मनोहर पारनेरकर – samdhun12@gmail.com

प्रथम हा लेख मला का लिहावासा वाटला याबद्दल दोन शब्द..

pune dispute within congress marathi news
पुणे काँग्रेसमधील मानापमान नाट्य सुरूच
Buddhism, Renovation of Buddhist Stupa at Karnataka
२५०० वर्ष जुन्या मौर्यकालीन बौद्ध स्तूपाचे पुनरुज्जीवन; का महत्त्वाचे आहे हे स्थळ?
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
chandrapur s 19 Month Old Survi Salve Enters India Book of Records
दीड वर्षाची सुरवी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या वैशिष्ट्य…

सप्टेंबर २०१५ मध्ये मला जरा जास्तच कलारसिक (अशा प्राण्यांना इंग्रजीमध्ये विनोदानं ‘कल्चर व्हल्चर’ असं म्हणतात.) अशा माझ्या तामिळ मित्राचा फोन आला. त्याने मला त्याच्या जराशा अभिमानमिश्रित आव्हानात्मक आवाजात जे काही सांगितलं ते थोडक्यात असं : त्याने आठवडय़ापूर्वी चेन्नईमध्ये एक विशेष असा सांस्कृतिक कार्यक्रम ऐकला. टी. एस. वेंकोबा नाईग या ‘अभंगसम्राटा’ने लोकप्रिय केलेल्या १४ अभंगांचा तो कार्यक्रम होता. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिकीट लावून झालेला हा कार्यक्रम अगदी हाऊसफुल्ल गेला होता. यानंतर माझ्या मित्राने मला विचारलेला खोचक प्रश्न असा.. ‘आधुनिक तामिळनाडूच्या सांस्कृतिक जगात आज अभंगाला जे स्थान आहे त्याच्या निम्म्यानं तरी गौरवपूर्ण स्थान या भक्तिसंगीत प्रकाराची मातृभूमी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात सध्या आहे का?’ त्यावेळेस जरी या प्रश्नाचं उत्तर द्यायचं मी टाळलं तरी या विषयाचा गंभीरपणे पाठपुरावा करायचा आणि शोध घ्यायचा असं मी मनात पक्कं ठरवलं. हा लेख जो तुम्ही आता वाचणार आहात, तो याच शोधाचा परिपाक आहे.

अभंग आणि हरिकथा या मराठी भक्ती परंपरेच्या दोन महत्त्वपूर्ण धारांचा गेल्या तीनशे वर्षांत तामिळनाडूत चांगलाच प्रसार झालेला आहे. माझ्या मते, महाराष्ट्राकडून तामिळनाडूला मिळालेला हा एक अत्यंत समृद्ध सांस्कृतिक ठेवा आहे. हरिकथा हा या लेखाचा विषय नाही, पण अभंगांची परंपरा आजही तामिळनाडूमध्ये महाराष्ट्रापेक्षा जास्त जोमाने दुमदुमते आहे असं दिसतं.

वर मी जी निरीक्षणं नोंदवली आहेत ती पूर्णपणे समजून घ्यायची असतील तर त्याकाळच्या मराठा इतिहासाची वाचकाला कल्पना असली पाहिजे. व्यंकोजी ऊर्फ ऐकोजी भोसले (१६३०-८४) यांनी तत्कालीन तंजावरच्या नायक घराण्याच्या राजाचा पराभव केला आणि १६७६ साली आपलं राज्य स्थापन केलं. (व्यंकोजी हे शहाजीराजे आणि तुकाबाई यांचे पुत्र असून, छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ होते.)

तंजावरचे मराठा घराणे हे अनेक बाबतीत अद्वितीय होते. तंजावरचा जवळजवळ प्रत्येक राजा हा शिक्षित होता, ज्ञानी होता. संगीत, नृत्य, नाटक, साहित्य, भविष्य, वैद्यकी अशासारख्या अनेक कला आणि शास्त्रांत तो पारंगत असायचा. (महाराष्ट्र किंवा उत्तर भारतातील बहुतेक राजांच्या बाबतीत असं म्हणता येणार नाही.) यासंदर्भात प्रसिद्ध संगीतज्ञ वामनराव देशपांडे लिहितात, ‘कोल्हापूर किंवा सातारा येथील भोसले घराण्यातल्या किंवा पुण्यातील पेशव्यांच्या घराण्यातल्या कुणाला कविता किंवा नाटक यांची आवड नव्हती किंवा त्यांच्यात कुणी संगीत कलाकार नव्हता. कुठल्याही विज्ञान शाखेचा किंवा शास्त्राचा अभ्यास केलेला नव्हता. याचा परिणाम म्हणजे १८० र्वष (१६७५-१८५५) तंजावर हे कर्नाटक संगीत आणि नृत्याचं तामिळनाडूतील सर्वात महत्त्वाचं केंद्र झालं.’

तंजावरच्या राजांनी स्थानिक तामिळ आणि तेलगु संस्कृतीत पूर्ण मिसळून जाऊन ती आत्मसात केली. (त्यावेळी तेलगु ही राजभाषा होती; तामिळ नव्हे!) आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आणि त्यांच्या पदरी असलेल्या संगीतकारांनी महाराष्ट्रातील बरेच संगीत कलाप्रकार कर्नाटक संगीताच्या मुख्य प्रवाहात आणले. ‘हरिकथा कलाक्षेपम्’ (जे महाराष्ट्रात कीर्तन किंवा हरी कीर्तन म्हणून ओळखलं जातं.), भजन आणि सर्वात लोकप्रिय अभंग हा प्रकार हे त्यातील प्रमुख होते. (मराठी संत कवींनी वापरलेले साकी, दिंडी, ओवी आणि श्लोक हे काव्यप्रकार हरिकथा कलाक्षेपम्मध्ये सामावून घेतले गेले आहेत.)

दक्षिण भारतात- विशेषत: तामिळनाडूमध्ये भक्ती परंपरा आणि मुख्यत्वेकरून हरिकथेचा प्रसार करण्यामध्ये समर्थ रामदासस्वामींनी (१६०८- ८१) अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. समर्थ १६७७ साली व्यंकोजीराजे भोसले यांना तंजावरमध्ये भेटले आणि त्यांना आशीर्वाद दिला होता, ही गोष्ट अनेकांना माहिती नसेल. व्यंकोजीराजांच्या सक्रीय पाठिंब्यावरच त्यांनी समर्थ संप्रदायाचा पहिला मठ- भिमाजी गोस्वामी मठ- तंजावरमध्ये स्थापन केला. त्यानंतर तंजावरच्या आसपासच्या क्षेत्रात समर्थाचे पट्टशिष्य भीमास्वामी शहापूरकर यांनी समर्थ संप्रदायाचा विकास आणि प्रसार केला.

अठराव्या शतकाच्या सुरुवातीला तंजावरमध्ये अभंग या कलाप्रकाराचं आगमन झाल्यानंतर तामिळनाडूमध्ये अनेक प्रतिभावान अभंग गायक निर्माण झाले. सुंदरा स्वामीगल, प्रख्यात मृदुंगवादक नारायणस्वामी आप्पा, रामदोस स्वामी (हे मृदुंगवादक दोस स्वामीगल म्हणून ओळखले जायचे.), तुकाराम राव यांसारखे उत्तम अभंग गायक निर्माण झाले. पण टी. एस. वेंकोबा नाईग (१९१२- ८६) हे त्या सर्वाचे शिरोमणी असून, ते ‘अभंगसम्राट’ म्हणून प्रसिद्ध झाले. सुरुवातीस ते एका बँकेत कारकून होते. पण नंतर त्यांनी सुप्रसिद्ध अशा सरस्वती महाल लायब्ररीमध्ये अभ्यास करून ते मराठीचे पंडित झाले. तथापि अभंगाच्या या सम्राटाला लवकरच आपल्या जीवितकार्याची जाणीव झाली आणि ते पूर्णवेळ अभंग गाणारे कलाकार झाले. लेखाच्या अगदी सुरुवातीला केलेल्या उल्लेखावरून वाचकांना व्यंकोबा नाईग यांच्या थोरपणाची आणि लोकप्रियतेची कल्पना आलीच असणार.

तामिळनाडूमध्ये आजही अभंग गाणारे अनेक कलाकार आहेत. परंतु ज्यांनी अभंगांची गौरवशाली परंपरा जिवंत ठेवली आणि ती वृद्धिंगत करीत आहेत अशी चार-पाच जी उल्लेखनीय नावे आहेत, ती अशी : अरुणा साईराम, ओ. एस. अरुण, रंजनी-गायत्री भगिनी आणि तुकाराम गणपती महाराज म्हणून प्रसिद्ध असलेले कडयन्नलूरमधील तामिळ कलाकार. या सर्व कलाकारांचा इथे उल्लेख करण्याचं कारण म्हणजे ते आजमितीला अभंग हा प्रकार अतिशय परिणामकारक रीतीने सादर करीत असून, त्यांचे देशभरात आणि विदेशातही कार्यक्रम होत असतात. तुकाराम गणपती महाराजांबद्दल मला काही कल्पना नाही, पण इतर चारही जण कर्नाटक शास्त्रीय संगीतशैलीतील मातब्बर गायक आहेत. त्यातल्या अरुणा साईराम याच एकटय़ा मुंबईकर आहेत. त्यांना उत्तम मराठी येते. त्यांनी लहानपणी पंढरपूरची वारीही केलेली आहे. त्या नेहमी त्यांच्या कार्यक्रमाची सांगता एखादा अभंग गाऊन करतात. रंजनी-गायत्री भगिनी या अत्यंत प्रतिभावान शास्त्रीय गायक असून, व्हायोलिनवादकही आहेत.

तुम्हाला शास्त्रीय संगीताची बऱ्यापैकी समज असेल तर तुम्ही त्यांच्या संगीताचा चांगल्या रीतीने आस्वाद घेऊ शकता. ओ. एस. अरुण हे एक अष्टपैलू कलाकार आहेत आणि दक्षिण भारतात अभंग लोकप्रिय करण्यात त्यांचा फार मोलाचा वाटा आहे. या गटात तुकाराम गणपती महाराज हे सर्वात रंगीले असून, त्यांचे दक्षिणेत आणि महाराष्ट्रातदेखील असंख्य चाहते आहेत. मुळात तामिळ असलेले हे महाराज महाराष्ट्रीय वारकरी दिसतातच, पण त्याहीपेक्षा ते एखाद्या हरीभक्तपरायण मराठी कीर्तनकारासारखे अधिक वाटतात.

जाता जाता..

तंजावर मराठा राजांच्या उदार मनाची आणि सर्वसंग्राहकतेची दोन उदाहरणं.. (१) शहाजीराजे- दुसरे (१६८४- १७१२) यांनी ‘पल्लकी सेवा प्रभंदम’ नावाचा एक ऑपेरा तेलगु भाषेत लिहिला होता. स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती (१९६२-६७) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांनी हा ऑपेरा बघितला तेव्हा ते आश्र्चयचकित होऊन म्हणाले होते.. ‘‘तामिळनाडूवर राज्य करणारा एक मराठी राजा तेलगु भाषेतला पहिला ऑपेरा लिहितो, हे आश्चर्यकारक आहे.’’

(२) सरफोजीराजे दुसरे (१७९८- १८३२) यांनी एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला कीर्तनाचार्य रामचंद्रबुवा मोरगांवकर आणि त्यांचे चिरंजीव विष्णुबुवा यांना महाराष्ट्रातून बोलावलं आणि तंजावरमध्ये स्थायिक व्हायला उत्तेजन देऊन त्यांना राजाश्रय दिला. मोरगावकर पिता- पुत्रांनी चातुर्मास्य कीर्तनाची परंपरा तंजावरमध्ये सुरू केली, जी आजतागायत चालू आहे असं मला माझ्या एका तामिळ मित्राने सागितलं. मोरगावकर बुवांना त्यावेळचे सर्वोत्तम  मृदुंगवादक नारायणस्वामी आप्पा हे साथ करत असत.

महाराष्ट्रापेक्षा तामिळनाडूमध्ये अभंगाला चांगले दिवस दिसताहेत यावर आपला मित्र सोपान याने खूप रंजक भाष्य केलं. तो म्हणाला, ‘‘एकेकाळी आपले त्यावेळचे राज्यकर्ते असलेल्या इंग्रजांचा क्रिकेट हा खेळ अनधिकृतपणे का होईना, स्वतंत्र भारताचा ‘राष्ट्रीय’ खेळ झालाय. आणि हे इंग्रज जर मान्य करतात, तर मग तामिळनाडूमध्ये अभंगाला चांगले दिवस येत असतील तर मराठी माणसाने का बरं वाईट वाटून घ्यावं? शेवटी तामिळ काय, मराठी काय, आपण सारे भारतीयच तर आहोत ना?’’

वेल सेड सोपान! पोहे हा मुळात मराठी खाद्यपदार्थ मध्य प्रदेशातील माळवा भागात ‘छा गया है’ असं मला जेव्हा मित्र सांगतात तेव्हा माझी प्रतिक्रियासुद्धा सोपानसारखीच होते.

तळटीपा :

(१) काही प्रसिद्ध तामिळ कलाकारांनी सादर केलेले अभंग मराठी भक्तिसंगीताच्या चाहत्यांना ऐकायला नक्कीच आवडतील असं मला वाटतं. सुदैवानं या गायकांचे मराठी उच्चार बऱ्यापैकी चांगले असून, अभंगांच्या मूळ शब्दांमध्ये त्यांनी बदल केलेला नाहीये. पुढे त्यांनी गायलेल्या अभंगांची यादी दिली आहे. प्रत्येक कलाकाराने एक अभंग गायला आहे. तुम्हाला युटय़ुबवर हे अभंग ऐकता येतील. यातील भारतरत्न सुब्बुलक्ष्मी (१९१६-२००४) सोडल्या तर बाकी कलाकार हयात असून कार्यरत आहेत. वर उल्लेख केलेली यादी अशी : (१) एम. एस. सुब्बुलक्ष्मी- ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी’- संत तुकाराम- राग यमुना कल्याणी; (२) रंजनी आणि गायत्री भगिनी- ‘आनंदाचा भोग घालुनी आसन’- संत नामदेव- राग मारवा; (३) ओ. एस. अरुण- ‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल’- संत नामदेव- जोगिया आणि बिभास रागांचं मिश्रण; (४) अरुणा साईराम- ‘ओंकार स्वरुपा तुज नमो’- संत एकनाथ- राग उन्नई अल्लाल; (५) तुकाराम गणपती महाराज यांनी गायलेल्या अभंगांचा तपशील स्पष्ट नसल्यामुळे तुम्ही त्यांचा युटय़ुबवर उपलब्ध असलेला कोणताही अभंग ऐकू शकता.

(अभंगांपुढे दिलेल्या रागांच्या नावांबद्दल जाणकारांमध्ये मतैक्य असेलच असे नाही. सर्वसाधारणपणे वाचकाची अभंग या गानप्रकाराशी तोंडओळख आहे असे गृहीत धरून हा लेख लिहिला आहे.)

शब्दांकन : आनंद थत्ते