28 September 2020

News Flash

बहरहाल : स्वानस्वांग

बहरहाल, निरोप लांबवू नये असं म्हणतात. तेव्हा हे निरोपाचं गाणं.. हे स्वानसाँग आवरतं घेतो.

(संग्रहित छायाचित्र)

गिरीश पांडुरंग कुलकर्णी 

हा- हा म्हणता वर्ष सरलं. या सरलेल्या वर्षांची सुरुवात आफ्रिकेच्या जंगलात झाली होती. अल्पमुदतीचा स्मृतिभ्रंश असलेल्या झाएदची गोष्ट ‘बहरहाल’ या सदरासाठी पाठवून मी आफ्रिकेला गेलो होतो. त्या गर्द रानात अन् प्राणीविश्वात हरवून गेलो असताना मला त्या सदरारंभ करणाऱ्या लेखाची पुसटशीही आठवण राहिली नव्हती. यथावकाश लेख छापून आला आणि पहिली प्रतिक्रियाही मिळाली. तीत एका परिचिताकडून बरं लिहिण्याची समज देण्यात आली होती. जर या लेखनप्रपंचात काही बरं लिहिलं गेलंच असेल तर त्याचं बरंच श्रेय त्या प्रथम प्रतिक्रियेस द्यावं लागेल. स्वत:ला हंस सारेच समजतील; मात्र इतरांनी ते मान्य केल्याशिवाय तुमचं हंसपण सिद्ध होत नाही. हाच एकंदरीत माणसाच्या सामाजिक अवस्थेचा परिपाक आणि हंस नसताही केवळ इतर तसे म्हणत असल्यानं आपणही भ्रमित व्हावं, हा त्याचा व्यत्यास. कळपात राहताना स्वत:ची निराळी ओळख जपण्याची आस नसणारी प्राणी-पक्षी यांची सृष्टी; तर स्वत:चं अस्तित्व सृष्टीवर लादण्याकरिता कळप बांधत राहण्याची मनुष्यप्रेरणा यांचं द्वैत मनाशी आकार घेत होतं. अशातच महाराष्ट्राच्या माळावर स्वत:ची ओळख विसरून काम करणारे माणसांचे जथ्थे पाहिले आणि समजुतीच्या दशदिशा विस्ताराची आवश्यकता जाणवली. सुदैवाने सुदूर पूर्व अन् जराशा पश्चिमेला प्रवास घडले. ‘ओह’ अन् ‘डेमियन’ यांसारखी माणसं भेटली. व्यक्ती अन् समाज या समीकरणाबद्दलच्या नवनव्या अर्थछटांनी समजुतीस सजगता आली. नाव, आडनाव, धर्म, भाषा, लिंग, इ. इ. वर्गवारीच्या लक्षणांची मांदियाळी सातत्याने पूर्वग्रह घट्ट करीत राहते आहे याची तगमग, जाणीव तीव्र झाली. स्वत:स सतत मुळातून उपटून सर्वस्वी अनोळखी आसमंतात रुजविणे आवश्यक आहे, तरच अर्थापर्यंत जाता येईल याचे वाचलेले, पाहिलेले दाखले दिशादर्शक वाटू लागले. हे सारे सदरातून मांडतानाचा हा लेखनप्रवास अनेकार्थानी रंजक झाला. मात्र, हे बोलताना मी स्वत:पुरतेच बोलतो आहे. वाचकांचे रंजन झाले असेलच याची खात्री नाही.

सातत्याने स्वत:ची ओळख बदलवत राहण्याचा अभिनयाचा व्यवसाय एकीकडे जनमानसात तुमची विशिष्ट प्रतिमा तयार करत असताना दुसरीकडे स्वत:शी मात्र ‘आपण यातले नेमके कोण?’ यासारखे संदेह निर्माण करतो. या लेखनप्रवासात स्वत:कडे नीट पाहता आलं. माणूस बोलताना वा लिहिताना आहे त्याहून हुशार वाटण्याचा धोका असतोच. आपण शब्दरचना करून नेमका कोणता अर्थव्यूह तयार करतो आहोत? त्यात ढोंग, मखलाशी, चातुर्यादि दुर्गुण किती? अन् प्रांजळता, निर्व्याज ऊर्मी, विषयाचे ज्ञान, एकंदरीत समजूत किती? याची नेमकी अटकळ बांधता येऊन दुर्गुणांचा निचरा करीत जास्तीत जास्त पारदर्शक लिखाण करण्याचा प्रयत्न करता आला. मी बोलेन ते सत्य, मला पटेल ते ज्ञान, मला गुदगुल्या करेल तो इतिहास, माझं मत हे भरतवाक्य अशा धारणांनी स्विपडपोषणाचा सध्याचा परिपाठ. स्वत:च्या नेत्याला देव बनवून मठाची उठाठेव करणारा असभ्य सांप्रदायिक भवताल. या साऱ्या चालू वर्तमानाकडे ‘बहरहाल’ असं म्हणत तटस्थ पाहणं शिकता आलं. स्वत:चं अज्ञान अन् उणिवा मांडत, शक्यतांकडे कुतूहलानं पाहणं मला जास्त भावलं.

कोणी नवी मांडणी करीत का नाही? नवी कथा सांगत का नाही? अशा प्रश्नांच्या तलखीतून ग्रेटा थुनबर्गसारख्या चिमुरडीबद्दल लिहावंसं वाटलं. स्वत:त तयार होणारी प्रतिक्रियात्मक प्रक्षोभकता माझ्या सांस्कृतिक कुपोषणाशी जशी संलग्न आहे, तशीच ती ढासळत्या निसर्ग समतोलाचाही परिपाक आहे.. वेगवेगळ्या पर्यावरणांचा ऱ्हास माणसांस मूर्ख वाचाळ बनवतो आहे.. अशा काही आकलनांनी मूक, संयत केले. सारे श्रेय स्वत:शी एकवटणाऱ्या ‘मी’पणाकडे दोषांचेही श्रेय दिल्यावर प्रश्नाचे मूळ शोधताना दुसऱ्यास बोल लावण्याचा अवगुण काही अंशी टाकता आला.

या प्रवासात अ‍ॅमेझॉनचे जंगल पेटले अन् महाराष्ट्रात पावसानं हाहाकार माजवला. समूहांनी सामंजस्यानं सृजन घडविलं आणि झुंडींनी माणसं मारली. गच्च गिजबीज शहरातून माणसं एकटी पडली आणि देशभरात तरुणाई एकवटली.. या आणि अशा साऱ्या घटनांनी काही उफाळून आलेलं कथन इथं लिहिता आलं. माणसांबद्दल, त्यांच्या कामाबद्दल, पाहिलेल्या प्रदेशाबद्दल, घेतलेल्या अनुभवाबद्दल जे वाटलं ते ताजेपणानं लिहिण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनेकदा आपलं आकलन तोकडं पडत असल्याची, काळाच्या मोठय़ा पटावर वर्तमानकाळ मांडून त्याचा साक्षेप घेणारं लेखन करण्यासाठीचा अभ्यास कमी असल्याची, विचारप्रपाताला निश्चित अर्थकक्षा देणारी शब्दकळा नसल्याची बोचणीही लागली. आपण लेखकाचे अवधान घेऊ शकत नाही, फार तर सुमार अभिनेत्यासम सोंग वठवू शकतो याचीही जाणीव झालीच. आणि तरीही विचारकलहाचे महत्त्व ठाऊक असल्याने मी नेटाने खोडी काढत राहिलो. स्वत:च्या एकारलेपणाचा बेसुमार कंटाळा येत असल्याने माझेच लिखाण मलाच उबग आणेल अशीही शंका होती. त्याकरिता वेगवेगळ्या शैलीत लिहून पाहिलं. जे येत नाही ते रचण्याचा प्रयत्न केला. एकच एक विषय अन् शैली यामध्ये सातत्याचा गुण असेलही; मात्र या नित्य बदलत्या विश्वात सतत नवं शोधण्याची वृत्ती मला हवीहवीशी वाटते. अशा काही लेखनप्रयोगांना ‘किती क्लिष्ट लिहितोस!’, ‘बरं होतं, पण म्हणजे काय म्हणायचं होतं नेमकं?’ अशा शेलक्या प्रतिक्रियाही मिळाल्या. कुणी कुणी वारेमाप प्रशंसाही केली. त्या साऱ्याच सहृदय वाचकांप्रति कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते. सिनेमानं दिलेली माझी दुसरी माय ज्योती सुभाष ही तर सतत तिच्या लेकराच्या पाठीशी राहिली. आवर्जून माझ्यातल्या बदलाची नोंद घेत राहिली. या सदराला काय नाव द्यावे, या संभ्रमात मी असता वृषालीनं सहजपणानं ‘बहरहाल’ हे नाव सुचवलं. माझ्या बोलण्यात हा शब्द वारंवार येतो. अनेक रंगलेल्या चर्चामध्ये विषय बदलताना वा निष्कर्षांकडे येताना ‘बहरहाल’ म्हणण्याची माझी लकब तिला ठाऊक होती. ‘लिखाण ताजं असावं, स्वस्मृतीपर नसावं, स्वत:चा डिडिम वाजवणारं नसावं’ असे अनेक निकष असलेल्या सदराला ते चपखल बसलं. मी मातुल घराण्याकडून मराठवाडय़ाशी जोडलेला आहे. त्या भागात निजामी राजवटीमुळे दैनंदिन व्यवहाराच्या भाषेत अनेक परभाषी शब्द येतात. त्यातलाच ‘बहरहाल’ हा एक फारसी शब्द. मी तो सढळ हातानं आणि अनेकार्थानं वापरतो. ‘तर बरं का.. असो, आता आहे हे असं आहे’ इ. नाना अर्थछटांनी त्याला मी मनासारखा रंगवून घेतला आहे. तर हे माहीत असल्यानं वृषालीनं अचूक नाव सुचवलं. वृषाली निष्णात वैद्य अन् गुणी अभिनेत्रीही आहे. बायको म्हणून तिनं माझी नाडी ओळखली असल्यानं माझ्या एकूण स्वास्थ्याकरिता ती निरनिराळ्या भूमिका लीलया पार पाडते. उमेश कुलकर्णी हा तर घरचा टीकाकार. प्रसिद्धीपूर्वी प्रत्येक लेख वाचून तो काटेकोर टीका करीत असल्यानं दोष सुधारता आले. चित्रीकरणाच्या, प्रवासाच्या गडबडीत लेख पोहोचण्यास उशीर झाला तरी ‘लोकसत्ता’च्या रवींद्र पाथरे, लता दाभोळकर यांनी संयम दाखविला. चित्रकार नीलेशनंही अत्यंत समर्पक चित्रं काढून आशय पोहोचविण्यास मदत केली. तर बरं का, वर्षभर अखंडित पाक्षिक सदर लिहिण्याचा हा माझा पण उपरोक्त मंडळींमुळे पूर्णत्वास जाऊ शकला.  मुकुंद संगोराम अन् गिरीश कुबेर यांनी दिलेल्या या संधीतून अनेक उपलब्धी हाती लागल्या. या साऱ्यांबद्दलही कृतज्ञता वाटते.

बहरहाल, निरोप लांबवू नये असं म्हणतात. तेव्हा हे निरोपाचं गाणं.. हे स्वानसाँग आवरतं घेतो. लेखकरूपी हंसाचं घेतलेलं स्वांगही उतरवतो. वर्ष सरताना या देशातल्या तरुण माणसांनी काही मोडतोड केली आहे. उजव्यांच्या न्यूनगंडातून आणि डाव्यांच्या अहंगंडातून तयार झालेले आडमुठे पूर्वग्रह बाजूला सारून या साऱ्या नवतेशी संवादी व्हायला हवं. एकमेकांशी मोकळं बोलायला निर्भय वाटायला हवं. एकमेकांकरिता अणकुचीदार अस्मितांची शरशय्या न घडविता इतिहास अन् संस्कृतीचा वापर ज्ञानाच्या परंपरा वाहत्या ठेवण्याकरिता, काळानं उभी केलेली आव्हानं पेलण्याकरिता, सम्यक अन् संयत अभिव्यक्ती मिळवण्याकरिता व्हायला हवा. बहरहाल.. येत्या नववर्षांत माणसांनी एकमेकांवर प्रेम करायला हवं. नवं वर्ष काय आणेल याचा हवाला देता येत नाही. मात्र, वैरमुथ्थु या तमिळ कविवर्याच्या कवितेत म्हटल्याप्रमाणे-

ऐकणार असेलच हे नवं वर्ष आमचं मागणं तर सांगून पाहू..

‘हॅलो, मि. ट्वेन्टीट्वेन्टी!

जमलंच तर आमच्यासाठी एक भयमुक्त राष्ट्र आणा,

दरवाजे नसलेली घरं आणा,

आतल्या आत काही काळंबेरं नसलेली स्वच्छ मनं आणा,

समजून घेण्याचं वरदान आणा,

अन् सर्व जगाला मोकळा श्वास घेण्यासाठी एक निवांत मन:शांती आणा

मिस्टर ट्वेन्टीट्वेन्टी!

तसंही तुमचं स्वागत आहेच.

नववर्षांच्या सर्वास शुभेच्छा!

(समाप्त)

girishkulkarni1@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2019 4:20 am

Web Title: wanswong africa baharhal article girish pandurang kulkarni abn 97
Next Stories
1 सदोष अनुवाद
2 मानवांचे अंती, एक गोत्र
3 माग.. वेगळ्या प्रयोगस्थळांचा!
Just Now!
X