28 November 2020

News Flash

येणारच तू..

१९७० चं दशक सुरू होत असताना वास्तव्यानं पुणेकर झाल्यावर माझ्यातला कवी प्रकट होऊ लागला. पण याचा अर्थ त्याआधी माझ्यातल्या कवीनं मला चाहूलच दिली नव्हती असं

| June 23, 2013 01:01 am

१९७० चं दशक सुरू होत असताना वास्तव्यानं पुणेकर झाल्यावर माझ्यातला कवी प्रकट होऊ लागला. पण याचा अर्थ त्याआधी माझ्यातल्या कवीनं मला चाहूलच दिली नव्हती असं मुळीच नाही. ‘लाख हाते द्याव्या आभाळ पुढती वाकले’ यासारखी सर्वार्थानं माझी पहिलीवहिली व्यक्तिगत म्हणावी अशी कविता मला वाडीत असतानाच सुचली होती. फार काय, ज्याविषयी गेल्या वेळी सविस्तर बोललो तो प्रदीर्घ काव्यानुवाद ‘परछाईयां’- तोही लिहिला गेला वाडीत असतानाच! पण याच जोडीला माझी व्यक्तिगत अनुभूती म्हणावी अशी आणखी एक कविता महत्त्वाची आहे..

येणारच तू भेटण्यास तर
जिवलग प्रियकर होऊन ये
धूसर स्वप्नील स्वरासारखा
उत्कट आतुर होऊन ये

क्षण क्षण चुंबित असता चालत
सुंदर यात्रा जगण्याची
त्या धुंदीतच अस्फुट घुमू दे
साद तुझ्या हुंकाराची

आस्वादाच्या शतधारांची
शिरी बरसता बरसात
अमृतवेळी त्या, कायेवर
फिरव तुझा प्रेमळ हात

नसानसांतून वीज अनामिक अर्निबध खेळत असता
मस्तकातली मत्त तुफाने दिशा नवी शोधित असता
‘दिसण्यापलीकडचे बघण्या’चा असता डोळय़ांना ध्यास
मिळता आनंदाच्या गीता आर्त वेदनेची आस

पापणीतुनी स्वप्न उतरते
तसाच अलगद अवचित ये
जगा न कळता.. मला न कळता..
स्वत: तुलाही नकळत ये..

कवी ज्याला इतक्या खात्रीपूर्वक ‘येणारच तू’ असं म्हणतो आहे तो आहे तरी कोण? हा प्रश्न मुळीच अवघड नाही. ज्याच्या येण्याविषयी कवीला- किंबहुना, समस्त जीवसृष्टीला मुळीच शंका नसते, तो एका ‘मृत्यू’खेरीज कोण बरे असू शकतो?
आता वयाच्या १८ व्या वर्षी एकदम मृत्यूला उद्देशून बोलावं असं का बरं वाटलं असेल? उत्तर अगदी सोपं आहे. ते वयच असं असतं की, आपण नक्कीच मरत नाही अशी (उगीचच) खात्री असते. तेव्हा फुकटचं ‘ये’ म्हणायला काय जातंय? शिवाय ही कविता मृत्यूला उद्देशून वगैरे असली तरी नीट वाचली तर कुणालाही जाणवेल, की तिच्यात मृत्यूची छाया वगैरे मुळीच नाही. किंबहुना, ती कविता शंभर टक्के जगण्याची.. आणि तीही रसरसून जगण्याची ऊर्मी व्यक्त करणारीच आहे. पण असं असलं तरी एक गोष्ट निखालस सत्य आहे की, जाणीवपूर्वक जगणं सुरू झालेल्या क्षणापासून आपल्याला मृत्यू सोबत करीतच असतो. त्यामुळे त्या अस्तित्वाची एक थंडगार जाणीव आपल्या उष्ण रक्ताआड मूकपणे अखंड वाहत असते. तीव्र संवेदनशीलता हे म्हटलं तर वरदान आणि म्हटलं तर शापही. हे दुधारी शस्त्र प्राणात वागवणाऱ्या कवींची तर या जाणिवेपासून सुटकाच नाही. फक्त प्रत्येक व्यक्तिमत्त्वाच्या संदर्भानुसार अभिव्यक्ती बदलते, इतकंच.
कविवर्य भा. रा. तांबे एकीकडे ‘जन पळभर म्हणतील हाय हाय’ म्हणतात आणि त्याचवेळी ‘मरणात खरोखर जग जगते’ ही ग्वाहीही देतात. इतकंच नाही तर मरणभयानं बावरलेल्या जिवाला नववधूचं रूपक वापरून ‘कळ पळभर मात्र खरे घर ते..’ ही आठवणही करून देतात. अपंगत्वाचं आयुष्य जगतानाही तेजाची गाणी गाणारे कवी गोविंद तर मृत्युकल्पनेचा स्वीकार करताना-
 ‘सुंदर मी होणार, जुनी इंद्रिये, जुना पसारा सर्व सर्व झडणार,
 नव्या शक्तीचे, नव्या तनूचे पंख मला फुटणार, सुंदर मी होणार’
    असा घोष करतात. ‘जोपर्यंत जगण्यात अर्थ आहे, तोपर्यंतच मरण्यात मौज आहे’ म्हणणारे गडकरी ‘वाटे स्मशान शांतिस्थान’ असंच मानतात. सर्वोच्च आनंदाच्या क्षणीही ‘आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा है’ म्हणणाऱ्या कवी शैलेंद्रांना तरी दुसरं काय सांगायचंय? ‘चित्रलेखा’तील ‘मन रे तू काहे न धीर धरे’ या सुंदर गीतात कवी साहिर लुधियानवी लिहितात, ‘उतनाही उपकार समझ कोई जितना साथ निभा दे, जनम मरन का मेल है सपना ये सपना बिखरा दे..’ पण यापुढे तर एक सर्वकालीन, पण दाहक अंतिम सत्य ते बोलून गेलेत.. ‘कोई न संग मरे..’ ‘मित्रानो, मुद्दाम ठरवून कुणाबरोबर जगता येईल कदाचित; पण ठरवून कोणी कुणाबरोबर मरू नाही शकत..’
तर अशा तऱ्हेने आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनलेली ही मरणजाणीव माझ्या कवितासखीनंही आपल्यापरीनं जपली आहे. अनिवार्य होईल तेव्हा भली किंवा बुरी; पण आपसूक व्यक्त होऊ दिली आहे.
‘सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का?’ ही आर्त हाक एकीकडे कुणा अमूर्त श्रेयाला होती, तशीच कुणा अनामिक, रक्तामांसाच्या संगतीलाही होती. पण तिथेही अखेर या ओळी आल्याच.. ‘बोलावल्यावाचूनही मृत्यू जरी आला इथे.. थांबेल तोही पळभरी, पण सांग तू येशील का?’
‘आभाळमायेनं ओथंबून येईल, सुगंधवारे आप्त होतील.. माझा पत्ता विचारत तुझी सारी दानं आपसूक येतील..’ हा ठाम आत्मविश्वास किंवा सुगंधी माज व्यक्त करतानाही शेवटी एक प्रश्न आलाच- ‘तू फक्त एक सांग, तेव्हा मी कुठे असेन?’
माझ्या ‘लय’ कवितासंग्रहातली एक छोटीशी कविता लिहिताना डोळय़ांपुढे नेमकं कोण होतं कोण जाणे.. पण ती आतली एक कायमची कासावीशी आहे, हे खरं. अलीकडे काही ना काही निमित्ताने अनेक वृद्धाश्रम पाहण्यात  येतात. ‘वार्धक्य साचले’ या स्वत:च्याच शब्दांची झळ असहय़ होऊ लागते आणि आपसूक ‘लय’मधली ती कविता आत घुसमटू लागते. कारण प्रत्यक्षात ते आपल्या सर्वाचेच भाकीत आहे..

‘तो झाडाखाली कण्हे मूक पाचोळा
घेऊन उशाशी स्वप्ने.. चोळामोळा
उठताच धुळीची चक्री हाक सभोती
ही पिकली पाने जातिल दूर.. दिगंती..

अलीकडे विशेषत: अध्यात्म, तत्त्वज्ञान यांचं पीक आपल्या सार्वजनिक जीवनात जरा अधिकच बहरत चाललंय. त्यातून मुळात अर्थपूर्ण अशा अनेक संकल्पना खूपच घाऊक प्रमाणात लोकप्रिय होत आहेत. त्यातली एक मूलभूत कल्पना- तिचा आदेश होण्यापूर्वीपासून आपण नकळत जगत आलो आहोत, असं माझ्या अलीकडेच लक्षात आलं. ती संकल्पना म्हणजे ‘क्षणस्थ’ जगणं. म्हणजे भूतकाळ आणि भविष्य यांचं योग्य प्रमाणात भान जागवत रोजच्या जित्याजागत्या वर्तमानकाळाला सजगपणे सामोरं जाणं.. पुन्हा तो वर्तमानकाळ म्हणजे भोवतालचा अद्वातद्वा पसारा नसून आपल्या परिघात व्यक्ती म्हणून स्वत:ला जगायला मिळणारा प्रत्येक अनमोल क्षण- जो क्षणोक्षणी दुसऱ्या क्षणात परावर्तित होत असतो- तो एकाग्रतेने आणि पूर्णपणे जगणं. तर मूलभूत पिंडच या जाणिवेवर पोसला गेल्याने मी पूर्वजन्म आणि पुनर्जन्म या कल्पनांच्या बाबतीत थोडासा तटस्थ.. आऊटसायडर आहे. साहजिकच यासंदर्भात स्वीकार अगर नकार अशी कुठलीच अतिरेकी भूमिका नसल्यामुळे आणि कुठल्याही संकल्पनांमागील मूलतत्त्वांचा आदर करणे हा सहज स्वभाव असल्याने माझ्या कवितासखीनं याही संदर्भात कुठलीही ओझी न घेता व्यक्त होण्यात आनंद घेतला आहे. ‘लय’मधील कवितांत त्याच्या खुणा सापडतील..

आयुष्य तुझे वर्षांत नको तू तोलू
ओंजळीत गळक्या नको चिरंतन झेलू
हा देह विनाशी फक्त बदलतो धाम
आयुष्य खरे तर जन्मांचा मुक्काम..

पण याहीपेक्षा मला अधिक भावणारी अभिव्यक्ती दुसरीच आहे..

कळले ना, जगणे गाणे आहे सारे
कोणीही गावो लागलेत तंबोरे
रे जगणे म्हणजे संथ स्वराचा श्वास
अन् मरण..? जणू ही दोन स्वरांतली आंस

पण हे सगळं आज निघालंय ते माझ्या ‘येणारच तू’ या कवितेमुळे. थोडक्यात, ‘आपण इतक्यात नक्की मरत नाही’ ही तेव्हाची खात्री (जी खोटी नव्हती!) आणि ‘आता आपण केव्हाही मरू शकतो..’ ही मान्यता इतका प्रवास घडलेला आहे. त्यामुळे मध्यंतरी लॉ कॉलेजवरच्या ‘पद्मा फूड्स’च्या कॉफी अड्डय़ावर एकटाच बसलो असताना सहज स्वत:च्याच मनाला विचारलं, ‘काय रे बाबा, तेव्हा काही न विचारताही तू ते तसं म्हणाला होतास. आज आता मीच तुला विचारतो, की आजचं तुझं म्हणणं काय आहे?’ आणि गंमत म्हणजे जराही खळखळ न करता त्यानं मलाही सांगितलं आणि परस्पर मृत्यूलाही..

नको मला चाहूल तुझी देऊ येण्याची
नको कळाया घटना मज माझ्या जाण्याची..

एकांतातील विजनवेळ सोबती असू दे
जो मातीचा घडला तो मातीस मिळू दे

नको दिसाया मला कुणाची व्यथा.. आसवे
अशा निरामय मरणालाही.. भाग्य हवे .

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2013 1:01 am

Web Title: yenar tu by sudhir moghe
Next Stories
1 समस्यापूर्ती
2 परछाईयाँ
3 एक समूर्त भावकाव्य
Just Now!
X