‘सर्वोच्च न्यायालयाचे षट्कार’ (२१ जुलै) हा अजित रानडे यांचा लेख वाचला. सर्वोच्च न्यायालयाने तुरुंगातून निवडणूक लढविण्यास आणलेल्या बंदीचे स्वागतच केले पाहिजे. कित्येक राज्यकर्ते महत्त्वाच्या पदांवर आपल्या बायका-मुलांची नियुक्ती करून तुरुंगातून अप्रत्यक्षपणे निर्णय घेताना दिसतात. सर्वोच्च न्यायालयाने अशा गैरप्रकारांना आळा घालण्याकरिता पुढाकार घ्यावा.
तसेच डॉ. हमीद दाभोलकर यांचा १६ जूनच्या अंकातील ‘आत्महत्या : असंवेदनशीलतेची परिणती’ हा लेख वाचला. गेल्या काही वर्षांत शिक्षण, नोकरी, व्यवसाय इत्यादी क्षेत्रांत प्रचंड स्पर्धा वाढली आहे. आत्महत्येस प्रवृत्त होणारी प्रत्येक व्यक्ती आपल्या समस्यांबद्दल इतर कुणाशी चर्चा न करता एकलकोंडे राहणेच पसंत करते. त्यामुळे आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या स्वभावात काही बदल जाणवल्यास इतरांनी सावध व्हायला हवे.  याकामी मार्गदर्शन करण्यासाठी सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये समुपदेशन केंद्रे उघडण्यात यावीत; जी मानसशास्त्रज्ञ आणि इतर साहाय्यक कर्मचाऱ्यांनी सुसज्ज असतील. या केंद्रांमध्ये येऊन आपल्या समस्या सोडवण्याकरिता नागरिकांना प्रोत्साहन देण्यात यावे. आजकाल विद्यार्थ्यांना शालेय तसेच कॉलेज- जीवनात स्पध्रेत टिकून राहताना कमालीच्या ताणतणावांशी सामना करावा लागतो. त्यांना हे तणाव व्यवस्थित हाताळता यावेत म्हणून शाळा तसेच कॉलेजांमध्येही अशा प्रकारची समुपदेशन केंद्रे असणे आवश्यक आहे. तसेच दूरध्वनीद्वारे उपलब्ध असणारी हेल्पलाइन टोल-फ्री केल्यास जास्तीत जास्त लोक त्याचा लाभ घेऊ शकतील. हे उपाय समस्याग्रस्त माणसांना ताणतणाव हाताळण्यास उपयुक्त ठरतील. परिणामी आत्महत्यांचे प्रमाणही निश्चितपणे कमी होईल.
–  केतन मेहेर, विरार (पूर्व)

अकारण विवाद
७ जुलैच्या पुरवणीतील ‘धम्मपद आणि गीता’ या अविनाश सहस्रबुद्धेलिखित पुस्तकाचे परीक्षण करताना प्रा. प्रकाश रा. पवार यांनी वापरलेले ‘गीता विरुद्ध धम्मपद’ हे शीर्षक वाचून हा दोन्ही विचारांत अकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न आहे की काय, असे वाटले. या दोन्ही विचारांच्या उगमाचा क्रम हा अगोदर गीता व मग धम्मपद असा आहे. कृष्ण व बुद्ध या दोघांनी त्यांच्या विचारांची मांडणी करताना तेव्हाचे सामाजिक प्रवाह, प्रश्न, प्राचीनतम धर्मपरंपरा व त्यात शिरलेले अनाचार यावर सखोल चिंतन करूनच उपदेश केलेले आहेत. हे उपदेश मूलभूत धर्मपरंपरांची ओळख व त्यात शिरलेल्या अयोग्य आचार-विचारांचा कसा निषेध करतात, हे अभ्यासणे जरूरीचे ठरते. या मतप्रवाहांची नाळ एकच आहे. ती कशी, हा प्रामुख्याने समजावून घेण्याचा विषय आहे. ‘विरुद्ध, विरोधी’ असे शब्द त्यांच्या अनुषंगाने वापरल्याने अकारण वाद निर्माण होईल.
रणभूमीवर वैचारिक गोंधळाने हतबल झालेल्या अर्जुनास कर्तव्यबोध करण्याच्या निमित्ताने भगवान कृष्णाने मूलभूत ज्ञानस्रोत असलेल्या वेदज्ञानाचे सार ७०० श्लोकांत विशद करून सर्व मानवजातीसाठी उपदेश केला आहे. हा हिंदूंचा धर्मग्रंथ मानला जात असला तरी मूळ वेदांमध्ये वा गीतेमध्ये ‘हिंदू’ वा ‘हिंदू धर्ममताची स्थापना’ असे शब्दप्रयोग कोठेही झालेले नाहीत. पुढे संस्कृत भाषेतील हे ज्ञान सर्वसामान्यांना समजावे म्हणून संत ज्ञानेश्वरांनी ते मराठी-प्राकृत भाषेत आणले. जसे तत्कालीन सर्वसामान्य लोकांना समजावे म्हणून भगवान बुद्धांनी त्यांचा उपदेश त्यावेळच्या पाली या लोकभाषेचा वापर केला. संस्कृत भाषेतील ‘धर्म’ हा शब्द पाली भाषेत ‘धम्म’ झाला. ‘धर्म’ व ‘धम्म’ एकच! आचारविषयक तत्त्वे व नियम म्हणजे धर्म! मात्र, हा धर्म व्यक्ती, कुटुंब, समाज, शासन यांच्याकरता वेगवेगळा; परंतु परस्परपूरक असतो.
भगवद्गीतेमध्ये कर्म, ज्ञान, भक्ती, योग, सांख्य इ.चे विवेचन ऐकल्यावर ‘आता भगवन्, तुझे नेमके मत काय?’ असा प्रश्न अर्जुनाने केल्यावर- ‘माझे निश्चित आणि उत्तम मत हे अर्जुना ऐक. यज्ञ, दान, तपाचा मनुष्याने कधीही त्याग करू नये. कारण यज्ञ, दान, तप (कर्म आणि स्वाध्याय) हे मनाला पावन करतात.’ सात्त्विक, राजस व तामस अशा कर्माचा उल्लेख गीतेमध्ये असून त्यात सात्त्विक कर्माला प्राधान्य देण्यात आले आहे. या पंचसाधन मार्गापैकी चौथ्या सिद्धांतात- अर्थात सत्कर्मात अहिंसेचा उल्लेख येतो, जो मूळ वेदांत ‘अनागो हत्या वै भीमा’- ‘निरपराधांची हिंसा करणे महाभयंकर आहे..’ असा स्थूल शब्दात, पण सार्वत्रिक स्वरूपाचा उपदेश येतो. यज्ञ असो वा दैनंदिन जीवनातील कोणतेही कर्म असो, त्यात हिंसेचे समर्थन कोठेही होऊ शकत नाही. मूळ वेदांना ते मान्य नाही.
भगवान बुद्धांच्या काळात यज्ञीय हिंसेचा अतिरेक झाला होता. ज्याचा त्यांनी (व भगवान महावीरांनीही) निषेध केला आहे. ‘हा सरासर अधर्म आहे’ अशा स्वरूपाचे विवेचन दोघांनीही केले आहे. म्हणूनच हिंसायुक्त तामसी यज्ञ व त्याचबरोबर सात्त्विक असे नित्यनैमित्तिक यज्ञही हळूहळू मागे पडले. विकृत यज्ञांचे निषेध करत असतानाच सात्त्विक यज्ञांची भगवान बुद्धांनी प्रशंसा केली आहे. नित्य यज्ञाचा अग्निहोत्राचा प्रशंसापर उल्लेखही भगवान बुद्धांनी केलेला आहे; ज्याचे उल्लेख ‘धम्मसुत’, ‘सुत्तनिपाद इ. ग्रंथांत आले आहेत. सात्त्विक यज्ञाचे ठिकाणी देवदेवता उपस्थित असतात, असे भगवान बुद्ध म्हणतात. वासनांनी जीवन दूषित होते, त्यांचा त्याग करून मन निर्मळ ठेवा, त्यासाठी ‘अत्तदीप भव’ (अंतरीचा विवेकाचा दिवा कायम प्रकाशित ठेवा.) असा उपदेश बुद्ध करतात. त्यांच्या काळात उच्च-नीचता पराकोटीला गेली होती. सर्व माणसे समान आहे असा उपदेश भगवान बुद्ध करतात.  
निरनिराळी शाश्वत सत्येच त्या- त्या काळात विविध धर्माच्या महापुरुषांनी सांगितली आहेत. त्यात डावे-उजवे करणे चुकीचे आहे. त्यात विरुद्ध, विरोधी असे काही नसते.
– श्यामसुंदर गंधे, पुणे</strong>

खरंच, तो ओलावा हरवलाय!
‘लोकरंग’मधील ‘बालमैफल’ (२१ जुलै) पानावरील सुवर्णा महाबळ यांनी लिहिलेली  ‘प्रिय बाईंस-’ ही गोष्ट खूप आवडली. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधल्याने या गोष्टीला वेगळेच महत्त्व आले आहे. ‘आम्ही घाबरून थरथरत असताना प्रत्येकाला जवळ घेणारा तो ओलावा कुठेतरी हरवलाय. नाही, नाही, तो हरवला नाही, तो तुमच्याजवळ आहे आणि आम्ही तुमच्यापासून दूर गेलोय..’ हे लेखिकेचे म्हणणे जरी खरे असले, तरी जवळ घेणारा तो ओलावा आताच्या शिक्षषकांमध्ये दिसून येत नाही, ही आजच्या विद्यार्थ्यांची खंत आहे.
– म. न. ढोकळे, डोंबिवली.