अमेरिकेसारख्या जगातील सर्वात बलाढय़ महासत्तेला वर्षांनुवर्षे झुंजवत ठेवून जेरीला आणणारा चिमुकला देश व्हिएतनाम हा आहे तरी कसा, हे जाणून घेण्यासाठी या देशाला भेट देण्याची बरेच दिवस मनात इच्छा होती. ती नुकतीच फलद्रुप झाली.

बाली व कंबोडिया या हिंदू संस्कृतीत मुरलेल्या देशांना भेट देऊन आम्ही रस्तामार्गे व्हिएतनाममधील हो ची मिन्ह सिटीमध्ये प्रवेश केला. कंबोडिया व बालीतील हसतमुख स्वागतानंतर व्हिएतनाम सीमेवरील अधिकाऱ्यांचे गंभीर चेहरे पाहून जरा धास्तीच वाटली. व्हिएतनाममध्ये प्रवेश करताना जवळ कमीत कमी हजार अमेरिकन डॉलर्स असणं आवश्यक आहे, अशी चिठ्ठी व्हिसा देतानाच आमच्या पासपोर्टवर डकवण्यात आली होती. त्यामुळे तेवढी रक्कम आम्ही अगदी हाताशी बाळगून होतो. पण कोणीच काही विचारलं नाही आणि पुढेही सर्वत्र चांगलाच अनुभव आला. इतकी वर्षे युद्धाच्या छायेत राहूनही या देशाने अल्प काळात केलेली प्रगती सर्वत्र प्रत्ययाला येत होती. 

सहा-आठ मार्गिका असलेले रुंद रस्ते आणि त्यावरून चाललेली हजारो दुचाकी स्वारांची फौज हे सर्वत्र आढळणारं दृश्य. दोन लेन्समध्ये २-२।।  फूट उंच दुभाजक आणि त्यावर लावलेल्या विविध रंगांच्या बोगनवेली नेत्रसुखद तर आहेतच; पण रहदारीलाही त्या नियंत्रणात ठेवतात. चारचाकींपेक्षा दुचाक्यांची संख्या लक्षणीय आणि सर्व स्वार शिरस्त्राणे घातलेले. लाल बत्तीत न घुसणारी, झेब्रा क्रॉसिंगच्या आधी थांबणारी वाहनं पाहून, शिस्तीमुळे देशाची प्रगती होते, हे ताबडतोब पटतं.

आमचा पहिला दिवस कू ची टनेल्सना भेट देण्याचा होता. शहरापासून जवळजवळ ७० कि. मी. दूरवर ही युद्धभूमी आहे. इथे दाट जंगल होतं- जिथं ही भुयारं खणण्यात आली आहेत. अमेरिकन सैन्याशी आपण अस्त्र-शस्त्रं वा मनुष्यबळ या कशातच बरोबरी करू शकत नाही याची जाणीव असल्यामुळे व्हिएतनामी हे युद्ध गनिमी काव्याने कसे लढले, हे पाहताना शिवाजीमहाराजांची आठवण होते. ही भुयारे खणताना अनेक क्लृप्त्या योजण्यात आल्या आहेत. पालापाचोळा आहे असं वाटून वरून धावणारे शत्रूसैनिक आत पडून त्यांना असंख्य खिळे टोचावेत अशी योजना यात आहे. एका लांबलचक भुयारात गाइड टॉर्च घेऊन बरोबर येतो. तिथे काही भाग वाकून, तर काही चक्क रांगत पार करावा लागतो. आत उतरताना आपल्याला गुडघे, पाठ, हृदय यांपैकी कसलीही व्याधी नाही ना, याची खातरजमा करून घेतली जाते. दिवसा या भुयारांमध्ये लपून रात्री बाहेर येऊन व्हिएतनामी नाना प्रकारे शत्रूला सतावत. अनेक प्रकारची कामं करत असलेले- उदा. टायरपासून चप्पल तयार करणारे-अगदी खरे वाटावेत असे पुतळे इथे बघायला मिळतात. आज हे स्थळ पर्यटकांचं आकर्षण केंद्र आहे आणि तिथल्या छोटय़ा दुकानात कू ची लिहिलेले मगज्, टी-शर्टस् वगैरे घ्यायला लोकांची गर्दी होते.

दुसरा दिवस मेकाँग नदीवर नौकाविहाराचा होता. हॉटेलपासून धक्क्य़ापर्यंतचा रस्ता म्हणजे दुतर्फा लांबवर पसरलेली हिरवीगार भातशेती आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुललेला पिवळाधमक बहावा. मधून मधून भेटणाऱ्या जलाशयांमध्ये फुललेली टपोरी कमळे लक्ष वेधून घेत होती. धक्क्य़ावरून जरा मोठय़ा बोटीत बसून आपण एका दाट वृक्षराजी असलेल्या हिरव्यागार बेटावर जातो. तिथे असंख्य प्रकारच्या झाडांमधून मनसोक्त फिरून, अनेक ओळखीच्या आणि अनोळखी फळांचा- उदा. ड्रॅगन फ्रूट आणि हनी टीचा आस्वाद घेऊन, थोडा स्थानीय संगीताचा आनंद घेऊन आपण एका लांबुळक्या, पण छोटय़ा बोटीत स्वार होतो. त्यात आपण दोघं आणि नावाडी, एवढेच. दाट खारफुटीमधून वाहणाऱ्या अरुंद कालव्यातून ही सफर होते. धक्क्य़ापर्यंत जाताना आपल्याला केरळच्या बॅकवॉटर्सची आठवण येते.

हो ची मिन्ह सिटीतील वॉर म्युझियम पाहून मात्र अगदी गलबलून येते. अमेरिकेने केलेल्या विध्वंसाच्या खुणा छायाचित्रांतून दिसतात. त्याबरोबरच वॉशिंग्टन डी. सी.मधील एका लांबलचक काळ्या दगडाच्या भिंतीवर कोरलेली व्हिएतनाम युद्धात कामी आलेल्या अमेरिकन हुतात्म्यांची यादी आठवते. आणि अमेरिकेने या युद्धातून नक्की काय साध्य केलं, हा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही.

हो ची मिन्ह सिटी सोडण्यापूर्वी आम्ही तेथील नोत्रेदाम चर्च, पोस्ट ऑफिस वगैरे बाहेरूनच बघितलं. चायना टाऊनमधील बुद्ध मंदिरही प्रेक्षणीय आहे. इथे अजूनही पूजाअर्चा चालते. सोनेरी रंगाचा वापर ठिकठिकाणी मुबलक प्रमाणात केलेला आढळतो.

फ्रेंचांनी व्हिएतनामचे उत्तर आणि दक्षिण असे दोन भाग केले. पण ते तिथल्या जनतेला रुचले नाही. हो ची मिन्ह हे इथले देशभक्त व कुशल प्रशासक होते. त्यांच्या नावावरूनच दक्षिण व्हिएतनाममधील सायगाव शहराचे नाव बदलून ‘हो ची मिन्ह सिटी’ करण्यात आले आहे. उत्तर व्हिएतनामधील हनोई ही आता त्यांची राजधानी आहे. हो ची मिन्ह सिटी ते हनोई दोन तासांचा विमानप्रवास आहे. इथल्या इमारतींवर फ्रेंच वास्तुकलेचा स्पष्ट प्रभाव जाणवतो. प्रचंड मोठय़ा क्षेत्रात पसरलेलं हो ची मिन्हचं स्मारक बाहेरूनच बघायला मिळालं. त्याचवेळी नेमका त्यांचा ‘चेन्ज ऑफ गार्डस्’चा सोहळाही अनुभवायला मिळाला.

इथला दुसरा प्रशासक ठॠ ऊ्रल्लँ ऊ्रीे हा एका भव्य महालात राहत असे. या वास्तूत त्याचे शयनगृह, भोजनगृह, मीटिंग रूम, ग्रंथालय, एका गच्चीवर हेलिकॉप्टर उतरण्यासाठी हेलिपॅड हे सारे त्याच्या विलासी जीवनशैलीची साक्ष देतात. या पाश्र्वभूमीवर एका मोठय़ा पार्कमध्ये निसर्गरम्य वातावरणात साधं, लहानसं २३्र’’ ँ४२ी – जे हो ची मिन्हचं निवासस्थान होतं- त्याचा साधेपणा अधोरेखित होतो. या पार्कमध्ये असंख्य प्रकारची झाडं आहेत. एक सिंगल पिलर पॅगोडाही वर जाऊन बघता येतो.

त्या संध्याकाळी वॉटर पपेट शो बघायचा आहे असं कळलं. पाण्याचा आभास निर्माण केला असेल असं वाटलं होतं. पण तुडुंब भरलेल्या प्रेक्षागृहात समोर साधारण १० x १२ फुटांचा मंच म्हणजे साक्षात पाण्याचा हौदच होता. त्याच्या तिन्ही बाजूंनी पडदे होते आणि त्यामागून येऊन विविध प्रकारच्या बाहुल्यांनी सुंदर लयदार नृत्यं सादर केली. कार्यक्रमाच्या शेवटी त्या बाहुल्यांना नाचवणारे कलाकारही पडद्यामागून त्या पाण्यात प्रेक्षकांना अभिवादन करायला आले. निवेदन मात्र सर्व स्थानीय भाषेत होतं. इथलं ळीेस्र्’ी ऋ छ्र३ी१ं३४१ी म्हणजे चिनी विद्वान कन्फ्यूशियस याने स्थापन केलेलं विद्यापीठ आहे. सुबक, सुंदर इमारतींना तशाच आखीवरेखीव बागांची जोड आहे. तिथे शिक्षण घेतलेल्यांची नावेही कोरली आहेत. इमारतींमध्ये सोनेरी-पिवळ्या रंगांची उधळण आहे. इथली बुद्ध मंदिरं प्रेक्षणीय आहेतच; पण एका पॅगोडामध्ये आडव्या बुद्धाची आणि बसलेल्या लाफिंग बुद्धाची अशा दोन प्रचंड मूर्ती लक्ष वेधून घेतात.

शेवटचा दिवस ऌं’ल्लॠ इं८ चा होता. प्रशांत महासागरावरून जवळजवळ दोन तासांचा बोटीचा प्रवास करून आपण ज्या डोंगरांजवळ पोहोचतो, त्यात प्रचंड आकाराच्या चुनखडीच्या गुहा आहेत. या गुहांमध्ये चढत, उतरत आपल्याला विविध आकार धारण केलेले  २३ं’ंॠ्रे३ील्ल दिसतात. त्यातून आपण आपल्या मनातील आकार शोधावा. या गुहांमध्ये वावरणे सोपे व्हावे म्हणून मंदशी प्रकाशयोजना केलेली आहे. हा निसर्गाचा चमत्कार जवळजवळ शंभर वर्षांपूर्वी उघडकीस आला असे म्हणतात. सारखं चढून, उतरून दमछाक होते. पण काहीतरी विलक्षण पदरी पडल्याचं समाधानही मिळतं. आजूबाजूला अनेक डोंगर पाण्यात ध्यानस्थ बसल्यासारखे दिसतात.

हा संबंध दिवसाचा कार्यक्रम आटोपून परत येताना आम्ही एका सिरॅमिकच्या कारखान्याला भेट दिली. भव्य शोरूममधील सुबक वस्तू बघूनच समाधान मानावं लागलं. कारण सामानाचं वजन वाढायची भीती! तसा व्हिएतनाममध्ये खरेदीला भरपूर वाव आहे. यात नाजूक भरतकाम केलेल्या, रंगीबेरंगी लहान-मोठय़ा बॅगांचा समावेश करावा लागेल. सुबक खेळण्यातल्यासारख्या लाल-काळ्या सायकली  आणि इथल्या रस्त्यांवर चालणाऱ्या सायकल रिक्षांच्या प्रतिकृतीही लक्ष वेधून घेतात. या रिक्षांचा चालक सवाऱ्यांच्या मागे बसतो. ताणलेले संबंध असूनही अमेरिकन डॉलर सगळीकडे आनंदाने स्वीकारला जातो. या लोकांनी रोमन लिपी स्वीकारली आहे, पण रस्त्यावरील सर्व पाटय़ा स्थानीय भाषेतच आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हॉटेलच्या खिडकीतून भल्या सकाळी दुचाक्यांवरून फळं-फुलं वाहून विकायला नेणारे दिसतात. माणसं एकंदर मेहनती असावीत. इतक्या लहान देशाने अल्प काळात लक्षणीय प्रगती केली आहे. गाइड व हॉटेलमधील कर्मचारी बऱ्यापैकी इंग्रजी बोलत असले तरी एकंदर जनतेला इंग्रजीचा फारसा गंध नाही. इथे उत्तम भारतीय शाकाहारी जेवण देणारी रेस्टॉरंट्स आहेत. आपल्यापासून फार लांब नसलेल्या या देशात भारतीय पर्यटक मात्र अभावानेच आढळतात.