‘अकूपार’ ही ध्रुव भट्ट या सिद्धहस्त गुजराती लेखिकाची चौथी कादंबरी. सहजसोपं तरीही आशयघन लेखन हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्टय़. प्रस्तुत कादंबरीत एका चित्रकाराच्या आत्मशोधाची कथा अतिशय उत्कटतेनं चितारली आहे. पंचमहातत्त्वांपैकी एक असणाऱ्या पृथ्वी या महातत्त्वाचं चित्र काढण्यासाठी मुंबईहून गीरच्या अभयारण्यात जाऊन पोहोचणारा नायक अखेर ‘गीर’चाच होऊन जातो.. पण इथपर्यंतचा त्याचा प्रवास अतिशय तरल, भावोत्कट आणि प्रसंगी भाबडा वाटावा असा आहे. ‘अंतर्मनाचा आवाज’ नायकाला मार्गदर्शन करीत राहतो. मात्र जसजसा हा प्रवास पूर्णत्वास येत जातो तशा त्याच्या मनातील शंका, द्वंद्व यांचं शमन होतं व एका समृद्ध जाणिवेचा त्याला साक्षात्कार होतो. सगळं जग सोडून हा चित्रकार नेमका ‘गीर’लाच का येतो, तिथं त्याची ओळख होणाऱ्यांमध्ये ‘सांसाई’, ‘अम्मा’, ‘डोरोथी’, ‘धानू’ यांसारखी माणसंच का भेटतात, त्यानं काढलेल्या ‘पृथ्वी’च्या चित्रांमधून मानवी जीवनाच्या विविधरंगी छटाच का रेखाटल्या जातात, या आणि अशा सुखद योगायोगांनी वाचकांना खिळवून ठेवत ध्रुव भट्ट एका चिरंतन सत्याची वाचकांना ओळख करून देतात. गीरचं घनदाट जंगल, तेथील उंच टेकडय़ा, रानमाळाचा भाग, सासण, हरिणी नदी हा सारा प्रदेश नायकासह पालथा घालून जणू आपण दमतो आणि क्षणभर स्तिमितही होतो. कथेतील विविध प्रसंगातून, कथेतील पात्रांच्या रूपानं होणारी ‘गीर’ची भव्यदिव्य ओळख, तेथील वैविध्यता आणि संपन्नता यात वाचक गुंतत जातो. ‘गीर’चे लोक लौकिकार्थानं अशिक्षित, पण मनानं अतिशय सुसंस्कृत, समजूतदार आणि पर्यावरणाविषयी उपजत ज्ञान असणारे आहेत. त्यांच्या जगण्यातील सहजता विशेषकरून सिंहांच्या वर्तनाचे त्यांनी लावलेले अर्थ आपल्याला चकित करून टाकतात. माणूस, निसर्ग व इतर प्राणी यांच्यातील परस्परपूरक संबंधांवर विचार करण्यास हे पुस्तक भाग पाडतं.
आता थोडंसं पुस्तकाच्या नावाविषयी. महाभारतात ‘अकूपार’ या पुरातन कासवाची कथा आहे. या कासवाच्या पाठीवर शेषनाग बसलेला आहे व तो पृथ्वीचा भार तोलतो आहे. तो चिरंजीव आहे. १९८२ मध्ये झालेल्या विनाशकारी वादळात गीर उद्ध्वस्त झालं होतं, भुईसपाट झालं होतं. मात्र, अल्पावधीतच ‘गीर’ पुन्हा होतं तसं तयार झालं. झाडं, झुडपं, वृक्ष, प्राणी-सारं काही. म्हणूनच ‘अकूपार’ कासवाप्रमाणे गीरही संजीवनी मिळाल्याप्रमाणे पुन्हा भरभराटीला आले म्हणूनच हे शीर्षक! भट्ट यांच्या कथनात भाषेचा लहेजा मोलाची भर घालतो. त्याच ताकदीनं अंजली नरवणे यांनीही अनुवाद साकारल्यानं कादंबरी वाचनीय झाली आहे.
अकूपार -ध्रुव भट्ट, अनुवाद-अंजली नरवणे, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे,  
पृष्ठे – २८०, मूल्य- ३०० रुपये.

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार