औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या आठव्या ‘अजंता एलोरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’मध्ये सुप्रसिद्ध सिने अभ्यासक अरुण खोपकर यांनी ‘कलर इन सिनेमा’ या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. सिनेमा किती पद्धतीने पाहता येतो हे सांगताना त्यांनी केलेल्या विवेचनाचा संपादित अंश..
रंगांची सुरुवात होते दृष्टीच्या जन्मापासून. मूल जेव्हा गर्भाशयात असतं तेव्हा त्याच्या डोळय़ांचा पूर्ण विकास झालेला असतो; पण ते उघडलेले नसतात. ज्यावेळी ते गर्भाशयातून बाहेर येतं, तेव्हा किती प्रकाश आत घ्यायचा आणि किती नाही याला अनुसरूनच काम करणारी डोळय़ांची यंत्रणा अनुनभवी असते. डोळय़ावर येणारा लहानशा मेणबत्तीचा किंवा पणतीचा प्रकाशही त्याला सहस्र सूर्यापेक्षा तेजस्वी वाटतो.

मूल गर्भाशयातून बाहेर येतं तेव्हा उष्णता, हवा, तऱ्हतऱ्हेचे आवाज, गंध बाळाच्या ज्ञानेंद्रियांवर हल्ला चढवतात. सर्व ज्ञानेन्द्रियांत डोळय़ांच्या मज्जातंतूंची संख्या सर्वाधिक असते. डोळय़ांना प्रकाशामुळे जी वेदना होते त्यामुळे मूल रडायला लागतं. जन्मल्यानंतर मूल रडलं नाही तर त्याच्या डोळय़ांमध्ये विकृती असण्याची किंवा ते आंधळं असण्याची भीती असते. म्हणून मूल जोरानं रडलं की आप्तेष्टांच्या चेहऱ्यावर हसू दिसतं.प्रकाश आणि अंधार याच्या सीमारेषेवर मूल जन्माला येतं. हा अनुभव कितीतरी खोलापर्यंत जाणारा आणि सुप्त मनातून कधीच न पुसला जाणारा असतो. सर्व मानवी संस्कृतींमध्ये प्रकाशाचा पहिला अनुभव खूप महत्त्वाचा ठरला आहे. तो अनेक धर्माच्या, श्रद्धांच्या, संकल्पनांच्या मुळाशी आहे. त्यामुळेच सूर्योपासना, तेजोपासना याला महत्त्व प्राप्त झालं.

prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
Savitribai Phule Pune University
‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’मध्ये आता गुद्द्यांची नवी संस्कृती; विद्यार्थी, विद्यार्थी संघटनांतील हिंसक प्रकरणांमध्ये वाढ
Controversy on Ramayana
सीतेच्या हातून रावणाला गोमांस, हनुमानाचं विकृत चित्रण, विद्यापीठातील नाटकाचा वाद आहे काय?
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा

प्रकाश हा विशिष्ट धर्म आणि संस्कृतीपलीकडे जाणारा आहे. पूर्व-पश्चिम हा अक्ष – या दिशा मानवाला सूर्योदय व सूर्यास्तानं नैसर्गिकपणं जाणवल्या. दक्षिण आणि उत्तर या दिशा माणसानं नंतर विचारानं शोधल्या. हिंदूू, ख्रिश्चन, झोराष्ट्रीयन, इजिप्शियन अशा वेगवेगळय़ा धर्माच्या धार्मिक वास्तू पूर्व-पश्चिम अक्षावर बांधलेल्या दिसतात. तेजोदेवतेचा उदय पूर्वेला होतो म्हणून तिची प्रतिमा किंवा प्रतीक पूर्वेला. त्यामुळे, चर्चचं मंदिर आणि मंदिराचं चर्च असे बदल ज्या वेळेला केले जातात, त्यावेळी स्थापत्याच्या अलंकारांत बदल होतात; पण अक्ष बदलत नाही.

सिनेमा सुरुवातीला कृष्णधवल होता. सगळं जग राखी छटांमध्ये मांडलं जायचं. त्यावर प्रेक्षकांचा ‘विश्वास’ बसण्याकरता बराच प्रयत्न करावा लागायचा. उदाहरणार्थ, एका दृश्यामध्ये एका खुर्चीवर प्रकाशाचा झोत असेल तर ती खुर्ची पांढरी भासते. खुर्चीवरचा प्रकाश कमी केला तर तीच गडद राखी किंवा काळी दिसेल. त्यामुळे एका दृश्यामधली एक वस्तू किंवा एक व्यक्ती तीच आहे हे अन्य दृश्यातही ओळखता यावं यासाठी बऱ्याच गोष्टी विचारात घ्याव्या लागल्या. पायऱ्या पायऱ्यांनी प्रकाशाकडून पूर्ण अंधाराकडे जाणाऱ्या राखी स्केलमध्ये हे सगळं मांडावं लागतं.

अनेक उत्तम सिनेमॅटोग्राफरनी या राखी ‘सुरां’चे वेगवेगळे ‘राग’ व शैली निर्माण केल्या. सत्यजित राय यांचे कॅमेरामन शुब्रतो मित्रा फिल्मचं लायटिंग करताना या राखी छटांना सा, कोमल ऋषभ, शुद्ध ऋषभ, कोमल गांधार, तीव्र मध्यम इ. स्वरांची मूल्यं देत असत. त्यांनी छायाचित्रण केलेले कुठलेही दोन सीन घेतले, तर त्यातल्या राखी छटा एकमेकांशी वादी-संवादी ‘सुरां’त बांधलेल्या जाणवतात. त्यांचे चित्रपट पाहताना पार्श्वसंगीतासारखं या राखी छटांचं भावसंगीत आपल्या नकळत सतत चालू राहतं व आपल्या बदलत्या भावनांना समांतर जात असतं.

निसर्गात रंग किती महत्त्वाचे आहेत! मादी आणि नर यांच्यातलं आकर्षण, त्याचा विशिष्ट काळ व त्या काळात शरीरात होणारे बदल रंगांत व्यक्त होतात. निसर्ग रंग तीन प्रकारे वापरतो. आकर्षणाकरता, अपकर्षणाकरता आणि गोपनाकरता. वाघ, चित्ता हे प्राणी अधिकतर गवताळ प्रदेशात शिकार करतात. वाघाच्या अंगावर पट्टे असतात. साधारणपणे शुष्क गवतात लपताना वाघाच्या अंगावरील हे पट्टे गवताच्या सावलीसारखे दिसतात. वाघ तिथे सहज लपू शकतो.

हॉलीवूडच्या सिनेमात नायक – नायिकांच्या डोक्यामागे तेजाचं एक हलकं वलय दाखवलं जायचं. त्यांच्या चेहऱ्यावर विशिष्ट प्रकारच्या लाइटिंगचा उपयोग करून त्याला उभारी आणून, निमुळता करून आकर्षक केलं जायचं. इटालियन निओरिअलिस्ट सिनेमांनी ते सगळं काढून टाकलं. त्यांना सगळय़ांना सारखीच किंमत द्यायची होती. मानवतावादी व समतावादी दृष्टिकोन व्यक्त करण्याकरता, त्यांनी राखी रंगांच्या छटा अशा वापरल्या की ‘बायसिकल थिव्ज’ या चित्रपटामधल्या एखाद्या लाँग शॉटमध्ये तुम्हाला हिरो कोण आहे हे पटकन सांगता येत नाही. निओरिअलिस्ट निर्मात्याला सर्व पात्रांतली मानवता व समानता जाणवली, ती माणसामाणसांमध्ये राखी छटांचा सारखाच वाटप करून दाखवली गेली.

रंगांचा अपसरणाकरता उपयोग कसा होतो? निसर्गातले जे छोटे विषारी प्राणी असतात, त्यांना दुसरा कोणीतरी सहज गिळून टाकण्याची शक्यता असते. त्यांचे रंग नेहमी अधिक भडक व सहज डोळय़ांत भरणारे असतात. ते आपल्या रंगांतूनच जाहीर करतात की, मी एक विषारी टोळ आहे किंवा मी विषारी बेडूक आहे किंवा मी विषारी साप आहे. त्यांचे रंग असतात.

माणूस जेव्हा संस्कृतीत रंग वापरू लागला, तेव्हा निसर्गातली रंगरचना घेऊनच तो तिचा वापर करू लागला. शेवटी तो निसर्गाशीच जोडलेला आहे. You are wired by Nature. How can you go against it ? त्यामुळे, निसर्गातून रंग घेऊन, निवड करून, त्यांत काही बदल करून रंगकला मांडाव्या लागतात.

एका फ्रेंच विचारवंतानं रंगांच्या तीन भाषा मानल्या आहेत. त्यातली एक आहे ‘दैवी रंगभाषा’. तेज हा ईश्वराचा अवतार आहे असं म्हणताना तेज ही संकल्पना असते. जेव्हा ती प्रत्यक्षात वापरली उतरते, उदा. धर्मगुरूची शुभ्र वस्त्रं, मग झाली ‘धार्मिक रंगभाषा’. पीतांबराचा रंग, वधूची साडी, अंत्यसंस्कारातले रंग ही सगळी रंगांच्या धार्मिक भाषेची उदाहरणं आहेत. दैनंदिन जीवनामध्ये रंगांचा वापर या दोन्ही रंगकभाषांना धरूनच केला जातो.
लाल, हिरव्या आणि निळय़ा रंगांच्या प्रकाशाच्या मिश्रणातून कोणत्याही रंगाचा प्रकाश निर्माण करता येतो. यांना प्रकाशाचे प्राथमिक रंग म्हणतात. तसेच लाल, पिवळा व निळा पदार्थाच्या रंगांतून कोणताही रंग निर्माण करता येतो. यांना द्रव्यांचे प्राथमिक रंग म्हणतात. यांच्या जननशक्तीमुळे त्यांना रंगविचारात खास महत्त्व आहे.

तांबडा रंग आहे, तो प्राण्यांच्या रक्ताचा रंग आहे. त्यामुळे तो प्राणीजगताशी संबंधित विविध गोष्टी व्यक्त करतो. उदाहरणार्थ, उत्तरेकडील अनेक भागांत नववधूची साडी लाल रंगाची असते. याला कारण काय, तर नववधू ही नवीन, ताज्या रक्ताला जन्म देणार आहे. महाराष्ट्रात एके काळी विधवा स्त्रियांनी विटक्या लाल रंगाची साडी नेसायचा प्रघात होता. विधवा रक्त पुढे प्रवाही ठेवणार नाही. त्यामुळे जो सुकलेल्या रक्ताचा रंग आहे, तो तिने तिच्या अंगावर बाळगावा असं सांगितलं जात असे.

हिरवा रंग मुख्यत: वनस्पतींचा रंग आहे. या रंगाची बांधिलकी, समृद्धी किंवा वृद्धीशी आहे. निसर्ग, वनश्री ही हिरवीच असते. निळय़ा रंगाला विस्तार सहज सामावून घेता येतो. मग तो समुद्र असो की आकाश! अथांग पसरलेला असूनही त्याचा बघणाऱ्याच्या डोळय़ांना त्रास होत नाही. तो सगळय़ांना बोलावून घेतो, सामावून घेतो, स्वागत करतो. त्याला विस्तार हवा असतो. आक्रमण नको असतं.

ज्यावेळी दोन प्राथमिक रंग एकत्र येतात आणि त्यातून जो नवीन रंग तयार होतो, त्याला दुय्यम रंग म्हणतात. दुय्यम रंग आपल्या आई आणि वडिलांची वैशिष्टय़ं घेऊन येतो. लाल आणि पिवळा रंग मिसळल्यास, त्यातून नारंगी रंग मिळतो. त्या नारंगी रंगात काही वैशिष्टय़ं लाल रंगाची तर काही पिवळय़ा रंगाची असतात. अगदी दोन्हीकडील क्रोमोझोम्स घेऊन आल्यासारखा रंगाचा जन्म होतो.


रगांच्या वेगवेगळय़ा बांधिलकी असतात. रंग एकच; पण अर्थ अनेक! सोने हा जगात असा एकच धातू आहे, जो सगळय़ात शुद्ध स्वरूपात सापडतो. हा चकाकणारा धातू आहे. त्यामुळे सगळय़ा धर्मात, सगळय़ा संस्कृतींमध्ये त्याला एक वेगळं महत्त्व आहे. त्याच्या पिवळय़ा रंगाच्या अनेक छटा आहेत. पिवळा रंग जसा सोन्याचा, तसा विष्ठेचाही असतो. किंवा सडणाऱ्या पानांचा सुद्धा. म्हणजे, एका रंगाचा एकच अर्थ- असंही नसतं. त्या रंगाच्या छटा, त्या रंगाची दुसऱ्या कुठल्या रंगाबरोबरची संगत इ. गोष्टींनी त्या रंगाची किंमत एका विशिष्ट संदर्भ चौकटीत करता येते.

कुठलीच रंगसंस्कृती स्वत:ला नीच/ हीन समजत नाही. गोऱ्या संस्कृतीतील लोक काळय़ा, पिवळय़ा रंगाच्या लोकांना हीन मानतात. मग आफ्रिकेतला कृष्ण कातडीचा माणूस काय करेल? त्यानं काय केलं, की मानवजन्माची कथाच वेगळय़ा पद्धतीने रचली! ज्यावेळी देवानं पृथ्वी घडवली, त्यावेळी माणसांना माती भाजून तयार केलं गेलं. पांढरा माणूस कच्चा निघाला. त्याच्यात काहीच दम नव्हता. म्हणून देवानं माती जरा जास्त भाजली व निमगोरी माणसं बनली. हे गोऱ्यांपेक्षा जरा बरे; पण टणक, टणटणीत नाहीतच. मातीतून जो तिसरा माणूस भाजला, तो काळाकुट्ट झाला. तो व्यवस्थित भाजलेला होता, म्हणून तो खरा पूर्ण माणूस! काळे ढगच आपल्याला पाऊस देतात आणि काळी मडकी टिकतात.रंग एकमेकांच्या सहवासानं वेगळे वागतात. काळय़ा पार्श्वभूमीवर जर तुम्ही पिवळा रंग ठेवला, तर तो तुमच्यावर चाल करून येतो आहे असं वाटतं. काळय़ा पार्श्वभूमीवर निळा चौकोन काढला, तर तो काळय़ाच्या मागच्या बाजूला आहे असं वाटतं. अशा अनेक रंगधर्मामुळं, रंगांचं गणित आहे इतकं गुंतागुंतीचं आहे की त्याला साधे नियम नाहीयेत.
कुठलाही रंग हा कधीही एकटा राहू शकत नाही. एक साधा प्रयोग पाहा. एक पांढरा कागद घ्या. त्यावर दोन इंच व्यासाचं तांबडं वर्तुळ काढा.

त्याच्याकडे दोन मिनिटं एकटक बघत राहा. त्यानंतर, ज्यावेळेला तुम्ही डोळे कागदाच्या पांढऱ्या भागाकडे नेता, त्यावेळी तुम्हाला एक हिरवं वर्तुळ दिसतं. हा हिरवा रंग तुमच्या डोळय़ानं तयार केलेला असतो. तांबडा रंग पाहून जेव्हा डोळा थकतो, तेव्हा तो स्वत:च पूरक हिरवा रंग तयार करून समतोल साधतो. तेच तुम्हाला दिसणारं, पण कागदावर नसणारं हिरवं वर्तुळ.एखाद्या रंगाची गैरहजेरी ही हजेरीइतकीच महत्त्वाची आहे. एखादा उत्तम चित्रपटदिग्दर्शक प्रेक्षकांना जे रंग दाखवतो, तितकेच जे रंग लपवून ठेवतो ते रंगही महत्त्वाचे असतात. अशा लपवलेल्या आणि दाखवलेल्या रंगांबरोबर तो सतत जादूगारासारखे खेळ करत राहतो. एखादा रंग तो जेव्हा काही काळ लपवून ठेवतो आणि मग अचानक दाखवतो, तेव्हा त्या रंगाचा परिणाम तीव्र होतो.

चित्रपटातला रंग काळात प्रवास करतो. ओझु म्हणून एक जपानी फिल्ममेकर आहे. संपूर्णपणे शरण जाऊन त्याच्या पायाशी नाक घासावं, इतका तो महान दिग्दर्शक आहे. त्याच्या फ्रेम्स बह्वंशानं राखी असतात. त्यांत कमी-अधिक प्रमाणात पिवळा, निळा आणि तांबडा असे तीन रंग असतात. फक्त त्यांचं प्रमाण तो बदलत असतो. त्याच्या ‘ऑटम आफ्टरनून’ या चित्रपटातला रंगवापराचा नमुना पाहू.

एका घरात बहीण, भाऊ आणि वडील आहेत. भावाचं लग्न झालेलं आहे. बहीण एकटीच आहे. कारण तिला वडिलांची काळजी आहे. इतर लोक तिच्या वडिलांना सांगतात, की आता तिचं वय होत चाललंय, तिचं लग्न करून टाक. मुलीचं नुकसान होऊ देऊ नये म्हणून बाप मुलाला सांगतो की, तू तिच्याशी बोल. तिच्या मनात कोणी असेल तर त्याच्याशी आपण बोलणी करू. ज्यावेळी भाऊ तिला विचारतो, त्यावेळी ती सांगते की, अमुक अमुक मुलगा मला आवडतो. मग भाऊ त्या मुलाला विचारतो. मुलगा म्हणतो, की मी खूप आधी तुझ्या बहिणीला लग्नाविषयी विचारलं होतं, पण त्यावेळी ती ‘नाही’ म्हणाली. मला अजूनही तुझी बहीण खूप आवडते; पण आता मी लग्न दुसरीकडे जमवलं आहे!

ही निराश करणारी बातमी बहिणीला कळण्याच्या सीनमध्ये ओझूनं काय केलंय, की त्या मुलीला स्वेटर दिलाय तो तांबडा, शर्ट पांढरा आणि स्कर्ट काळा आहे. तिच्या आजूबाजूला पिवळा, हिरवा असे रंग अगदी लहान वस्तूंवर खेळवत ठेवले आहेत. ज्यावेळी तिला आपल्या इच्छेप्रमाणे लग्न अशक्य आहे, हे कळतं त्यावेळी तिने लाल रंगाचा ड्रेस घातलेला असतो. आपल्याला त्यावेळी फक्त तांबडा, पिवळा आणि काळा रंग दिसत असतो. निळा रंग पूर्णपणे नाहीसा झालेला असतो.

ती मुलगी आपल्या खोलीत जेव्हा एकटी उदास अवस्थेत कापड मोजायची टेप बोटांना विमनस्कपणे गुंडाळत बसलेली असते, तिला पाठमोरी पाहताना, तिचे काळे केस आणि तिच्यापलीकडे एक भला मोठा निळय़ा शेडचा टेबल लॅम्प ठेवलेला दिसतो. ती खिन्नपणे बसलेली आहे. निळा रंग ज्याक्षणी फ्रेममध्ये येतो, त्यावेळी वाटतं की आईच्या कारुण्यासारखा तो निळा प्रकाश तिला कुशीत घेतो आहे आणि सांगतो आहे, ‘बाई असंच असतं आयुष्य! काय करणार!’

पश्चिमेकडे रंगाचा कल्पकतेने वापर करणारे प्रारंभीचे दिग्दर्शक म्हणजे अंतोनिओनी व गोदार्द. त्यांनी रंग अतिशय हिंस्रपणे वापरला. अंतोनियोनीचा पहिला रंगीत चित्रपट म्हणजे ‘रेड डेझर्ट’. त्या चित्रपटामध्ये त्यानं ५०० मिमीच्या लेन्स वापरल्या होत्या. त्यामुळे अवकाशाची खोली कमी होऊन ते सपाट होतं. त्यामुळे रंगाचं रंगत्व तुम्हाला जाणवतं. रेखीवपणे दिसणाऱ्या वस्तूच्या मागच्या आणि पुढच्या वस्तू रंगीत सावल्यांसारख्या दिसतात. आपल्याला नेहमी दिसते ती तांबडी ‘खुर्ची’ आणि इथे चित्रपट दिग्दर्शक तुम्हाला दाखवतो ती ‘तांबडी’खुर्ची. म्हणजे तिचा खुर्चीपणा दिग्दर्शकाला दाखवायचा नसतो, त्याला लालपणा दाखवायचा असतो!

जेव्हा रंग जाणीवपूर्वक वापरला जातो, तेव्हापासून खऱ्या अर्थानं रंगीत सिनेमाचा जन्म होतो. ज्यावेळेला तुम्ही चित्रपटातला रंग बघता, त्यावेळेला जे दिसतं, त्याबरोबरच दिग्दर्शकानं काही रंग लपवलेत का? किती वेळ लपवलेत? या सगळय़ा गोष्टी साकल्यानं जाणवायचा सराव व्हायला लागतो. चित्रपटातला रंग हा संगीतासारख्याच रंगधुना व रंगबंदिशीत बांधलेला असतो. रंगांचं असं संगीत ज्याला चित्रपटात खेळवता येतं, तो खरा चित्रपट दिग्दर्शक. बाकीचे बडबडे फक्त गोष्टी सांगतात.

एका चित्रपटात कितीतरी चित्रपट दडलेले असतात. एक रंगांचा चित्रपट. एक अवकाशाचा, तर एक गतीचा. एक ध्वनीचा, एक कथानकाचा. एक अभिनय कौशल्याचा- असे वेगवेगळे चित्रपट! पाहणाऱ्याची नजर जितकी खुललेली असेल, तितके ते एकत्र दिसू व ऐकू येतात. जोपर्यंत तुमची नजर खुलत नाही, तोपर्यंत तुमच्यासमोर जगातला सर्वोत्कृष्ट चित्रपट आला तरी तो तुम्हाला दिसणार नाही.

(शब्दांकन- अनुजा क्षीरसागर)
arunkhopkar@gmail.com