सुनंदा महाजन

lokrang@expressindia.com

एका जर्मन कवयित्रीची हृद्गिते अर्थात कविता मराठीत आणून ती आपल्या भाषेत मांडावीत, असा एक अनोखा प्रयोग उलरिकं द्रेस्नर आणि अरुणा ढेरे यांनी जयश्री हरि जोशी यांच्या (जर्मन आणि मराठीमधील दुवा) सर्जक साहाय्यातून घडवून आणला आहे. ग्योथे इन्स्टिट्यूट म्हणजेच मॅक्सम्युलर भवन या संस्थेने २०१५ साली ‘पोएट्स ट्रान्सलेटिंग पोएट्स’ हा प्रकल्प राबवला. जर्मन कवयित्री उलरिकं द्रेस्नरच्या निवडक कवितांचे अनुसर्जन करण्यासाठी ग्योथे इन्स्टिट्यूटने अरुणा ढेरे या प्रथितयश कवयित्रीला निमंत्रित केले. ‘दोन भिन्नभाषी कवींनी एकत्र यावं, दुभाष्यामार्फत एकमेकांच्या कविता थेट समजून घ्याव्यात आणि इंग्रजीसारख्या आणखी एका मध्यस्थ भाषेची मदत न घेता शब्दश:, अर्थश: त्या अनुवादित कराव्या अशी या प्रकल्पामागची कल्पना,’ असे अरुणा ढेरे यांनी प्रस्तावनेत म्हटले आहे. तर जयश्री हरि जोशी यांनी- उलरिकं, अरुणा व जयश्री आम्ही तिघी म्हणजे एकमेकींसमोर ठेवलेले अंतर्वक्र आरसे, असे सांगून, ‘जर्मन कवितेची मराठी रूपसज्जा,’ असे या प्रयोगाच्या पुस्तकरूपी फलस्वरूपाला संबोधले आहे.

या पुस्तकाचे शीर्षक आहे ‘साक्षीभावाने बघताना!’ आकर्षक मुखपृष्ठासह, दोन रंगांच्या पानांसह, दोन रंगांच्या अक्षरांसह आणि आलटून पालटून येणाऱ्या दोन भाषांमधील शब्दांसह ही कवितेची रूपसज्जा नटली आहे. हे अनुसर्जन आपल्यासमोर कसे उलगडत जाते ते आपण पाहू.

सुरुवातीला उलरिकं द्रेस्नर आपल्या कवितेविषयी आधी जर्मनमधून व नंतर मराठीतून (अनुवादातून) आपल्याशी संवाद साधते. आपल्या ‘श्वास, स्पंदन, कक्षा ’ या प्रस्तावनेतून. ती म्हणते, ‘ माझ्या कविता या माझ्या संपूर्ण अस्तित्वभानातून उमटत जातात, म्हणजेच माझ्या स्त्रीदेहाच्या जाणिवांतूनसुध्दा.’ हे तिचे अस्तित्वभान व या तिच्या जाणिवा मराठीत आणताना अरुणा ढेरेंनी ‘भावानुवाद करण्याचं स्वातंत्र्य न घेता कवितेच्या उभय अभिव्यक्तीशी, म्हणजे आशयाशी आणि शब्दरूपाशी जास्तीत जास्त प्रामाणिक राहण्याचा हा प्रयत्न असल्यानं अनुभवाची मराठी पद्धतीनं समांतर उभारणी करण्याची इच्छा पूर्ण बाजूला ठेवावी लागली,’अशी कबुली देत अनुसर्जनाचे अनोखेपण अधोरेखित केले आहे.

माझ्या सुदैवाने मी मराठी व जर्मन साहित्याची वाचक व अभ्यासक असल्याने मला पुस्तकात मांडलेल्या दोन्ही भाषांतील कवितांचा आस्वाद तर घेता आलाच, तसेच अनुसर्जनाची वाटचालही माझ्या ध्यानात आली. उलरिकं द्रेस्नरच्या कवितेची वैशिष्ट्ये सांगायची झाल्यास तिच्या प्रतिमा थोडय़ा वेगळ्या आहेत. म्हणजे, कधी स्त्री-पुरुषामधील संपत आलेल्या नात्याला ती एका लहानशा गोजिरवाण्या सशाचा मृत्यू म्हणते. अथवा रस्ते नसलेले खेडे म्हणजे तिच्या नजरेतून जिथे पोचताच येत नाही अशा जीवनाच्या अवशेषांचा एक ढिगारा आहे. तिच्या कवितेत बाई असणे, तिचे जगणे, तिची आयुष्य मनासारखे जगता यावे म्हणून होणारी धडपड येते, या अशा जगण्यालाच ती कविता म्हणते. तिच्या कवितेत स्त्रीच्या शारीर अनुभवांची विश्लेषक मांडणी आहे. त्याला आईपणाच्या अनुभवाची डूब आहे, मुलाला जन्म देणारी, जन्म दिल्यावर आईपण निभावून नेणारी आई ती मांडते. अगदी गर्भपाताच्या वेदनेची मन हेलावून टाकणारी ठसठसही ती व्यक्त करते. उदा. ‘मोकळे होताना’ या कवितेत ती म्हणते,

‘‘(गर्भपात, ऐवज ८० ग्राम्स् )

अंतर्धान पावणं, मरणं आणि अवतरणं

मुळारंभाची सिद्धता करणं

शोषणं आणि खेचून घेणं

अशुद्ध हवा.

प्रारंभ. हुंकार.’’

उलरिकं नवीन शब्द तयार करते. ती शब्दांशी खेळते. तिच्या कवितेत ध्वनी महत्त्वाचा आहे. ओळींमध्ये शब्दांची मांडणी करताना ती विविध प्रयोग करते. तर हे वैशिष्ट्य मराठीत आणायला चांगलीच कसरत करावी लागणार होती. ती किती उत्तम जमली आहे ते पाहा : अब्जावधी वर्षांच्या, जीवसृष्टी तयार होत असतानाच्या कालप्रवाहाकडे ‘साक्षीभावाने बघताना’ एक डोळा आपला अनुभव मांडत आहे. या कवितेची सुरुवात अशी आहे :

‘‘तिथेच उभी मी पण बघू शकत नाही त्या जागी स्वत:ला’’

किंवा- ‘‘साप, राक्षसी घोरपड अशा आदिकाळातल्या एखाद्या प्राण्याला

प्राक्प्राचीन अस्तित्व, काळं, निर्मम, आदिम.

मात्र आशीर्वाद या जमिनीला.

अजून किडय़ांचं किरकिरणं नाही

की नाही पक्ष्यांचं उडणं

ह.ह.हवा नाहीये अजून.’’

भाषांतरित कवितेच्या पुस्तकात जर्मन आणि मराठी अशा दोन्ही भाषांमधील कविता असूनही मराठी वाचकाला अडखळल्यासारखे होणार नाही, कारण अरुणा ढेरे व जयश्री जोशी यांनी प्रामाणिक अनुसर्जनातून ती कविता ‘आपली’ केली आहे. उलरिकं द्रेस्नरच्या कवितेइतक्याच अनवट वाटेवरून जाताना आपण एका नव्या काव्यानुभवानिशी चालत राहतो. या अनुभवात मोठा वाटा असणाऱ्या पुस्तकाच्या विशेष मांडणीसाठी रोहन प्रकाशनाच्या चंपानेरकरांचे आभारच मानले पाहिजेत. कवितेचे भाषांतर करणे हे अवघड काम आहे. ते करताना अनेक प्रश्नांची उकल करावी लागते. सामाजिक, सांस्कृतिक संदर्भ असलेल्या प्रतिमा दुसऱ्या भाषेत नेताना त्यांच्यातून होणारे आकलन मूळ आशयाच्या समीप राहील याची दक्षता घ्यावी लागते. त्यासाठी कवीनेच हे शिवधनुष्य पेलल्यास बरे, असे हा प्रकल्प राबवणाऱ्याला वाटले असू शकेल.

‘साक्षीभावाने बघताना’- उलरिकं द्रेस्नरच्या निवडक कविता

अनुवाद- जर्मन-मराठी अनुसर्जन- अरुणा ढेरे / जयश्री हरि जोशी

रोहन प्रकाशन, पुणे.

पृष्ठे-१७६ , मूल्य- २५० रुपये.