रश्मी पारसकर-सोवनी

मनोज बोरगावकरांची ‘नदीष्ट’ ही कादंबरी शीर्षकासोबतच निसर्ग कवेत घेऊन येते. तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेल्या आधुनिक युगात माणसाच्या वाटय़ाला आलेला एकटेपणा, तुटलेपणा आणि निसर्गाची ओढ यातून निओ-पॅगनिजम अस्तित्वात येतो. ‘नदीष्ट’मध्ये हा निओ-पॅगनिजम नदीरूपात अवतरतो.

meteor showers, sky, meteor,
उद्यापासून आकाशात उल्कावर्षावाचा विविधरंगी नजारा, सुमारे १२ हजार वर्षांनी…
power supply of Kalyan East was suddenly interrupted in early morning
उकाड्याच्या होरपळीत कल्याणमध्ये विजेचा लपंडाव, उकाड्याने नागरिक हैराण
Nashik heats up temperature at 40.4 degree Celsius but sprinkles of rain in some areas
नाशिक तापले… पारा ४०.४ अंशावर, काही भागात पावसाचा शिडकावा
श्श्श्श… वाघोंबांची तलावामध्ये सुरू आहे पूल पार्टी; ‘ठंडा ठंडा कुल कुल’मुळे बाहेर निघायलाच तयार नाही

पाचशे-हजार मीटरचा नदीकिनारा पक्ष्याने विहार करून पाहावा तसा ‘बर्डस् आय वू’ लेखकाने नदीष्टमध्ये टिपला आहे. जणू गूगल मॅपवर नदी झूम केल्यावर काठावरची वस्ती ठळक दिसावी. नदीवरचा फोकस शिफ्ट करून नदीकाठच्या लोकांवर जावा आणि अलगद त्यांच्या अंतरंगात शिरावा.. तसे लेखक प्रत्येक व्यक्तिरेखेच्या अंतरंगात वाचकाला घेऊन जातो.

‘डिजेक्शन : अ‍ॅन ओड’ या कवितेत कोलरीज म्हणतो, ‘मनुष्य आवडीनुसार आपल्या मनात निसर्गाला एक रूप देत असतो.’ बोरगावकरांना निसर्ग नदीत- मातृरूपात गवसला. संपूर्ण कादंबरीच आई आणि नदीभोवती फिरते.  बोरगावकरांची नदीवर आध्यात्मिक श्रद्धा नाही. नागरी संस्कृतीतल्या कृत्रिमतेतून आलेला एकटेपणा, आदिमतेशी तुटलेले नाते यामुळे माणूस गुदमरत जगतो. या घुसमटीला वाट मोकळी करून द्यायला शोधलेला पर्याय म्हणजे नदी. लेकराला पोसणाऱ्या आईपेक्षाही अर्भकाला रुजवणाऱ्या गर्भाशयाशी या नदीचे नाते आहे. कादंबरीच्या सुरुवातीला लेखक म्हणतो, ‘नदी म्हणजे आईचे विस्तारत गेलेले गर्भाशय.. गर्भातून बाहेर पडावे लागले की केवढी गुदमर होते आपली.. आईशी तुटलेली नाळ नदीशी जोडल्यागत वाटते मला.’

आई, नदी, कविता ही सृजनाची तीन रूपं लेखक एकच मानतो आणि या रूपांना भेटणे म्हणजे आईच्या गर्भात परत जाणे असे त्याला वाटते. बोरगावकरांना नदी ही एक ‘सजीव’ वाटते. रोडावत जाणारी नदी त्यांना नीट वज न झालेल्या, खंगलेल्या बाळंतिणीसारखी वाटते. वाळूचा उपसा करणारे नदीच्या गाभ्याला जखम करतात, ते गर्भपातामुळे स्त्रीला होणाऱ्या इजेसारखे त्यांना वाटते. गावाला नदी असणं हे लेकीला माहेर असण्याइतकं महत्त्वाचं आहे.

‘नदीष्ट’मधील पात्रांना नदीचं अस्तित्व हे त्यांच्या अस्मितेताच एक भाग वाटतं. या व्यक्तिरेखा नदीशी इतक्या तादात्म्य पावल्या आहेत की, त्यांना तिच्याशी बोलायला भाषेचीही गरज पडत नाही. त्यांच्या नसानसातून नदी वाहते. रक्ताच्या नात्यापेक्षाही नदीच्या नात्याने जोडलेली माणसे जवळची असतात, कारण यापेक्षा सशक्त जोडणी असूच शकत नाही, असे लेखकाला वाटते.

दादाराव, बामनवाड, सगुणा, भिकाजी नदीत आपली आई शोधतात. संपूर्ण कादंबरी या जीवघेण्या शोधयात्रेने पछाडलेली आहे. नदीच्या पटावर हा शोध एखाद्या सिग्नेचर टय़ूनप्रमाणे वाजत राहतो. दादाराव आईच्या मायेचा अनुभव घेण्याकरिता वृद्धावस्थेतही रोज नदीत पोहायला येतात. नदीच्या अंजान जागेच्या वाळूमुळे आपण जन्माला आलो, असे मानणारा बामनवाड गोदामायपुढे नतमस्तक होतो. सगुणाचा प्रवास नदीच्या प्रवाहासारखाच. हीच नदी सगुणाच्या आईच्या गावातूनही वाहते. तिला स्पर्शून गेलेला नदीचा प्रवाह तिच्या आईलाही स्पर्शून जाईल, ही भाबडी समजूत सगुणाला सुखावून जाते. पश्चात्तापदग्ध भिकाजी शांतीच्या शोधात नदीवर भटकत राहतो. काळोखातल्या हलत्या सावल्यांसारखे अस्तित्व असलेले हे लोक दिवसाउजेडी धूसर होतात. समाज यांच्या अस्तित्वाची दखल घेत नसेलही, पण नदीच्या दोऱ्यात हे सर्व मण्यांसारखे एकत्र ओवले जातात. किनाऱ्यावरच्या वाळूवर आकार उमटावे आणि लाटांनी ते पुसले जावे तशी ‘नदीष्ट’ची कहाणी पुढे सरकत जाते.

कादंबरीचे वैशिष्टय़ म्हणजे, या कथेतील नायक न-नायक आहे. लेखकाने सुज्ञपणे कादंबरीतल्या नायकाला नाव दिलेले नाही. त्याच्या नावाच्या जागी वाचक स्वत:चे नाव कधी लावतो ते त्यालाही कळत नाही. तथाकथित समाजमान्यतांपुढे मान तुकवणारा, त्यांच्यातला फोलपणा जाणवत असतानाही त्याविरुद्ध बंड न करणारा नायक हा अँग्री यंग मॅन का नाही, असा प्रश्न वाचकाला पडतो. सगुणामध्ये मात्र ही तडफ आहे. पहिल्या भेटीतच ती विचारते, ‘नजर चुरानेवाले तुम.. और हिजडे हम.. सच्ची बता, आँख में आँख डाल के देखनेवाला हिजडा, की नजर चुरानेवाला हिजडा? आँख चुरानेवाला हिजडा हुआ ना रे?’ या प्रश्नासरशी नायकासह सर्व समाजाला सगुणा हिजडा बनवते आणि स्वत: नायक होते. बिनधोक, बिनधास्त फिरणारी सगुणा बावचळलेल्या नायकाला सावरते, त्याच्या नाकत्रेपणाला दूषणं देत नाही. तिच्यासोबत चालण्याचीही हिंमत नसलेल्या नायकावर तो  साधा-सच्चा आहे म्हणून प्रेम करते, प्रेमाचा इजहार करते, पण प्रेमाची याचना, जबरदस्ती करत नाही. त्याच्यावर नामुष्की येऊ नये म्हणून त्याची मदत घेणं नाकारते आणि मन घट्ट करून त्याच्या आयुष्यातून निघून जाते. या न-नायकांच्या कहाणीत नायक कोणी असेल तर तृतीयपंथी सगुणा. समाजाने तिला हीन वागणूक दिली, तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं तरी तिने आपलं चांगुलपण जपलं. हिजडा म्हणून हिणवली जाणारी सगुणा दिलदार, क्षमाशील आणि लढाऊ आहे.

एखाद्या प्रदेशाच्या भूगोलाची आणि इतिहासाची छाप त्या प्रदेशातील जनमानसावर पडते. ‘नदीष्ट’मध्ये गोदाकाठच्या जनमानासाचे दर्शन घडते. या नदीकाठच्या संस्कृतीत भूत, वर्तमान, भविष्याची सरमिसळ होते आणि कादंबरीला वैश्विक परिमाण लाभते. ‘नदीष्ट’ ही कादंबरी कोणत्याही नदीकिनाऱ्यावरची, कोणत्याही कालखंडातली असू शकते.

यातल्या व्यक्तिरेखा काळाचे संदर्भ घेऊन वावरत असल्या तरी त्यांची कहाणी आणि स्वभाव वैश्विक आहेत.

कादंबरीतील भाषा तिच्या भूत, वर्तमान, भविष्याच्या ताण्याबाण्यासह लेखकाने पेश केली आहे. निजामाच्या काळाशी नाते सांगणारी उर्दूमिश्रित मराठी, हैद्राबादी हिंदी, तेलुगू आणि इंग्रजीचा वापर लेखकाने मुक्तहस्ताने केला आहे. बोलणाऱ्याइतकीच ही भाषा जिवंत आणि अकृत्रिम आहे. ‘चंचीतला माखुल खुर्दा घेऊन उलाल होतात, तो खदाल हसला, माझा दमखम संपत चालला होता, घरी जाऊन फराकत झोपायचे.’ असे कधीही न ऐकलेले शब्द या कथनात ठिकठिकाणी आढळतात. ‘ढकलस्टार्ट गाडी, अजिबोगरीब फीलिंग, ट्रॅजिक ड्राम्यानंतरचा कॅथार्सिस, सुप्त बाँडेज घेऊन डिपार्ट झालो, बरणी गदागदा हलवून सेटल करावं तसं..’ असे विविध भाषांमधले शब्द, वाक्प्रचार इथे गुण्यागोविंदाने एकत्र नांदतात, त्यामुळे ही कादंबरी भाषिकदृष्टय़ाही वाचकाला समृद्ध करते.

पानोपानी नयन बाराहातेंनी काढलेली चित्रं वाचकांचे कादंबरीशी नाते दृढ करतात. जीवनमूल्ये, मानवी स्वभाव दर्शवणाऱ्या अनेक सुंदर वाक्यांची पखरण लेखकानं केली आहे.

कादंबरीमध्ये कुठेही पल्लेदार वाक्य नाहीत, चर्चा चर्वतिचर्वण नाही, उपदेश नाही. क्लिष्टतेचा मोह बोरगावकरांनी हेतुपुरस्सर टाळला आहे. सरलता आणि आशयघनतेबाबत ही रचना हेमिंग्वेच्या ‘द ओल्ड मॅन अँड द सी’ची आठवण करून देते. ‘नदीष्ट’मधील नायकाचे मनोगत वाचकाला आत्मविश्लेषण करायला लावते.

‘नदीष्ट’- मनोज बोरगावकर

ग्रंथाली प्रकाशन, पृष्ठे – १६८, मूल्य – २०० रुपये