News Flash

रेकॉर्ड प्लेयर

८० व्या दशकाच्या मध्यापर्यंत संगीतप्रेमी तरुणांची गाणे ऐकण्याची हौस भागवणारी हक्काची जागा म्हणजे इराण्याचे हॉटेल असे; जिथे मशीनमध्ये नाणे टाकून हवी ती (उपलब्ध असेल त्यातली)

| June 21, 2015 12:17 pm

८० व्या दशकाच्या मध्यापर्यंत संगीतप्रेमी तरुणांची गाणे ऐकण्याची हौस भागवणारी हक्काची जागा म्हणजे इराण्याचे हॉटेल असे; जिथे मशीनमध्ये नाणे टाकून हवी ती (उपलब्ध असेल त्यातली) तबकडी (Record) ऐकता येत असे. हे आजच्या पिढीतल्या, जगातले कुठलेही उपलब्ध संगीत कधीही, कुठेही ऐकू शकणाऱ्या तरुणाला अजब वाटू शकते. पण आजची ही ध्वनिमुद्रण, प्रक्षेपण आणि स्थल-कालनिरपेक्ष श्रवण करण्याची lok03प्रगती ज्या शिडीवरून झाली आहे, त्याची पहिली पायरी, तबकडीवर केलेले ध्वनिमुद्रण आणि ते ऐकवू शकणारा रेकॉर्ड प्लेयर हीच होती.
चित्र क्र. १ आणि २ मध्ये अतिजुना आणि जुना असे दोन रेकॉर्ड प्लेयर दिसतात. प्लेयर सुरू केल्यावर तबकडी गोल फिरू लागते आणि टाचणी असलेला हात तबकडीवर फिरू लागतो आणि आपल्याला तबकडीवर मुद्रित झालेले ध्वनी ऐकायला मिळतात. १८७७ मध्ये शोध लागलेला हा ‘फोनोग्राफ’, जवळ जवळ १०० वर्षे जगभरातल्या श्रोत्यांच्या सेवेत होता. आता परत त्याला मागणी येऊ लागली आहे.
शोधाची कहाणी – १८७७ मध्ये एडिसनने एक प्रयोग केला. दूरध्वनीच्या ऐकायच्या बाजूच्या पडद्याला त्यांनी एक टाचणी जोडली आणि ती टाचणी सरकणाऱ्या कागदावर टेकलेल्या अवस्थेत ठेऊन पडद्याची कंपने टाचणीमार्फत कागदावर कोरली. हे होते पहिले ध्वनिमुद्रण! ध्वनी हवेतील कणांच्या कंपनामुळे तयार होणाऱ्या लहरींच्या स्वरूपात असतो, हे माहीत असल्याने त्याने ते मुद्रण, दुसरी टाचणी वापरून पुन्हा ध्वनीच्या स्वरूपात ऐकता येईल हेही शोधले. यानंतर त्याने ‘फोनोग्राफ’ नावाचे यंत्र तयार केले. यामध्ये पितळी दंडगोल एका जस्ताच्या पातळ पत्र्यामध्ये लपेटलेला होता. तो दंडगोल हाताने गोल फिरवतानाच पुढे-मागे सरकवण्याची सोय होती. एका बाजूने ध्वनी तयार करून, तो पडद्यावर आपटून, त्या पडद्याची कंपने एका टाचणीमार्फत जस्ताच्या पत्र्यावर कोरली जातील अशी व्यवस्था केली. दंडगोल हाताने फिरवून, ध्वनी दंडगोलावरील पातळ पत्र्यावर कोरून त्याने ध्वनिमुद्रण केले. याच ध्वनिमुद्रणावरून त्याने दुसरी टाचणी फिरवून ती एका पडद्याला जोडून तयार होणारी कंपने, विस्तारकामधून (Amplifier) ध्वनी वर्धकाकडे पोचवल्यावर मुद्रित केलेला ध्वनी ऐकू आला. त्याने प्रथम मुद्रित केलेले आणि ऐकलेले शब्द होते- ‘मेरी हॅड अ लिटिल लँब!’ ही बालकविता.
हा शोध नवीन दालन उघडणारा होता. यात ध्वनिमुद्रित करणे आणि ऐकणे अशी दोन्ही कामे होत होती. पण फोनोग्राफ हाताळण्यास अवघड असल्याने आणि जस्ताच्या पत्र्यावरील ध्वनिमुद्रण जास्त काळ टिकत नसल्याने, त्याचे म्हणावे तसे व्यापारीकरण झाले नाही. एडिसननेही त्यावर पुढे फार काम केले नाही. पण एमिल बर्लिनेर या जर्मन शास्त्रज्ञाने त्यावर अधिक संशोधन करून १८८७ मध्ये ‘ग्रामोफोन’ तयार केला. त्यात त्याने दंडगोलावरील पत्र्याऐवजी कडक रबराची (नंतर शेलॅकची) ध्वनिमुद्रण केलेली (कोरलेली) तबकडी फिरवून ध्वनी निर्माण करण्याची यंत्रणा दिली. ती तबकडी गोल फिरणाऱ्या थाळीवर ठेवून फिरवता येत असे.
या तबकडय़ा (ध्वनिमुद्रिका) कशा तयार होत असत ते पाहू.
चित्र क्र. ३ मध्ये दाखवल्याप्रमाणे ३ प्रकारच्या तबकडय़ा तयार होत असत. तबकडीच्या एका मिनिटात किती फेऱ्या (RPM-Revolutions per minute) होतात त्यावरून त्यांचे ३ प्रकार होते.
१. ७८ rpm- १९५०च्या दशकाच्या अखेपर्यंत या प्रकारच्या तबकडय़ा तयार होत असत. त्यावर सुमारे ५ मिनिटांचे ध्वनिमुद्रण असे. या तबकडय़ा शेलॅक (एक रासायनिक द्रव्य)च्या बनविलेल्या होत्या.
२. ३३.३ rpm किंवा LP (Long Play)- या तबकडय़ा १९४८च्या सुमारास बाजारात आल्या. यावर २५ मिनिटांचे ध्वनिमुद्रण होत असे. या पॉलीव्हिनील क्लोराईड ऊर्फ व्हिनीलपासून बनवलेल्या असत.
३. ४५ rpm किंवा EP(Extended Play)- १९४९ च्या सुमारास बाजारात आलेल्या तबकडय़ांवर १०-१५ मिनिटांचे ध्वनिमुद्रण होत असे.
ध्वनिमुद्रित तबकडी तयार करण्याच्या पद्धतीची मूळे थेट एडिसनपर्यंत जाऊन भिडतात. कशी तयार होते ही तबकडी?
प्रथम अल्युमिनियमची थाळी घेऊन त्यावर लॅकरचा (एक रासायनिक द्राव) थर दिला जातो. ही थाळी मुद्रण यंत्रामध्ये नेवून त्यावर ध्वनीलहरींच्या दर्जानुसार खाच कोरली जाते. ही खाच थाळीच्या कडेपासून सुरू होऊन मध्यबिंदूपर्यंत सलग असते.
या खाच पाडलेल्या थाळीवर टीन क्लोराईड आणि द्रव चांदीचा थर दिला जातो. त्यामुळे चांदी लॅकरच्या थरावर घट्ट चिकटते. या थाळीवर काही रासायनिक प्रक्रिया करून नंतर चांदीची थाळी लॅकरच्या थरापासून वेगळी केली जाते. ही चांदीची तबकडी म्हणजेच ‘‘मूळ तबकडी’’ (Master Record). यावर खाचांच्या बरोबर उलट असे उंचवटे असतात. ही मूळ तबकडी वापरून त्याच्या प्रती काढल्या जातात.
प्रती काढण्याकरिता पॉलीव्हिनील क्लोराईड ऊर्फ व्हिनीलच्या छोटय़ा लाद्या वापरतात. व्हिनीलची लादी आणि मूळ तबकडी एका दाब यंत्रामध्ये ठेवून त्यावर १९० अंश उ तापमानाला १०० टनाचा दाब देऊन व्हिनीलची योग्य आकाराची तबकडी बनवतात आणि मूळ तबकडीचा ठसा खाचांच्या स्वरूपात त्यावर उमटवतात.
अशा पद्धतीने तयार झालेल्या प्रतीचा काटछेद (Cross section) चित्र क्र. ४ मध्ये दाखवला आहे.
ध्वनिमुद्रित तबकडी ऐकण्यासाठी रेकॉर्ड प्लेयर (चित्र क्र. २) वापरतात. चित्रात दाखवल्याप्रमाणे, तबकडी रबर/ प्लास्टिकचे आवरण असलेल्या फिरणाऱ्या थाळीवर पकडून ठेवली जाते.
चित्रात दाखवलेल्या हातावरील टाचणी (ही रत्नं किंवा तत्सम कडक धातूपासून बनवलेली असते) असलेल्या डबीची रचना चित्र क्र. ५ मध्ये दाखवली आहे.
तबकडी थाळीवर फिरू लागली की ही टाचणी तबकडीवरील खाचेतून फिरू लागते. खाचेच्या स्वरूपानुसार टाचणी हलल्यामुळे डबीतील पडदा कंप पावू लागतो. या कंपनांचे चुंबकीय क्षेत्रातील तार वेटोळ्यामुळे विद्युत संकेतामध्ये रूपांतर होते.
विद्युत संकेत विस्तारकामध्ये ताकदवान बनवले जातात आणि ध्वनिवर्धकाकडे पोचवले जातात.
मुद्रित केलेला ध्वनी आपण ऐकू शकतो.
१९७०च्या दशकात ध्वनिफितीचा शोध लागला आणि रेकॉर्ड प्लेयरला पर्याय तयार झाला. यातील प्रगतीमुळे आज ध्वनी ऐकण्यासाठी ध्वनिफीत, CD, DVD, DIGITAL असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
दीपक देवधर – pdeodhar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2015 12:17 pm

Web Title: record player
Next Stories
1 आकाशवाणी (रेडिओ)
2 इन्व्हर्टर
3 विजेची घंटा (Electric Bell)
Just Now!
X