News Flash

शुभ्र काही जीवघेणे!

लंडनमध्ये हिवाळ्यात हमखास येणाऱ्या या शुभ्र पाहुण्याच्या आगमनाने केवळ निसर्गातच नाही तर जनमानसातही होणाऱ्या बदलांचे टिपलेले हे क्षण..

| February 9, 2014 01:10 am

लंडनमध्ये हिवाळ्यात हमखास येणाऱ्या या शुभ्र पाहुण्याच्या आगमनाने केवळ निसर्गातच नाही तर जनमानसातही होणाऱ्या बदलांचे टिपलेले हे क्षण..
खिडकीपाशी उभे राहून तासन् तास
अविरत शांतपणे आकाशातून पडणारा हा बर्फ
अनाहूतपणे फिरकणारा भटका विहंग
पानगळतीत टिकून राहिलेल्या पानांची फडफड
खिडकीपाशी उभे राहून तासन् तास..
पाऊस आणि बर्फ, या आकाशातून पृथ्वीला भेटायला येणाऱ्या निसर्गाच्या विभिन्न जाती. पाऊस हा एखाद्या धटिंगणासारखा आपल्या आगमनाची घोषणा करीत, आकांडतांडव करीत बरसतो. नव्यानेच प्रेमात पडलेल्या तरुणासारखा तो पृथ्वीला भेटायला येतो. बर्फाचे आगमन मात्र अतिशय सावध.. सुरुवातीला जरासा लाजरेपणा.. आपली चाहूलही लागू न देता.. साऱ्या आसमंताला आच्छादित करतो. एखाद्या अनुभवी प्रियकरासाराखा तो आपले शुभ्र हात साऱ्या पृथ्वीतलावर फिरवतो.
भारतात पहिल्या पाऊसाने दरवळणारा मृत्तिकागंध, त्यानंतर त्याच्या जोरदार सरींनी लोकांची होणारी त्रेधातिरपिट आणि कधी कधी संतप्त होऊन त्याने केलेला प्रलयप्रात याचा अनुभव घेतल्यानंतर इंग्लंडला पडणाऱ्या बर्फाविषयी फारच उत्सुकता होती. अर्थात युरोपमध्ये स्विडन, नॉर्वे, फिनलंड, स्वित्र्झलड या ठिकाणी हिवाळ्याचे चारही महिने बर्फच असतो. इंग्लंडमध्ये, स्कॉटलंडमध्ये आणि उत्तर भागात हिवाळ्याचे एक-दोन महिने सतत बर्फ पडतो. पण लंडनमध्ये आणि दक्षिण इंग्लंडमध्ये बर्फ फार तर आठवडाभर मुक्काम ठोकतो. त्यामुळे या पाहुण्याविषयी लोकांत फार उत्साह!
जसजसा नाताळचा दिवस जवळ येतो तसतसे लोकांच्या ‘white christmas’ (व्हाइट ख्रिसमस) असणार का, यावर पैजा सुरू होतात. हवामान खाते मागील १०० वर्षांचा इतिहास आणि यंदाच्या थंड-उष्ण वाऱ्यांची हालचाल पाहून ख्रिसमसला बर्फ पडेल का याची बतावणी करू लागतात. पण हा बर्फाचा वर्षांव फार फार तर दोन-तीन दिवस आधी वर्तवता येतो. इंग्लड हे एक बेट असल्याने थंड-उष्ण वारे फारच सैरभैर वाहतात! त्यामुळे लंडनसारख्या शहरात ‘व्हाइट ख्रिसमस’ फार वाटय़ाला येत नाही. दोन वर्षांपूर्वी मात्र ख्रिसमसपूर्वीच या महाशयांनी हजेरी लावली आणि लोकांची त्रेधातिरपिट उडविली होती. पण जरी ख्रिसमसला नाही आला तरी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात बर्फाची एखादी तरी हजेरी होते.
इतर युरोपियन शहरांसारखे लंडन अतिबर्फवृष्टीला सामना देण्यासाठी अजूनसुद्धा फारसे तयार नाही. वर्षांतून एक-दोनदा होणाऱ्या या बर्फवृष्टीने वाहतुकीचा निकाल लागतो. लंडनच्या महापौरांनी ‘आपण सज्ज आहोत’ अशा घोषणा देऊनही, रेल्वे, विमानतळ येथे लोकांचा खोळंबा होतो. पण बच्चेकंपनीची मात्र मजा!
वर्तमानपत्रे, टीव्ही, रेडिओ यांवरून बर्फवृष्टी होणार म्हणून घोषणा सुरू असतात. लोकांना जीवनावश्यक वस्तूंची आगाऊ खरेदी करण्याचे आवाहन केले जाते. ऑफिसातील मॅथ्यू त्याच्या जवळच्या मित्रांना जमवून घरी पत्त्यांचा डाव मांडायचे ठरवतो. तर निकला त्याच्या चेलसी फुटबॉलच्या गेमला कसे जायचे याची चिंता. डेविडला त्याच्या दोन उच्छाद मुलांना घरात कसे काबूत ठेवायचे याचे टेंशन! तर अभीला भल्या सकाळी कॅनडासाठी विमान गाठायचे असल्याने त्याची चिंता. आणि माझ्यासारखे अनेक मोठी सुट्टी मिळेल का या आशेवर!!
येण्याचा एवढा गाजावाजा असला तरीही प्रत्यक्षात येताना हा बर्फ अगदीच आवाज न करता येतो. खिडकीपाशी वाट पाहत उभे राहाल तर यायचाच नाही मुळी! आणि जरा पाठ फिरली की हिमबृष्टी होते. सावरीच्या कापसासारखे हिमकण सैरभैर भिरू लागत हळूहळू बर्फाचा सुंदर शुभ्र गालिचा पसरला जातो. झाडे, फुले, पाने, रस्ते, घरे यांना घट्ट धरून राहतो हा बर्फ. पावसासारखा चटकन निसटत नाही. एक-दोन दिवसांच्या मुक्कामालाच येतो जणू. अंगावर कपडय़ांचे थर चढवून लोक घराबाहेर पडण्याचे धैर्य करतात. गाडय़ांवर आणि रस्त्यांवर बर्फाचा थर असल्याने पायीच चालणे योग्य ठरते. नव्या कोऱ्या बर्फावर पाय ठेवल्यावर हळूच चिरकल्याच आवाज होतो. चालता चालता या आवाजाचा एक नादच लागतो. सब्रिना, सुरेशबरोबर बर्फाच्छादित परिसर पाहायला जाण्याचा मोह आवरता येत नाही. बच्चेकंपनी वडिलधाऱ्यांसोबत जवळच्या गार्डनमध्ये कूच करते. घरगुती तयार केलेल्या स्लेजला ओढत त्याचे खेळ चालू असतात. हॅमस्डेड हिद, प्रिमरोज हिल यांसारख्या छोटय़ा टेकडय़ांवरून बर्फातून खाली घसरत येण्याचे खेळ चालू होतात. चिल्लरपार्टी आणि मोठेही ‘स्नोमॅन’ बनविण्यासाठी सज्ज होतात. बर्फाचे गोळे करून एकमेकांवर फेकायचे. किराणा मालाचे दुकान चालवणारा अलीसुद्धा आत येणाऱ्या गिऱ्हाईकाचे बर्फाचा छोटा गोळा फेकून स्वागत करतो! ‘होली’डे असल्याने लोकांनाही काही वाटत नाही!! काही उत्साही जॉगिंगसाठीसुद्धा घराबाहेर पडतात. शेते, मैदाने, टेकडय़ा सारे काही या बर्फाखाली दडपून गेलेले असते. बरेचदा रात्री बर्फातून शेतात फिरताना निळ्या आकाशाखाली शुभ्रपणे चमकणारा हा बर्फाचा गालिीचा डोळ्याचे पारणे फेडतो. झाडाच्या फांद्यांवर बसलेला, घरांच्या कौलावर संथावलेला, पायवाटेवर पहुडलेला आणि कधी कधी गाडय़ांच्या टपावर बसून फिरणारा असा हा बर्फ! स्वच्छ सूर्यप्रकाशात त्याची कांती चकाकून जाते. हळूहळू हा सूर्य प्रखर बनतो आणि बर्फ वितळू लागतो. म्युनिसिपलचे लोक येऊन गाडय़ांनी किंवा रेती टाकून बर्फाचा निकाल लावण्यासाठी सज्ज होतात. महत्त्वाच्या रस्त्यांवरून बर्फ काढून टाकण्याचे काम जोरात चालू असते. तरीही एखाद्या हट्टी बाळासारखा हा झुडपांमागे, पानांमध्ये, झाडांच्या टोकांवर, छतांवर घट्ट चिकटून असतो. लोकही हळूहळू आपल्या कामाला लागतात. त्यांच्या मनात मात्र एका अज्ञात कवीच्या ओळी रेंगाळत असतात –
‘हाताच्या तळव्यावर अलगदपणे विसावणारा
किंवा निसटून जमिनीवर पसरणारा हा हिमकण
त्याची हिऱ्यासारखी सुंदरता
हे प्रभो, कधीच कमी होऊ नये’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2014 1:10 am

Web Title: snow fall in london
Next Stories
1 जावे दावोसच्या गावा…
2 अशोक – द ग्रेट!
3 जीवनाविषयीच्या ओल्या उमाळ्याची कविता
Just Now!
X