२४ फेब्रुवारीच्या ‘लोकरंग’मध्ये ‘वेध.. व्हॅटिकनमधील सत्तांतराचा!’ हा माझा लेख प्रसिद्ध झाला. त्यावरील प्रतिक्रिया ३ मार्च रोजी आणि १० मार्च रोजी प्रसिद्ध झाल्या. त्या सर्व प्रतिक्रियांचा हा एकत्रित प्रतिवाद..
पो प बेनेडिक्ट सोळावे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर कॅथॉलिकपंथीय भाविकांना धक्का बसणे स्वाभाविक होते. त्या तशा वातावरणात माझा लेख त्यांना अनपेक्षित वाटणार, हे मी गृहीत धरले होते. (तथापि त्यांना तो ‘आक्षेपार्ह’, ‘पूर्वग्रहदूषित’, ‘निषेधार्ह’, ‘असंबद्ध’ वगैरे वगैरे वाटला, हे वाचल्यावर मात्र मी काळजीत पडलो. माझ्या मूळ लेखात एकही निराधार विधान मी केले नसल्यामुळे ‘त्या’ आघाडीवर माघार घ्यावी लागण्याचा प्रश्नच नव्हता. हे सारे ख्रिस्ती बांधव आपल्याच धर्मपीठाबद्दल, श्रद्धाकेंद्राबद्दल किती एकांगी विचार करत आहेत, याचे धक्कादायक चित्र या पत्रांमधून समोर आल्यामुळे मला त्यांची काळजी वाटू लागली. ख्रिस्ती चर्चचे सेवाभावी आणि अध्ययनशील असे जे रूप सातत्याने समाजासमोर ठेवले जाते, ते खरे आहे आणि अनुकरणीयही आहे, असे मानणारा मी एक हिंदुत्ववादी आहे. तथापि, त्या चर्चच्या अंतरंगात काळेबेरे आहे. व्हॅटिकनचा अंतर्गत सत्तासंघर्ष गेली कित्येक वर्षे निरनिराळ्या प्रसंगाप्रसंगातून प्रकाशझोतात येत राहिला आहे आणि पुरुष वर्चस्वाच्या कडेकोट बंदोबस्तात वावरणारी ही धर्मसत्ता स्त्रियांचे व मुलांचे शोषण करत असूनही त्याबद्दलची प्रकरणे दडपण्याचा प्रयत्न करत असते, ही त्या चित्राची दुसरी बाजूही तितकीच, किंबहुना काकणभर तरी अधिक खरी आहे. ही दुसरी बाजू माझ्या लेखातून सारखी डोकावत असल्यामुळे) या साऱ्या पत्रलेखकांना तो लेख बोचणे स्वाभाविक आहे. त्यामुळे हे सारे पत्रलेखक जाणूनबुजून किंवा भाबडेपणापोटी व्हॅटिकनचे जे विकृत रूप दडवून ठेवू इच्छित होते, तेच आता विस्ताराने मांडण्याची संधी मला मिळाली आहे.
अल्पवयीन मुलांचे ख्रिस्ती धर्मोपदेशकांकडून केले जाणारे लैंगिक शोषण आणि त्या संदर्भातील माहिती उघडकीस आल्यावरही केवळ दोषी नव्हे, तर गुन्हेगार असणाऱ्या धर्मोपदेशकांना चांगली अद्दल घडवणारी शिक्षा ठोठावण्यात व्हॅटिकनमधील उच्चपदस्थांना गेल्या वीस-पंचवीस वर्षांत आलेले अपयश.. हा माझ्या लेखातील एक महत्त्वाचा मुद्दा. ‘पोप महाशयांनी जी स्पष्ट भूमिका घेतली व कार्यवाही केली,’ त्याकडे मी ‘सोयीस्कर डोळेझाक’ केली आहे, असा नोबेल मेन यांचा आक्षेप आहे. आर्यलड हा कॅथॉलिकपंथीय महत्त्वाचा देश. २०११ साली शेवटी शेवटी त्या देशात व्हॅटिकनमधील आपली वकिलात बंद करण्याचा निर्णय घेतला, हे ठाऊक आहे की नाही याची मला कल्पना नाही. पण त्यांच्या माहितीसाठी त्या निर्णयामागे आर्थिक कारण सांगितले गेले असले, तरी हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे उघड गुपित आहे की, अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण करण्यास सोकावलेल्या कॅथॉलिक धर्मोपदेशकांना वठणीवर आणण्याऐवजी पाठीशी घालणाऱ्या व्हॅटिकनबद्दल सर्वसामान्य आयरिश जनतेत उफाळलेला असंतोष हेच परस्परसंबंधातील दुराव्याचे खरे कारण आहे. ही घटना मोठी असली आणि मला नोव्हेंबर २०११ पासूनच ठाऊकही असली तरीही शब्दमर्यादेचे भान असल्यामुळे मी ती मूळ लेखामध्ये उल्लेखलीसुद्धा नव्हती. आता डोळेझाक कोण करतो आहे, ते वाचकांनीच ठरवावे.
‘आफ्रो-आशियाई देशांमध्ये एड्ससारख्या रोगाच्या झालेल्या फैलावापासून ख्रिस्ती धर्मोपदेशकांचे संरक्षण व्हावे म्हणून भिक्षुणींचा असा वापर झाला, तर तो आक्षेपार्ह मानता येणार नाही’, अशी त्यांची (म्हणजे रॅट्झिंगर यांची) भूमिका होती. माझ्या लेखातील या वाक्यालाही असाच विनाकारण आक्षेप घेतला गेला आहे. या वाक्यातील एकेरी अवतरणामधील वाक्यांश रॅट्झिंगर यांचीच भूमिका थोडक्यात मांडतो, असे माझ्या लेखात मी स्पष्टपणे म्हटलेले असताना ‘सुवार्ता’चे संपादक फादर फ्रान्सिस कोरिया आपल्या पत्रात मलाच उलटा प्रश्न विचारतात, की ‘वरील विधान हे लेखकाचे स्वत:चे मत आहे की दुसऱ्या कुणाचे? ते जर दुसऱ्या एखाद्या लेखकाचे असेल, तर त्या लेखकाचा तसा नामोल्लेख होणे गरजेचे होते. जगद्विख्यात व्यक्तीविषयी लिहिताना कोणताही पुरावा न देता असे खोडसाळ विधान करणे योग्य नाही व ते शिष्टाचारालाही धरून नाही. अशा लेखामुळे भाविकांच्या धार्मिक भावना दुखावतात’.. माझा मूळ लेख फादर कोरिया यांनी नीट शांतपणे वाचण्याचे कष्ट घेतले असते, तर त्यांच्याच नजरेला हे आले असते, की त्यांना आक्षेपार्ह वाटणारे वाक्य ज्या परिच्छेदात आहे, त्यात मी आडपडद्याने नव्हे, तर सरळसरळ रॅट्झिंगर यांचे नाव घेऊन त्यांच्यावर टीका केली आहे. (मी असे लिहिले आहे, की, ‘महिलांच्या संदर्भातही कॅथॉलिक चर्चची प्रतिमा आता धवल राहिलेली नाही. गर्भपाताचा अधिकार महिलांना द्यावा, अशी मागणी जगभर जोर धरत असतानाही कॅथॉलिक चर्चची भूमिका मात्र जुनीपुराणीच राहिली आहे. ती कालसुसंगत व्हावी, असा प्रयत्न करण्याऐवजी रॅट्झिंगर यांनी भिक्षुणी म्हणून चर्चच्या सेवेत दाखल होणाऱ्या तरुणींच्या लैंगिक शोषणाकडेही दुर्लक्षच केले होते’..) कोरियांना आक्षेपार्ह वाटलेले ‘ते’ खोडसाळ विधान कुणाचे आहे, याबद्दल निदान मी तरी संशयाला जागाच ठेवलेली नाही. किंबहुना ‘त्या’ अवतरणातील वाक्यातून व्यक्त होणारी निषेधार्ह भूमिका रॅट्झिंगर यांची होती, असेच मी स्पष्टपणे म्हटले आहे. आता प्रश्न उरला तो पुराव्याचा, आधाराचा..
रॅट्झिंगर यांच्या त्या भूमिकेबद्दल सविस्तर आणि साधार विवेचन करणे मला शक्य आहे, पण ती भूमिका सोदाहरण स्पष्ट करायची झाली, तर विसाव्या शतकातील शेवटच्या दहा-पंधरा वर्षांपर्यंत मागे जावे लागेल आणि पोप जॉन पॉल दुसरे व त्यांचे निकटवर्ती सल्लागार असणारे जोसेफ रॅट्झिंगर या दोघांच्याही नेतृत्वाखाली चर्चने भिक्षुणींच्या लैंगिक शोषणाबद्दलच्या तक्रारींची कसकशी दखल घेतली (किंवा घेतलीच नाही) याचा लेखाजोखा मांडावा लागेल.
 फादर रेमंड रूमान यांनी आपल्या पत्रात ‘माझ्या लेखातील सत्यता पडताळून पाहणे आवश्यक आहे,’ अशी समंजस, विवेकी भूमिका प्रारंभी घेतली असली, तरी तशी कोणतीही पडताळणी न करताच ते माझा निषेधही करून मोकळे झाले आहेत. ‘त्या’ प्रदीर्घ कालावधीत ‘नॅशनल कॅथॉलिक रिपोर्टर’सारखी साप्ताहिके, ‘मिस्ना’(MISNA) ‘आदिस्ता’(Adista) यांच्यासारख्या  मिशनरी वा इटालियन धार्मिक वृत्तसंस्था, ‘ला रिपब्लिका’सारखी इटालियन वृत्तपत्रे चर्चमधील घडामोडींबद्दल वेळोवेळी जे वृत्तान्त वा अहवाल प्रसृत करत होती, ते माझ्यासारख्या एका ख्रिस्तेतर भारतीयाला अत्यंत संक्षिप्त स्वरूपात उपलब्ध होत होते. मग ती सारी वृत्ते किंवा ते सारे अहवाल माझ्या लेखाविरुद्ध प्रतिक्रिया व्यक्त करायला पुढे सरसावलेल्या या सगळ्या ख्रिस्ती श्रद्धांवंतांपर्यंत मात्र कसे पोचले नाहीत, याचेच आश्चर्य वाटते. निदान मार्च २००१पासून तरी व्हॅटिकनने भिक्षुणींच्या लैंगिक शोषणाची समस्या अस्तित्वात असल्याचे अधिकृतपणे मान्य केले आहे, हेसुद्धा या सर्वाना ठाऊक नाही काय?
कॅथॉलिक धर्मोपदेशकांच्या उज्ज्वल प्रतिमेला तडा जाईल, असे भिक्षुणींच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण १९९०पासून सातत्याने कमी-अधिक प्रमाणात व्हॅटिकनचा पिच्छा पुरवते आहे.
२० मार्च २००१ रोजी रोममधील चर्चसूत्रांच्या हवाल्याने असे वृत्त दिले गेले होते, की किमान २३ देशांमधील धर्मोपदेशक भिक्षुणींचे लैंगिक शोषण वर्षांनुवर्षे करत असल्याचे आज कॅथॉलिक चर्चने कबूल केले. त्यापूर्वी किमान सात वर्षे व्हॅटिकनमधील अधिकारीवर्गालाच ठाऊक असलेले काही गोपनीय अहवाल आणि काही अगदी ताजे अहवाल ‘नॅशनल कॅथॉलिक रिपोर्टर’च्या प्रतिनिधींनी हस्तगत केले होते आणि त्यांच्या आधारे कल्पनाही करता येणार नाही अशा लैंगिक शोषणाचे धर्मोपदेशकांचे ‘पाप’ उघडकीस आणले गेले होते. प्रामुख्याने आफ्रिकी देशांमधील तरुण भिक्षुणी धर्मोपदेशकांच्या वासनांच्या बळी ठरल्या होत्या, परंतु इतरही काही देशांमधील भिक्षुणींचा ही अत्याचारितांमध्ये समावेश होता.. सर्व ख्रिस्ती पत्रलेखकांच्या विशेष माहितीसाठी सांगतो, त्या अन्य देशांमध्ये इटली, आर्यलड, अमेरिका यांच्याप्रमाणेच फिलिपाइन्सचा आणि आपल्या भारताचाही समावेश होता. ‘‘आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करून कॅथॉलिक धर्मोपदेशक भिक्षुणींशी ‘जवळीक’ साधतात, कधीकधी अशा ‘जवळिकी’मुळे भिक्षुणींना दिवस जातात, ती बाब लक्षात आल्यावर संबंधित धर्मोपदेशक त्या भिक्षुणींवर दबाव आणतात आणि त्यांना गर्भपात करायला भाग पाडतात’’.. संततिनियमनाची साधने वापरू नयेत, असा ‘तत्त्वाधिष्ठित’ र्निबध आपल्या अनुयायांना सक्तीने पाळायला भाग पाडू पाहणारी कॅथॉलिक चर्चची यंत्रणा आपल्याच धर्मोपदेशकांकडून वारंवार घडणाऱ्या, वर्षांनुवर्षे घडत राहिलेल्या अत्याचाराची दखल कशी घेणार, हा महत्त्वाचा प्रश्न त्या गौप्यस्फोटानंतर प्रकर्षांने पुढे आला होता. ‘प्रिफेक्ट ऑफ दि सेक्रेड काँग्रिगेशन फॉर दि डॉक्ट्रिन ऑफ दि फेथ’ अशा जबाबदारीच्या पदावर १९८१ सालापासून आरूढ झालेल्या जोसेफ रॅट्झिंगर यांच्या विवेकबुद्धीला मिळालेले ते एक आव्हान होते. १९९१मध्ये एका ‘कम्युनिटी सुपिरिअर’कडे धर्मोपदेशकांनी ‘इंटिमेट फेव्हर्स’साठी भिक्षुणी पुरवल्या जाव्यात, अशी मागणी केली होती. ती प्रथम नाकारली गेली. तेव्हा धर्मोपदेशकांनी सांगितले, की ‘मग आम्हाला बायका धुंडाळत गावामध्ये फिरत बसावे लागेल आणि त्या तशा प्रकारात आम्हाला एड्स होण्याची शक्यता आहे’. अशी भीती घातल्यावर पहिल्या नकाराचे होकारात रूपांतर झाले आणि मग भिक्षुणींच्या शोषणाला काही धरबंधच राहिला नाही. आफ्रिकेतील एका धर्मप्रांताच्या प्रमुखांनी तर जाहीरपणे असे सांगितले, की ‘आफ्रिकी संदर्भात ब्रह्मचर्याचे पालन करणे याचा अर्थ लग्न न करणे एवढाच आहे. मुले होऊ न देणे असा काही त्याचा अर्थ नाही.’
‘कॅथॉलिक फंड फॉर ओव्हरसीज डेव्हलपमेंट’ या संस्थेची समन्वयक म्हणून काम पाहणाऱ्या सिस्टर मॉरा (Sister Maura O’Donohue) ओंदोनोहू यांनी पुढाकार घेऊन भिक्षुणींचा हा प्रश्न धसाला लावण्याचा प्रयत्न करून पाहिला. कार्डिनल मार्टिनेझ सोमालो यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यावाचून आणि धर्मोपदेशकांमध्ये जाणीव जागृती निर्माण करण्याची गरज तोंडपूजेपणाने मान्य करण्यावाचून व्हॅटिकनच्या उच्चपदस्थांनी काही केले नाही.
१९९८मध्ये ‘मदर सुपिरियर ऑफ दि मिशनरीज ऑफ अवर लेडी ऑफ आफ्रिका’ सिस्टर मेरी मॅक्डोनाल्ड यांनी पुन्हा एकदा वरिष्ठांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला. त्यांनी वरिष्ठांकडे सादर केलेला प्रबंधवजा अहवाल वाचून ताबडतोब १६ वरिष्ठांचे एक मंडळ नियुक्त करण्यात आले. त्या ज्येष्ठ बिशप्सपुढे नावनिशीवार तक्रारींचा पाढा वाचणाऱ्या सिस्टर मॅक्डोनाल्ड यांना आश्चर्याचा दु:खद धक्का बसला, कारण त्या बिशप्सनी तक्रारी करणाऱ्या सिस्टर्सनाच दोषी ठरवले होते, ख्रिस्तसेवा म्हणून धर्मोपदेशकांचा (कोणताही) आदेश मुकाटय़ाने पाळला नाही म्हणून! ‘धर्मोपदेशक ज्या बिकट परिस्थितीत धर्मकार्य पार पाडत असतात, तिचा विचार करता त्यांचा एड्ससारख्या भयानक व्याधीपासून बचाव व्हावा म्हणून भिक्षुणींचा वापर होत असेल, तर तो आक्षेपार्ह मानता येणार नाही,’ अशीच भूमिका व्हॅटिकनने म्हणजेच पोप जॉन पॉल दुसरे व कार्डिनल जोसेफ रॅट्झिंगर यांनी संयुक्तपणे घेतलेली होती. पोप झाल्यानंतरही बेनेडिक्ट सोळावे यांनी भूमिकेत बदल झाल्याचे कृतीतून दाखवून दिले नाही. भिक्षुणींचे लैंगिक शोषण केल्याबद्दल असंख्य धर्मोपदेशकांना बहिष्कृत केल्याची शिक्षाही त्यांनी जाहीरपणे दिली नाही किंवा भिक्षुणींच्या संघाला सांत्वनपर पत्रसुद्धा पाठवले नाही. हे कटू असले, गैरसोयीचे असले तरी सत्य आहे.
कॅथॉलिक चर्चच्या या विकृत भूमिकेमुळे धर्मनिष्ठ, श्रद्धावंत ख्रिश्चनांच्या धार्मिक भावना दुखावत नसतील, तर माझ्यासारख्या एका परधर्मीय लेखकाच्या एका लेखातील त्याच भूमिकेचा वास्तव निर्देश करणाऱ्या वाक्यामुळे मात्र त्या कशा काय दुखावल्या जातात, हा मला पडलेला प्रश्न आहे.
पोप महाशयांची निवड ही कार्डिनल्सच्या एका व्यापक मेळाव्यात गुप्त मतदान पद्धतीने होते हे वैशिष्टय़ मान्य असले तरी ही सारी प्रक्रिया लोकशाहीची द्योतक आहे हा फ्रान्सिस डिसोझा यांचा दावाही मान्य होण्यासारखा नाही. कार्डिनल्सची निवडणूक होत नाही, नियुक्ती होते आणि अशा अनेक नियुक्त्या गेल्या दोन-अडीच दशकांमध्ये दोन्ही पोप महाशयांनी आपापले वारसदार आपलीच विचारसरणी पुढे नेणारे असावेत, या हेतूने केल्याचे त्या त्या वेळी स्पष्ट झाले आहे. याबाबतचे धर्मप्रांतागणिक वृत्तान्त उपलब्ध असले, तरी स्थलाभावी ते इथे देता येत नाहीत.. त्याचप्रमाणे आरिन्झे हे ८० वर्षांचे असले तरी यंदा ते पोपपदाचे प्रमुख दावेदार आहेत, हे ‘टाइम’सारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या नियतकालिकानेसुद्धा आपल्या २५ फेब्रुवारी १३ च्या अंकात म्हटले आहे. (जिज्ञासूंनी ही मुखपृष्ठकथा- ‘दि न्यू पॉलिटिक्स ऑफ दि कॅथॉलिक चर्च’ अवश्य वाचावी.) त्यामुळे त्या बाबतीतही मी केलेले विधान वाचकांची दिशाभूल करणारे नाही, हे रेमंड मच्याडो यांनी लक्षात घ्यावे.
प्रतिवाद मूळ लेखापेक्षाही लांबला, पण आपल्या वसई धर्मप्रांतामधील ख्रिस्ती बांधवांच्या आक्षेपांना किमान उत्तरे देण्यासाठी एवढे विवेचन गरजेचेही होते.