उदारीकरण-पर्वाच्या गेल्या वीस वर्षांच्या काळात अनेकविध क्षेत्रांत कितीतरी उलथापालथी झाल्या. सकारात्मक बदल झाले. नव्या संधी, शक्यता निर्माण झाल्या. त्यातल्या काही प्रमुख क्षेत्रांचा आढावा घेणे, हा या सदराचा हेतू आहे. याअंतर्गत अर्थकारण, खेडी, स्पर्धा परीक्षा व प्रशासकीय अधिकारी यांच्यासंबंधीचे लेख आजवर प्रकाशित झाले. या महिन्यात ‘प्रसारमाध्यमांतील बदल’ हा विषय असून या मालिकेतला पहिला लेख ७ एप्रिलच्या अंकात प्रकाशित झाला होता. त्याचा हा उत्तरार्ध. जागतिकीकरणामुळे प्रसारमाध्यमांच्या कक्षा कशा विस्तारत गेल्या, याचा आढावा घेणारा..

गेल्या वीस वर्षांच्या जागतिकीकरणात प्रसारमाध्यमांची दुनिया अफाट विस्तारली. तीत मध्यम जाती, बहुजन यांना काही स्थान मिळाले की नाही, याचा त्रोटक आढावा ७ एप्रिलच्या ‘लोकरंग’च्या अंकात घेतला. त्याच्या जोडीने आंबेडकरी मराठी पत्रकारिता फैलावली. तिचे स्वरूप स्वतंत्र, स्वावलंबी कार्यकर्त्यांसारखे आणि स्वजातीय रक्षक असे पुढे आले. मासिक, पाक्षिक, साप्ताहिक अशा टप्प्यांनी आंबेडकरी पत्रकारिता न जाता ती दैनिकाच्या रूपाने रोज वाचकांना भेटू लागली. अन्य मराठी मध्यमवर्गीय, भांडवली वृत्तपत्रांसारखी वाट तिने चोखाळली नाही. मध्य प्रवाहातील पत्रकारितेत अनुसूचित जातींच्या समस्या मांडल्या जाणे अवघड असते असा समज किंवा अनुभव असलेल्या कार्यकर्त्यांनी या पत्रकारितेत पत्रकार म्हणून काम सुरू केले. ‘व्यावसायिकदृष्टय़ा यशस्वी’ अशी नोंद या पत्रकारितेची आहे. परंतु एक जळजळीत वास्तव असे की, ही आंबेडकरी पत्रे जातकेंद्री झाल्याने त्यांना अन्य जातीय वाचकवर्ग लाभला नाही.

जागतिकीकरणामुळे बाजार वाढला, स्पर्धा आली. त्यातून मुद्रणाची प्रक्रिया स्वस्त, सुलभ, आटोपशीर झाली. परिणामी सामाजिक न्यायाचा संघर्ष या मंडळींना टोकदार करता आला. सरकार व उर्वरित समाज यांच्यावर अन्याय निवारणासाठी दबाव टाकता आला. शिक्षणाने समर्थ झालेला फार मोठा आंबेडकरी समाज ही वृत्तपत्रे वाचतो आणि त्याचबरोबरीने तो अन्य व्यावसायिक पत्रेही घेतो.

जागतिकीकरणाक डे आरंभी आर्थिक व भांडवली परिवर्तन म्हणूनच बघितले गेले. खरे तर माहिती तंत्रज्ञानाचा त्यात मोठा वाटा होता. संगणक आणि दळणवळण यंत्रणा यांच्या संयोगातून जागतिकीकरणाची सिद्धी झाली. माहिती तंत्रज्ञान हा वैज्ञानिक व तांत्रिकी आविष्कार असला तरी समाजपरिवर्तनात माहिती तंत्रज्ञानाने फार मोठी कामगिरी बजावली, याकडे कोणाचे फारसे लक्ष गेले नाही. समाजशास्त्रज्ञ माहिती तंत्रज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या बदलांकडे जरा उशिराच वळले. नव्वदच्या दशकात परदेशात कार्यालयीन काम संगणकाधिष्ठित झाले. महिलांना त्यासाठी प्राधान्य देण्यात आले. टायपिंगवरून डेटा प्रोसेस असे कामाचे स्वरूप बदलताच अनेक सामाजिक बदल झाले. कार्यालयांची रचना व मांडणी बदलली. कार्यालयीन अडगळ कमी झाली. मनुष्यबळात कपात होऊन कामाचा भार वाढला. कामाचे तास चोवीस झाले. खर्च पुष्कळ कमी झाला. इंटरनेटमुळे खासगी व कार्यालयीन संपर्क प्रचंड वाढला. वायफळ गप्पा व अनावश्यक ओळखी होत चालल्या. शारीरिक-मानसिक ताण वाढले. कार्यालय घरात शिरले. ‘जॅक ऑफ ऑल ट्रेड्स’ची परंपरा जाऊन विशेषीकरण आरंभले. त्याचबरोबर मल्टि-टािस्कग अर्थात बहुकौशल्यप्राप्तीही सक्तीची झाली.

पत्रकारितेत येणाऱ्या किंवा आलेल्या ब्राह्मणेतरांना त्यांच्या जातींप्रमाणे (धनगर, माळी, सोनार, लोहार, कुंभार, कोळी, भंडारी, भावसार, मराठा, इ.) काही कौशल्ये एकतर प्राप्त होती अथवा माहिती होती. हरहुन्नरीपणा ब्राह्मणेतर जातींमधील युवकांत खूप असतो. शेती व ग्रामव्यवस्थेत हुन्नर आपोआप प्राप्त होत असतात. एक व्यक्ती अनेक कामांत प्रवीण असतेच. अशा हरहुन्नरी युवकांपुढे माहिती तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे काम मुळीच आव्हानात्मक नव्हते. थोडी अडचण इंग्रजीची होती; पण संगणकांनी सारे संदेशात इतके सुलभ व सोपे केलेले- की चुकीची कळ दाबली तरी सूचना योग्यच मिळत जाई. अ‍ॅप्टेक, एनआयआयटी आदी संगणक प्रशिक्षण संस्थांनी प्रशिक्षित केलेली संपूर्ण पिढी नव्या अर्थव्यवस्थेच्या कामाला जुंपली. जवळपास निम्मे सेवाक्षेत्र ओबीसी जातींच्या कौशल्यावर भारतात विस्तारले. अमेरिका आदी प्रगत राष्ट्रांनी भारतीयांच्या स्वस्त कष्टांसाठी आपली कवाडे उघडल्याने माहिती तंत्रज्ञानाचा व त्यातून मिळणाऱ्या उत्तम मोबदल्याचा भरपूर गवगवा झाला. माहिती तंत्रज्ञानात कौशल्यप्राप्ती करण्याची एकच झुंबड उडाली.

दरम्यान, एक बदल पत्रकारितेत झाला. संगणकाधिष्ठित कार्यपद्धतीमुळे प्रॉडक्ट वा प्रोजेक्ट, जॉबवर्क वा असाइनमेंट, प्रोग्रॅमिंग वा सिस्टीम अ‍ॅनालिसिस अशा शब्दावलींचा संसर्ग पत्रकारितेशी होताच मालक व संचालक यांची पत्रकारितेकडे पाहण्याची दृष्टीही बदलली. बातमीदार व उपसंपादक हे दोनच पत्रकारितेचे आधार असतात. त्यांना काम चक्क तोलूनमापून करणे सक्तीचे झाले. एकेका ओळीचा हिशेब संगणकामार्फत नोंदवला जाऊ लागला. कॉस्ट टू कंपनी, सिक्स सिग्मा, केवायसी आदी व्यवस्थापनशास्त्रातील संकल्पना पत्रकारितेतही सुरू झाल्या. अमेरिकन पत्रकारितेतील व समाजातील व्यक्तिवाद भारतीय पत्रकारितेत रुजवण्यात आला. कार्यालयीन संस्कृतीत आणि खासकरून सामूहिक कार्यशैलीत जन्म घेणाऱ्या पत्रकारितेत व्यक्तिवाद व व्यक्तिकेंद्रितता घुसली.

व्यक्तिवादाला माध्यमांनी खतपाणी घालायला सुरुवात करताच दोन गोष्टी घडल्या. स्वयंरोजगाराला त्यातून प्रेरणा मिळाली. ‘आंत्रप्रुनरशिप’ किंवा उद्यमशीलता पसरत चालली. दुसरी- जे बारा बलुतेदार ग्रामव्यवस्थेतून आलेले पत्रकार होते, ते (तशी ग्रामरचना अस्तित्वात नसताना, परंतु काही कौटुंबिक परंपरांमुळे) जागतिकीकरणाच्या या उद्यमशील व उद्योगप्रवण वातावरणाचे प्रचारक बनले. त्यांच्यातील कौशल्ये कळत-नकळत जागतिकीकरणातील व्यापार, विक्री, नफा, कर्ज, गुंतवणूक आदी गोष्टींसाठी कामी आली. ओबीसी जातीच्या पत्रकारांना जागतिकीकरणाच्या व्यापारी व उद्यमशील भागाने भुरळ घातली. या व्यक्तिकेंद्री आणि उद्यमशील वातावरणाचा परिणाम पत्रकारांच्या ‘बायलायनी’ गेल्या वीस वर्षांत वाढण्यावर झालेला दिसतो. २५-३० वर्षांपूर्वी बातमीदाराचे नाव बातमीवर झळकणे हा भयंकर आक्षेपार्ह प्रकार मानला जाई. अनाम पत्रकारिताच खरी पत्रकारिता असे तेव्हा मानले जाई. का? तर ज्यांच्यावर कठोर टीका केली आहे वा ज्यांची कुलंगडी बाहेर काढली आहेत, त्यांना कोण्या एका पत्रकाराने धारेवर धरलेले नाही, तर त्या वृत्तपत्राने-म्हणजे संस्थेने धरले आहे; म्हणजेच सामूहिक जबाबदारीचा तो नमुना होता. गेल्या २० वर्षांत बायलाइन्सची संख्या पानोपानी वाढल्याचे कारण म्हणजे सामूहिक जबाबदारीतून संस्थेची मुक्तता, वैयक्तिक त्या पत्रकाराची प्रसिद्धी आणि तिसरे मोठे सामाजिक कारण म्हणजे पत्रकारांच्या जातीचे लोक सत्तेत व प्रशासनात असणे. वरील तीनपैकी दोन कारणे सरळसरळ भांडवलशाहीच्या आगमनाची चिन्हे होती. तिसरे कारण मराठी पत्रकारितेचा पायाच पालटून टाकणारे होते.

जागतिकीकरणाला जोडूनच आपल्या देशात ओबीसी जातींच्या हातात आरक्षणाद्वारे सत्ता आली. जसजसे या जातींचे पत्रकार तयार होऊ लागले, तसतशी पत्रकारिता राज्यसत्तेची विरोधक असते, ती राज्यकर्त्यांवरील अंकुश असते, ही मांडणी सैल होत होत नष्टच झाली. ‘सत्ता विरुद्ध पत्रकारिता’ हा सिद्धांत ब्राह्मण जेव्हा बहुसंख्येने पत्रकारितेत होते, तेव्हाचा. हाती सत्ता नसलेल्यांनी आणि सत्तेशी काही संबंध नसलेल्यांनी (म्हणजे जातींनी) सत्तेला शत्रू मानणे हा स्वाभाविक आविष्कार होता. पत्रकार ब्राह्मण व सत्ताधारी ब्राह्मणेतर अशी उभी फूट जेव्हा होती, तेव्हा असे घडत राहिले. मंडल आयोगाने हे बदलून टाकले. सत्ता आणि पत्रकारिता एकमेकांचे विरोधक नसून परस्परपूरक असल्याचे याच काळात बोलले जाऊ लागले. कारण दोन्ही ठिकाणी ‘जातवाले’ बसू लागले. जवळचे नसले तरी ‘आपल्यापैकी’ असणारे सत्तेत बसू लागताच पत्रकारितेचा रोख बदलत गेला. शोधक पत्रकारिता, रहस्यस्फोट, गौप्यस्फोट, मागोवा, धांडोळा, खोलवरचा तपास आदी कार्ये पत्रकारितेतून कमी कमी होत गेली. जाती-जातींत ओढ नव्हे तर जात्यांतर्गत ओढ निर्माण होण्याचा तो काळ होता. जात्यांतर्गत वर्गभेद गळून पडले आणि जातीय ऐक्य जागोजागी निर्माण झाले. सत्तेत मराठय़ांच्या जोडीने बसणाऱ्या मराठेतरांना पत्रकारितेचा मोठाच आधार लाभला. मराठा होते तेही अर्थातच स्वकीयांचे हित सांभाळू लागले. पत्रकारितेतही नानाविध विषय, बाजू आणि मूल्ये प्रकटू लागली. पत्रकारिता खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक झाली. साऱ्यांची, साऱ्यांसाठी, साऱ्यांनी करावयाची झाली.

जागतिकीकरणाचा आणखी एक परिचय म्हणजे कायम सुरक्षित, एकनिष्ठ व एकाच ठिकाणची नोकरी करण्याची सवय टाकून देऊन आव्हानात्मक, पण अस्थिर कामाची सवय प्रत्येकाने लावून घ्यायला केलेली सुरुवात. अनेक पत्रकार सुरक्षित, एकनिष्ठ पत्रकारितेला रुळले होते. मात्र, त्यापेक्षा अधिक आव्हानात्मक, जोखमीतही समाधान देणारे पर्याय त्याच सुमारास उभे राहत होते. माहिती तंत्रज्ञान आत्मसात करणाऱ्यांना भरपूर मागणी होती. पैसा, प्रतिष्ठा आणि काहीशी सत्ता देणाऱ्या माहिती तंत्रज्ञानाच्या उद्योग-व्यवसायात ब्राह्मण भराभर शिरू लागले. झाले! पत्रकारितेत बहुजनांना आणखीन संधी मिळू लागली.

जातिव्यवस्थेच्या कचाटय़ामुळे आणि ब्राह्मणी प्रभावामुळे नवे ज्ञान आणि माहिती ज्या बहुजनांना मिळत नव्हती; त्या सर्वानी भारताबाहेरून येणाऱ्या राज्यकर्त्यांना, व्यापाऱ्यांना, पर्यटकांना, अभ्यासकांना, धर्मोपदेशकांना प्रतिसाद दिल्याचा इतिहास आहे. त्याची पुनरुक्ती माहिती तंत्रज्ञानाच्या बाबतीत झाली. जागतिकीकरणामुळे ‘नॉलेज इकॉनॉमी’मध्ये वावरायला मिळेल अशी खात्री पटल्याने ब्राह्मणेतरांनी संगणक व दूरसंचार यांचे तंत्रज्ञान शिकून घेतले. या तंत्रज्ञानाने बेकारी वाढेल, काम वाढेल, स्थैर्य नाहीसे होईल, हे माहीत असूनही आपल्याला जागतिक व्यवहारात उतरता येणे शक्य होईल अशी खात्री पटल्यावर बहुजन माहिती तंत्रज्ञानाधिष्ठित बहुतेक व्यवसायांत बस्तान बसवते झाले.

१९९१ नंतर माध्यमांनी जो माहिती तंत्रज्ञानाचा स्वीकार करून आपला कारभार फैलावला, त्यासाठी त्यांनी बहुजनांची कुमक तयार केली. माहितीचा महामार्ग, नॉलेज सोसायटी, नॉलेज इकॉनॉमी, आर्टिफिशियल इन्टेलिजन्स आदी विशेषणांनी नटवण्यात आलेल्या नव्या वातावरणात प्रवेशणे ब्राह्मणेतरांनाही रुचले. त्यामुळे पत्रकारितेची पदवी घेतलेल्यांना काम मिळालेच; शिवाय पत्रकारितेला लागणारे तंत्रज्ञान ज्यांना ठाऊक होते, त्यांनाही पत्रकारितेत प्रवेश मिळाला. इंग्रजी भाषेची जाण ज्यांना बऱ्यापैकी होती आणि ज्यांनी न्यूनगंड टाकले अशा बहुजन तरुण-तरुणींना इंग्रजी पत्रकारितेत स्थान मिळाले. तिथे सर्वात आधी जागतिकीकरणाचा आग्रह धरलेला!

इंग्रजी भाषा शिकून खासगीकरण, उदारीकरण, ग्राहकवाद, चंगळवाद यांचा उपभोग घेणारा एक बहुजन मध्यमवर्ग अर्धनागरी महाराष्ट्रात तयार झाला आहे. त्याच्या सेवेला व साथीला सारी माध्यमे रुजू झाली आहेत. माध्यमांमार्फत बहुराष्ट्रीय कंपन्या आणि भारतीय भांडवलशाही आपले ‘मतदार’ तयार करत आहे. कोठून आला हा मध्यमवर्ग? उघड आहे- तो ग्रामीण भागातून शिक्षण, रोजगार, उद्योग, नोकरी आदींसाठी स्थलांतरित झालेला घटक आहे. त्याने कारखाने वा यंत्रांवर आधारलेली उत्पादन पद्धत न स्वीकारता मानवी बौद्धिक कौशल्ये आणि माहीतगारी यावर आधारलेली उत्पादन पद्धत जवळ केली. त्यातूनच तो जागतिक अर्थकारणाशी जोडला गेला. त्यातील जो बहुजन प्रसारमाध्यमांशी जोडला गेला, तो बदलत्या पत्रकारितेचा जनक, वाहक, प्रसारक ठरला. आजच्या पत्रकारितेतील सारे गुणदोष त्याच्या कर्तृत्वाचे आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्यांचा बाजाराशी कधी संबंध नव्हता (असला तरी म्हणीपुरता- ‘बाजारात तुरी..’ होता!) आणि लोकशाहीतून निर्माण झालेल्या सत्तेशीही नव्हता, त्यांना जागतिकीकरणाने पत्रकारितेत घडवलेले असे बदल पटणार नाहीत. सर्व जातींना सत्ताव्यवहारात जेव्हा वाटा मिळतो तेव्हा पत्रकारिता आणि राज्ययंत्रणा- उद्योग- शेती- व्यवसाय यांचे संबंध शत्रुवत ठरत नाहीत. अशा वातावरणात सर्वाचा केवळ आत्मोन्नती करवून घेण्याचाच कार्यक्रम असतो. कारण प्रथमच कित्येक उपेक्षित समाजघटक या सत्ताव्यवहारात सहभागी झालेले असतात. कदाचित म्हणूनच विद्यमान जागतिकीकरणात आंतरराष्ट्रीय आवाका, चिंतन वा आकलन आवश्यक न वाटता त्या सर्वाना स्थानिकीकरणातच जास्त गोडी वाटत जाते. ‘ग्लोबलायझेशनचे लोकलायझेशन मार्गे प्रसारमाध्यमे’ झाले आहे ते या अब्राह्मणीकरणामुळेच!