प्रमोद मुनघाटे

काहीतरी सांगण्याची अनिवार इच्छा ही कोणत्याही निर्मितीची पहिली अट असते. ते सांगता आले, तर तीच त्या निर्मितीची प्रेरणा आणि वैशिष्टय़ ठरते. शर्वरी पेठकर हिच्या ‘तूर्तास खासगी एवढंच..’ या कादंबरीच्या बाबतीत असेच झाले आहे. या आत्मनिवेदनात्मक कादंबरीची नायिका नववी उत्तीर्ण होऊन दहावीत गेलेली एक मुलगी आहे. तिचे विश्व ते केवढेसे असणार? आणि कादंबरी तर महाकाव्य असते असे म्हणतात. महाकाव्यात अनेक काव्ये असतात आणि विश्वात अनेक विश्वं एकाच वेळी नांदत असतात. प्रत्येक विश्व त्या त्या कालावकाशात परिपूर्णच असते. फक्त त्या विश्वाकडे पाहण्याचा डोळा असावा लागतो. ‘तूर्तास खासगी एवढंच..’ या कादंबरीची नायिका ‘मी’ ही तर त्या चिमुकल्या विश्वाचा एक भागच आहे.

नववी-दहावी म्हणजे पौगंडावस्था. या वयातील मुलांचे एक विश्व असते. घराच्या चार भिंतींतून हळूच आपली सुटका करून शाळा, शिक्षक, मित्रमत्रिणी या अवकाशात स्वत:चे अस्तित्व शोधू लागतात. छोटय़ाशा घराच्या गच्चीतील बागेत असलेल्या फुलझाडाची कुंडी उचलून पहिली, तर खाली इवल्या इवल्या मुंग्यांनी बनविलेली विराट वसाहत पाहून आपण आश्चर्यचकित होतो. नववी-दहावीतल्या मुलांची शाळा अशीच असते.

‘तूर्तास खासगी एवढंच..’ या कादंबरीच्या लेखिकने दहावीच्या उन्हाळ्यात ही कादंबरी लिहून काढली. मग मधे दोन-तीन वष्रे गेली नि ती प्रकाशित झाली. अवघ्या सोळा- सतराव्या वर्षी असलेली ही भाषेची सहज शैली आणि कादंबरीलेखनाची बठक शब्दापलीकडची आहे, हे अत्यंत कौतुकास्पद आहे. या कादंबरीतले सगळेच प्रसंग ताजे आहेत.

नायिका आपल्याला तिच्या शाळेच्या विराट विश्वातील जीवनमरणाच्या गोष्टी कथन करते. हे कथन करणारी ‘मी’ फार हळवी आहे. मध्यमवर्गीय म्हणता येईल अशा सगळ्या भावभावना, संवेदना आणि मूल्ये तिच्या व्यक्तित्वात दिसतात. ती आपल्या वयाच्या सर्व नसर्गिक व शारीरिक वैशिष्टय़ांचे सगळे उठाव शब्दाशब्दांतून व्यक्त करते. ते एकाच वेळी तिचे खासगी आहे आणि त्याच वेळी पौगंडावस्थेचे प्रतिनिधित्व करणारे वैश्विकही आहे. तिच्या कथनाचे हे खरे सामथ्र्य आहे.

शाळेत भडक लिपस्टिक आणि नेटक्या साडय़ा घालणाऱ्या शिक्षिका आहेत. ‘लाइन मारणारी’, दंगामस्ती करणारी थोराड मुलं आहेत. फुगीर नाकाच्या, घट्ट युनिफॉर्म व आखूड स्कर्ट घालणाऱ्या मुली आहेत. मुलामुलींच्या जोडय़ा आहेत. खाणाखुणा, कुजबुज, शिट्टय़ा, चर्चा, रडारड आणि घरी जाऊन आरशासमोर तासन्तास उभे राहणे आहे. शाळेचे स्नेहसंमेलन, व्हॅलेन्टाइन डे, निरोप समारंभ यानिमित्त होणारे प्रचंड राजकारण आहे. शाळेबाहेर चणाचोर गरमच्या गाडय़ा आहेत. हे सगळे ‘मी’ आपल्या सूक्ष्म तपशीलवार वर्णनशैलीतून कथन करते. अनेक प्रसंगांच्या मालिका आहेत. त्यात अनेक पात्रे आहेत. त्यातून निर्माण होणारे ताणतणावाचे अनेक प्रसंग आहेत.

शाळेच्या विश्वात खास अशी भाषा आहे. इंग्रजी, मराठी व हिंदीच्या मिश्रणातून ती भाषा तयार झाली आहे. अनेक शब्दप्रयोग, वाक्प्रचार पौगंडावस्थेतील मुलांच्या विकारांचे दर्शन घडविणारे आहेत. भावनिक उद्रेक, शारीरिक भेदाभेद आणि लैंगिक आकर्षण व्यक्त करणारी भाषा ही या कादंबरीचा महत्त्वाचा विशेष आहे. उदाहरणार्थ : ‘मुलांमध्ये एखाद्या मुलाला आवडणाऱ्या मुलीचं मॅडमनं स्टेजवर येण्यासाठी नाव घेतलं, की ज्याचीवाली ती मुलगी आहे, त्याच्या मित्रांनी ती स्टेजवर जाताना जोरात टाळ्या वाजवायलाच पाहिजे आणि खूपदा ती मुलगी स्टेजवर जाताना तिच्यावर ‘पायलागू भाभीजी’ अशा जोरजोरात कॉमेंट्स व्हायच्या. आणि मग ‘आपल्यावाली’साठी आपल्या मित्रांनी टाळ्या वाजवल्या ना, मग ‘त्याच्यावाली’साठी आपण जोरात टाळ्या वाजवणं हे आपलं कर्तव्य आहे, अशी भावना जागृत होऊन तो मुलगा त्याच्या मित्रांना आवडणाऱ्या मुलीसाठी जोरजोरात टाळ्या-शिट्टय़ा वाजवायचा. एकूणच कोणत्या मुलीची मुलांमध्ये जास्त क्रेझ आहे, हे तिला मिळणाऱ्या टाळ्या आणि शिट्टय़ांमधून कळून यायचं. आणि त्यातही दोन मुलांना एकच मुलगी आवडत असेल, तर कोणत्या मुलाच्या मित्रांचा किती मोठा कल्ला होतो आणि कोणत्या मुलांकडून त्या मुलीवर टाळ्यांचा जास्त वर्षांव होतो, यावरून ठरायचं की कोण जास्त मोठा भाई आहे ते..’

शाळेत वर्ग चालू असताना त्या छोटय़ाशा जागेत मुलांच्या असंख्य क्रीडा चाललेल्या असतात. एक डोळा आणि एक कान शिक्षकाकडे असला, तरी मुलं आपल्या विश्वात विहरत असतात. ते परस्परांतील काही गुपितांची देवाणघेवाण करीत असतात. काही मनाने खिडकीच्या बाहेर केव्हाच उडाले असतात. त्या शाळेच्या जगातील अनेक गोष्टी मुलांसाठी एखाद्या देशाच्या कारभारासारखे असते. त्यांचे हेवेदावे, डाव-प्रतिडाव, निंदानालस्ती आणि प्रचंड राजकारण यांना ऊत आलेला असतो. स्नेहसंमेलन ही घटना तर अशा राजकारणाचे केंद्रच असते. गाणे, भाषण, नाटक आणि सूत्रसंचालन कुणाला मिळणार आणि कुणाचा पत्ता कट होणार, हे त्या शाळेतील मुलांच्या अस्तित्वाचेच प्रश्न असतात. कादंबरीची निवेदिका ही अशा सगळ्या राजकारणाची बळी ठरली आहे, हे अनेक प्रसंगातून दिसते. शाळेचे मंत्रिमंडळ, त्यातील मिनिस्ट्री, हेडबॉय आणि हेडगर्ल म्हणून निवड, त्यानिमित्ताने येणारे मान-अपमान यामुळे ‘मी’सारखी संवेदनशील मुलगी कोलमडून पडते. वडिलांच्या कुशीत रडून घेते. मुलींच्या या विश्वात शिक्षिका आणि आई त्यांच्या रोल मॉडेल्स कशा असतात, त्यांच्याकडून अपेक्षाभंग झाल्याचे दु:ख किती तीव्र असते आणि कशी सावरून नेते, ते या कादंबरीतील अनेक घटनांमधून सूक्ष्मपणे चित्रित झाले आहे.

विशेषत: शिक्षकदिनाच्या उत्सवात दहावीतील मुलं गणवेशाऐवजी फॉर्मल्स घालणार आणि मुली साडी, हे अगदी ठरलेलेच. या दिवसाची मुली वर्षभर वाट बघत असतात. शाळेत सर्वासमोर साडीत मिरविण्याची तीच एक नामी संधी असते. कपाटातल्या आईच्या साडय़ा अंगावर घेऊन ‘मी’ने कितीतरी वेळा घरीच गिरक्या घेतलेल्या असतात; पण हाय रे दैवा! अचानक बातमी येते की, यावर्षी शिक्षकदिन गणवेशावरच साजरा करायचा. कोण खळबळ माजते दहावीच्या वर्गात. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात जणू महायुद्धच. या सगळ्या खळबळीचे, गोंधळाचे आणि मुलींच्या रडण्या-रुसण्याचे वर्णन फार सुंदर आलेले आहे.

‘तूर्तास खासगी एवढंच..’ या शीर्षकातून लेखिकेने अतिशय सूचकतेने आपल्या अनुभवांचा परीघ स्पष्ट केला आहे. खरोखरच पौगंडावस्थेतील मुलांचे खासगी मनोव्यापार या कादंबरीत तपशीलवार येतात. अनेक स्वभावाची व वृत्तीची मुलं-मुली इथे आहेत. अभ्यासू, कष्टाळू, भांडखोर, बढाईखोर, मुजोर, लाजाळू, मनस्वी आणि दुसऱ्याला आधार देणारी अशी अनेक व्यक्तीचित्रणे रेखीव उमटली आहेत. या वयातील मुलांची दिवास्वप्ने, लैंगिक गंड, नराश्य, कौर्य आणि शरमेचे अनेक प्रसंग निवेदनाच्या ओघात येतात. यापेक्षा वेगळे या कादंबरीत नाही. पण जे आहे ते ठसठशीत आहे.

मध्यमवर्गीय जीवनातील, तेही आयुष्याच्या एका चिमूटभर अवकाशातील घटना लेखिकेने जाणीवपूर्वक निवडल्याचे लक्षात येते. म्हणून ‘तूर्तास’ असे विशेषण शीर्षकात येते. आपल्या वर्तुळाच्या पलीकडे जाण्याचा अट्टहास इथे दिसत नाही. अनुभव आणि भाषा या दोन्हींसंदर्भात तिला स्वत:चे अस्सल काय असते ते कळले आहे, असे लक्षात येते. आपल्या मर्यादित जगण्याच्या वर्तुळातील मर्यादांशी प्रामाणिक राहून त्यातील नाटय़ हेरण्याचा हा प्रकार लेखिका शर्वरी पेठकर या तरुणीकडून वाचकांच्या अपेक्षा उंचावणाऱ्या नक्कीच आहेत.

‘तूर्तास खासगी एवढंच..’ – शर्वरी पेठकर,

अक्षर मानव प्रकाशन,

पृष्ठे- ११२, मूल्य- १५० रुपये