‘वाङ्मयशोभा’ हे साहित्यविषयक मासिक अव्याहतपणे एकहाती चालविणारे मनोहर महादेव केळकर यांची अलीकडेच (मार्च २०१३) जन्मशताब्दी झाली. मराठी साहित्यात नवनवे लेखक आणि त्यांचं कसदार लेखन आणण्यासाठी धडपडणाऱ्या केळकरांच्या या मोलाच्या कामगिरीची त्याचप्रमाणे ‘वाङ्मयशोभा’च्या त्यातील योगदानाची यानिमित्ताने मराठी सारस्वताने दखल घेणं गरजेचं होतं. परंतु तशी ती घेतली गेली नाही. आज साहित्यविषयक मराठी नियतकालिकांचं जे दुर्भिक्ष्य जाणवतंय, त्या पाश्र्वभूमीवर साहित्य क्षेत्रात अखंड ५५ वष्रे चाललेल्या ‘वाङ्मयशोभा’ने दर्जेदार साहित्य व लेखकांची निर्माण केलेली परंपरा खचितच लक्षणीय होय.
‘जे गवसले, ते दावावे। जे सुचले, ते सांगावे।  
सुगंधित ते आदरावे । बकुल वा प्राजक्त॥’
या वृत्तीने ‘वाङ्मयशोभा’ हे मराठीतील मासिक अव्याहतपणाने एकहाती चालवणारे मनोहर महादेव केळकर यांची मार्च २०१३ मध्ये जन्मशताब्दी झाली. मराठी नियतकालिकांच्या क्षेत्रात अखंड ५५ वष्रे चालणाऱ्या ‘वाङ्मयशोभा’ने दर्जेदार साहित्याची व लेखकांची परंपराच निर्माण केली होती. वाङ्मयशोभाच्या आधी सुरू झालेले ‘किर्लोस्कर’ आणि आगेमागे सुरू झालेली ‘हंस’, ‘वसंत’ ही मासिके जरी आपला लौकिक वाढवत असली, तरी वाङ्मयशोभाने साहित्यिक जगतात स्वत:चे स्थान निर्माण केले होते ते केळकरांनी लेखकांशी जपलेल्या नात्यामुळेच! कोणताही भक्कम आíथक आधार नसताना केळकरांनी ‘वाङ्मयशोभा’ चालवले ते फक्त आत्मविश्वास, जिद्द आणि पाठीशी असलेला साहित्यिक वारसा यांच्या जोरावरच. म्हणूनच शंकरराव किलरेस्करांसारख्या उद्योगपती- संपादकांनी एकटय़ाच्या बळावर ही मजल गाठल्याबद्दल केळकरांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली होती.
१९३७ साली ‘मनोहर ग्रंथमाला’ नावाने प्रकाशन व्यवसाय सुरू केलेल्या केळकरांनी पु. रा. भिडे, तात्या ढमढेरे आणि गं. भा. निरंतर या मित्रांच्या साहाय्याने ‘वाङ्मयशोभा’ सुरू केले. पु. रा. भिडे (स्वामी विज्ञानानंद) आणि म. म. केळकर संपादक असलेल्या वाङ्मयशोभाचे जनकत्व एक-दोन अंकांनंतर लगेचच केळकरांकडे आले ते अखेपर्यंत! आणि मग मात्र केळकर आणि ‘वाङ्मयशोभा’ यांचा साहित्यिक प्रवास सुरू झाला तो एकमेकांच्या हातात हात घालूनच. अगदी सुरुवातीच्या काळात चुलते साहित्यसम्राट न. चिं. केळकर, प्रा. द. के. केळकर, आई गिरीजाबाई केळकर या घरच्याच साहित्यिकांचे लेखनसहाय्य केळकरांना लाभले. पण या सगळ्यांच्या बरोबरीने वाङ्मयशोभाला अनेक मोठे आणि नामवंत लेखकही लाभले आणि मग सुरू झालेला वाङ्मयशोभाचा साहित्यिक प्रवास कायमचाच मराठी वाचकांच्या मनावर आरूढ झाला. केळकर कुटुंबीय सोडून वाङ्मयशोभाला जे मोठे लेखक सुरुवातीच्या काळात लाभले, त्यांत ना. सी. फडके, श्री. म. माटे, गं. भा. निरंतर, वामन मल्हार जोशी यांसारख्या अनेक नामवंतांचा समावेश होता. यातील फडके-माटे यांनी वाङ्मयशोभासाठी अनेक उत्तमोत्तम कथा, लेख लिहिले. तसेच वि. स. खांडेकर, पु. भा. भावे हेही वाङ्मयशोभाचे लेखक. पण त्यातही भाव्यांशी केळकरांचे लेखकापेक्षाही मत्रीचे नाते अधिक जुळले. सभा-संमेलने, साहित्यिक वर्तुळे यांच्यापासून दूर असणाऱ्या केळकरांचा स्वभाव मात्र माणसे जोडण्याचा होता. त्यामुळेच त्यांचा अनेक साहित्यिकांशी संबंध आला. नव्या, उदयोन्मुख साहित्यिकांना प्रोत्साहन द्यायचे, त्यांना पत्रे लिहून त्यांच्याशी वैचारिक देवाणघेवाण करायची, हा केळकरांचा परिपाठ. त्यातूनच शं. ना. नवरे, स. गं. मालशे, वसुंधरा पटवर्धन, मधु मंगेश कर्णिक, सदानंद रेगे यांसारखे लेखक हे मित्र म्हणून जोडले गेले. सदानंद रेग्यांबरोबर एकदा घरी आलेल्या मंगेश पाडगावकरांकडे केळकरांनी लेखाची मागणी केली असता पाडगावकरांनी लेख पाठविण्याची हमी एका कवितारूपी पत्राने दिली-
‘जाहीर करतो तारीख आठ
त्या दिवशी मम निबंध येईल
नाहीतर कवि शब्दाखातर
दाढी आपुली काढुनि देईल’
जी. ए. कुलकर्णी हे वाङ्मयशोभाचे आणखी एक लेखक. जी. एं.चा आणि केळकरांचा तीस वर्षांहून अधिक काळ पत्रव्यवहार होता. पण प्रत्यक्षात भेट मात्र तीन वेळाही झाली नव्हती. तरीही त्यांचा स्नेह अखंड होता. अं. शं. अग्निहोत्री, भास्कर आनंद गुप्ते, सलीम अली, भानू शिरधनकर, ज्येष्ठ कवी-लेखक शांताराम आठवले अशी अनेक गुणी माणसे स्नेही साहित्यिक म्हणून केळकरांच्या जवळ आली. यातली काही दुरावली. काही काळाने ओढून नेली. पण लेखकामधील गुण हेरून केळकरांनी माणसे जोडून वाङ्मयशोभाचा प्रपंच सतत वाढता ठेवला. अनेक गुणी लेखकांना प्रकाशात आणून त्यांचे पहिलेवहिले साहित्य वाङ्मयशोभातून प्रसिद्ध केले. त्यातल्या चांगल्या लेखकांना उत्तेजन देऊन लेखक म्हणून नाव मिळवून दिले. हे त्यांचे ऋण शांता शेळके, गिरीजा कीर, राम क्षीरसागर, वसंत जहागीरदार यांसारखे लेखक मानत असत.
वाङ्मयशोभाचे स्वरूप हे सुरुवातीपासून वाङ्मयीन असल्याने त्याला कोणतेच साहित्य वज्र्य नव्हते. वाद, परिसंवाद, मुलाखती, राजकीय लेख, ललित लेख, पुस्तक परीक्षणे (जी सुरुवातीच्या काळात ‘वाङ्मयशोभा’ या नावानेच प्रसिद्ध होत होती), कथा, कादंबरी, कविता, महिलांविषयक साहित्य अशा सर्वच प्रकारच्या साहित्याने अंक परिपूर्ण करण्याचा केळकर नेहमीच प्रयत्न करत. त्र्यं. वि. पर्वते यांनी घेतलेल्या स. गो. बर्वे, न्या. छागला, स. का. पाटील यांच्या कसदार मुलाखती केळकरांनी आपल्या अंकातून प्रसिद्ध केल्या. लोकमान्य टिळकांचा िहदुत्वाची व्याख्या करणारा ‘चित्रमयजगत’च्या अंकातला आणि १९०२ साली न. चिं. केळकरांनी इस्रायलसंबंधीचा इंग्रजीतून लिहिलेला, हे दोन्ही लेख केळकरांनी मिळवून १९४८ च्या मार्च-एप्रिल अंकातून प्रसिद्ध केले. कालांतराने वाङ्मयशोभाचे अंक दुर्मीळ होतील तेव्हा निवडक, वेचक साहित्याची साठवण करण्याच्या हेतूने केळकरांनी अशा प्रकारे लेख पुनर्मुद्रित करून एक मोठाच ठेवा जतन केला आहे, हे वाङ्मयशोभाचे जुने अंक चाळताना दिसून येते. तसेच त्यांनी प्रा. द. के. केळकर, दि. के. बेडेकर, न. वि. तथा काकासाहेब गाडगीळ अशा अनेक मान्यवरांकडून विविध सामाजिक-राजकीय विषयांवर लेख लिहून घेतले. कथा-कादंबरीच्या मानाने वाचकवर्ग कमी असलेला कविता विभागही त्यांनी कवी यशवंत, सोपानदेव, िवदा करंदीकर, मंगेश पाडगावकरांपासून दत्ता हलसगीकरांपर्यंतच्या सर्व कवींनी सजवला होता. माधव ज्युलियनांच्या निधनानंतर गोपीनाथ तळवलकरांची ‘अश्रुमाला’ ही श्रद्धांजलीपर कविता आणि कविवर्य भा. रा. तांबे यांची ‘जातोस भास्करा काय’ ही हृदयस्पर्शी कविता वाङ्मयशोभातूनच प्रसिद्ध झाली. पण सगळ्यात वाचकांवर ज्या कवितेने मोहिनी घातली, ती कवी मनमोहन नातूंची ‘राधे तुझा सल अंबाडा’ ही कविता! कविता जमत नाही म्हणून कचऱ्याच्या टोपलीत फेकलेले या कवितेचे बोळे केळकरांनी उचलून मनमोहन नातूंकडून ती पुन्हा लिहून घेतली. पुढे या कवितेच्या दहा हजार रेकॉर्ड्स निघून या तिने नवा उच्चांक गाठला. ‘लोककवी’ म्हणून मान्यता मिळालेल्या या कवीने-
‘मनोहर, तुझा
यशोदायी हात
केरातले सोने वेचणारा
तुझ्या ‘परीक्षक’ हाताने
‘राधे तुझा सल’ मराठीला वाचवून दिले.
जे ‘कागद’ रद्दीत गेले असते
त्यांना तू महोदयता दिलीस..’
या शब्दांत केळकरांचे आभार मानले होते. त्याचप्रमाणे भालचंद्र खांडेकरांच्या ‘हीच राघवा, हीच पैंजणे’ या कवितेवरही पुढे गाणे तयार होऊन त्याच्या अनेक रेकॉर्ड्स खपल्या. श्रीनिवास विनायक कुलकर्णीसारख्या सुंदर अक्षरातील लेखकाच्या कविता तर केळकरांनी त्यांच्या अक्षरातल्या कवितेचा ब्लॉक करूनच अंकात छापल्या. असा हा काव्य विभाग केळकरांनी कवींच्या गुणग्राहकतेमुळेच जोपासला.
वाङ्मयशोभातील बहुसंख्य वाचकांचा आवडता असणारा कथा विभाग अनेक मान्यवर, नवोदित लेखकांनी समृद्ध केला. मान्यवर लेखकांबरोबरच नव्या कल्पनांचा स्वीकार करणाऱ्या केळकरांनी नव्या-जुन्यांचा मेळ साधत आपली वाङ्मयीन अभिरुची जपली. वाङ्मयशोभाचे जुने अंक चाळताना गंगाधर गाडगीळांची ‘प्रिया आणि मांजर’ ही पहिली कथा, ए. रझ्झाक यांची ‘भंगण’ ही कथा, कुमुदिनी रांगणेकर यांची ‘उषा सोमण’, धनश्री हळबे यांची ‘प्रतिकार’ अशा अनेक लेखकांच्या कथांनी पुन:प्रत्ययाचा आनंद मिळतो. मध्यंतरी ज्या कथेवर चित्रपट निघून गाजला ती उषा दातार यांची ‘काकस्पर्श’ ही कथाही वाङ्मयशोभातूनच प्रसिद्ध झालेली. नारायण धारप, द. पां. खांबेटे, जी. ए. कुलकर्णी, गिरीजा कीर, पद्मजा फाटक, अंजली संभूस, मंदाकिनी भारद्वाज अशा अनेक मान्यवर लेखकांच्या कथांनी संपन्न असणाऱ्या या विभागात आपण एकदा घुसलो की हरवूनच जातो. म्हणूनच या विभागाला केळकरांनी आपल्या ‘स्वभावाला औषध नाही, दैवापुढे गती नाही’ या आत्मचरित्रात ‘अलिबाबाची गुहा’ असे जे म्हटले आहे, ते अगदी यथार्थ आहे. अशा उत्तमोत्तम कथाकारांमुळे वाङ्मयशोभाचा कथा विभाग संपन्न झाला.
१९५६  ते १९६४ पर्यंत पसे देऊन लेखक मिळवायची धडपड केळकरांनी आपल्या ऐपतीप्रमाणे केली. त्यात अनेक नामवंत लेखक दुरावले, तर नवोदित लेखक जोडले गेले. पण लेखकांच्या नावापेक्षा ‘वाङ्मयशोभा’च्या नावावरच मासिक खपले पाहिजे हा त्यांचा अट्टहास होता. त्यासाठी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. ‘वाङ्मयशोभा’ ही केळकरांच्या दृष्टीने वाङ्मयनिर्मितीची एक प्रयोगशाळा होती. त्यांनी व्यवहार करताना तो आíथक गणितापेक्षा ध्येयवाद, जिद्द यांच्या बळावरच अधिक केला. त्यामुळे वाङ्मयशोभाच्या खपाला मर्यादा पडल्या. पण शृंगारकथा, पोलिसी कथा यांना त्यांनी आपल्या मासिकातून कधीच थारा दिला नाही. त्याचप्रमाणे बीभत्स रसाखेरीज वाङ्मयशोभाला कोणताही रस वज्र्य नव्हता. रसाप्रमाणेच जातिभेद, धर्मभेद, वर्णभेद, वर्गभेद, िलगभेद वा प्रांतभेद असा कुठलाच भेद न मानता केळकरांनी वाङ्मयशोभाच्या माध्यमातून निव्वळ साहित्यसेवाच केली. ‘लेखकाचे लेखन आवडले तर त्याच्या लायकीप्रमाणे त्याला मोबदला अवश्य द्यावा, तो त्याच्या कौशल्याचा सन्मान आहे,’ हा वसुंधरा पटवर्धन यांचा सल्ला केळकरांनी शेवटपर्यंत अत्यंत काटेकोरपणे पाळला. त्याकाळच्या इतर मासिकांच्या तुलनेने वाङ्मयशोभाचे मानधन अल्प असले तरी लेखकाला मानधनाची मनिऑर्डर, प्रसिद्धीचा अंक, लेखाची कात्रणे अगदी वेळेवर पाठवली जायची. त्याचप्रमाणे वाङ्मयशोभाकडे प्रसिद्धीसाठी आलेल्या मजकुराचाही विनाविलंब निर्णय घेऊन तसे लेखकाला कळवले जाई. वाङ्मयशोभातून प्रसिद्ध होणारे साहित्य हे दर्जेदार असायलाच हवे, पण तितकेच ते शुद्धही असायला हवे, यावर केळकरांचा कटाक्ष असे. म्हणूनच प्रूफरीडरने अंकाची प्रूफे वाचली तरी ते स्वत: चार-चार वेळा बारकाईने ती तपासत असत. सव्यसाची संपादकाची सर्व कामे लीलया पार पाडत. केळकर घराण्याचा साहित्यिक वारसा पाठीशी असणाऱ्या केळकरांचा िपडही आपोआपच लेखकाचा बनला होता. महाविद्यालयीन काळात लिहिलेली ऐतिहासिक व विनोदी नाटके, ‘प्रसाद’ मासिकातून केलेले कथालेखन, विनोबा भाव्यांचे चरित्र, कथाकार य. गो. जोशींवरचा ‘अजून बिडी विझली नाही’ हा मृत्युलेख हे केळकरांच्या उत्कृष्ट लेखनशैलीचे नमुने आहेत. पण मध्यमवर्गीय मराठी वाचकांनी उचलून धरले ते केळकरांचे ‘स्वभावाला औषध नाही आणि दैवापुढे गती नाही’ हे आत्मचरित्र. तसेच वाङ्मयशोभातून परखडपणे लिहिलेल्या संपादकीय लेखांना लेखक-वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळायचा. म्हणूनच त्यांच्या आग्रहावरून केळकरांनी ‘दृष्टिक्षेप’ हे संपादकीय लेखांचे संकलित पुस्तक प्रसिद्ध केले. याखेरीज केळकरांनी २१  पुस्तकेही लिहिली.
वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी वाङ्मयशोभाच्या संपादनास त्यांनी सुरुवात केली, ती  १९९२ पर्यंत- म्हणजे वयाच्या ७९ व्या वर्षांपर्यंत! कितीही संकटे आली तरी ती पार करत कसोशीने त्यांनी ही सारस्वतसेवा केली. १९८० ते १९९० च्या दशकात चित्रपट, दूरदर्शन यांनी प्रेक्षकांना आपल्याकडे वळवायला सुरुवात होती, पण केळकरांनी वाङ्मयशोभाचे अस्तित्व, वेगळेपण टिकवले, जपले ते नवनवीन लेखकांच्या बळावरच! वाचक, हितचिंतकांच्या उदंड प्रतिसादामुळे व सहाय्यामुळेच आपण वाङ्मयशोभाची यशस्वी वाटचाल करू शकलो, हा कृतज्ञभाव केळकरांच्या ठायी होता. मान्यवर लेखक-लेखिकांबरोबरच चित्रकार, व्यंगचित्रकार यांच्यातलेही गुण हेरून त्यांना केळकरांनी वाङ्मयशोभाशी जोडून ठेवले. व्यंगचित्रकार वसंत सरवटे, द. अ. बंडमंत्री आणि नंतरच्या काळातील अशोक डोंगरे यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात वाङ्मयशोभातूनच केली. दलाल-मुळगावकर यांच्यासारख्या प्रथितयश चित्रकारांच्या चित्रांनी वाङ्मयशोभाची अनेक मुखपृष्ठे सजली. पद्मा सहस्रबुद्धे, वसंत सहस्रब्रुद्धे, अशोक डोंगरे या केळकरांशी घनिष्ठ संबंध असलेल्या चित्रकारांनी वाङ्मयशोभाच्या कथा-कवितांच्या सजावटीबरोबरच सुंदर मुखपृष्ठेही साकारली आहेत. साक्षेपी संपादक या नात्याने मान्यवर तसेच नवोदित लेखक-लेखिका, चित्रकार या सर्वानाच केळकरांनी जोडून घेतले होते, याची मी साक्षीदार होते याची आज या क्षणी मला धन्यता वाटते.
केळकरांच्या वाङ्मयीन कार्याचा गौरव पुणे मराठी ग्रंथालयाने आणि प्रकाशक परिषदेने केला होता. वाङ्मयशोभाने ५५ वर्षांच्या काळात जे अत्युत्कृष्ट साहित्य वाचकांना दिले, तो खरे तर एक दुर्मीळ ठेवाच आहे. पण अंक जुने होतील, कागद फाटेल, मग पुढच्या पिढीला हे साहित्य कसे मिळणार, या चिंतेने पोखरणाऱ्या केळकरांची उधळण्याइतका पसा जवळ आला तर निवडक वाङ्मयशोभा काढण्याची इच्छा होती. परंतु शारीरिक अक्षमता, सगळ्याच नियतकालिकांची झालेली दयनीय अवस्था यामुळे त्यांची ही इच्छा अपुरीच राहिली. १९९२ साली केळकरांनी वाङ्मयशोभाची जबाबदारी आपल्या धाकटय़ा चिरंजीवांकडे सोपवली. पण त्यांना बदलत्या परिस्थितीमुळे ५ नोव्हेंबर १९९४ साली केळकरांच्या झालेल्या निधनानंतर शेवटचा श्रद्धांजलीचा अंक काढून ‘वाङ्मयशोभा’ बंद करावे लागले. २०१२-२०१३ या त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या कुटुंबीयांनी ‘निवडक वाङ्मयशोभा’चा प्रपंच न करता आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे १९३९ ते १९९२ या काळातील वाङ्मयशोभाच्या सर्व अंकांचे डिजिटायझेशन केले आणि आता ते ‘बुकगंगा डॉट कॉम’च्या माध्यमातून वाचकांना उपलब्ध करून दिले आहे. केळकर कुटुंबीयांनी म. म. केळकरांना वाहिलेली ही कालसुसंगत श्रद्धांजलीच होय. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लेखक-वाचकांच्या आठवणी सांगणारी स्मरणगाथा ‘स्मरण ‘म.म.’त्वाचे’ ही स्मरणिकाही यानिमित्ताने प्रकाशित करण्यात आली. नव्या रूपातील या वाङ्मयशोभामुळे मराठी वाचक म. म. केळकर व त्यांच्या कुटुंबीयांप्रती नक्कीच ऋणी राहतील.

hindostan hamara marathi news, hindostan hamara book
राष्ट्रवादी लोककवितेचा बुलंद उद्गार
dr babasaheb ambedkar
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दुर्मीळ पत्रे, लेख यांचे प्रदर्शन
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार