‘लोकरंग’मधील सहजसुंदर लेखात अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी प्राणिमात्रांना मिळणारी पावसाची चाहूल कसकशी असते याचे अनेक दाखले दिले आहेत. ते त्यांच्या स्वानुभवांवर आधारीत आहेत. त्यांच्याकडूनच यासंदर्भात ऐकलेली ही एक हकिकत..
नवेगावबांधला इटाडोह नावाचे ७५ चौ. कि. मी. एवढा प्रचंड विस्तार असलेले एक तळे आहे. या तळ्यामध्ये समुद्रासारखी वादळेही होत असतात. तिथल्या कोळ्यांना सवळा माशाच्या मादीद्वारे समुद्रात वादळ केव्हा येणार, याबद्दलचा अंदाज बांधता येतो. सवळा माशाच्या मादीचे पोट चिरले की तिच्या अंडकोशावर २७ नक्षत्रांसाठीच्या २७ काळपट रेषा आढळतात. मात्र, ज्या नक्षत्रावर पाऊस किंवा वादळ येणार असेल, फक्त तेवढीच रेघ लाल रंगाची असते. त्या नक्षत्रावर तेथील कोळी मासेमारीसाठी जात नाहीत.
चितमपल्लींनी सांगितलेले अशासारखे अनुभव म्हणजे काही सिनेमा-नाटकाचा खेळ नव्हे; जो पाहिजे तेव्हा बघता येईल. त्यासाठी वर्षांनुवर्षे निसर्गाचे निरीक्षण करण्याची चिकाटी लागते. दुर्दैवाने त्यांच्या अशा काही अनुभवांना अवैज्ञानिक म्हणून उपेक्षिले जाते. याला काय म्हणावे?
– शशिकांत काळे, डहाणू रोड.

चिकित्सक लेख
‘लोकरंग’मधील (१९ मे) विनय हर्डीकरांचा ‘हास्यास्पद प्रहसन’ हा स्वातंत्र्योत्तर काळातील देशाच्या राजकारणाचा मागोवा घेणारा लेख म्हणजे त्यांच्यासारख्या क्रियावान कार्यकर्त्यांच्या अभ्यासूवृत्तीचा आणि चिकित्सक क्षमतेचा नुसताच आरसाच नाहीए, तर राजकारणाला आज लागलेले अनिष्ट वळण आपण सर्व मिळून बदलू शकू, हा दुर्दम्य आशावादही त्यात व्यक्त झालेला आहे.
निर्लज्ज सत्तास्पध्रेला आणि पशांच्या अर्निबध हैदोसाला जागरूक नागरिक पायबंद घालू शकतील असा केवळ विश्वास व्यक्त करूनच हर्डीकर थांबत नाहीत, तर त्यासाठी आपण आता प्रयत्न केले नाहीत तर इतिहासच काय, आपणही आपल्याला क्षमा करू शकणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
२०१४ साली येऊ घातलेल्या आगामी निवडणुकीत सुशिक्षित आणि सुसंस्कारित तरुणांनी पुढे यावे आणि पक्षीय राजकारणाचा विचार क्षणभर बाजूस ठेवून सत्याधिष्ठित राजकारणासाठी आपली उमेदवारी जाहीर करावी. अर्थात खुद्द विनय हर्डीकरांनीच हे आव्हान पेलले तर अधिक चांगले!
रवींद्र देसाई