रेखा देशपांडे – deshrekha@yahoo.com

राजेश खन्ना, अमिताभ बच्चन यांच्यासारख्या तगडय़ा महानायकांच्या राजवटीत स्वत:चं ‘रोमॅन्टिक हीरो’ म्हणून स्वयंभू स्थान निर्माण करणं हे खचितच सोपं नव्हतं. मात्र, ऋषी कपूरने ते निर्माण केलं. एवढंच नव्हे, तर ते त्यांच्या झंझावातात टिकवलंसुद्धा!  वारशानं आलेलं अभिनयाचं गारूड चाहत्यांवर करणं कपूर खानदानातही काहींना जमलं नाही. परंतु ऋषी त्यालाही अपवाद ठरला.

‘ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन.’

टीव्हीवर बातमी झळकली आणि तिनं अगदी आतून हलवून सोडलं. आपला काळ संपत आल्याची जाणीव तीव्र झाली असावी. बातमीतल्या ‘ज्येष्ठ’ या शब्दानं गेलेला सगळा काळ जणू ढवळून काढला मनात. ‘बॉबी’ प्रदर्शित व्हायचा होता. त्याच्या पब्लिसिटीची जोरदार मोहीम सुरू होती. शेवटी राज कपूरचा चित्रपट होता तो! त्याचं प्रदर्शित होणं हा इव्हेंट असणार होता. तिशी-पस्तिशीच्या ‘कॉलेजकुमार’ नायक-नायिकांची गेल्या काही वर्षांची परंपरा तोडून दोन कोवळ्या नायक-नायिकांची तारुण्याची जाणीव पहिल्या प्रेमाच्या साक्षात्कारानं जागी होताना पडद्यावर साकार होणार होती.

जैनेंद्र जैन हे ‘बॉबी’चे संवादलेखक होते. ते ‘माधुरी’ या हिंदी पाक्षिकाचे सहाय्यक संपादक आणि समीक्षकही होते. ते ऑफिसमध्ये आले की ‘माधुरी’चं वातावरण ‘बॉबी’मय होऊन जायचं. त्या सुमारास प्रशिक्षणाचं वर्ष संपून पत्रकार म्हणून मी ‘माधुरी’त नुकतीच सुरुवात केली होती. ‘बॉबी’च्या नायकाची- ऋषी कपूरची मुलाखत घ्यायची असाइनमेंट मला मिळाली. ती बहुधा त्याची पहिलीच मुलाखत असणार. त्याचं कारण आमचे सहाय्यक संपादकच आर. के.च्या या प्रॉडक्शन युनिटचा भाग होते. आर. के. प्रॉडक्शनकरता साक्षात राज कपूर यांच्यासाठी संवाद लिहायची संधी मिळाली होती आमच्या सहाय्यक संपादकांना. त्याचं ‘माधुरी’ला रास्त कौतुक होतंच.

जैनेंद्रजींनीच अपॉइंटमेंट ठरवली. माझं काम सोपं झालं. नाहीतर पब्लिक बूथवरून फोन करत राहा.. करत राहा.. स्टारला गाठा अशी सुरुवात झालेली होतीच. भेटही जैनेंद्रजींच्या घरीच ठरली- बांद्य्राला ‘पत्रकार’मध्ये. मी ठरल्या वेळी पोचले. आमच्या गप्पा चालल्या होत्या. थोडय़ा वेळानं रस्त्यावरून जैनेंद्रजींच्या नावानं हाका सुरू झाल्या. आम्ही दोघं बाल्कनीत आलो. रस्त्यावर चिंटू मोटरबाइकवरून हाका मारत होता. त्यावेळी चिंटूच तर होता तो! आर. के.चा चिंटू म्हणजे सगळ्यांचा चिंटूच. तोही त्यांच्याकडे प्रथमच येत होता. जैनेंद्रजींची बिल्डिंग कोणती, ते कोणत्या मजल्यावर राहतात, हे त्याला शोधायचं होतं. त्यासाठी त्यानं सरळ खालून हाकाच मारायला सुरुवात केली. अगदी शाळकरी मुलगाच वाटला मला तो. अकरावी-बारावीतला. ‘आ जाओ ऊपर. नीचे से क्यों चिल्ला रहे हो?’ जैनेंद्रजी म्हणाले. मग तो वर आला. जैनेंद्रजीही गप्पिष्ट आणि हाही. गंमतजंमत चालली होती. प्रश्नांची उत्तरं त्यानं सीरियसली दिली अर्थात. जैनेंद्रजी स्वत:ही उत्फुल्ल स्वभावाचे आणि चिंटूही तसाच. तो होता तोवर घर अगदी फुलून आलं होतं.

तो चिंटू ‘ज्येष्ठ’ही झाला आणि आज सगळं संपवून निघालासुद्धा..?

‘बॉबी’ प्रदर्शित झाला आणि ऋषी कपूर-डिंपल स्टार झाले. ऋषीला मिळालेला उत्कट अभिनयाचा वारसा त्याआधी लहान वयात ‘मेरा नाम जोकर’मधल्या चिंटूत लोकांना दिसला होताच. त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता त्याबद्दल. पुरस्कार मिळाला तेव्हा राजसाहब म्हणाले, ‘जा, आधी पापाजींना (पृथ्वीराज कपूर) तो देऊन ये..’ पापाजींनी नातवाची पाठ थोपटली.. हे ऋषीनंच सांगितलं तेव्हा.

ऋषी आणि शशी कपूर एका सेटवर असले की आल्या आल्या ऋषी आधी शशी अंकलच्या पाया पडायचा, की मग शशी त्याला पोटाशी धरायचा. स्टार झाल्यानंतरही ऋषी राजसाहबांच्या सेटवर सहाय्यक म्हणून काम करायचा. ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ चित्रपटासाठी तो सहाय्यक होता तेव्हाची एक आठवण. शशी राजच्या मागेच लागला होता की ‘आवारा’सारखा ड्रीम सीक्वेन्स टाका म्हणून. राजनी बऱ्याचदा ऐकून घेतलं आणि मग एक दिवस ते उखडले.. ‘कसा करणार ड्रीम सीक्वेन्स? आहेत शंकर-जयकिशन, शैलेंद्र, राधू कर्मकार, नर्गिस? अरे, तो सीक्वेन्स आम्ही सगळ्यांनी मिळून केला होता. मी एकटय़ानं नाही..’ हे सांगताना ऋषीच्या मनात लहानपणी या सगळ्यांना एकत्र बसून गप्पा मारताना, त्यातून गाणी तयार होतानाच्या पाहिलेल्या आठवणी जाग्या व्हायच्या. राजसाहबांचा सहाय्यक म्हणून सेटवर काम करताना चूक कुणाचीही असली तरी राजसाहबांचा ओरडा ऋषीच खायचा.. हेही तो अभिमानानं सांगायचा. चित्रपटसृष्टीतल्या या फर्स्ट फॅमिलीच्या अशा साध्यासुध्या, तरीही लडिवाळ गोष्टी खूप आहेत. त्यांत सिनेसृष्टीतलं खानदानीपण सतत प्रतिबिंबित होताना दिसतं.

‘मैं तो बाय डिफॉल्ट अ‍ॅक्टर बना..’ असं ऋषी ‘बॉबी’तल्या रोलविषयी कायम म्हणत आला. ‘‘ ‘बॉबी’ करायचं ठरलं. डिंपलची निवड झाली होती. ‘बॉबी’ ही नायिका आहे. चित्रपट नायिकेचा आहे खरं तर. मला एक दिवस राजसाहब म्हणाले, ‘चिंटू वजन कमी कर. तुला ‘बॉबी’मध्ये काम करायचं आहे.’ असा मी ‘बॉबी’चा नायक झालो. ‘बॉबी’ तयार झाला. रिलीज होता होता डिंपलचं लग्न झालं होतं. तिनं सिनेमात काम करायचं सोडलं होतं. ‘बॉबी’ हिट् झाला आणि मी झालो स्टार. मैं तो बाय डिफॉल्ट अ‍ॅक्टर बना.’’

त्यानंतर त्याचा ‘जहरीला इन्सान’ हा चित्रपट आला आणि चांगलाच आपटला. अशावेळी एका चित्रपटानं स्टार झालेल्यांची अवस्था बिकट होते. पण इथे रक्तात होते आर. के.चे चिवट संस्कार. यशापयशाचा कोणताही परिणाम होऊ न देता चित्रपट नावाचा कर्मयोग! आणि मग बघता बघता ऋषी कपूर रोमँटिक हीरो म्हणून लोकप्रिय झाला.

७० चं दशक. सुपरस्टार राजेश खन्ना राज्य करत होता. हळूहळू त्याला शह देत ‘अ‍ॅंग्री यंग मॅन’ अमिताभनं त्याचं राज्य काबीज केलं. शिवाय हीमॅन धर्मेद्र, जंपिंग जॅक जीतेंद्र लोकप्रिय होतेच. या सगळ्यांच्या स्पर्धेतही ऋषीच्या रोमँटिक इमेजचं वेगळेपण ठसत होतं. सेटवर ऋषीच्या नृत्याचं चित्रीकरण पाहणं ही मेजवानीच असायची.

‘खेल खेल में’, ‘रफूचक्कर’, ‘धन दौलत’, ‘कर्ज’, ‘चांदनी’, ‘नगीना’, ‘बोल राधा बोल’, ‘प्रेमरोग’, ‘सरगम’, ‘हम किसीसे कम नहीं’, ‘सागर’, ‘हिना’ असे एक किंवा दोन नायकांचे चित्रपट असोत की ‘अमर अकबर अँथनी’, ‘नसीब’, ‘कभी कभी’सारखे मल्टिस्टारर- ऋषी त्यातलं महत्त्वाचं आकर्षण नेहमीच ठरला. ‘सरगम’, ‘दामिनी’ हे तसे म्हटलं तर ऋषीच्याच भाषेत सांगायचं तर नायिकेचे चित्रपट. पण ऋषी कधी केवळ नायिकेला साथ देणारा टेकू नव्हता. तो स्वतंत्रपणे डफलीवाला होता.. सत्यवादितेवर भाळून दामिनीवर प्रेम करणारा, पण घराण्याच्या इभ्रतीचा प्रश्न उभा राहिल्यावर डळमळणारा, काहीशी हिंदीतल्या नायकाच्या परंपरेला न शोभणारी छटा घेऊन आलेला (म्हणजे धाडसीच की!) रोहित होता. त्याचा अभिनय, त्याचा वावर, त्याचं नृत्यकौशल्य, त्याच्या अंगातली लय सगळं पडद्यावर जिवंत नृत्य करत असायचं. आणि ते त्याच्या व्यक्तिमत्त्वातही होतं. ‘अमर अकबर अँथनी’चंच घ्या ना. चित्रपटभर अमिताभचा अँथनी ‘माय नेम इज अँथनी गोन्साल्विस’ असा पडद्यावर हंगामा करत असताना ऋषीचा अकबरही ‘तैयब अल्ली प्यार का दुश्मन हाय हाय’ आणि ‘परदा है परदा’चा जल्लोष करत पडद्यावर उत्सव साजरा करायचा. ‘अमर अकबर अँथनी’ मनमोहन देसाईंचा आणि अमिताभ-ऋषीचा चित्रपट ठरला. ‘नसीब’मध्ये दारू पिऊन खांबावर चढलेला मोठा भाऊ आणि ‘चल मेरे भाई, तेरे पाँव पडम्ता हूँ’ म्हणत त्याची मिनतवारी करणारा ऋषी! अमिताभ आणि ऋषीची ही केमिस्ट्रीदेखील विलक्षण लोभस असे.

नीतूबरोबरच्या त्याच्या प्रेमाच्या चर्चाइतकेच त्यांचे एकत्र चित्रपट गाजत होते. ‘खेल खेल में’, ‘रफूचक्कर’, ‘कभी कभी’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘दूसरा आदमी’.. आणि सगळ्यांना भावत होती ती त्यांच्यातली केमिस्ट्री. डिंपलचं अचानक लग्न झालं तो खरा धक्काच होता चाहत्या वर्गाला. त्या टीनेजर प्रेमिकांची केमिस्ट्रीही खूप भावली होती सगळ्यांना. पण ते होतं काफ लव्ह. त्यातून बाहेर येऊन कामावर लक्ष केंद्रित करणं हे आर. के.चं वैशिष्टय़. ऋषी ‘आर. के.’ होता! नीतूचं आणि त्याचं प्रेम सफल होऊन त्यांचा विवाह झाला तेव्हा चाहत्यांनाही त्याचा खूप आनंद झाला. आणि ती केमिस्ट्री या कोवळ्या जोडप्यानं आयुष्यभर जोपासली. थँक्स टू.. पाहता पाहता मॅच्युअर होत गेलेली नीतू! ऋषीनं आग्रहानं- नव्हे हट्टानं नर्गिस आंटीला लग्नाला यायला लावलं आणि कित्येक वर्षांनंतर नर्गिस राज कपूरच्या आनंद सोहळ्यात सहभागी व्हायला आली. एकेकाळी ‘मैं न रहूँगी, तुम न रहोगे, फिर भी रहेंगी निशानियाँ’ या ओळीच्या चित्रीकरणासाठी लहानग्या ऋषीला चॉकलेटचं आमिष दाखवणारी नर्गिस आंटी..

रोमँटिक हीरोचा काळ असो-नसो, ऋषीच्या लोकप्रियतेत त्यानं कधीच अडथळा निर्माण केला नाही. वय (आणि वजन) वाढल्यावर अलीकडे त्यानं आणि (रणधीरनंही) ‘हाऊसफुल्ल’सारख्या कॉमेडीजमधून, तशीच अनेक वर्षांनंतर नीतूबरोबर ‘बेशरम’मध्ये केलेली धमाल त्याच्यातल्या अभिनेत्याचं अस्सलपण सतत अधोरेखित करत राहिली. ‘अग्निपथ’मधला रऊफ लाला ऋषी करेल असं आधी कधी कुणाला वाटलं असतं का? पण त्याच्यात अस्सल अभिनेता होता नं! अभिनेत्याला साचेबद्ध भूमिकांतून बाहेर काढून त्याच्या अभिनयाचा कस लावणाऱ्या भूमिकांच्या नव्या युगातही ऋषी चपखल उतरला.

त्या उत्फुल्ल ऋषीला कॅन्सर झाल्याची बातमी कळली तेव्हा छान उमललेल्या गुलाबाला कीड का लागावी, असं वाटलं. बरा होऊन तो परत आला तेव्हा हायसं वाटलं होतं. असाध्य म्हणून असलेल्या कॅन्सरच्या ख्यातीला सुरुंग लागलाय. मनीषा, युवराज, सोनाली बेंद्रे किती जणांनी लावलाय तो. ऋषीनंही लावला आणि इरफानही लावला म्हणून किती बरं वाटलं होतं. पण नाही. दोघांनीही धक्काच दिला. तोही अशा विचित्र वेळी.. भयानक लॉकडाऊनच्या काळात.

राज कपूर गेले. आर. के. स्टुडिओ इतिहासजमा झाला. आता आर. के.चा आणखी एक लोभस अंश अनस्तित्वात विलीन झाला.. लोभस आठवणी मागे ठेवून.

सुपरडुपर हिट् ‘बॉबी’बरोबर ऋषी आला होता. स्टार झाला होता. आल्या आल्याच चाहत्यांची केवढी गर्दी. केवढा उत्साहाचा समुद्र उसळला होता तेव्हा. ‘तुमने कभी किसीसे प्यार किया?’ या त्याच्या प्रश्नाला ‘किया..’ म्हणून प्रतिसाद देणाऱ्या चाहत्यांच्या समुद्राचं आणि त्याचं नातं होतं. चिंटू.. अरे, जायचंच होतं तर दुसरी एखादी वेळ निवडायचीस की रे!