प्रकाश मगदूम prakashmagdum@gmail.com

महात्मा गांधीजींच्या ऐतिहासिक दांडी यात्रेला १२ मार्च २०२० रोजी ९० वर्षे होत आहेत. त्यानिमित्त रुपेरी पडद्यावर चित्रित झालेल्या दांडी यात्रेचे केलेले स्मरण..

Sarbajeet singh
सरबजित सिंगच्या मारेकऱ्याची पाकिस्तानात हत्या; मुलगी म्हणते, “हा न्याय…”
Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
Accused in gang rape case
सामूहिक बलात्कार प्रकरणातील नऊ वर्ष पसार असलेल्या आरोपीला अटक
young man murdered by throat slit in Ichalkaranjit two accuse were arrested
इचलकरंजीत क्षुल्लक कारणातून तरुणाचा गळा चिरुन खून; दोघांना अटक

भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील ‘दांडी यात्रा’ हे एक स्वयंप्रकाशित प्रकरण आहे. दांडी यात्रेची संकल्पना, नियोजन आणि अतिशय यशस्वी असे आयोजन हे महात्मा गांधीजींच्या नेतृत्वशैलीचे खूप उत्तम उदाहरण आहे. वयाच्या ६१व्या वर्षी ७८ लोकांना सोबत घेऊन २२० मलांची वाट ऐन उन्हाळ्यामध्ये तुडवून एक अन्यायकारक कायदा मोडायचा; आणि त्याद्वारे एका बलाढय़ सरकारी सत्तेला आव्हान देण्याची ही घटना जगाच्या तोपर्यंतच्या इतिहासातील अपूर्वच म्हणावी लागेल.

अशा या रोमहर्षक घटनेची दखल त्यावेळच्या चित्रपट कंपन्यांनी न घेतली तर ते नवलच! चित्रपटाच्या कथेमध्ये जसे क्षणोक्षणी बदल घडतात, नवीन घटनाक्रम सामोरे येतात आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवतात; त्याप्रमाणे या दांडी यात्रेच्या संपूर्ण कालावधीमध्ये नाटय़ भरलेले होते. हेच नाटय़ पडद्यावर चित्रित करण्यासाठी केवळ भारतीयच नाही तर परदेशी चित्रपट कंपन्याही पुढे आल्या. त्यांनी बनवलेली वृत्तचित्रे (न्यूज रिल्स) ही देश-विदेशांमध्ये असंख्य चित्रपटगृहामध्ये दाखवली गेली आणि त्याद्वारे लाखो लोकांनी ती पाहिली. अजूनही ती वेळोवेळी पाहिली जातात.

१९३० सालाच्या सुरुवातीपासूनच गांधीजी कोणत्या नवीन चळवळीची घोषणा करतात याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले होते. पण खुद्द गांधीजी स्वत: याबाबतीत संभ्रमावस्थेमध्ये होते. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर गांधीजींना जानेवारी महिन्यात साबरमती आश्रमामध्ये भेटले तेव्हा आपल्या या अवस्थेची कबुली गांधीजींनी दिली होती. ते अंधारामध्ये चाचपडत होते आणि आपल्या ‘आतल्या’ आवाजाची प्रतीक्षा करत होते. ही उत्कंठा अनेक पत्रकारांना आणि फिल्म कंपन्यांनाही लागलेली होती आणि त्यामुळे आपापले कॅमेरे घेऊन ते सर्व जण साबरमती आश्रमाभोवती घुटमळत होते.

दक्षिण आफ्रिकेतल्या यशस्वी ‘नाताळ लढय़ाचे हिरो’ म्हणून भारतात परतून गांधीजींना आता पंधरा वर्षे झाली होती आणि भारताच्या स्वातंत्र्य लढय़ाचे एकमेव नेते म्हणून गांधीजींना सर्वानी निर्वविादपणे मान्य केले होते. याच काळात भारतामध्ये चित्रपट उद्योगाची स्थापना झाली होती आणि अनेक चित्रपट कंपन्या सुरू होऊन वेगवेगळ्या विषयांवर सिनेमे बनवण्यास सुरुवात झाली होती. जरी पौराणिक कथांवर चित्रपट बनवण्यावर जोर असला, तरी समाजात घडणाऱ्या अनेक प्रासंगिक विषयांवर माहितीपट बनवणेही सुरू झाले होते. त्यामुळे गांधीजींचे १९१५ साली झालेले भारतातील आगमन आणि त्याच्या आधी दोन वर्षे सिनेमा उद्योगाची १९१३ साली दादासाहेब फाळके यांनी रोवलेली मुहूर्तमेढ या जवळपास समकालीन घटना होत्या. जसजसे भारतीय राजकारणातील गांधीजींचे महत्त्व वाढत गेले, तसतसे त्यांच्या हालचाली फिल्म कॅमेऱ्यामध्ये टिपण्यास चित्रपट कंपन्यांनी सुरुवात केली. अर्थात, गांधीजींचे चित्रपट कलेविषयीचे मत प्रतिकूल असले तरी भारतीय जनतेचा सर्वमान्य नेता म्हणून त्यांची छबी रुपेरी पडद्यासाठी चित्रित करण्यासाठी त्यावेळच्या बहुतेक चित्रपट कंपन्या तयार होत्या.

५ मार्च १९३० रोजी जेव्हा गांधीजींनी आपल्या ‘आतल्या’ आवाजाला हाक देऊन मिठाच्या सत्याग्रहाची जाहीररीत्या प्रथम घोषणा केली, तेव्हा त्यांच्या काँग्रेसमधील सहकाऱ्यांना धक्काच बसला. बऱ्याच जणांना ही कल्पना खुळचट वाटली! ब्रिटिश सरकारधार्जण्यिा ‘स्टेट्समन’ वर्तमानपत्राने तर या सत्याग्रहाची संभावना बालिश आणि हास्यास्पद अशी केली. असे असूनसुद्धा गांधीजींबाबत आणि एकूणच मिठाच्या सत्याग्रहाबाबत नेमका काय निर्णय घ्यावा हे ब्रिटिश सरकारला उमगले नाही. गांधीजींना विनाकारण सुरुवातीलाच अटक करून त्यांना हिरो बनवण्यापेक्षा ही खुळचट कल्पना आपोआपच फ्लॉप होईल अशी त्यांची समजूत झाली. पण ही जगावेगळी कल्पना किती विलक्षण होती याचा पूर्ण विश्वास गांधीजींना होता; आणि त्यातील अंगभूत सस्पेंस आणि नाटय़मयतेची खात्री चित्रपट कंपन्यांना होती.

१२ मार्च १९३०च्या पहाटे साडेसहा वाजता गांधीजींनी आपली बांबूची काठी हातात घेतली. कमरेच्या पंचाला त्यांचे प्रसिद्ध घडय़ाळ अडकवले होते आणि प्रार्थना गीतांच्या तालावर साबरमती आश्रमातून त्यांनी आपले पाऊल उचलले. हा क्षण टिपण्यासाठी डझनभर चित्रपट कंपन्या त्यांचे कॅमेरे घेऊन सज्ज होत्या. त्यासोबत लागणारी उपकरणे वाहून नेण्यासाठी या चित्रपट कंपन्यांचे अनेक ट्रक उभे होते. भारतातील चित्रपट कंपन्या तर होत्याच होत्या, पण ब्रिटिश मूव्हीटोन (इंग्लंड), पाथे (फ्रान्स), पॅरामाऊंट आणि युनिव्हर्सल (अमेरिका), फॉक्स मूव्हीटोन, जे आर्थर रँक, डॉयशे ओकेन्श्यू (जर्मनी) यांसारख्या परदेशी फिल्म कंपन्याही जातीने उपस्थित होत्या.

मूकपटाच्या जमान्यात स्टंट चित्रपट बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या भोगिलाल दवे यांच्या शारदा फिल्म कंपनीने ‘महात्मा गांधींची स्वातंत्र्यासाठी यात्रा’ या शीर्षकाचा दोन रिळांचा २१०० फूट लांबी असलेला माहितीपट बनवला. तसेच मूकपटाच्या युगातील एक प्रमुख स्टुडिओ असलेल्या श्री कृष्ण फिल्म कंपनीने ‘महात्मा गांधींची ऐतिहासिक यात्रा’ १२ मार्च १९३० (Mahatma Gandhi’s Historic March, 12th March1930) या नावाचा दोन रिळांचा आणि १९९३ फूट लांबीचा माहितीपट बनवला. हे दोन्ही माहितीपट दुसऱ्याच दिवशी म्हणजे १३ मार्च १९३०ला मुंबईच्या सेन्सॉर बोर्डाने पहिले प्रसिद्ध निर्माते चंदुलाल श्हा यांच्या श्री रणजीत फिल्म कंपनीने ‘महात्मा गांधींची यात्रा १२ मार्च १९३० अहमदाबाद’ या नावाने ६६० फूट लांबी असलेला माहितीपट तयार केला. सेन्सॉर बोर्डाने १९ मार्च १९३० रोजी काहीही काटछाट न करता या तिन्ही माहितीपटांच्या प्रदर्शनासाठी परवानगी दिली. परंतु याच विषयावर काही दिवसानंतर बनवलेल्या दोन माहितीपटांच्या नशिबात हे भाग्य नव्हते. ‘दांडी येथील सविनय कायदेभंग ६ एप्रिल १९३०’ आणि ‘दांडी येथील सविनय कायदेभंग ७ एप्रिल १९३०’ असे शीर्षक असलेल्या दोन माहितीपटांवर मुंबई सेन्सॉर बोर्डाने बंदी घातली. २२ एप्रिलच्या आदेशाद्वारे बंदी घालताना कारण दिले गेले की, हे माहितीपट सरकारविरोधी आहेत आणि कायदा व सुव्यवस्था मोडण्यास प्रोत्साहन देणारे आहेत. युनिव्हर्सल कंपनीने तयार केलेल्या रीळ नं. ३८ आणि ४४ या माहितीपटांमधील गांधीजींची दांडी येथील सर्व दृश्ये सेन्सॉर बोर्डाने कापण्याचा आदेश दिला. हर्स्ट मेट्रोटोन कंपनीच्या रीळ नं. ३९ मधील गांधीजींच्या दृश्यांनाही कात्री लावण्यात आली. १९४० मध्ये तमिळ भाषेत बनलेल्या ‘उत्तम पुथिरन’ या टी. आर. सुंदरम् यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटामध्ये गांधीजींचा उल्लेख तर आहेच, पण त्यांच्या दांडी यात्रेचा संदर्भ दाखवणारी दृश्येदेखील आहेत. ‘पादांडी मुंडुकु’ या १९६२च्या तेलुगू चित्रपटात दांडी यात्रेचा आणि मिठाच्या सत्याग्रहाचा उल्लेख आहे. व्ही. मधुसूदन राव यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात गांधी आणि नेहरू भाषण करतानाची दृश्ये समाविष्ट केली गेली होती. अर्थात, रिचर्ड अ‍ॅटनबरो यांच्या ‘गांधी’ सिनेमाला विसरून कसे बरे चालेल! एका संथ कथेला नाटय़मय वेग येऊन प्रेक्षकांना गुंग करायला लावणारी दांडी यात्रेची दृश्ये या सिनेमाचे खास आकर्षण होते. त्याचबरोबर यात्रा घडताना त्यावेळच्या वर उल्लेख केलेल्या फिल्म कंपन्यांनी केलेले कव्हरेज याचीही दृश्ये पाहायला मिळतात.

अमिताभ बच्चन यांचा ‘कुली’ सिनेमा त्यांच्या सेटवर झालेल्या जीवघेण्या अपघातासाठी सर्वाच्याच लक्षात आहे. पण त्या सिनेमात एक सीन आहे, ज्यामध्ये नायिका अमृता सिंग ही बच्चनला साखळदंडाने बांधून चाबकाने फोडून काढते आणि त्या जखमांवर मीठ चोळते. पण नायक हुं की चूं करत नाही आणि उलट उत्तर देतो की, ‘या मिठासाठी महात्मा गांधीजींनी सत्याग्रह केला होता. त्या सत्याग्रहामध्ये जे रक्त सांडले होते त्याप्रमाणे माझेही रक्त त्या पवित्र रक्तात मिसळले आहे आणि निष्ठावान सत्याग्रहींसारख्या मलाही काही वेदना होणार नाहीत.’ जनमानसाची नाडी माहीत असलेल्या दिग्दर्शक मनमोहन देसाईंनी अतिशय बेमालूमपणे या प्रसंगाद्वारे प्रेक्षकांच्या भावना जागवल्या आहेत. ही काही उदाहरणे दांडी यात्रेची महती चित्रपट पडद्यावर कशी उमटली हे दाखवतात.

७७ वर्षे उलटून गेल्यानंतरही दांडी यात्रेची मोहिनी चित्रपटकर्त्यांवर अजूनही तशीच आहे, याचे प्रत्यंतर २००८ साली ‘ळँी रं’३ र३१्री२’ या हिंदी, इंग्रजी आणि गुजराती अशा तीन भाषांत बनलेल्या डॉक्युमेंटरीमधून येते. दिग्दर्शक ललित वाच्छानी यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत मूळ दांडी यात्रेचा मागोवा घेण्यासाठी या संपूर्ण २२० मलांचा पुन्हा एकदा दौरा केला. जिथे जिथे गांधीजींची दांडी यात्रा थांबली, तिथे तिथे ही चित्रपट बनवणारी टीम गेली आणि त्यांनी तिथे मुक्काम केला. त्या नाटय़मय प्रसंगांना पुन्हा जिवंत करून सध्याच्या कालावधीच्या पार्श्वभूमीवर जोखण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न होता.

सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग असलेल्या मीठ या पदार्थाची सत्याग्रहासाठी निवड करणे हा गांधीजींचा मास्टर स्ट्रोक म्हणता येईल. अन्यायकारक कायद्याच्या विरोधात पूर्ण अिहसक पद्धतीने आंदोलन करण्यासाठी समाजाच्या सर्व थरातल्या लोकांना बरोबर घेऊन शांततापूर्वक चालत जाणे हा एक अभिनव प्रयोग होता. आणि तेही एक-दोन दिवस नाही तर तब्बल चोवीस दिवस. एखाद्या कुशल कलावंताप्रमाणे आणि चतुर चित्रपट निर्मात्यासारखे गांधीजींनी प्रत्यक्ष यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी पुरेशी वातावरण निर्मिती केलेली होती. त्यामुळे पहिल्या दिवसापासून या आंदोलनाला जी प्रसिद्धी मिळाली ती अभूतपूर्व अशी होती. दूरदूरच्या देशातून चित्रपट कंपन्यांचे प्रतिनिधी आले आणि त्यांनी केवळ गांधीजींचेच नाव चहू दिशेला पसरवले नाही, तर भारताच्या स्वातंत्र्य चळवळीची ओळख जगभरच्या जनतेला करून दिली. यात्रेच्या पुढच्या टप्प्यावर आधीच पोचून हे प्रतिनिधी आपल्या साधन सामुग्रीसह फुटेज घेण्यासाठी तयार राहायचे. येणारा प्रत्येक दिवस हा सस्पेन्सने भरला होता. गांधीजींना सरकार अटक करेल की नाही, सत्याग्रहींवर लाठीमार होईल की अन्य कोणती कारवाई होईल. यात्रेच्या मार्गावरची खेडी आणि तिथली जनता कशा पद्धतीने यात्रेला सामोरे जाईल अशा अनेक शक्यता होत्या. उत्कंठेने भारलेले क्षण होते आणि जोडीला गांधीजींचा तरुणालाही लाजवेल असा उत्साह होता. एका सभेच्या ठिकाणी तर गांधीजी त्यांच्याहून दहा वर्षांनी लहान असलेल्या सरोजिनी नायडूंना हात देऊन व्यासपीठावर चढायला मदत करताना उपलब्ध असलेल्या फुटेजमध्ये दिसतात. त्यामध्ये अशीही दृश्ये दिसून येतात की गांधीजी यात्रेमध्ये चालत नाहीत तर जवळपास धावताहेत आणि त्यांना साथ देण्यासाठी त्यांच्या इतर सहकाऱ्यांची तारांबळ उडालेली आहे! त्यांच्या या झपाटय़ामुळे यात्रेचा जथ्था पूर्ण तीन दिवस विश्रांती घेऊनसुद्धा नियोजित वेळेच्या एक दिवस अगोदर दांडी येथे पोचला. मार्गावरची त्यांची भाषणे आणि गावकऱ्यांबरोबर साधलेला संवाद तसेच यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत ही सगळी दृश्यचित्रे केवळ भारतभर नव्हे, तर जगाच्या कानाकोपऱ्यात दाखवली गेली. मुख्य सिनेमा सुरू होण्याअगोदर हे एक-दोन रिळांचे माहितीपट चित्रपटगृहांत दाखवले जायचे आणि त्याद्वारे दांडी यात्रा ज्या मुख्य चळवळीचा भाग होती ती सविनय कायदेभंगाची चळवळ लाखो लोकांपर्यंत पोचली.

गांधीजींचा उजवा हात असलेल्या पंडित नेहरूंना या संपूर्ण चळवळीच्या यशाबद्दल सुरुवातीला साशंकता होती. स्वातंत्र्य चळवळीचा मिठाशी काय संबंध होता हे त्यांनाच नव्हे तर अनेक काँग्रेस नेत्यांना उमगले नाही. त्याच नेहरूंनी कालांतराने डी. जी. तेंडुलकरांच्या सुप्रसिद्ध ‘महात्मा’ या चरित्र ग्रंथाची प्रस्तावना लिहिताना म्हटले की, त्यांच्या मनातील गांधीजींची सर्वात ठळक प्रतिमा ही दांडी यात्रेत हातात बांबूची काठी घेऊन चालतानाची आहे! अतिशय तरल आणि उत्कट अशा शब्दांत नेहरू या प्रतिमेचे वर्णन करताना लिहितात, ‘सत्याच्या शोधात निघालेला हा साधक, आत्ममग्न, दृढनिश्चयी आणि निर्भय- जो कुठल्याही परिणामांची तमा न बाळगता आपल्या ध्येयाकडे चालतच राहिला.’ गदिमांच्या ‘उचललेस तू मीठ मूठभर, साम्राज्याचा खचला पाया’ या अजरामर ओळींचे स्मरण करताना आपण दांडी यात्रेच्या नव्वदीनिमित्त म्हणू शकतो की, एक प्रखर देशभक्तीची लाट जी भारतभर पसरली आणि त्यामुळे या बलाढय़ साम्राज्याचा पाया खचला, त्यामध्ये एक खारीचा छोटासा वाटा दांडी यात्रेच्या पडद्यावरच्या हालत्या चित्रांचादेखील नक्की होता.

(लेखक राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक आहेत.)