|| कौस्तुभ केळकर- नगरवाला

 

जिगरी मतर सदाभौ यांस,

दादासाहेब गांवकरचा दंडवत.

काय सदाभौ? ममईला पाऊसपानी कसं हाई? वल्या पावसात चिंब भिजून ऱ्हायलाय की न्हाई? कांदाभजी आन् हिरवी मिर्ची. हाण त्येच्या आयला. पाऊस आक्षी रोहितवानी दमदार ब्याटिंग करून ऱ्हायलाय की गडय़ाहो. आमी वाचलं ‘लोकसत्ता’मंदी. मस पाऊस पडून ऱ्हायलाय ममईला. सदाभौ, जीवाला जपा वाईच. दमदार पाऊस ममईची ईकेट काढतू लागलीच. ममईची शून्य मिल्टात तुंबई होती म्हनं. येखाद् दिस हापीसला दांडी. चालतंय की. उगा आटापिटा करून हापीसला जाशीला आन् मागारी घरला पोचायचं वांदं. आमी काय म्हन्तो सदाभौ? ममईच्या हापीसवाल्या सायेबांनीबी समजून घेयाला पायजेल. दरसाल शीक लीववानी पाच- सा मान्सून लीव देयाला पायजेल. भाईर मरनाचा पाऊस.. घरधनी हापीसात अटकल्येला.. कारभारनीचा जीव टांगनीला. यापरीस आभाळात काळ्या ढगांची गर्द गदी जाली की लगोलग मान्सून लीववर जायाचं. टांगापलटी मोडमंदी टीवीम्होरं आडवं हुयाचं. पेटल्येला पाऊस काळजाला काळजीची भोकं पाडतुया. काळजातलं चर्र्र ईसरून जायाचं. कडईत तापलेल्या तेलामंदी पोवनाऱ्या भज्यांचा चर्रचर्र आवाज कानात साटवायचा. खमंग भज्यांची भरपेट ढेकर देयाची आन् आनंदात पाऊसगानी गायाची. काय सदाभौ? कशी काय हाये आम्ची आयडियाची कल्पना?

सदाभौ, तुमी काय बी म्हना. तुमास्नी पाऊस लागतु तो फकस्त कांदाभजी खायासाटी. आभाळ फाटल्यावानी संततधार कोसळधार पाऊस तुमा शिटीवाल्या लोकान्ला झ्येपत न्हाई.

मंग तुमीच लोकं ‘रेन रेन गो अवे’ म्हनून ऱ्हायत्यात. आवं, शीतभर पावसानं ढीगभर पानी साचून ऱ्हायलंय. ट्ऱ्याफिकचा जांगडगुत्ता होतुया. लोकलगाडय़ा बंद पडत्याती. जीवाला घोर आन् पावसाचा जोर. तुमी लोकं समदं बील पावसाच्या नावानं फाडून ऱ्हायतात. वागनं बरं नव्हं. मे म्हैन्यात पानीकपातीचा चटका बसला की पावसाच्या नावानं बोटं मोडायची. ‘ये रे ये रे पावसा’ म्हनायचं आन् पावसाला साद घालायाची. जूनमंदी तेला यायाला दोन-चार दिस ल्येट जाला की त्याच्या नावानं मस बोंबा मारायच्या. आवं, लई लांबचा प्रवास हाई त्येचा. थोडं फुडं-मागं हुनारच की राव. पावसाच्या नावानं चांगभलं. तो पडाया लागला की हावरटावानी आपली धरनं काटोकाट भरून घेयाची. सालभराची पान्याची ददात मिटाया पायजेल. त्यो आपल्याच तालामंदी बरसू लागला की म्हनायचं- बास जालं.. आता जा तिकडं- गावाकडं. मेरे आंगने में तुमारा क्या काम हाई? आवं, पाऊस मंजी निसर्गराजा हाई सदाभौ. त्यो मनमौजी हाई. कलंदर बी हाई आन् बिलंदर बी. त्येच्या बेशिस्तीला बी शिस्त हाये गडय़ाहो. राजावानी दिलदार हाई त्यो. त्योच जलदाता, त्योच अन्नदाता. गावच्या, शेराच्या, भासेच्या, राज्याच्या आन् देसाच्या सीमा त्यो बगत न्हाई. त्यो  बेधुंद, मदमस्त बरसू लागला की दिल गार्डन गार्डन होतंया बगा. आता तुमी जर त्येला गावाकडं जा, हापीसच्या टायमाला येवू नगंस, ईतवारी ये आसं सांगून ऱ्हायला तर त्यो रूसनारच की वं. त्यो रुसला की संपलं. सदाभौ, तुमास्नी पाऊस कसा पायजेल सांगू? तुमच्या शिटीच्या आभाळामंदी पावसाचं टाकं हवं. पोरं साळंला पोचली, समद्यो बाया-बाप्ये हापीसात पोचले की तिथल्ला नळ चालू करायचा. त्यो बी येकदम डीम. हळूहळू पडनारा पाऊस. रिमझीम. संध्याकाळी पाचनंतर बंद. कुटं बी पानी तुंबाया नगं. ट्रॅफिक जाम नगं. तुमा शिटीवाल्यान्ला सालभर पुरंल ईतकं पानी पदरात पाडून घेयाचं. त्ये गावलं की नळ बंद. तुमास्नी असा रिमोट कंट्रोलवर चालनारा पाऊस हवा हाई सदाभौ. कसं जमायचं? आवं, पर्जन्यदेव हाई त्यो. त्येच्यावर कंट्रोल कुनाचा बी न्हाई. तुमी स्मार्ट शिटीवालं.. त्याची आर्त हाक ऐका की राव. त्यो म्हन्तो ऊतू नका, मातू नका. घ्येतला वसा टाकू नका. पावसाचं पानी जिराया मोकळी जिमीन गावली तर त्यो कशाला तरास देईल? पेवरच्या नावानं तुमी कोपरा कोपरा ब्लाक करून ऱ्हायलाय. पावसाच्या पान्यानं जावं कुटं? मग त्योच पिक्चर दरसाली रिलीज होतुया. रिपीट टेलीकाश्ट. पानी पानी रे.. पानी तुंबतंया रे..

सदाभौ, पुढच्या मान्सूनला तुमी गावाकडं या. आमचा गावाकडचा पाऊस येकदम सराट. येकदम डिफरंट. शिटीवाला पाऊस मुका आसतुया. गावाकडचा पाऊस घडाघडा बोलतु आमच्यासंगट. धडाधडा बरसतु. सोबतीला अत्तराची सुगंधी पिपं घीवून येतंया बेनं. पहिल्या पावसात ही पिपं जिमिनीत रिती हुत्यात. मातीच्या वासाचा घमघमाट.. मन वढाय वढाय.. शिटीतलं डामरी रस्तं आन् पेवर ब्लाकवाल्या जिमिनी. मातीच्या वासाची जादुई अत्तराची कुपी त्येन्ला ठावं न्हाई.

गावाकडचा पाऊस आमचा सच्चा दोस्त. तो कशापायी कुनाला खुन्नस देईल? हवामान खात्याला तर बिल्कूल न्हाई. सदाभौ, आकाश जिक्कून ऱ्हायलाय देस माजा. बळीराजाला लई आधार हाई हवामान खात्याचा. आताशा बराब्बर भाकीत करत्यात. थोडंसं उन्नीस-बीस. आवं, पर्जन्यदेव लहरी हाई. वारा त्येचा जिगरी मतर. हिकडं तिकडं भरकटतो वाईच. चालतंय की!

सदाभौ, तुमास्नी ठाव नसंल.. गावाकडं पावसाचं भाकीत सांगनारी भारी शिश्टीम हाई. कावळा-कावळीचं घरटं झाडावर ऊंच बांधल्यालं दिसलं की समजून घेयाचं.. त्या साली पाऊस कमी. मद्दम उंचीवर आसलं की पाऊस मिडीयम. आन् येकदम खालच्या अंगाला कावळ्याचं घरटं दिसलं की रंपाट पाऊस.

पावसाची चाहूल लागली की बलं जिमीन हुंगू लागत्यात. गळ्यातल्या घंटा वाजवीत जोरान्नी डुरकतात. मोर पिसारा फुलवून नाचत्यात. पावशा ठाव हाये की न्हाई तुमास्नी? पावशाचा आवाज काळजाचा ठाव घेतु गडय़ाहो. वाईच कान दिवून ऐका त्येची हाक. आक्षी मऱ्हाटीत बोलतु त्यो पक्षी. ‘पेरते व्हा, पेरते व्हा..’ असं सांगून जातू त्यो. त्याच्याकडनं वर्दी मिळाली की बळीराजा कामाला लागतु. नांगरनी, कुळपनी, पेरनी.. मस कामं असत्याती. त्यो चातक पक्षी आपला पाहुना हाये. तिकडचा आफ्रिकेतला हाई. पावसाची वर्दी देयाला येतु आपल्या रानात. कोकिळा, बुलबुल, वटवटय़ा.. या समद्या पक्ष्यान्ला घरटी बांधाया मोप देसी झाडं पायजेल. करंज, आंबा, पिपळ, वड अशा झाडांची देवराई हवी. सदाभौ, गावाकडं धोबी पक्षी दिसला की दी यंड.. पाऊस सपला.

बळीराजाचा आन् पावसाचा जलम जलम का रिश्ता हाई सदाभौ. समदी बारा नक्षत्रा त्येला ठाव हाईती. पडेल हस्त, शेती मस्त. पडतील स्वाती, पिकतील मोती. बळीराजा निसर्गाच्या साळंत शिकलाय सदाभौ. आन् पाऊस ईषय त्येच्या आवडीचा. डिटेलमंदी श्टडी केलाय त्येनं पावसाचा. गावाकडं नक्षत्रान्ला आन् पडनाऱ्या पावसाला रंपाट नावं हाईती. तरनाताठा पाऊस संततधार. रिमझिम म्हातारा. कडकडाटी सासूचा आन् श्येतीला उपेगी फाल्गुनातला सुनेचा. दमदार कोसळधार हत्तीचा.

पाऊस पडाया लागला की रानात चिखल होतु. डोईवर ईरलं न्हाईतर घोंगडं घेयाचं आन् रानात जायाचं. काळ्या मातीत मातीत.. तिफन चालते. सर्जा राजाची दमदार साथ. पायान्ला मस चिखल्या हुत्यात. पर्वा कुनाला? पावसाचं मोती पिवून शिवार हिरवंगार झाल्याबिगर बळीराजाला चन पडनार न्हाई. बीजे अंकुरे अंकुरे.. स्रावनात ऊनपावसाचा ख्येळ सुरू जाला की रान हिरवा शालू नेसतं. सनासुदीचे दिवस येत्यात. कूस भरल्यावानी गरभारपनाचं हिरवं त्येज समदीकडं दिसू लागतं. समदं रान, समदं गाव, समदी धरित्री आबादानी हुते. त्या हिरव्या सोर्गात पर्जन्यदेवाचं आशीर्वाद घेयाचं आन् त्येला येकच रिक्वेश्ट करायची..

‘‘देवा, काळ्या आईच्या भक्तीमंदी माझ्याकडनं कसूर होनार न्हाई. कष्टाचा नवीद हमेशा दाखवीन. तू मातर रुसू नकोस. तुझा बरसता आशीर्वाद भरल्या आभाळावानी आमच्या डोईवर हरसाल आसू देत. समद्यास्नी पुरंल येवढं पानी दे. प्वाटभर अन्न दे. समदं रान आबादानी होवू देत..’’

फिकर नाट सदाभौ. पर्जन्यदेवानं आमचं गाऱ्हानं ऐकलंया. मस पाऊस हाये या साली. येकदम आबादीआबाद. तुमा-आमाला येक एसेमेस धाडलाय पर्जन्यदेवानं..

‘ऊतू नका, मातू नका.

प्लॅश्टीक कचरा टाकू नका.

पानी अडवा, पानी जिरवा.

रुतू बरवा, रुतू हिरवा..’

मान्सूनच्या दिलसे हिरव्यागार शुबेच्चा, सदाभौ.

तुमचा जिवाभावाचा दोस्त..

दादासाहेब गांवकर

 

kaukenagarwala@gmail.com