ‘मौनराग’चा प्रयोग पाहून अत्यंत भारावलेल्या अवस्थेत मोठमोठे मान्यवर महेशदांशी फोनवर बोलतात. नंतर त्यांचा आम्हाला येणारा फोन फार सुखावह असतो..
फ्लॅशबॅक संपवून आज २०१४ मध्ये.. :
आधुनिक भारतीय रंगभूमीवरच्या महत्त्वाच्या नाटककारांपकी एक असलेल्या महेश एलकुंचवार या नावाशी घडत गेलेली ही अशी ओळख.. मानाचे सर्व पुरस्कार त्यांना कधीच प्राप्त झाले. अनेक भाषांमध्ये त्यांची नाटकं जगभर पोहोचलीयत. रंगकर्मीच्या चारही पिढय़ांमध्ये त्यांचं नाव अत्यंत आदरानं घेतलं जातं. आज त्यांच्याकडे पाहताना ते पंचाहत्तरी पूर्ण करताहेत असं अजिबात वाटत नाही. नागपूरचा त्यांचा आजचा ‘दिनक्रम’ हा अनेकांच्या आश्चर्याचा विषय आहे. शरीर सुदृढ ठेवणं, वाचन, चिंतन, लेखन आणि ग्लोबली कनेक्ट राहणं हे त्यांचं अलीकडचं रुटीन. पूर्वी थोडे एकटे एकटे राहणारे महेशदा हल्ली नागपूरच्या सांस्कृतिक वर्तुळातही वावरताना दिसतात. स्नेही मंडळी आणि नातेवाईक त्यांची वास्तपुस्त अगदी चोख ठेवतात. ‘आता माझं कुणी उरलं नाही मुंबई-पुण्यात’, असं ते हल्ली वारंवार म्हणत असले तरी अनेकांमध्ये त्यांचं आतडं गुंतलेलं आहे. अशा महेशदांशी माझा संवाद आहे, मी त्यांच्या निकटच्या वर्तुळात आहे असं ‘मराठवाडी’ पद्धतीनं मी हक्कानं म्हणतो खरा, पण खरंच त्यांच्या जवळचा आहे की नाही हे फक्त त्यांनाच ठाऊक!
अलीकडेच कळलं ते एक नवं नाटक लिहितायत.
महेशदा, आम्हा सगळ्या रंगकर्मीतर्फे पंचाहत्तरीच्या खूप खूप शुभेच्छा! वाचूया लवकरच तुमचं नवं नाटक!