डॉ. संजय ओक – sanjayoak1959@gmail.com

डॉ. संजय ओक .. प्रख्यात सर्जन. राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे प्रमुख. आयुष्य व्रतस्थतेनं रुग्णसेवेत व्यतीत करत असतानाच अचानकपणे उद्भवलेल्या सर्वसंहारी करोनाकाळाचे आव्हान पेलण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. या काळातील अनुभवांचं  मनमोकळं साप्ताहिक सदर..

टपरीपर चायवाले ने हाथ में गिलास थमाते पूँछा-

‘चाय के साथ और क्या लोगें साब?’

जुबाँ पे लब्ज आतें आतें रुक गये..

‘पुराने यार मिलेंगे क्या?’

गुलजारांनी लिहिलेल्या या चार ओळी करोनाच्या काळात मला खूप अस्वस्थ करून गेल्या. आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये ही टपरी आपल्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग बनते. कॉलेज कोणतेही असो- लॉ, इंजिनीअरिंग किंवा मेडिकल- विद्यार्थीदशेतल्या महत्त्वाच्या घडामोडी इथेच तर घडतात. चार आण्याचा चहा अन् चार तास गप्पा.  पण म्हणून बाकडय़ावरून कोणी हाकलून देत नाही. विद्यार्थीदशा संपते आणि गृहस्थाश्रम सुरू होतो. नवी नवलाई संपली आणि वाग्बाणांचा वर्षांव होऊ लागला की आपण अलगद चपलेत पाय सरकवून नाक्यावरच्या टपरीकडे सरकतो.  तेथे ‘Birds of same feather gather together’ या नात्याने घरात भरपूर पिसे उपटले गेलेले आपल्यासारखे विद्ध वीर भेटतात आणि मफिली झडू लागतात. निमित्त असते ते चहाचे. आणि कधी कधी घरात न पेटू शकणाऱ्या तोंडातील धुरांडय़ाचे. आमचा एक मित्र करोनापूर्व काळात त्याला ‘ऑक्सिजन घेतोय’ अशी संज्ञा वापरायचा.

गृहस्थाश्रमात ही नाक्यावरची चहाची टपरी किंवा मॉडर्न भाषेत ‘जॉइंट’ किंवा ‘चाय पॉइंट’ मग उपनगरात ठिकठिकाणी उदयास येतात. पूर्वी आम्ही शाळेत असताना एक बरे होते- या दुकानाला ‘अमृततुल्य’ असे विशेष नाव असायचे. चहाचे दुकान म्हणजे अमृततुल्य  आणि रसवंतीगृह ऊर्फ उसाचा रस म्हणजे कानिफनाथ ही समीकरणे डोक्यात फिट्ट होती.  काऊंटरवर भोक पडलेला गंजीफ्रॉक घालून समोरच्या आटीव दुधामधून झारा फिरवणारा घामाघूम झालेला नाना मला आजही डोळ्यासमोर दिसतोय. काचेच्या अध्र्या ग्लासात हिंदकळणारा तो चहा एक कळकट्ट पोऱ्या आमच्या समोर वर्ल्ड बँकेने लोन दिल्याच्या थाटात आदळत असे आणि चहा पिऊन झाल्यावर ‘मांडून ठेव’ ही आमची खासियत.  प्रत्येकाचे एक पानी खाते असे. ‘खाते’ या शब्दाचा संबंध खाण्यापिण्याशी आहे हे तेव्हा कुठे आम्हाला समजले! पुढे या टपऱ्यांचे ‘कॅफे’ झाले, ‘चायोस’ किंवा ‘चाय पॉइंट’ म्हणून त्याच्या सुधारित आवृत्त्या निघाल्या.  ‘आमच्याकडे अमृततुल्य चहा मिळतो’ याचे रूपांतर ‘आमच्याकडे १५० प्रकारचे चहा मिळतात’ यात झाले. चव बदलली, दाम बदलला; पण गणगोत आणि गप्पाटप्पा मात्र त्याच राहिल्या. वाढती महागाई, ऑफिसातील स्पर्धा, छळकुटय़ा सुपरवायझर, घरातली धुसफुस, ई. एम. आय.च्या चिंता.. कुठेतरी व्हॉट्सअ‍ॅपवर आलेला दबक्या आवाजात सांगण्याच्या लायकीचा विनोद.. राजकारणावर केलेले मतप्रदर्शन.. आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत कोणाचे कुठे काय चुकते आहे याचे विश्लेषण.. कालच्या ‘टी-२०’त मिड् ऑनला मारलेला शॉट कव्हर्समधून काढायला हवा होता याचे समालोचन.. या साऱ्या विषयांचा साक्षीदार राहिलेली ती चहाची टपरी!

करोना आला आणि सारेच बदलले. टपरी बंद झाली. चार फळकुटं लावून बंद केलेला तो आमचा अड्डा आम्हाला आमच्या बाल्कनीतून दिसायचा. अस्वस्थ करायचा. आम्ही खूप काही हरवलं होतं. आमच्या टोळक्यातले दोघे करोनामुळे कैलासवासी झाले होते. पण त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा सामूहिक चहापानाचा समारंभही होऊ शकत नव्हता. चहा हा आता घरात ठरलेल्या वेळेला तुरुंगातल्या कैद्याला मिळणाऱ्या भत्त्याप्रमाणे येत होता. नीटनेटक्या कपातून. पण काचेच्या अध्र्या ग्लासात हिंदकळण्याची लय मात्र कुठेतरी हरवून गेली होती. अगदी हक्काने आणि अकृत्रिम स्नेहाने वापरलेली ‘भ..’कारान्त विशेषणं वापरण्याची सोय नव्हती. घरातला चहा आलं टाकूनही मुळमुळीत होता. आता कधी हा करोना संपतोय आणि नाक्यावरच्या बाकडय़ावर बसून सिंहासनाधिष्ठित सम्राटाच्या आविर्भावात आम्ही पुन्हा कधी ते अमृतपेय प्राशन करतोय याची वाट पाहतानाच गुलजार उद्गारते झाले..

‘पुराने यार मिलेंगे क्या?’