News Flash

चतुरकथा..

चतुराच्या चेहऱ्याचं यथार्थ वर्णन करणारी ही अर्थपूर्ण जपानी चारोळी आठवायला कारणही तसेच घडले. गेल्याच महिन्यात महाराष्ट्रामध्ये चतुरांच्या नवीन जातींचा शोध लागल्याची बातमी ‘लोकसत्ता’तच वाचली.

| August 31, 2014 01:11 am

kSee this dragonfly
his face is practically…
nothing else but eyes…l  : Chisoku    
चतुराच्या चेहऱ्याचं यथार्थ वर्णन करणारी ही अर्थपूर्ण जपानी चारोळी आठवायला कारणही तसेच घडले. गेल्याच महिन्यात महाराष्ट्रामध्ये चतुरांच्या नवीन जातींचा शोध लागल्याची बातमी ‘लोकसत्ता’तच वाचली. आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या असंख्य कीटकांपैकी एक असणाऱ्या चतुरांबद्दलची ही बातमी फारशी कुणाच्या लक्षातही राहिली नसेल, कारण अजूनही आपल्याकडे कीटकांच्या निरीक्षणाला व अभ्यासाला वन्यजीव व पक्षीनिरीक्षण किंवा पुष्पनिरीक्षणाएवढे ‘ग्लॅमर’ प्राप्त झालेले नाही. फुलपाखरं सोडल्यास इतर कीटकांना साहित्यातही विशेष स्थान मिळालेले दिसत नाही. कीटकांच्या अनोख्या विश्वातल्या बऱ्याचशा गूढरम्य गोष्टी अजूनही अप्रकाशितच राहिलेल्या आहेत. कीटकशास्त्रज्ञ, तज्ज्ञ मंडळी या अंधारातल्या गोष्टी शोधून काढत असले तरीही निसर्गप्रेमींपर्यंत, चौकस बुद्धीच्या निरीक्षकांपर्यंत ही गुपिते सहजी पोहोचत नाहीत. त्यासाठी  नाइलाजाने पाश्चात्त्य भाषांतील साहित्याचा आधार घ्यावा लागतो वा निसर्गविषयक वाहिन्यांकडे मोर्चा वळवावा लागतो.
आपल्याला लहानपणापासून चतुर (dragonfly) ओळखीचा असतोच. दबकत दबकत चोरपावलांनी जाऊन दगडावर वा काटकीवर विसावलेल्या चतुराच्या शेपटीला किंवा पंखाला धरून त्याला पकडण्याचं, त्याच्या शेपटीला दोरा बांधून उडवण्याचं ‘थ्रिल’ बहुतेकांनी अनुभवलेलं असतं. त्याचीच धाकली बहीण म्हणावी अशी नाजूक, छोटी आवृत्ती असलेली ‘टाचणी’ही (damselfly) आपल्यापैकी बहुतेकांना परिचित असते. विशेषकरून पाण्याजवळ आढळणारे हे कीटक इतर कीटकांपेक्षा बऱ्याच बाबतीत वेगळे ठरतात. काहीसं गूढाकर्षक विचित्र रूप, हवाई हल्लेखोर (प्रीडेटर) असा इतर कीटकांमध्ये असणारा दरारा, जवळपास ३०० दशलक्ष वर्षांपूर्वीपर्यंत जाणारा वंशेतिहास (ज्यांच्यापुढे मानव म्हणजे ‘कल का बच्चा’!) आणि हवेतील उड्डाणाचे सारे मूलभूत शास्त्रीय नियम धाब्यावर बसविणारी विस्मयजनक उड्डाणक्षमता अशा गुणवैशिष्टय़ांमुळे चतुर व टाचण्या इतर कीटकांपेक्षा वेगळ्या उठून दिसतात.
पक्षी तसेच पुष्पनिरीक्षण व निसर्गाभ्यास-भ्रमंती हे छंद आनंददायी व मन प्रसन्न करणारे आहेत यात दुमत नाही. परंतु चतुर-टाचण्यांसारख्या इवल्या कीटकांचे निरीक्षणही काही कमी मनोरंजक नाही. एकदा पक्षीनिरीक्षणासाठी नाशिकजवळच्या एका तळय़ावर गेलो असताना केलेले चतुरांचे निरीक्षण अजूनही मला लख्खपणे आठवते. वर स्वच्छ, निळय़ा आभाळात जाडगेल्या लालजर्द चतुरांची टोळी आपापल्या हवाई हद्दीची टेहळणी करत उडत होती. त्यातला प्रत्येकजण स्वत:च्या आखीव पट्टय़ात वरखाली झेपावत सूर मारत होता अन् जवळ येणाऱ्या दुसऱ्या चतुराला हुसकावून लावत होता. एखादा वेगळा कीटक जरी त्याच्या हद्दीत घुसला तरी त्याच्या मागे लागत होता. मध्येच एक-दोन मोठाले, टॅक्सीसारखे काळे-पिवळे चतुर सावकाश रेंगाळत शांतपणे उडत होते. आणखी काहीजण पाण्यावर सूर मारत होते. काही गोल गोल घिरटय़ा घालत होते. तर काही काटक्यांवर वा पाणगवतावर स्तब्ध बसून विश्रांती घेत होते. त्यातले काही निळय़ा सॅटीनच्या रंगाचे, काही मळकट पिवळय़ा रंगाचे, काही मुलायम रेशमी पंखांचे काळे चतुर होते. तर काही केशरी पंखांचे, चमकदार तपकिरी रंगाचे होते. एक तर झळाळणारे सोनेरी पंख आणि त्यावर काळे बुंदके मिरवणारा होता. प्रत्येकाचा थाट न्यारा!
काठावरच्या लव्हाळय़ात, गवताच्या काडय़ांमधून वाट काढत काही टाचण्या हळुवारपणे उडत होत्या- म्हणण्यापेक्षा तरंगत होत्या किंवा वाऱ्याच्या मंद झुळकांबरोबर वाहवत जात होत्या. निळ्या-पिवळय़ा रंगांच्या टाचण्या लांबूनही लक्ष वेधून घेत होत्या, तर काही हिरव्या रंगाच्या गवतात बेमालूमपणे अदृश्य होऊन गेल्या होत्या. ‘मला काय माहीत?’च्या आविर्भावाप्रमाणे उलटा बाहेर वळवलेला खालचा ओठ आणि मोठाले लंबगोलाकार डोळे टाचण्यांचे चतुरांशी असलेले जवळचे नाते दाखवून देतात. टाचणी म्हणजे  Damselfly आणि Damsel  चा अर्थ होतो- नाजूकशी युवती. तर चतुर म्हणजे  Dragonfly.. अन् Dragon म्हटलं जातं- एका कल्पित पंखवाल्या भल्यामोठय़ा भयंकर सर्पाला! नावाप्रमाणेच टाचण्या चतुरांपेक्षा नेहमीच नाजूक, हळुवार व लहानखुऱ्या असतात. टाचण्या विश्रांतीसाठी बसताना त्यांचे पंख पाठीवरून शेपटीला समांतर असे मिटून घेतात, तर चतुर त्यांचे पंख जुन्याकाळच्या छोटेखानी विमानांप्रमाणे दोन्ही बाजूला आडवे पसरून बसतात.
आता थोडंसं चतुरांच्या वंशइतिहासाबद्दल! त्याच्या मुळाशी जायचं म्हटलं तर आपण पोहोचतो थेट उत्क्रांतीवृक्षाच्या मुळापाशी! आज जिवंत असणाऱ्या सर्वात जुन्या जिवांमध्ये त्यांचा समावेश होतो. पृथ्वीतलावर सुमारे २५० ते ३५० दशलक्ष वर्षांपासून त्यांचे अस्तित्व आहे. अन् आज आपणाला दिसणाऱ्या त्यांच्या रूपात गेल्या १५० दशलक्ष वर्षांपासून काहीही बदल झालेला नाही. चतुरांना पृथ्वीवरचे पहिले हवाई हल्लेखोर-परभक्षी (प्रीडेटर) होण्याचा मान दिला जातो. त्यांचा एक पूर्वज तर चक्क ६५ ते ७० सें. मी. लांब- म्हणजे थेट दोन फुटांपेक्षा मोठे पंख असणारी जबरदस्त असामी होता आणि त्याचं नाव होतं- Meganewramonvi.. या आदिपुरुषाचे आजचे वंशज म्हणजे चतुर व टाचण्या कीटकवर्गाच्या २९ गणांपैकी ‘ओडोनाटा’ या गणात समाविष्ट होतात. आज जगभरात चतुरांच्या तब्बल ४५०० जाती सापडतात. ज्यांचा आकार २ ते १३ सें. मी.पर्यंत व पंख ३० सें. मी.पर्यंत लांब असतात. अगदी आपल्या जवळच्या नदी-तलावावरील भ्रमंतीत सहजी पाच-सात प्रकारचे चतुर दृष्टीस पडतात. बर्फाळ ध्रुवीय प्रदेश वगळता जगभर सर्वत्र त्यांचा मुक्त संचार आहे. त्यातही उष्ण, दमट, मध्य कटीबंधीय प्रदेशांचे तर अनभिषिक्त सम्राटच मानले जातात!
चतुरांचं शरीर त्यांच्या हवेत उडता उडता शिकार करण्याच्या जीवनपद्धतीला अनुरूप असंच असतं. त्यांचे पंख निमुळते, चांगलेच चिवट, करकरीत व लवचिक असतात. त्यांची एकत्रितपणे वा एकेकटीसुद्धा हालचाल होऊ शकते. त्यांचे धड म्हणजे मध्य शरीर चौकोनी, जाडसर आकाराचे; कारण त्यात पंखांना जोडलेले शक्तिशाली स्नायू सामावलेले असतात. साऱ्यावर कडी म्हणजे त्यांची उड्डाणकला! बहुधा सर्व उडणाऱ्या जिवांमध्ये चतुरांएवढे गोंधळवून टाकणारे, विस्मित करणारे उड्डाण कोणाचेही नसेल. कारण अजूनही आपल्याला त्यांच्या उडण्याच्या पद्धतीतील गुंतागुंत व बारकावे नीटसे कळलेले नाहीत. हे कीटक अत्यंत आश्चर्यकारकरीत्या उडू शकतात. ते सरळ पुढे, तसंच मागच्या बाजूला रिव्हर्समध्येही उडू शकतात. दोन्ही बाजूंना डावी-उजवीकडेही उडू शकतात. ‘पलक झपकतेही’ उडण्याची दिशा बदलू शकतात आणि झटपट प्रति ताशी ९६ कि. मी.पर्यंत सुसाट वेग वाढवून क्षणार्धात दिसेनासे होऊ शकतात. पक्ष्यांप्रमाणे हवेच्या कमी-जास्त वेगवान प्रवाहांचा हुशारीने उपयोग करून घेऊन कमी श्रमांत ते हवेत तरंगू शकतात, अन् वर-खालीही जाऊ शकतात.
चतुरांचे डोळेही अजबच! दोन मोठाल्या मण्यांसारखे चमकदार संयुक्त नेत्र- ज्यांमध्ये प्रत्येकी १०,००० ते  २५,००० षट्कोनी सूक्ष्म भिंगे सामावलेली! हे कमी की काय, म्हणून आणखी तीन साधे नेत्रक- डोळे कपाळावर असतातच! त्यात भर म्हणून चतुरांना त्यांचं डोकं अक्षरश: कसंही, कुठेही, कोणत्याही दिशेला वळवता येतं- ज्यामुळे हव्या त्या कोनातून ते पाहू शकतात. त्यांच्या सहा काटेरी पायांचा उपयोग चालण्यापेक्षा काटकीवर वा भिंतीवर आधार घेण्यासाठीच होतो. उडताना तर हे काटेरी पाय व वासलेला जबडा मिळून मृत्यूचा एक पिंजराच तयार होतो; ज्यात दुर्दैवी भक्ष्य पकडले जाऊन त्याचा हवेतच फन्ना उडवला जातो. चतुर शुद्ध मांसाहारी शिकारी आहेत अन् त्यांची पोटपूजा होते छोटय़ा माश्या, मधमाश्या, डास, चिलटं, फुलपाखरं आणि लहान चतुरांवर! टाचण्यांचं भक्ष्य म्हणजे लहान कीटक!
यांच्या जोडीदाराच्या अनुनयाची व मीलनाची तऱ्हाही न्यारीच! आकाशातल्या ठरावीक हद्दीमध्ये नर उडत, पहारा देत मादीची वाट पाहत असतो. तिच्या आगमनानंतर त्यांचा पाठशिवणीचा खेळ रंगतो. एकदा का ते दोघे एकामागे एक सरळ रेषेत उडू लागले की समजावे- ‘सबकुछ आलबेल है!’ त्यांची मीलनक्रियाही इतर कीटकांपेक्षा हटके! प्रथम नर आपल्या शेपटीच्या टोकाकडून स्वत:चे शुक्राणू आपल्या पोटाच्या पुढच्या भागावरील विशिष्ट अवयवावर आणून ठेवतो. त्यानंतर मादीच्या पाठीवर आरूढ होऊन तिचे डोके स्वत:च्या पोटावरील चिमटय़ांनी पकडतो. मग मादी आपली शेपटी उलटी वळवून, वाकवून शेपटीचे टोक नराच्या पोटापुढच्या भागावर आणते, जिथे नराने अगोदरच शुक्राणू आणून सोडलेले असतात. अशा आडवळणी प्रवासानंतर एकदाचे शुक्राणू योग्य ठिकाणी पोहोचतात. टाचण्यांमध्ये हीच क्रिया थोडय़ाफार फरकाने घडते. यात नर त्याच्या शेपटीकडच्या चिमटय़ांनी मादीची पाठ पकडतो आणि दोघांच्या शरीरांचे आकडे, वेलांटय़ांमधून एक विशिष्ट चक्राकार शरीराकार निर्माण होतो. या स्थितीत टाचण्या बराच काळपर्यंत राहतात. अगदी मादी अंडी घालण्यासाठी पाण्यावर उतरेपर्यंतही!
अंडी बहुधा तळ्याच्या वा डबक्याच्या काठावर घातली जातात किंवा चिखलात गाडून ठेवली जातात. बऱ्याचदा पाण्याच्या पृष्ठभागावर पसरवली जातात. तर क्वचित पाणवनस्पतींच्या मऊ खोडांमध्ये वा पानांच्या देठांमध्येही घातली जातात. काही आठवडय़ांनंतर अंडय़ांमधून चतुरांच्या अळय़ा-निंफस् (ज्यांना ‘नाइअ‍ॅड्स’ म्हटले जाते)- बाहेर पडतात. यासुद्धा मांसाहारीच असतात व पूर्णपणे पाण्याखालीच जगतात. या सगळय़ात गमतीची बाब अशी की, चतुरांच्या जीवनातील ही अळीची जलचर अवस्था थेट दोन-तीन वर्षांपर्यंतही असते. तर हवेतील जीवनकाल फक्त काही दिवसांपासून पाच-सहा महिन्यांपर्यंतच असतो. या अळय़ांचं रूपसुद्धा भीतीदायक.. हत्यारबंद सैनिकांसारखं! मोठं डोकं, दणकट पाय, बोटीच्या प्रॉपेलरप्रमाणे पुढे ढकलणारी शक्तिमान शेपटी, अन् सर्वात खतरनाक हत्यार म्हणजे पकडीसारखा हलणारा कराल दातेरी जबडा- जो चिल्लर किडे व किरकोळ मासे हा-हा म्हणता सहजी चुरून, भुगा करून टाकतो.
पाण्याखालच्या दीर्घ वास्तव्यात चतुरांच्या अळय़ा इतर कीटकांसारख्याच ८ ते १५ वेळा कात टाकतात. प्रत्येक कात टाकल्यावर अळीचं रूप बदलत जातं, आकार मोठा होत जातो आणि शेवटी एकदाची ती घटिका भरते. बहुधा रात्री उशिरा किंवा भल्या पहाटेच ही पूर्ण वाढ झालेली अळी पाण्यातल्या काटक्यांवरून चढून वर मोकळय़ा हवेत येते, अन् बाहेर आल्यावर शेवटची कात टाकते. अशा प्रकारे एका पूर्ण वाढ झालेल्या चतुराचा पाण्याच्या साक्षीने हवेमध्ये जन्म झालेला असतो. अजूनही त्याचे पंख मऊ आणि चुरगळलेलेच असतात. हळूहळू ते सरळ होऊ लागतात. बारीक शिरांमध्ये रक्त दौडायला लागून कडकही होतात. अंतिमत: पंख पूर्णपणे कोरडे करकरीत होऊन लकाकायला लागल्यावर व शरीर वाळून तेजतर्रार झाल्यावर हे निसर्गाचे अद्भुत शिकारी ‘हेलिकॉप्टर’ त्याच्या पहिल्या उड्डाणासाठी सज्ज होते, अन् पाहता पाहता वाऱ्यावर स्वार होऊन आपल्या जन्मदात्या पाण्यावर घिरटय़ा घालू लागते.
यांच्या पाण्यातल्या अळय़ा जरी शिकारी, भक्षक म्हणून प्रसिद्ध असल्या तरी त्यांनाही त्यांचे शत्रू आहेतच. ‘जीवो जीवस्य जीवनम्’ ही उक्ती सार्थ ठरवत निसर्गाचे रहाटगाडगे व्यवस्थित चालण्यासाठी बऱ्याचशा अळ्या पाण्यातल्या माशांकडून व इतर जलचरांकडून मटकावल्या जातात. तर वेडे राघू, खाटीक, कोतवाल आदी पक्षीगण बऱ्यापैकी कसरती करून बऱ्याचशा चतुरांना आपल्या उदरात जागा देतात. मानवासाठी मात्र चतुर निरुपद्रवी वर्गात मोडतात. किंबहुना, काही प्रमाणात आपल्याला उपद्रव देणारे डास व माश्यांसारखे कीटक गट्टम करून मदतच करतात. काही देशांमध्ये डासांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी चतुरांचा उपयोग करून घेण्याचे प्रयोग चालू आहेत.
नेहमी गोडय़ा पाण्याच्या सान्निध्यातच आढळणारे चतुर बऱ्याचदा पाण्यापासून पुष्कळ दूर वाळवंटांमध्येसुद्धा उडताना सापडले आहेत. चतुरांच्या काही जाती उडत उडत खूप लांबची अंतरे कापण्यासाठी प्रसिद्ध आहेत. खोल समुद्रातील जहाजांवर चतुर सापडल्याची उदाहरणेही काही कमी नाहीत. आपल्या परभक्षी जीवनामुळे चतुर व टाचण्या बहुतेक सगळय़ा जलीय परिसंस्थांचा, जैवव्यवस्थांचा महत्त्वाचा भाग मानले जातात.
आपल्या आजूबाजूच्या विविध रंगाकारांच्या पक्षी-प्राण्यांप्रमाणेच हे इवले कीटकही आपल्याला भरभरून आनंद देऊ शकतात. त्यासाठी हल्ली ‘बाजार’ बनलेल्या अभयारण्यांतील गर्दीत धडपडत जाण्याची अजिबात जरूर नाही. आपल्या जवळपासचं एखादं शांत तळं वा तलाव, ओढा किंवा पाणथळ जागा शोधावी, निवांत वेळ पाहून त्याच्या काठावर आरामात बैठक जमवावी, छोटीशी डायरी, पाठकोरे कागद अन् पेन्सिल खिशात ठेवावी. जमलंच तर एखादी छोटेखानी दुर्बीणही बरोबर घ्यावी. आणि मग डोळे भरून त्यांना आपल्या डोक्यावरून, पाण्याच्या पृष्ठभागावरून, गवताच्या पात्यांमधून, रामबाणाच्या, जलवेताच्या काडय़ांमधून सूर मारताना पाहावं. त्यांच्या आपसातील हल्लाबोलीचा माग काढावा. आपापल्या हद्दीचं रक्षण करतानाची आक्रमक उड्डाणं पाहावीत. गवतातून हळुवार, नजाकतदार तरंगणं अवलोकावं. एखादी काटकी, दगड किंवा गवताच्या पात्यावर बसून विश्रांती घेताना चमकणारे गूढ डोळे निरखावेत. त्यांचे वेगवेगळय़ा कोनांतून फिरणारे डोकं बघून विस्मित व्हावं. विविधरंगी पारदर्शक, बुट्टेदार, थरथरणारे, पण शक्तिशाली पंख डोळय़ांत साठवावेत. अंगी नाना कळा असलेले हे मनमौजी ‘ड्रॅगन्स’ व ‘डॅम्सेल्स’ आपल्याला कधीही निराश करणार नाहीत..
 kSnowy mountain
echoes in the Jewelled eye
of a Dragonflyl – Issa.                                       
(छायाचित्रे : डॉ. श्रीश क्षीरसागर)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2014 1:11 am

Web Title: story of kite insect
Next Stories
1 वेध..महाराष्ट्रीय संवेदनेचा!
2 आजचा महाराष्ट्र आणि वैचारिकता
3 टोकावर उभं असलेलं मराठी गाणं!
Just Now!
X