संस्कृत साहित्यिकांनी शृंगाराला रसांचा राजा मानलं आहे. शृंगाराच्या संभोग आणि विप्रलंभ या दोन्ही प्रकारांच्या वर्णनांत रसपरिपोषासाठी पावसाचं नेपथ्य त्यांनी योजलं आहे. कालिदासानं मेघाच्या साक्षीनं विप्रलंभ आळवला आहे. तर संभोगशृंगाराच्या परिपोषाचं एकमेव ठळक उदाहरण म्हणजे शूद्रकाचं ‘मृच्छकटिक’! पावसाचं हे सृजनरूप, विरह- वियोग- आतुरता आदी मानवी भावभावना उद्दीपित करण्याचं त्याचं उत्कट सामथ्र्य संस्कृत साहित्यातून प्रतीत होतं. वाल्मीकी रामायणातही पावसाची चित्रदर्शी वर्णनं आढळतात. निसर्गाशी एकरूपत्व साधलेल्या संस्कृत साहित्यात मेघानं प्रभाव गाजवला नसता तरच नवल.   
उष्ण कटिबंधातल्या भारतासारख्या देशात पावसाळा हा सर्वात देखणा ऋतू. खरं तर तो ‘नेमेचि येतो’; तरीही ‘हे सृष्टीचे कौतुक’ नव्या नवलाईनं गायला सगळेच कविमनाचे रसिक सरसावलेले असतात. पहिली झडपण झाली रे झाली, की रूप-रस-गंधांच्या चिंब चिंब दुनियेत ते स्वत:ला पूर्णपणे झोकून देतात. आणि त्यातून उमललेल्या त्यांच्या प्रतिभेची बनतात पाऊसगाणी. संस्कृत साहित्यिक तरी याला कसे अपवाद ठरावेत? या साहित्याची गंगोत्री असलेल्या वेदवाङ्मयातसुद्धा ऋषिमुनींनी पर्जन्यसूक्तं गायली आहेत. निसर्गातल्या इतर घटनांबरोबर पावसालाही देवता मानून त्यांनी त्याची स्तोत्रं रचली. त्यांना सगळय़ात भावलेलं रूप आहे- गर्जना करीत कोसळणाऱ्या धुवाँधार पावसाचं. ढगांचं आडदांड रूप पाहून त्यांना दमदार आवाजात हंबरणाऱ्या धष्टपुष्ट बैलाची आठवण येते. आणि त्याच्या कोसळण्यात सिंहगर्जनाही ऐकू येते. पाण्याच्या रथात बसून घोडे चौफेर उधळणारा हा पर्जन्यदेव स्थावर-जंगमाचा आत्मा आहे. तुमचा-आमचा मायबाप आहे. तो सर्वत्र सृजनाचा मंत्र िशपीत जातो म्हणून ‘पर्जन्याय प्र गायत’.. ‘पावसाचं स्तवन करा..’ असं वसिष्ठमुनी सांगतात. आणि जणू त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून बेडूक ‘ये रे ये रे पावसा’चा जप करू लागतात. ते ऐकून खूश होत वसिष्ठ मंडूकसूक्तात त्यांचंही गुणगान करतात. बेडकांचं पर्जन्यसूक्त वसिष्ठांनी किती काळजीपूर्वक ऐकलंय, बघा. ते म्हणतात- ‘‘वर्षभर दडून बसलेल्या या बेडकांना पावसाच्या शिडकाव्यानं लगेच कंठ फुटतो. त्यांच्या या ‘पर्जन्यजिन्विता’- ‘पावसानं स्फुरलेल्या’ वाणीचं कौतुक तरी किती करावं? एकानं ‘डराँव’ केलं की पाठोपाठ दुसरा त्याची नक्कल करतो आणि मग एकापाठोपाठ एक करीत समस्त मंडूक मंडळी जेव्हा तालासुरात डराँवू लागतात, तेव्हा अगदी मंत्रपठण चालल्यासारखं वाटतं.’’ दोन हजार वर्षांपूर्वीची बेडकांची ही सवय आजही गेलेली नाही. नाही का?
भाविकांच्या प्रार्थनेला प्रतिसाद देऊन पावसानं अतिवृष्टी आरंभली, तर तिला आवरण्यासाठी पर्जन्यशांतीतून त्याची त्यांनी विनवणी केली. एकंदरीत ऋषिमुनींनी आळवलं ते पावसाचं स्थूल, दृष्टीला दिसणारं, काहीसं आक्रमक रूप. या रूपात रंग भरले आदिकवी वाल्मीकीने. रामायणाच्या किष्किंधाकांडातलं पावसाळय़ाचं बहारदार वर्णन ही संस्कृत साहित्यातली पहिली निसर्गावरची भावकविता आहे. प्रसंग आहे सीताहरणानंतरचा. सुग्रीवाला राज्याभिषेक करण्यासाठी किष्किंधेला पाठवून राम-लक्ष्मण पावसाळा संपेपर्यंत माल्यवान पर्वतावर मुक्कामाला आले आहेत. एके दिवशी पर्वताला चहू बाजूंनी काळय़ा ढगांनी वेढलं आणि हा-हा म्हणता सभोवतीची सृष्टीच पालटून गेली. या उत्तेजक बदलानं रामाला बोलतं केलं. वर्षांऋतूनं समोर सादर केलेलं तांडव आणि लास्य लक्ष्मणाला दाखवत तो म्हणाला, ‘‘अरे, हे आकाश बघ. कधी वाटतं, समुद्राच्या पाण्याचा गर्भ नऊ महिने धारण केलेली, दिवस भरत आलेली ही आसन्नप्रसवा आहे. तर कधी हे पर्वतावर उतरू पाहणारे ढग बघून वाटतं, खुशाल त्यांच्या पायऱ्यांवर चढून वपर्यंत जावं न् सूर्याच्या गळय़ात कुडय़ाच्या फुलांची माळ अर्पावी. आणि हा वारा पाहिलास का? ढगांशी झोंबी खेळून, केतकीबनात लूटमार करून धावणाऱ्या या वाऱ्याच्या स्रोताचा ओला गंध ओंजळीनं पिता येतोय्. इकडे या जांभळाच्या झाडांना जांभळं लगडली आहेत की काळेशार भुंगे? छे छे, अरे, मला तर वाटतं, ही जांभळंही नव्हेत आणि त्यातला रस मटकावणारे भुंगेही नव्हेत; हे तर फांद्याफाद्यांवर साचलेले विझलेल्या कोळशांचे (अर्धवट पेटलेल्या वणव्यामुळे तर नव्हे?) तुकडे असावेत. हे पहा- वाऱ्यानं गदागदा हलल्यामुळे झाडावरून गळून पडलेल्या आंब्याच्या फळांचे रंग किती वेगवेगळे! (वाल्मीकीला ‘मागला’ म्हणजे रायवळ आंबा माहीत होता की काय?) इकडे बघ- झाडांच्या पानांवर चिकटून लोंबणारे पाण्याचे मोती गट्टम् करणाऱ्या पक्ष्यांच्या पिसांचे रंग किती बदललेत! खाली पहा- हिरव्याशार गवतावर मधून मधून उठून दिसणारे इंद्रगोप किडे. वाटतं की, लाल बुंदके असलेली पोपटी शाल पांघरलेली रमणीच आहे ही भूमी!’’
सृष्टीच्या रंगमंचावर मेघराजानं सादर केलेल्या गायन-वादन-नृत्याच्या या रंगारंग कार्यक्रमात वाल्मीकीनं केतकी, कुटज इत्यादी फुलांबरोबरच केकारव करीत ठुमकणारे मोर, चातक, चक्रवाक, बगळे, तसंच सोन्याच्या चाबकासारखी सपकन् तळपणारी वीज अशा अनेकांना सहभागी करून घेतलं आहे. पंचेंद्रियांना आस्वाद्य अशा या भौतिक रूपापलीकडचं पावसाचं रूपही वाल्मीकीनं साकारलं आहे. सृष्टीचं हे लोभसवाणं रुपडं डोळय़ांत साठवताना रामाच्या अंतरीची वीणा विरहाची आर्त तान छेडते आणि सीतेच्या आठवणींची व्याकुळता शब्दांत रूप घेते. तो लक्ष्मणाला म्हणतो, ‘‘उन्हानं भाजलेल्या या जमिनीवर बरसलेल्या नव्या पाण्यामुळे तिच्यातून वाफा बाहेर पडताहेत. शोकानं आतल्या आत जळणारी सीतासुद्धा अशीच अश्रू ढाळीत असेल.’’ वाल्मीकीनं चितारलेलं हे पावसाचं चित्र आता केवळ त्याच्या शब्दांच्या कुंचल्यातून उतरलेलं सृष्टीचं भौतिक रूप राहत नाही. विविध रंगांनी नटलेल्या या दुनियेत विराणीचे सूरही मिसळले आहेत.
वाल्मीकीनं साकारलेल्या या वर्षांविश्वाचा ठसा उत्तरकालीन संस्कृत साहित्यावरही उमटला आहे. इतका, की कालिदासासारख्या श्रेष्ठ कवीलाही वाल्मीकीची पाऊलवाट चोखाळण्याचा मोह आवरता आला नाही. मात्र, त्याच्या निसर्गचित्रांतून कालिदासाच्या लोकोत्तर प्रतिभेनं कल्पनाशक्तीच्या पंखांनी घेतलेली उंच भरारी पाहिली की, ‘ज्योतीने तेजाची आरती’ करावी तशी ही महाकवीनं आदिकवीची बांधलेली पूजा वाटते. कालिदास हा मुळातच निसर्गकवी. त्याच्या सगळय़ाच काव्य-नाटकांना निसर्गाचं नयनरम्य नेपथ्य लाभलं आहे. त्याच्या समग्र वाङ्मयाच्या आस्वादाच्या एकसंध परिणामाचा एक भाग म्हणजे पर्यावरणाशी ‘सोऽहम्’ तादात्म्याचा मंत्र. असा कालिदास जेव्हा निसर्गाला आपली शब्दफुलं अर्पण करू पाहतो तेव्हा त्याच्या नवनवोन्मेषशालिनी प्रतिभेला अगणित धुमारे फुटले नाहीत तरच नवल. त्याचं ‘ऋतुसंहार’ हे तर सहाही ऋतूंची उठावदार चित्रं रेखाटण्यासाठी रचलेलं काव्य! आपल्या प्रियेच्या डोळय़ांसमोर तो पावसाळय़ाचं चित्र कसं उभं करतो, पाहू या. तो म्हणतो-
‘‘ही बघ, पावसाळय़ाची स्वारी आली राजाच्या स्वारीसारखी डामडौलात. या स्वारीत झुलणारे हत्ती आहेत मेघ, विजा आहेत पताका आणि मेघांचे ‘उमडघुमड’ आहेत नगारे. हे ढग आहेत की निळय़ा कमळांची दाटीवाटी? विजेची प्रत्यंचा चढवून इंद्रधनुष्यातून जलधारांचे बाण सर्वदूर सोडणारा हा पाऊस. काठावरच्या झाडांना आडवं करीत नद्यांना जोशात वाहायला लावणारा पाऊस. मोराच्या पिसाऱ्याला निळय़ा कमळांचे गुच्छ समजून लगटू पाहणाऱ्या भुंग्यांना गोंधळात टाकणारा पाऊस. पालापाचोळा, किडेमकोडे, चिखलमाती यांची गाठोडी काखोटीत मारून पाण्याला जमिनीवरून सापासारखी वळणं घेत खालच्या बाजूला वाहायला लावणारा पाऊस. एकीकडे मंचकावर रुसून, पाठ फिरवून झोपलेल्या रमणीला गर्जनेनं घाबरवून तोंड वळवून पतीला आवेगानं गळामिठी घालायला लावणारा पाऊस; तर दुसरीकडे पती दूर प्रवासाला गेल्यामुळे प्रोणितभर्तृकेच्या डोळय़ांतून बरसणारा पाऊस. एकीकडे मीलनाचा बसंतबहार, तर दुसरीकडे विरहाचा पूरिया छेडणारा पाऊस.’’
पावसाची रूपं तरी किती आळवावीत या महाकवीनं? ‘ऋतुसंहारा’तलं हे वर्षांगीत केवळ नांदी ठरावी, इतकं प्रभावी महानाटय़ ‘मेघदूता’च्या रूपात घेऊन भेटीला येतो हा महाकवी. या खंडकाव्यात या महाकवीच्या प्रतिभेचा वेलू भौतिक-अभौतिक सर्व अर्थानी गगनावरी गेलेला दिसतो. या काव्याचा नायकच मुळी मेघ आहे. यक्षाचं नायकपण कथेला आधार देण्यापुरतं आहे. सव्वाशेच्या आसपास मंदाक्रान्ता वाहिल्यात मेघाच्या रामगिरीपासून अलकेपर्यंतच्या दक्षिणोत्तर प्रवासवर्णनाला! या प्रवासवाटेवरच्या भारताच्या भूगोलाला त्यानं गवसणी घातलीय मेघाच्या नजरेनं. या मार्गावरून भरारी घेताना खालच्या भूप्रदेशाची जी रम्य चित्रं त्याच्यासमोर साकारतायत् त्यात त्यानं भरलेले रंगही आहेत. पाऊसचित्रांच्या या भव्य दालनातून एक फेरफटका मारला तरी नजरेत ठळकपणे भरतात डोंगर, दऱ्या, नद्या, झरे, पशुपक्षी, दिवस, रात्र, चंद्र, चांदण्या.. आणखीन कितीतरी. पाऊस गाणाऱ्या या चित्रांत उमटली आहे आसमंतातली चलबिचल, वर्णगंधांची उधळण, वाऱ्याची झुळझुळ, पाखरांची किलबिल, पानाफुलांची सळसळ, नदी-झऱ्यांची खळखळ, दऱ्याखोऱ्यांचे हुंकार, डोंगर-पहाडांचे साद-प्रतिसाद आणि मानवी स्पंदनांची कितीतरी आंदोलनं! प्रत्येक चित्राचे रंग वेगळे आणि त्यातून उमटणारे भावतरंगही वेगळे. माळव्याच्या माळरानावर पावसाच्या पहिल्या शिडकाव्याबरोबर दरवळलेला मातीचा सुगंध भरभरून हुंगणारे हरणांचे कळप, कमलतंतूंची शिदोरी चोचीत धरून मेघाला साथसोबत करणारे राजहंसांचे थवे, त्याच्या वाटेवर तोरण बांधणाऱ्या बगळय़ांच्या माळा, वरच्यावर त्याच्या पाण्याचे थेंब टिपणारे चातक, त्याच्या पडघमाच्या तालावर थिरकणारे मोर, चैत्यांच्या वळचणीला काटय़ाकुटय़ांनी घरटी बांधू पाहणारे पारवे, पहिल्या िशपणीनं तरारून उठलेल्या कदंबावरची उमलू पाहणारी- केसर डोकवू लागलेली हिरवट पिवळी फुलं, कर्दळींना फुटलेले पहिलेवहिले कोंब, सुईसारख्या टोकदार तुऱ्यांनी गच्च भरलेली, पिवळी प्रभा फाकणारी दशार्ण देशातली केतकीबनं.. आणि लहडलेल्या फळांनी गडद झालेल्या जांभूळबनांनी अंधारलेल्या रानसीमा! या चित्रांत मेघाच्या नुसत्या दर्शनानंच ‘आता शेतं पिकणार’ अशी मनोमन खात्री पटून त्याच्याकडे कृतज्ञ नजरेनं पाहणाऱ्या जशा साध्याभोळय़ा कृषिकन्या भेटतात, तशाच उज्जयिनीमध्ये प्रणयक्रीडेनं झालेली शरीराची हुळहूळ त्याच्या थेंबांच्या शीतल स्पर्शानं शमली म्हणून त्याला नजरेनं दुवा देणाऱ्या गणिकाही भेटतात. शाकारलेल्या शेतातून वाट काढणाऱ्या, तसंच जाईजुईच्या कुंजांतून फुलं वेचताना घामानं कोमेजलेले कानांवरचे फुलांचे गुच्छ मागे सारणाऱ्या निरागस ग्रामकन्यकासुद्धा भेटतात. आणि आकाशातून मेघाच्याही वर अंतरिक्षातून संचार करणाऱ्या यक्षकिन्नरांना हा निळासावळा मेघ कसा दिसतो? आकाशात उमटलेल्या इंद्रधनूच्या सन्निध असलेला हा मेघ म्हणजे मोरपिसाचा तुरा खोवलेला बाळकृष्णच जणू. आणि चर्मण्वती नदीच्या फेसाळ पाण्यावर ओठंगलेला मेघ म्हणजे भूमातेच्या गळय़ातल्या मोत्याच्या एकसरामधला नीलमणीच जणू!
निसर्गाच्या कुशीत डोंगरदऱ्या तुडवीत, पानंफुलं निरखीत, मेघाच्या पालखीत बसून चैतन्याची शीळ फुंकत या कलंदर महाकवीनं केलेल्या या विहंगम सफरीचा रोमांचक अनुभव सहृदय जेव्हा आपल्या अन्तश्चक्षूंनी घेतो, तेव्हा तोही आनंदानं चिंब होतो.
कालिदासाच्या रसील्या नजरेनं आणि उत्तुंग प्रतिभेनं कवेत घेतलेल्या पाऊसमेघाची ही रूप-रस-गंधांनी नटलेली चित्रं जरा निरखून पाहिली की त्यातली भावनांची स्पंदनंही ऐकू येतात. ‘मेघदूता’त तर या महाकवीनं आदिकवीच्या पावलावर पाऊल ठेवीत संपूर्ण काव्यभर करुणाचा कोमल स्वर छेडला आहे. ‘मेघालोके भवति सुखिनो ऽ प्यन्यथावृत्ति चेत:’ – ‘‘आभाळात दाटलेले पावसाळी ढग नुसते पाहिले तरी आनंदी माणसाच्या मनातसुद्धा कालवाकालव होते..’’ हा तर या काव्याचा प्रारंभबिंदू आहे. ज्या मेघाच्या दर्शनानं यक्षाची विरहव्यथा उफाळून आली, त्यालाच दूर अलकानगरीत विरहव्यथेनं जळणाऱ्या आपल्या प्रिय पत्नीकडे पाठवून तिचं सांत्वन करायला त्यानं सांगितलं आहे. यामधून यक्षानं- पर्यायानं कालिदासानं- पावसाचं एक आगळं वैशिष्टय़ अधोरेखित केलंय् : पाऊस जाळतोही आणि शमवतोही.
संस्कृत साहित्याच्या प्रवासात पावसात भिजताना महाकवी कालिदासाशी हितगूज करण्यात अंमळ जास्त वेळ घालवला, याचं कारण कालिदासानं आळवलेल्या मेघमल्हाराच्या भीमसेनी तानेची उंची नंतर कुठल्याच कवीला गाठता आली नाही. इतकंच नव्हे तर नंतरच्या कवींनी त्यांच्या पाऊसगीतांत कालिदासापेक्षा फारसे वेगळे रंग भरले नाहीत. एक म्हणजे संस्कृत काव्यात निसर्गवर्णन यायला हवं, असा दंडक संस्कृत साहित्यशास्त्रकारांनी घालून दिल्यामुळे बहुतेक काव्यांत निसर्गवर्णनाला कविकर्मकांडाचा एकसुरीपणा आला. दुसरं म्हणजे कालिदासासारखा निसर्गाशी एकरूप झालेला कवी क्वचितच दिसतो. तरीही या महाकवीपेक्षा काहीतरी निराळं सांगण्याचा प्रयत्न कुठे कुठे झालेला दिसतो.
भट्टिकाव्यात मुसळधार कोसळणाऱ्या पावसाकडे पाहून राम (तोच- वाल्मीकीचा!) म्हणतो, ‘‘वर आकाशात हे ढग फाटताहेत आणि तिकडे जंगलांचा थरकाप उडाला आहे. विजेच्या आसुडाचे फटके ओढल्यामुळे आकाश कण्हते आहे.’’ शिशुपालवधात माघकवीचं लक्ष केतकीच्या फुलानं वेधून घेतलं आहे. तो म्हणतो, ‘‘हे फूल नाही, ढगांच्या दंगामस्तीत चंद्राचा तुटून पडलेला तुकडा आहे.’’ पावसानं पृथ्वीवर मनमुराद धिंगाणा घातल्यावर आधीची उन्हाची काहिली कुठल्या कुठे पळून गेली. त्यामुळे अवघं चराचर नवं नवं भासू लागलं. या नवेपणाची नोंद भारवीनं आपल्या किरातार्जुनीयात घेतली आहे. पावसाळय़ात कोकिळेच्या (खरं तर कोकिळाच्या!) कंठात अधिक गोडवा कुठून आला? पिकलेल्या जांभळाचा मधुर रस आकंठ प्यायल्यामुळे, हे भारवीचं उत्तर.
संस्कृत साहित्यिकांनी शृंगाराला रसांचा राजा मानलं आहे. शृंगाराच्या संभोग आणि विप्रलंभ या दोन्ही प्रकारांच्या वर्णनात रसपरिपोषासाठी पावसाचं नेपथ्य त्यांनी योजलं. कालिदासानं मेघाच्या साक्षीनं विप्रलंभ आळवलेला आपण ऐकला. संभोगशृंगाराच्या परिपोषाचं एकमेव ठळक उदाहरण म्हणजे शूद्रकाचं ‘मृच्छकटिक’! या नाटकाच्या पाचव्या अंकाचं नावच मुळी ‘दुर्दिनम्’ असं आहे. दुर्दिन म्हणजे दिशा अंधारून टाकणारा घमासान पाऊस. इथे तो अकाली आलाय् आणि थैमान घालून राहिलाय्. त्याच्या वेगवेगळय़ा चेष्टांचं आणि त्यामुळे सभोवती झालेल्या गोंधळाचं वर्णन शूद्रकानं चित्रमय शैलीत केलं आहे. एके ठिकाणी तो म्हणतो-
उन्नमति नमति वर्षति
गर्जति मेघ: करोति तिमिरौघम्।
प्रथमश्रीरिव पुरुष: करोति रूपाण्यनेकानि।।
‘‘हा ढग उठून उभा राहतो, खाली वाकतो, बरसतो, गरजतो, अंधाराचा लोट सोडतो. पहिल्यांदाच हातात संपत्ती आलेल्या माणसासारखे नाना ढंग करतो.’’ नायिका वसंतसेना अभिसारिका बनून चारुदत्ताला भेटायला निघाली अन् हा अचानक कोसळायला लागला. त्यानं तिला सचैल स्नान घातलं. विजांनी गर्जनांनी तिला घाबरवायचा प्रयत्न केला. पण ती बधली नाही. उलट, ‘मी जाते प्रियाकडे’ असं त्याला बजावून ती चारुदत्ताकडे पोचलीसुद्धा. इकडे नुसती मेघगर्जना ऐकून चारुदत्ताच्या अंगोपांगी कदंब फुललाय्. त्यात अचानक ओलेती प्रिया समोर ठाकलेली. आजचा दुर्दिन सुदिनच ठरला म्हणायचा. तिचं निथळतं सौंदर्य न्याहाळत तिला मिठीत घेत चारुदत्त पावसाला म्हणतो, ‘‘कोसळ बाबा खुशाल शंभर र्वष. चमकू दे विजा. घुमू दे गर्जना. माझी प्रिया मला मिळाली.’’ रंगमंचावर हा पावसातल्या मीलनाचा सीन हिट् होत असणार. संस्कृत साहित्यात मेघमल्हाराची सुखद आणि सुफल सांगता झाल्याचं हे एकमेव उदाहरण.
संस्कृत साहित्याच्या या मुख्य प्रवाहातून थोडं बाजूला गेलं तरी दिसतं की, छोटय़ा-मोठय़ा कवींनासुद्धा पावसानं अन् मेघानं भुरळ घातलीय. अशा कवींची मुक्तकं- स्फुटकाव्यं सुभाषितसंग्रहात संकलित करून ठेवली आहेत. त्यांच्यावर एक नजर फिरवली की लक्षात येतं की, यांपैकी बहुसंख्य कवी रुळलेल्या वाटेनं जात पावसाळय़ात दिसणाऱ्या (कविसंकेतानुसार!) पिसारा फुलवलेले मोर, चातक, केवडा इत्यादींच्या वर्णनांत गुंतलेले आहेत. मात्र, पावसानं काहींना तत्त्वचिंतन करायला लावलं आहे. कुणीएक चातकाला म्हणतो, ‘‘बाबा रे, जो जो ढग दिसेल त्यापुढे दीनवाणेपणानं पाण्याची भीक मागू नकोस. सगळेच ढग काही पाणी देणारे नसतात. काही नुसतेच गरजतात.’’ या चातकान्योक्तीतून या कवीनं मनुष्यस्वभावावर भाष्य केलं आहे. दुसरा ढगाला म्हणतो, ‘‘अरे, आला आहेस तर बरसून टाक. उगाच ऐटबाजी करत बसू नकोस. जर का दक्षिणवारा वाहू लागला की मग बघ- तू कुठे असशील ते.’’ आणखी एका अनामिकानं पावसाच्या लहरीपणावर नेमकं बोट ठेवलं आहे. तो म्हणतो, ‘‘काय म्हणावं या पावसाला? ओसाड जमिनीवर इतका बरसतो, की पाण्याचे पूर लोटतात. आणि पेरल्या शेतांवरून मात्र चार थेंब टाकत तो सरळ निघून जातो. कसला हा न्याय?’’ एका सुभाषितात ढगाचं ‘दानशूर’ म्हणून वर्णन केलंय्. त्यात म्हटलंय्, ‘‘ढग जवळ साठवलेलं सगळं पाणी पृथ्वीला देऊन संतुष्ट करतो, म्हणून त्याचं स्थान वर आकाशात. तर समुद्र सगळय़ांचं पाणी घेऊन स्वत:जवळ साठवतो, त्यामुळं त्याचं स्थान खाली.’’
वेदकालापासून अभिजात कालातल्या साहित्यापर्यंत केलेल्या या धावत्या सहलीत अनुभवलेलं पावसाचं रूप ‘जोरदार सरीवर सरी’ असं आहे. सर्वच कवींना ‘नभ उतरू आलं’ आणि ‘मन झिम्माड झालं’ असाच अनुभव आला आहे. त्याचबरोबर रिमझिम बरसणाऱ्या पाऊसधारांत ‘प्रियाविण उदास वाटे’ हाही अनुभव त्यांनी शब्दबद्ध केला आहे. मात्र, ‘काले मेघा, काले मेघा, पानी तो बरसाओ’ अशी दीनवाणी हाक मारणारा कुणी कवी भेटत नाही. अवर्षणाचं चित्र रंगवण्यात फारशी काव्यात्मता नाही असं वाटतं की काय या कवींना? या सर्वच पाऊसगाण्यांतली गतानुगतिकता बाजूला केली, तर पावसामुळे उद्दीपित झालेली बाहय़ सृष्टीतली आणि आंतरसृष्टीतली स्पंदनं या कवींनी नेमकेपणानं टिपली आहेत असं म्हणता येईल.                                                         

narendra modi
बहुसंख्य हिंदू तर मांसाहारीच!
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
sensex, 75000 points , share market news loksatta,
‘सेन्सेक्स’ची ऐतिहासिक ७५ हजारांच्या शिखरावरून माघार
raju shetty allegations against dhairyasheel mane over development work
खासदारांचे विकासकामात गौडबंगाल, इतरांची कामे आपल्या नावावर खपवली; राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांच्यावर आरोप