01 October 2020

News Flash

सचिनदांची जादुई गाणी..

‘सगळ्यात सुंदर डय़ुएट्स देणारा संगीतकार म्हणजे बर्मनदा’ असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. त्यांची द्वंद्वगीतं ही खऱ्या अर्थाने एकमेकांशी बोलणारी, प्रश्नोत्तरांनी सजलेली असतात.

| April 27, 2014 01:08 am

‘सगळ्यात सुंदर डय़ुएट्स देणारा संगीतकार म्हणजे बर्मनदा’ असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. त्यांची द्वंद्वगीतं ही खऱ्या अर्थाने एकमेकांशी बोलणारी, प्रश्नोत्तरांनी सजलेली असतात. ‘आँखों में क्या जी’, ‘हाल कैसा है जनाब का?’, ‘इक घर बनाऊंगा..’ इ. शेकडो उदाहरणं आहेत. ‘इक घर बनाऊंगा’मध्ये तर एक मस्त संवाद आहे.. ‘मं भी कुछ बनाऊंगा..’ यावर तिचा प्रश्नार्थ हुंकार आठवा.. (ती ग्लासमधील छोटीशी नूतन.. बर्फाचे खडे अंगावर पडल्यावर तिचा तो कहर गोड अभिनय!) अशा डय़ुएट्समध्येसुद्धा ‘चुपके से मिले प्यासे प्यासे’ (मंझिल) खूप वेगळं. यात गीता दत्त आधी लयीत बोलते आणि त्याच ओळी नंतर चालीत गाते. अतिशय गोड प्रकार आहे हा! इतकं हळुवार, तलम. जणू बोलणं आणि गाणं यांच्या सीमेवरचा हा विलक्षण संवाद. ‘ओ निगाहें मस्ताना’मध्ये आशाबाई नुसत्या हुंकाराने, गुणगुणण्याने जे बोलतात ते शब्दांपेक्षाही अर्थवाही आहे. हा ‘प्रयोग’ अपघातानेच झालाय. आशाबाईंचं एक रेकॉìडग रद्द झाल्यानं किशोरने या गाण्यात त्यांना बोलावलं आणि बर्मनदांच्या तयार असलेल्या गाण्यात कुठलीही ओळ न वाढवता, बदलता, फक्त हुंकार आणि गुणगुणणं एवढाच; पण प्रचंड एक्स्प्रेसिव्ह भाग आशाबाईंनी गायलाय.
गाण्यामध्ये रिअ‍ॅलिस्टिक साऊंड्स बेमालूम मिसळणं बर्मनदांना सहज शक्य होत असे. ‘वल्ला जवाब तुम्हारा नहीं’नंतर नेमक्या जागी सायकलची घंटी (माना जनाब ने-पेइंग गेस्ट), ‘थकी हारी सासों में’मध्ये (जिन्हें नाज है- प्यासा) खोकण्याचा आवाज आपल्याला त्या बदनाम गल्लीत घेऊन जातो. घुंगरू, तबला आणि ही हताश खाँसी.. या विसंगत आवाजांनी भयाण वास्तव समोर येतं. किती प्रश्न! कला, तारुण्य, स्त्रीत्व- सगळंच विकू पाहणारी आणि विकत घेऊ पाहणारी कुठल्यातरी मजबुरीची शिकार झालेली अभागी जनता.. हे सगळं सांगून जातात गाण्यातले हे खरेखुरे साऊंड्स. काळजात आत कुठेतरी तुटतं हे गाणं ऐकताना. गजाआडून हताशपणे बाहेरच्या फुललेल्या वसंताकडे पाहणारी नूतन. तिच्या ‘ओ पंछी प्यारे’ (बंदिनी) मध्ये सुपात धान्य पाखडणाऱ्या त्या सहबंदिवान स्त्रिया. त्याचाच ऱ्हिदम पूर्ण गाण्यात आहे.. ‘मं खिडकी से चूप चूप देखूँ रुत बसंत की आयी..’
साहिर लुधियानवी, मजरूह सुलतानपुरी, शैलेन्द्र, नीरज, हसरत जयपुरी, गुलजार अशा वेगवेगळ्या टेम्परामेंटच्या गीतकारांबरोबर बर्मनदांनी उत्कृष्ट गाणी दिली. चालीवर लिहायला नाखूश असलेले साहिर आणि काव्यापेक्षा चालीला महत्त्व देणारे दादा यांच्या मनस्वी प्रतिभा एकत्र आल्यावर निर्मिती अद्वितीयच झाली. ‘प्यासा’, ‘बाजी’ ही दोनच खणखणीत उदाहरणं पुरेशी आहेत. ‘ये दुनिया अगर मिल भी जाए’ ही अप्रतिम कविताच आहे. ‘मिल भी जाए’ या शब्दांवर अतिकोमल स्वर लावून रफीने कमाल केलीय. आणि ‘तुम्हारी है, तुम ही सम्भालो ये दुनिया..’ हा टाहो ऐकून डोळ्यांत पाणी तरळलं नाही तर गाणं ऐकणाऱ्याच्या माणूसपणाबद्दल शंका यावी. कुठून येतं हे सगळं? यातला एकही फॅक्टर- कवी, संगीतकार, गायक, अभिनेता आपण कमी-जास्त करू शकत नाही. मुळात कवी असलेला नीरज ‘खिलते हैं गुल यहाँ..’, ‘मेघा छाए आधी रात’सारख्या गाण्यांत अभिजात िहदी भाषेचं सौंदर्य दाखवून जातो. तर गुलजारचं पहिलंच िहदी चित्रपटगीत ‘मोरा गोरा अंग ले..’ (बंदिनी) मध्ये ‘लईले, दई दे, तोहे राहू लागे बरी.. असे अस्सल ग्रामीण, पण खूप गोड शब्द किती सुंदर रूपडं घेऊन येतात. ‘तदबीर से बिगडी हुई तकदीर बना ले, अपने पे भरोसा है तो इक दाव लगा ले’ ही साहिरची गजल आहे. पण चित्रपटात ती आली वेस्टर्न रंग घेऊन.
‘दुल्हन बनके गोरी खडी है, कोई नहीं अपना, कैसी घडी है..’(चल री सजनी- ‘बम्बई का बाबू’- मजरूह) याहून बिदाईच्या प्रसंगाचं अर्थपूर्ण वर्णन असूच शकत नाही. आणि तो हुंकार देणारा कोरस..  मुकेशचा काळीज कापणारा आवाज.. हेही गाणं रडवतंच आपल्याला.
काही गाणी स्वत:चाच एक गंध घेऊन येतात, असं नाही वाटत तुम्हाला? ‘बचपन के दिन भी क्या दिन थे.. उडते फिरते तितली बनके’ (सुजाता) ऐकताना कुठंतरी कैरीच्या करकरीत फोडींचा रसरशीत गंध जाणवतो. आणि ‘सो जा िनदिया की बेला है, आजा पंछी अकेला है’ (नौ-दो-ग्यारह) या गाण्याची रातराणीच्या फुलांच्या गंधासारखी हळूहळू नशा चढत जाते.
काही वेळा काही स्वत:च्या किंवा दुसऱ्या संगीतकाराच्या विशिष्ट स्वरावली, फ्रेजेस पुन्हा दुसऱ्या गाण्यात डोकावताना दिसतात. ‘ये तनहाई हाय रे हाय..’ (तेरे घर के सामने) आणि ‘तुझे जीवन की डोर से’ (शंकर-जयकिशन- ‘असली नकली’) च्या ओळींची चाल एकच आहे. ‘असली नकली’ हा आधी आलेला चित्रपट आहे. (१९६२) यात कुठेही चौर्याचा पुसटसाही संदर्भ देण्याचा हेतू नाही. उलट, एकच स्वरावली दोन प्रतिभावंतांना कशी मोहवते आणि तिची पुढची डेव्हलपमेन्ट किती वेगळी होऊ शकते, याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे. तज्ज्ञांच्या मते, हा ‘मेजर सेवन्थ कॉर्ड’ आहे (सा ग प नी) आणि या कॉर्डवर या रचनांचं शिल्प उभं आहे असं म्हणणं जास्त सयुक्तिक ठरेल. ‘जिंदगी के सफर में’ (पंचम- आपकी कसम) हेसुद्धा गाणं याच प्रकारातलं. ‘तुझे जीवन की डोर से’ आणि ‘ये तनहाई’ ही पुढे किती वेगळी गाणी झाली.
बर्मनदांच्याच एका चालीचा पुनर्जन्म किती वेळा झाला ते बघणं खूप इंटरेिस्टग आहे. ‘ठंडी हवाएं’ (नौजवान), ‘रहे ना रहे हम’ (रोशन- ‘ममता’), ‘हमें रास्तों की जरूरत’ (राहुल देव बर्मन- ‘नरम गरम’), ‘सागर किनारे’ (सागर) इतका प्रवास एका चालीचा (मुखडय़ाचा) झाला. ‘मोसे छल किए जाए’ आणि ‘क्या से क्या हो गया’ हे जोडगाणं चित्रपटातही पाठोपाठ येतं. त्यांची मुखडय़ाची चाल एकच आहे. फक्त ‘सा’ (आधारस्वर) बदलतो.
काही वेळा बर्मनदा मुखडय़ालाच अंतरा म्हणून रिपीट करतात. तो मुखडाच खूप विस्तृत असतो. ‘फूलों के रंग से, दिल की कलम से’ (प्रेम पुजारी) या गाण्यात मुखडय़ाची चालच पुन्हा अंतऱ्याची चाल बनून येते. ‘लोगों न मारो इसे’ (अनामिका) या गाण्यात पंचमनेसुद्धा हाच प्रयोग केलाय. ‘जीने दो और जियो’ (आशा- ‘टॅक्सी ड्रायव्हर’) हेही असंच गाणं आहे.
एकाच स्वरावलीवर मुखडय़ाची चाल फिरवणं; तरीसुद्धा एकसुरी न करणं- ही करामत बघा. ‘पलकों के पीछे से क्या तुमने कह डाला’ (तलाश) मध्ये सा, रे, ग या तीन स्वरांत ‘घुमवलाय’ सा रे ग रे सा, ग रे सा रे, सा ग रे.. असा. ‘ये दिल दीवाना है..’ (इश्क पर जोर नहीं) यातही शब्द रिपीट होतात आणि स्वरही. ‘सा ग सा रे नी सा’ हीच फ्रेज संपूर्ण ध्रुवपदात येत राहते. ‘शब्दस्वर अनुप्रास’ म्हणायचं का याला?
‘ऐ मेरी जिन्दगी’ (टॅक्सी ड्रायव्हर) मधले ‘किसको पता है कल आए के न आए’ आणि ‘तुफानापरी बेभान मी झाले’ (मी आले निघाले.. ‘गंमतजम्मत’) यांचा ग्राफ एकच आहे. ही सुरावटसुद्धा अनेक लोकगीतांत ऐकायला मिळते. त्याअर्थी ती खूप जुनी असावी. केशवराव भोळ्यांनी त्यांच्या ‘माझे संगीत’ या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे प्रभावी स्वर आपल्या अंतर्मनाच्या आतल्या कप्प्यात कुठेतरी अस्तित्वात राहतात आणि एखाद्या स्वररचनेत आपल्या नकळतही डोकावू शकतात.
आवाज एकदम बारीक करून पुन्हा पूर्ण थ्रोने लावण्याची गंमत ‘रात अकेली है..’ (ज्वेल थीफ) आणि ‘ओ निगाहें मस्ताना’ (पेइंग गेस्ट) मध्ये ऐकायला मिळते. ‘रात अकेली है’ मध्ये ‘आके मेरे पास.. कानों में मेरे.. जो भी चाहे कहिए..’ यात तनुजाचा बिनधास्तपणा आणि आशाबाईंचा आवाज कसा एकरूप झालाय. ‘ओ निगाहें मस्ताना’मध्ये ‘बस्ती के दियों को बुझ जाने दे’मध्ये किशोरनं असाच आवाज बारीक करत करत एकदम व्हॉल्यूम वाढवलाय.
लक्ष्मीकांत-प्यारेलालना जेव्हा सचिनदांबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी व्यक्त केलेलं मत खूप महत्त्वाचं आहे. त्यांच्या मते, सातत्याने नावीन्याचा शोध घेणारा हा संगीतकार होता. ‘गोपीतरंग’ या वाद्याचा उपयोग ‘ये दुनिया रूप की चोर’ (शबनम) या गाण्यासाठी करणं काय, किंवा ‘ये रात ये चांदनी’सारखं गाणं हेमंतकुमारकडून वेगळ्याच टोनमध्ये गाऊन घेणं, ‘मस्तराम बनके जिंदगी के दिन’ (टॅक्सी ड्रायव्हर) साठी वेगळ्याच पिचिंगचा उपयोग करणं, ही सगळी बर्मनदांच्या विलक्षण कल्पनाशक्तीचीच उदाहरणं आहेत. सॅक्सोफोन (तेरे मेरे सपने अब एक रंग है), अ‍ॅकॉर्डियन (रूप तेरा मस्ताना), स्पॅनिश गिटार (हम आपकी आँखों में, दिल की उमंगें हैं जवाँ, रूला के गया सपना), मेंडोलिन (खोया खोया चाँद, कोई आया धडकन कहती है), पियानो (बचपन के दिन भी क्या दिन थे) अशा त्या- त्या वाद्यांची गंमत आणि टोन ओळखून सचिनदांनी केलेल्या प्रयोगांची यादी न संपणारी आहे. ‘कोई आया’मधलं ते अफाट मेंडोलिन ‘लक्ष्मीकांत-प्यारेलाल’ जोडीमधल्या लक्ष्मीकांतजींचं आहे. बर्मनदांच्या आजारपणात अनेक गाणी पंचमने हाताळल्यामुळे त्याचा पगडा त्या गाण्यांवर स्पष्ट दिसतो. उदा. आराधना, ज्वेल थीफ, मिली, इ.(क्रमश:)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2014 1:08 am

Web Title: s d burmans magical songs
Next Stories
1 आजा. चल दे कहीं दूर..
2 आप यूँ फासलों से गुजरते रहे..
3 कभी खुद पे, कभी हालात पे रोना आया!
Just Now!
X