मीभारत सोडला आणि सर्वप्रथम एक वर्ष ऑस्ट्रेलियामध्ये राहिले. त्यानंतर स्कॉटलंडला आले आणि इथलीच झाले. या दोन्ही देशांत विद्यापीठांमध्ये संशोधन साहाय्यक म्हणून काम केले आणि अलिबाबाचा प्रचंड lok03खजिनाच असल्यासारखे संशोधनाचे अथांग विश्व माझ्यासमोर खुले झाले. आयुष्यात करण्यासारखे आणि शिकण्यासारखे कितीतरी आहे हे प्रकर्षांने जाणवले. आपले ज्ञान किती खुजे आहे आणि नवीन ज्ञान मिळवण्यात आणि संशोधन करण्यामध्ये किती आत्मिक आनंद साठवलेला आहे हे समजून आले. हा आत्मिक आनंद अधिकाधिक मिळवता यावा म्हणून संशोधनात पदवी (डॉक्टरेट) घेण्याचे मी ठरवले. शिष्यवृत्तीसह मला पीएच. डी.ला प्रवेश मिळाला आणि माझा एक सुंदर प्रवास सुरू झाला. पीएच. डी.च्या पाच वर्षांच्या प्रवासात मी अनेक गोष्टी शिकले. ‘पब्लिक एंगेजमेंट विथ सायन्स’ हा त्यातलाच एक भाग. आपले संशोधन सामान्य नागरिकांना समजावून सांगणे आणि या संशोधनामुळे त्यांच्या आयुष्यात कसा फरक पडणार आहे, हे सोप्या भाषेत त्यांना विशद करून सांगणे म्हणजेच ‘पब्लिक एंगेजमेंट विथ सायन्स.’    
ब्रिटनमध्ये ‘पब्लिक एंगेजमेंट विथ सायन्स’ अतिशय महत्त्वाचे आणि अतिशय लोकप्रियसुद्धा आहे. ब्रिटिश सरकार संशोधनावर लाखो पौंड खर्च करीत असते. हा पैसा करदात्यांमुळे उभा राहतो. आपला पैसा संशोधक कसा वापरतात, हे जाणून घेण्याचा करदात्यांना अधिकार असतो. संशोधकांना आपल्या जबाबदारीची जाणीव राहावी म्हणून, त्याचप्रमाणे संशोधकांशी संवाद साधल्याने सामान्य नागरिकांना उच्च शिक्षणाचे आणि संशोधनाचे महत्त्व कळावे, या विचारातून ‘पब्लिक एंगेजमेंट विथ सायन्स’ची संकल्पना पुढे आली. सामान्य नागरिकांशी संवाद साधल्यामुळे आपले संशोधन आणि संशोधनाच्या पद्धती शास्त्रज्ञांना पुनश्च तपासून घेता येतात. त्यातून सामान्य नागरिकांना काय हवे आहे, ते कळते आणि त्याप्रमाणे आपल्या संशोधनाची दिशा ठरवता येते. परंतु या प्रक्रियेमध्ये केवळ शास्त्रज्ञांनाच फायदा होत नाही, तर सामान्य जनतेमध्येही विज्ञानाविषयीची आवड आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी असे उपक्रम खूप उपयुक्त ठरतात.  
‘पब्लिक एंगेजमेंट विथ सायन्स’ हा इंग्लंडच्या संस्कृतीचा एक भागच आहे असे म्हटले तरी अजिबात गैर ठरणार नाही. दरवर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये इंग्लंडमधील कोणत्यातरी एका शहरात साजरा होणारा ‘ब्रिटिश सायन्स फेस्टिव्हल’ हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. इंग्लंडमध्ये साजरा केला जाणारा असाच आणखी एक उत्सव म्हणजे ‘नॅशनल सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग वीक.’ हा विज्ञानोत्सव सर्व शहरांमध्ये मार्च महिन्यात साजरा केला जातो. विज्ञानप्रेमींसाठी खूप मोठी पर्वणी असणारे हे उपक्रम ब्रिटिश सायन्स असोसिएशनतर्फे राबविले जातात. आठवडाभर चालणाऱ्या विज्ञानोत्सवांचे कार्यक्रम अतिशय भरगच्च, माहितीपूर्ण, नावीन्यपूर्ण आणि रंजक असतात. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित हे विषय घेऊन वैविध्यपूर्ण भाषणे, प्रदर्शने, कार्यशाळा यांचे आयोजन या विज्ञानोत्सवांतून केले जाते. स्थानिक विद्यापीठे आणि शाळा या आयोजनात उत्साहाने भाग घेतात. स्थानिक सरकार तसेच अनेक उत्साही स्वयंसेवक या विज्ञानोत्सवांना भरभक्कम पाठिंबा देतात. या भरगच्च अशा उत्सवांमध्ये सर्व वयोगटांच्या लोकांसाठी काही ना काही तरी कार्यक्रम असतातच. माहिती, मनोरंजन, वादविवाद आणि नवीन संशोधन असे विषय घेऊन विज्ञानप्रेमींना आकर्षित केले जाते.
यातील बहुतांश कार्यक्रमांना प्रवेश विनामूल्य असतो. असे अनेक स्थानिक विज्ञानोत्सव यू.के.मध्ये विविध ठिकाणी, विविध वेळेला साजरे होत असतात. त्यामुळे  विविध शहरांतील विद्यापीठे आणि वैज्ञानिक संस्थांना या उपक्रमांमध्ये भाग घेण्याची संधी मिळते.
ब्रिटनमधील जनतासुद्धा अत्यंत उत्साहाने हे विज्ञानोत्सव साजरे करते. मला तर कित्येक असे उत्साही लोक भेटलेले आहेत, की जे दरवर्षी वेळात वेळ काढून, सुट्टय़ा घेऊन या उत्सवांतून सहभागी होतातच. अशा काही विज्ञानोत्सवांना हजेरी लावण्याची संधी मला मिळाली. या दोन्ही विज्ञानोत्सवांमध्ये मी विविध विषयांवरील भाषणे, प्रदर्शने आणि कार्यशाळांना उपस्थिती लावली. एका विज्ञानोत्सवात मला स्वयंसेविका म्हणून काम करण्याचीही संधी मिळाली. उत्सवासाठी येणाऱ्या लोकांना मदत करणे, विविध कार्यक्रमांचे संयोजन करण्यास मदत करणे अशा पद्धतीची कामे मला तिथे करता आली. या विज्ञानोत्सवांमुळे शिकण्यासारखे आणि जाणून घेण्यासारखे कितीतरी ज्ञान या जगात आहे याची जाणीव झाली. त्याचप्रमाणे आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा वापर आपण लोककल्याणासाठी कसा करू शकतो याची एक छोटीशी झलकही पाहायला मिळाली. सगळे संशोधक अगदी उत्साहाने अशा विज्ञानोत्सवांतून भाग घेऊन त्यांच्या संशोधनाची झलक आपल्याला द्यायला उत्सुक असतात. विज्ञानोत्सवांत भाग घेऊन मीही माझे संशोधन जनतेपुढे मांडले. आपल्या संशोधनास मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहिला की संशोधकांचा हुरूप दुणावतो असा माझा अनुभव आहे.   
दोन-तीन वर्षांपूर्वी अशाच एका स्थानिक विज्ञानोत्सवात मी आमच्या लॅबमधील काही लोकांबरोबर सहभाग घेतला होता. आम्ही आमच्यातच एक स्पर्धा आयोजित केली होती. सगळ्यांनी छोटय़ा छोटय़ा गटांमध्ये आपल्या संशोधनाचे केवळ नव्वद सेकंदांमध्ये वर्णन करायचे. त्यानंतर प्रेक्षकांकडून मतदान घेऊन ज्याचे वर्णन सर्वात अधिक रंजक असेल त्याला पंधरा-वीस मिनिटे आपल्या संशोधनाबद्दल माहिती देण्यास वेळ दिला जाणार होता. ही स्पर्धा आम्ही एकदा एका शाळेत, एकदा आमच्या विद्यापीठात आणि एकदा तर चक्क एका स्थानिक पबमध्ये आयोजित केली होती. सर्व ठिकाणी अतिशय एकाग्रतेने आमचे म्हणणे ऐकले गेले, आम्हाला निरनिराळे प्रश्न विचारले गेले. खूपच समृद्ध करणारा असा हा अनुभव होता. आपले काम अगदी साध्या-सोप्या भाषेत, पण रंजक पद्धतीने केवळ नव्वद सेकंदांत सांगणे फारच कठीण होते. त्या नव्वद सेकंदांसाठी आम्हाला एका आठवडय़ाची मेहनत घ्यावी लागली होती. हा झाला एक अनुभव! पण अशा अनेक कार्यशाळा, सर्वेक्षण, सेमिनार, पोस्टर प्रदर्शने यांतून भाग घेतल्यामुळे आमच्या संशोधनाचे विविध पैलू आम्हालाच नव्याने कळत गेले. त्याचप्रमाणे आपल्या श्रोत्यांचा वयोगट आणि अनुभव बघून सार्वजनिकरीत्या आम्ही आपल्या अभ्यासाबद्दल बोलायला शिकलो.
शास्त्रज्ञ आणि सामान्य जनता यांना एकत्र आणणाऱ्या, त्यांच्यात संवाद निर्माण करणाऱ्या आणि दोन्ही बाजूंना समृद्ध करणाऱ्या ‘पब्लिक एंगेजमेंट विथ सायन्स’ची संकल्पना इतर कोणत्या देशांत अस्तित्वात आहे की नाही याची माहिती मला नाही, परंतु भारतात जर अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात नसेल तर ते निश्चितच करायला हवे असे मला वाटते. त्यामुळे सामान्य लोकांमध्ये विज्ञानाविषयीची आवड आणि जागरूकता निर्माण होईल. आपण आजवर जे काही सार्वजनिक उत्सव साजरे करत आलो आहोत, त्या व्यासपीठांचासुद्धा वापर विज्ञानोत्सव घडविण्यासाठी झाला तर खूप चांगला पायंडा पडायला मदत होईल. शाळांमध्ये अशा कार्यक्रमांचे आयोजन केले तर विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, गणित या विषयांमधील संशोधनाबद्दल स्वारस्य निर्माण होण्यास नक्कीच मदत होईल. त्याचप्रमाणे उच्च शिक्षण आणि संशोधनाचे महत्त्व त्यांना लहानपणापासूनच कळेल. अनेक विद्यार्थी नुसत्या पदव्या घेऊनच थांबणार नाहीत, तर उच्च शिक्षणाचे ध्येयसुद्धा ठेवतील. असे चांगले उपक्रम आपल्या शिक्षणपद्धतीत अंतर्भूत केल्यास विद्यार्थ्यांसाठी ते निश्चितच फायदेशीर ठरतील.